२२ फेब्रुवारी २०१४

लोक सत्ता नि शाही आणि पुरवण्या

'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या स्थानिक पुरवण्या (मुंबई वृत्तान्त, पुणे वृत्तान्त, नाशिक वृत्तान्त, इत्यादी) बंद करण्यात येणार आहेत. हा निर्णय प्रिय वाचकांपर्यंत पोचवण्यात आला होताच. आणि वाचकांनी आता या निर्णयाचं प्रातिनिधिक स्वागत केलं असावं, याचा दाखला देण्यासाठी 'लोकमानस' या सदरामध्ये दोन वाचकांची पत्रं काल (२१ फेब्रुवारी) छापण्यात आल्येत. (ही पत्रं पुणे आवृत्तीतच सापडली).

स्थानिक पुरवण्या बंद करण्याचा निर्णय वर्तमानपत्रातून अधिकाधिक वाचनीय आणि ज्ञान देणारा मजकूर पुरवण्यासाठी झाला असल्याचं यावरून दिसू शकतं. पण आता आपण 'लोकसत्ते'च्याच १५ फेब्रुवारीच्या अंकातल्या अग्रलेखाकडे वळू. 'माध्यम स्वातंत्र्याचा 'अर्थ'' अशा शीर्षकाच्या या लेखामध्ये भारतातील माध्यम व्यवहार कसा ढासळतीकडे आहे याचा लेखाजोखा एका आंतरराष्ट्रीय अहवालाच्या निमित्ताने घेतलाय. या अग्रलेखाचा सारांश तिथेच छापलेला आहे, तो असा :
आरएसएफ (रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स) या स्वयंसेवी संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भारतातील माध्यम स्वातंत्र्याची अवस्था अत्यंत 'अवघड' आहे. आणि त्याचबरोबर जे दाखवायचे त्यापेक्षा जे लपवायचे त्याचाच अधिक विचार करण्याची एक अळीमिळी-गुपचिळी स्वरूपाची धनधार्जिणी संस्कृती माध्यमांत फोफावली आहे. ती तर अधिक घातक आहे.
आता या नोंदीतला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा यांची सांगड घालू. स्थानिक पुरवण्या बंद करण्याचा निर्णय फक्त वाचकांना वाचनीय मजकूर पुरवण्यासाठी आहे, यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. मुळातच 'लोकसत्ते'च्या वर्तुळाचा व्यास गेली काही वर्षं कमी होत चाललाय, हे बातम्या कुठकुठल्या ठिकाणच्या आहेत हे तपासत गेलं तर आपल्यासारख्या सामान्य वाचकांच्याही लक्षात येऊ शकतं. आणि सर्वज्ञानी नसलेल्या काही साध्या पत्रकारांकडे चौकशी केली तर आपल्याला असंही कळू शकतं की, गेल्या काही वर्षांमधे या वर्तमानपत्राने आपल्या काही आवृत्त्यांची कार्यालयंही अशीच आकसत आणली, तालुका व गाव पातळीवरती काम करणारे 'स्ट्रिंजर' बातमीदार शेकड्यानं कमी केले. किंवा पूर्वी निघणारी टॅब्लॉइड आकारातली 'लोकमुद्रा' ही सांस्कृतिक विषयांना वाहिलेली पुरवणी बंद का झाली, याचंही कारण याच वृत्तपत्राचे एखादे संपादक खाजगीत आपल्या सहकाऱ्यांना सांगून गेले असतील, तर ते आपल्याला कळू शकतं. का केली पुरवणी बंद, तर कॉस्ट-कटिंगमुळे. 'लोकमुद्रा', 'बालरंग', 'हास्यरंग' या सुट्या पुरवण्या एकेक पानाच्या करून 'लोकरंग' या रविवारच्या मुख्य पुरवणीत अॅडजस्ट करण्यात आल्या. या घडामोडी काही वर्षांपूर्वीच घडलेल्या आहेत. या घडामोडींचाच पुढचा भाग म्हणून स्थानिक पुरवण्या बंद करण्याचा निर्णय असावा, अशी एक शंका आपण इथे व्यक्त करू. कारण स्थानिक पुरवण्याही आधी सहा पानी होत्या, त्या नंतर चार पानी झाल्या आणि आता त्यांची पानं मुख्य अंकात अॅडजस्ट करण्यात येणारेत, म्हणजे मुख्य अंक बारा पानांवरून सोळा पानी होईल.

लोकसत्तेच्या ज्या अग्रलेखाचा उल्लेख वरती आलाय, त्यात असं म्हटलंय पाहा :
माध्यमांवर विविध दडपणे असतात. सरकार वा सत्ताकांक्षी किंवा दहशतवादी, बंडखोर यांच्याकडून येणारी दडपणे दृश्य स्वरूपात मोडतात. अर्थव्यवस्थेतून येणाऱ्या बंधनांबाबत मात्र फारसे बोलले जात नाही. ही एक वेगळ्याच प्रकारची सेन्सॉरशिप माध्यमांना सातत्याने भोगावी लागत आहे. मालक-चालक आणि माध्यमांना जाहिराती देणारे कॉर्पोरेट जगत यांचे आर्थिक हितसंबंध यांतून विकाऊवृत्तांची एक वेगळीच संस्कृती निर्माण झाल्याचा अंदाज चाणाक्ष वाचकांना केव्हाच आला आहे. पण जे दाखवायचे त्यापेक्षा जे लपवायचे त्याचाच अधिक विचार करण्याची एक अळीमिळी-गुपचिळी स्वरूपाची धनधार्जिणी संस्कृती माध्यमांत फोफावली आहे.
या अग्रलेखातल्या बाकीच्या मुद्द्यांबद्दल काय बरं-वाईट असं बोलणं हा या नोंदीचा उद्देश नाही, पण माध्यम व्यवहारातल्या आर्थिक तणावाचा जो उल्लेख त्यात आलाय, तो तणाव स्थानिक आवृत्त्या बंद होण्यामागे असणं अगदी साहजिक आहे, पण या तणावाला झूल दिलेय ती मात्र वाचनीय मजकूर पुरवण्याच्या हेतूची. हेही अर्थातच साहजिक आहे. आणि आपण चाणाक्ष वाचक नसूनही हे लक्षात आलं, मग चाणाक्ष वाचकांना अजून किती काय काय लक्षात आलं असेल.

पण वर उल्लेख केलेल्या वाचक-पत्रांमधे या निर्णयाचं समर्थन करताना संबंधित वाचकांनी काही मुद्दे थोडक्यात मांडलेले आहेत. उदाहरणार्थ, एक वाचक असं म्हणतात :
आपला स्थानिक पुरवणी (वृत्तान्त) बंद करण्याचा निर्णय चांगला आहे. वर्तमानपत्रांच्या स्थानिक आवृत्त्या अजिबात वाचवत नाहीत. स्थानिक वार्ताहर हे तेथील नेत्यांच्या आणि नोकरशहांच्या सतत दबावाखाली असतात. वार्ताहराचेही स्थानिक हितसंबंध निर्माण झालेले असतात. त्याचे प्रतिबिंब सुमार दर्जाच्या स्थानिक आवृत्त्यांमध्ये सतत उमटत असते. खरी गरज उत्तम दर्जाचे वार्ताहर नेमणे आणि सातत्याने ठरावीक कालावधीनंतर त्यांना प्रशिक्षण देणे ही आहे.
यातला मुद्दा आपण 'स्थानिक' कशाला ठरवतो यावर अवलंबून नाही का? म्हणजे भारतीय इंग्रजी कोत्या माध्यमांच्या दृष्टीने मराठी माध्यमं 'स्थानिक'मधे मोडतील. मराठीत आता कोणाच्या दृष्टीने काय स्थानिक ठरेल काही कळत नाही. पण वरच्या पत्रातला मुद्दा अगदीच गंभीरपणे घ्यायचा तर जगभरातलीच अनेक वर्तमानपत्रं नि वृत्तवाहिन्या नि मासिकंही बंद करण्याची अपेक्षा ठेवावी लागेल, कारण पत्रात उल्लेख केलेले दबाव यातल्या सगळीकडेच सापडतील.

स्थानिक आवृत्त्या वाढत गेल्यामुळे त्या त्या प्रदेशातल्या बातम्या तिथल्या तिथेच खेळत राहतात नि दुसऱ्या प्रदेशातल्या वाचकांपर्यंत त्यातल्या आवश्यक बातम्याही पोचत नाहीत, अशी एक तक्रार करतात लोक, पण स्थानिक पुरवण्या बंद करण्याचा निर्णय केवळ अशा बातम्या सगळीकडे सुरळीत पसराव्यात एवढ्यापुरताच आहे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. मुळात अहमदनगरमधल्या सोनईला गेल्या वर्षी जानेवारीत काय झालं, याची बातमी आपल्या कथित राज्यस्तरीय वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावरून वाचकांपर्यंत पोचली होती काय? किंवा अंगणवाडी सेविका राज्यभर कसलं काय आंदोलन कशासाठी करत होत्या, हे कितपत मोठ्या प्रमाणात या कथित राज्यस्तरीय वृत्तपत्रांमधून वाचकांपर्यंत पोचलं? पण टोलचं मुंबई, कोल्हापूर, पुणे इथलं आंदोलन मात्र गाजलं. हे का होतं? कुठल्या भागांमधल्या बातम्यांना प्राधान्य दिलं जातं? तसंच ते का दिलं जातं? आपले ग्राहक कोण आहेत, यावरच हे ठरवलं जाणार असेल तर मग उगाच लोकशाहीची सेवाबिवा कशाला मधेच आणायची. (वर उल्लेखित एका पत्राचं शीर्षक ''लोकसत्ता'द्वारे लोकशाहीची सेवाच' असं दिलंय.)

याचं एक अगदी थोडक्यात छोटंसं उदाहरण पाहू. आत्ताच्या पाच फेब्रुवारीला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या कॉम्प्लेक्समधे, आजूबाजूच्या गावांमधून काही किलोमीटरांचे प्रवास करून साधारण साठ-सत्तर अंगणवाडी सेविका नि कर्मचारी बायका घुसल्या नि त्यांनी आपलं थकित मानधन द्यावं यासह निवृत्तीवेतनाची मागणी मांडत घोषणा दिल्या. ही छोटीशी बातमी साहजिकपणेच तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रांमधे येईल किंवा राज्यस्तरीय वर्तमानपत्रांच्या स्थानिक पुरवणीत येईल. अशा छोट्या छोट्या बातम्या येत येत राज्यस्तरीय वर्तमानपत्रात कधीतरी याची मोठी दखल आपसूक घेतली जाते. किमान तशी आशा निर्माण होते. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या टोल प्रकरणाएवढ्या उचलल्या गेल्या नसल्या, तरी त्यांची दखल अशी टप्प्याटप्प्यानं घेतली गेली म्हणून जे काय थोडंफार व्हायचं ते झालं. 'लोकसत्ते'तल्याच या घडामोडींसंबंधींच्या दोन बातम्या पाहा. एक, 'विदर्भ वृत्तान्त'मधे आलेली, ही बातमी अंगणवाडी सेविकांच्याच आंदोलनासंबंधी नागपूरहून आलेली आहे. आणि दुसरी, या आंदोलनाला जे काही यश आलं असेल त्यासंबंधीची बातमी, ही अर्थातच सरकारी निर्णयाची नि मुंबईतली बातमी आहे. तर ही मुंबईतली निर्णयाची बातमी येण्यापूर्वी विविध ठिकाणांहून त्यासंबंधीच्या बातम्या येणं आवश्यक ठरतं. स्थानिक पुरवण्यांमधली पानं मुख्य अंकात घातली की हे काम आवश्यक तसं होईल असा विश्वास चाणाक्ष वाचक तर ठेवणार नाहीतच, पण आपल्यासारखे सामान्य वाचकही ठेवणार नाहीत.

वरती उल्लेख आलेल्याच पत्रांपैकी एका पत्रात म्हटलंय :
आजकाल कुठल्याही गावाला गेले की मराठी वृत्तपत्रांमधून केवळ स्थानिक बातम्यांना स्थान असते, ज्यामध्ये परगावाहून आलेल्या माणसाला अजिबात रस नसतो. त्यामुळे त्याला इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रे घेऊन आपली गरज काही प्रमाणात भागवावी लागते.
या पत्रात चुकून येऊन गेलेला मुद्दाच खरा ठरण्यासारखा आहे. वास्तवात स्थानिक बातम्यांसाठी स्थानिक पुरवण्या नि मुख्य अंक (आतली एकदोन पानं वगळता) राज्यस्तरावरचा अशी 'लोकसत्ते'सारख्या राज्यस्तरावरच्या वर्तमानपत्राची रचना. किंबहुना म्हणूनच हे राज्यस्तरीय वर्तमानपत्र म्हणून ओळखलं जातं. अन्यथा, विदर्भात 'देशोन्नती' किंवा बेळगाव-कोकण पट्ट्यात 'तरुण भारत' अशी वर्तमानपत्रं त्यांच्या वेगळ्या ओळखीनीशी आहेतच की. मग पत्रामधे केलेली तक्रार नक्की कोणासंदर्भात आहे? की, स्थानिक काही नकोच, अशा इच्छेपायी ही तक्रार आहे. कारण शेवटी हे वाचक वळतायंत ते इंग्रजी वृत्तपत्राकडे. मग गोंधळ काहीतरी वेगळाच असावा. (तो एका वर्तमानपत्रापलीकडेही गेलेला आहे अर्थातच. त्यामुळे 'महाराष्ट्र टाइम्स'च्या स्थानिक म्हणून निघणाऱ्या 'मुंबई टाइम्स', 'पुणे टाइम्स' आदी पुरवण्या बहुतेककरून जनरल एन्टरटेन्मेंट अशा सदराखाली मोडतील अशा काढल्या जातात. आणि याच नव्हे तर रविवारच्या पुरवणीतही 'मास्टहेड'खाली 'अॅडव्हर्टोरियल, प्रमोशनल अँड एन्टरटेन्मेंट फीचर' अशी ओळ रोमन लिपीत टाकण्यापर्यंत वेळ येते. किंवा एखाद्या मासिकातही अशी ओळ न छापता असंच सदर चालवलेलं सापडू शकतं, पण मराठी मासिकं तितकी वाचली जात नाहीत त्यामुळे बरंय. तरी, आपण उदाहरणार्थ 'लोकसत्ते'बद्दल बोलतोय कारण तिथे किमान लोकांपर्यंत पोचणारा चेहरा संपादकीय आहे, आणि इतरांच्या तुलनेत ते वाचनीय आहेत असंही वाचकांच्या पत्रांमधून समोर येतं, ते आपण मान्य करू. बाकी 'सकाळ'सारख्या वृत्तपत्रांनी तर मालकांचाच चेहरा मुख्यत्त्वे झळकवायला सुरुवात केलेली आहे. यात व्यक्तिगत दोषारोपांनी काहीच होणार नसल्यामुळे आपण शक्यतो संस्थात्मकच बोललोय, पण त्यातही 'लोकसत्ता'च का याचं स्पष्टीकरण या कंसात आलंय. किंबहुना बातम्यांऐवजी लेख स्वरूपातील मजकूर वाढवत नेणं ही त्यांच्याच अग्रलेखात उल्लेख केलेल्या आर्थिक तणावातून आलेली भूमिका असू शकते. बाकी, आपल्या नोंदीतला मुद्दा एका संपादकाच्या किंवा एका मालकाच्याही पलीकडे गेल्याचं चाणाक्ष वाचकांनी हेरलं असेलच. आणि आपली नोंद ही वाचक म्हणूनच केलेली आहे.)

तर, वरती उल्लेख केलेल्या एका वाचकाच्या पत्राचं शीर्षक 'स्थानिक हितसंबंधांच्या सुमार प्रतिबिंबांना रजा' असं दिलं आहे. मुळात वर्तमानपत्रामध्ये काय समाजातल्या सुमारपणाचं प्रतिबिंब पडू नये असं आहे की काय? पडू दे की सगळं काय असेल त्याचं प्रतिबिंब. आणि हे हितसंबंध 'स्थानिक'पणातच एवढे उग्र आहेत, असं भासवून घेण्याचं काय कारण? पण भास व्हायला काय कारण थोडीच लागतं! आणि 'सुमार' ह्या शब्दाबद्दल आपल्यासारख्या सामान्य नि सुमार वाचकाला जाणवलेली विशेष बाब अशी की, आपण तो जितक्या वेळा दुसऱ्याला उद्देशून वापरू तितकं आपल्याभोवती सुरक्षेचं अधिक घट्ट कवच नि वलयसुद्धा निर्माण होतं. किमान त्याचा भास तरी निर्माण करता येतो. (बहुतेक स्वतःबद्दल तो शब्द वापरल्यानंसुद्धा ते होत असेल. भारीच म्हणजे.) वास्तविक केशवसुतांनी कवितेत नोंदवलेले क्षणात नाहिसे होणारे दिव्य भास कविप्रकृतीसाठी होते. पण माहितीपिसाट युगात असले दिव्य भास कवडीमोल ठरणार, त्यापेक्षा ज्ञानाचे क्षणोक्षणी होणारे आभास बरे. त्यासाठी मग सध्या माध्यमं जोरात आहेत.

उरलेल्या क्षणांसाठी अळीमिळी-गुपचिळी बरी!

केशवसुतांच्या गावाच्या आसपास एका स्थानिक घरात लोकसत्ता (फोटो - रेघ)

१३ फेब्रुवारी २०१४

एक एस्टी व पानवलकरांची एक कथा

चंद्रपूरहून अमरावतीला जाणाऱ्या एस्टीत एक तरूण मुस्लीम बाई आणि तिचा नवरा बसलेत. बाईनं फिकट पिवळसर एकूणच थोडा फिकटलेला ड्रेस घातलाय. त्यांना एक मूलसुद्धा आहे. सुरुवातीला सगळं ठीक. हळूहळू वेळ गेल्यावर बस लागण्याची वेळ आली. बाईला बस लागते बहुतेक, त्यामुळे ती खिडकीतून डोकं बाहेर काढून ओकते. तिच्या डोक्यावरची ओढणी तेवढ्या वेळेपुरती खाली. बाकी परत डोक्यावर ओढणी. हळूहळू दोनेकदा उलटून पडल्यावर बाई खलास होत गेली. फारच तरूण बाई असावी. डोळे एकदम नितळ आणि बुबुळं स्पष्ट करड्या रंगाची. उलटी झाल्यावर एकदम कोऱ्या चेहऱ्यानं बाई नुसती बसून. शेजारी नवरा तुलनेनं जास्तच वयाचा. गाडी न लागणारा, त्यामुळे ऊर्जा होती. त्याची ऊर्जा नंतर हळूहळू स्वतःचं नाक शिंकरण्यात जायला लागली. शिंकरताना बायकोची ओढणी नाकाला जोरदार लावून काम सुरू. बाईला काय तेवढी ऊर्जाच नसल्यासारखी ती बसलेली. नि ओढणीत शेंबूड.

मग अमरावती आल्यावर ड्रेसवर बुरखा परत.

हा वरचा तपशील अगदी खरोखरचा. त्यात काहीच गोष्ट टाकलेली नाही.

पण तपशील घडत असताना आठवली श्री. दा. पानवलकरांची एक गोष्ट. तिचं नाव 'सर्च' (औदुंबर, मौज प्रकाशन).

पानवलकरांची स्टाइल म्हणजे कथा सुरू झाली की आपण एकदम घटनास्थळीच. जबरदस्त उपमा नि गोष्ट सांगण्याची लयदार शैली. कथा एकदम 'दिसते' समोर. 'सर्च'मधे मुंबईत एका मुस्लीम घरात कस्टमचे अधिकारी गेलेत. कायतरी स्मगलिंगचं सोनं लपवल्याची वार्ता त्यांना लागलेली असते तिची शहानिशा करायला. त्या घरातल्या कासम बोचऱ्याच्या दोन बेगम आहेत- एक मोठी नि एक छोटी. कथेत जो अधिकारी त्यातल्या त्यात केंद्रस्थानी आहे त्याला सुरुवातीला जी कासमची छोकरी वाटलेली असते ती वास्तवात असते छोटी बेगम. ह्या थोड्याशा केंद्रस्थानी असलेल्या अधिकाऱ्याचं नाव मदन. आढ्याला टांगलेलं एक गाठोडं तपासायला हवं असल्याचा निर्देश तो छोट्या बेगमकडे बघून करतो नि-
तिनं खोलीभर पाहिलं. स्टूल, खुर्ची दिसेना. ती खोलीभर उगीचच फिरली. तिच्या लयदार हालचालींत पाहतांना त्याला एक बोच सलू लागली. बडी बेगमला मनसोक्त शिणवून तो ढेरपोट्या हिला बोचकारून बोचकारून छळीत असावा. बुरख्यांतून ही कुठे जाणार?

आणि मग ह्या मदनाला त्या बेगमबद्दल काही ना काही वाटत राहतं नि बाकी कस्टमचा रेग्युलर सर्चही सुरू असतो. सोनं सापडत नाही, पण कासमला तरीसुद्धा अधिकारी लोक घेऊन जातात.
कासमनं आहे त्या लेंग्यावर शर्ट घातला. छोटीनं कोट आणला. कोटाची दशा झाली होती अगदी.

कासम बोचऱ्याला मध्ये घेऊन साहेबमंडळी पायऱ्या उतरू लागली. मदनचं पाऊल घोटाळलं. सगळ्यांत मागं राहून तो जिन्याच्या वळणावर रेंगाळला. बडी बेगम डोळ्याला पदर लावीत आत वळली. छोटी तशीच अर्ध्या दारात उभी राहून केसांतल्या आकड्यानं चौकटीवर रेघोट्या ओढीत राहिली.

एस्टीतला जो तपशील सांगितला तो घडत असताना, छोट्या बेगमबद्दल कायतरी पानवलकरांनी त्या अधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून लिहिलेलं, ते नुसतं ओझरतं आठवलं. ओझरतंच. कथेचं नावही मग डोक्यात आलं, आणि थोडं थोडं आठवलं. मग बाकी कथा परत तपशिलात बघताना लक्षात आलं की १३ फेब्रुवारीला पानवलकरांची जयंती असते. तर, त्यामुळे आज ही नोंद रेघेवर करून ठेवली. छोट्या बेगमच्या रेघोट्यांच्या निमित्तानंही.

पानवलकर मूळचे सांगलीचे. मुंबईत कस्टम खात्यात नोकरीला होते. कुठली त्यांची कथा दुसऱ्याच कुठेतरी कुठल्यातरी तपशिलामुळे आपसूक कोणत्या तरी जनरल वाचकाच्या डोक्यात यावी, हे त्यांच्यातल्या लेखकाला थोडं फार का होईना समाधानाचंच ठरेल. त्या समाधानासाठीही ही छोटी नोंद.

श्री. दा. पानवलकर [१३ फेब्रुवारी १९२८ - १९ ऑगस्ट १९८५]

फोटो विजय तेंडुलकरांनी काढलेला असून
जया दडकर व म. द. हातकणंगलेकर यांनी संपादित केलेल्या
आणि आनंद अंतरकर यांनी 'विश्वमोहिनी'तर्फे
प्रकाशित (१३ फेब्रुवारी १९८७) केलेल्या पुस्तकातून
तो इथे चिकटवला आहे.

१२ फेब्रुवारी २०१४

अवघा रंग एक झाला, ये गोरे गोरे गाल

शाहरूख खानचा 'बाझीगर' नावाचा चित्रपट आलेला, मागे एकदम १९९३ साली. त्यात एक गाणं होतं, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, असं. यातले काळे डोळे नि गोरे गाल अपेक्षित होते ते काजोलचे.

हा चित्रपट ज्या वर्षी आला त्याच्या एक वर्ष आधीच भारतात परदेशी दूरचित्रवाणी वाहिन्याही दिसण्याची सोय नागरिकांना करून देण्यात आली. आणि मग त्या दशकामधे केबल टेलिव्हिजन भारतात फोफावला. असं सगळं फोफावताना जाहिरातीही फोफावत गेल्या. आणि मोठ्या पडद्यावरचे स्टार छोट्या पडद्यावर जाहिरातींमधून नि आता विविध कार्यक्रमांमधूनही दिसायला झाले.

'बाझीगर' येऊन गेल्याला आता वीस वर्षं उलटली. या काळात शाहरूख खान नि काजोल दोघांचं वयही जाहिरातींच्या संख्येसारखं वाढलंच साहजिकपणे. तर जिचे गोरे गोरे गाल अपेक्षित होते ती काजोल आता एक जाहिरात करते. ओले टोटल इफेक्स्ट्स क्रिमची.

या जाहिरातीत काजोलला किंवा जाहिरातीतल्या चेहऱ्याला एक महत्त्वाचा प्रश्न पडलाय- तरूण दिसण्याचा पर्याय स्वीकारावा की उजळ दिसण्याचा?

काजोल - तारुण्याच्या शोधात (छायाचित्र : ओले टोटल इफेक्ट्सच्या जाहिरातीतून कापलेला तुकडा)

आपण उगाच मराठीत प्रश्न लिहिला बहुतेक, कारण जाहिरातीतला प्रश्न इंग्रजीत आहे - लूकिंग यंगर ऑर लूकिंग फेअरर? म्हणजे एखादं क्रिम यंग बनवतं तर दुसरं फेअर, यातलं कुठलं स्वीकारू?

काजोल - उजळपणाच्या शोधात (छायाचित्र : डिट्टो)

पेहेले इन मे से एक चुनना पडता था, पर अब नही, थँक्स टू ओले'ज् न्यू टोटल इफेक्ट्स अँटी एजींग प्लस फेअरनेस क्रिम. फाइट साइन्स ऑफ एजींग अँड लूक फेअरर. यंगर लूकिंग अँड फेअरर लूकिंग स्किन. - असं जाहिरातीतला मागचा आवाज आपल्याला सांगतो.

आणि त्यानंतर जाता जाता काजोल म्हणते : चॉइस क्लिअर है!

जाहिरातीत प्रश्न असला तरी प्रश्नचिन्ह टाकलेलं नाहीये. खरं तर काजोलच्या चेहऱ्याकडे बघून यातला कुठलाच प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे, असंही आपल्याला वाटलं नव्हतं, पण तिला तसा प्रश्न पडलाय असं जाहिरातीत दाखवलंय. आणि तारुण्य नि उजळपणा या दोन्ही पर्यायांना एकाच ट्यूबमधे घालून देणारं हे 'ओले'चं क्रिम समोर असताना चॉइस क्लिअर है, असं सुंदर काजोल प्रेक्षकांना सांगते.

शाहरूख खान, 'इमामी क्रिम'सोबत
चॉइस म्हणजे आपण आहोत तसेच, म्हणजे काळे तर काळे, राहण्याचा मात्र नाहीये बरं का. किंवा तसा एका अर्थी चॉइस आहे, पण तो स्वीकारलात तर तुम्हाला हेटाळणी सहन करावी लागेल. हे पुन्हा शाहरूख खानच आपल्याला इमामी फेअर अँड हेन्ड्सम क्रिमच्या एका जाहिरातीत सांगतो. याच क्रिमच्या दुसऱ्या जाहिरातीत मग तो त्याच्या 'बादशाह' होण्यापर्यंतच्या प्रवासात त्याला या क्रिमने कशी साथ दिली हेही सांगतो. शिवाय मर्दों को चाहिये ज़्यादा, असं सांगत खास पुरुषांच्या त्वचेकरता बनलेलं हे क्रिम प्रेक्षकांपुढे सादर करतो. म्हणजे उगीच तुम्ही तुमच्या घरातल्या बायकांचं उजळपणाचं क्रिम वापरू नका, तुम्हाला हे वेगळं, खास तुमच्या चॉइससाठीचं क्रिम तयार केलेलं आहे असं पुरुष प्रेक्षकांना तो सांगतो.

मुळात आपला असा समज होता की, काजोल ही तशी आहे त्या रंगाची, थोडी गडद अशीच सुंदर दिसते. पण आपला तो काय समज नि आपली ती काय समज! तरी 'पॉप्युलर कल्चर' असं ज्याला अभ्यासक मंडळी म्हणतात त्यासंबंधीची ही नोंद आहे एवढं तरी आपल्याला निश्चित समजलंय. त्यामुळे अजून एक असाच पॉप्युलर विषय असतो ना राजकारण हा, त्या विषयातल्या एका व्यक्तीला आपण इथं सोबत आणलंय. आता हल्लीच्या राजकारणात पॉप्युलर न राहिलेली एक मृत व्यक्ती म्हणजे राममनोहर लोहिया. श्रीपाद केळकर यांनी अनुवादित नि संपादित केलेल्या 'ललित लेणी' (प्रेस्टिज प्रकाशन) या लोहियांच्या पुस्तकात 'रंग आणि सौंदर्य' अशा शीर्षकाचा एक लेख आहे, त्यात लोहिया म्हणतात :
''श्यामल वर्णाची नेहमीच उपेक्षा झाली आहे असे नव्हे. किमान हिंदुस्थानात तरी तसे झालेले नाही. संस्कृत साहित्यात कृष्णवर्णीय श्यामा सुंदर मानली आहे...

''भारतीय पुराणातील सर्वश्रेष्ठ स्त्री द्रौपदी सावळीच आहे. त्या द्रौपदीला कृष्णा असेही म्हणण्यात येते. तत्कालीन पुरुषी अहंकाराला तिचे पाच पती आणि शिवाय तिची एक किंवा दोन प्लेटॉनिक प्रेमप्रकरणे मान्य झाली नसावीत म्हणून तिची उपेक्षा झाली. शुचितेच्या प्रतिमा मानल्या गेलेल्या आणि शिवाय गौरवर्णाच्या अशा सीता-सावित्रीच भारतीय स्त्री-जातीच्या प्रतिनिधी मानल्या जातात. ही मान्यता अविचारीपणाची आहे. आणि त्यामुळे भारताच्या अन्य प्रातिनिधिक स्त्रियांच्यावर अन्याय झालेला आहे. भारतीय पौराणिक साहित्यातील, सावळी कृष्णा आणि घनश्याम कृष्णा ह्या दोघीही सर्वोत्कृष्ट सौंदर्य आणि सुगंध लाभलेली अशी अनुपम पुष्पे होत.

विशाल विश्वामधली पुराणात अथवा इतिहासात आपल्या सर्व समकालीन पुरुषांपेक्षा हजरजबाबी आणि ज्ञानी अशी द्रौपदी हीच बहुधा एकमेव स्त्री आहे. कृष्णाशी तिची तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण ही समयसूचक आणि बुद्धीमान स्त्री कृष्णाची मित्र, सहकारी आणि नायिका देखील होती-- कृष्ण आणि कृष्णा ही महाभारताची समान योग्यतेची नायक - नायिका होत. त्या दोघांच्या मैत्रीत संघर्षाची छाया देखील दिसत नाही. अशी ही कृष्णा म्हणजे द्रौपदी, सावळी होती.''
हे फक्त एक म्हणणं म्हणून आपण अतिशयच नम्रपणे इथे नोंदवूया, कारण इतिहासाबद्दल काही बोलताना फार आत्मविश्वासानं बोलण्यासारखी परिस्थिती नसते. किमान आपली तरी तशी स्थिती नाही. पण तरी-

तरी - वरच्या जाहिरातींमधून ज्या गोऱ्या गोऱ्या गालांची आस व्यक्त झाली त्या तुलनेत १९६७ साली वारलेल्या लोहियांचं म्हणणं वेगळं होतं. आता 'आम आदमी पार्टी'मधे असलेले योगेंद्र यादव यावर जास्त बोलू शकतील. लोहियांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१०मधे 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'ने एक विशेषांक काढला होता, असं अंधुक आठवलं नि त्यानुसार शोधल्यावर यादवांचा त्या अंकातला लेख सापडला. काही ना काही कमी-अधिक असतंच, पण तरी त्यातल्यात्यात-

आपण हे पॉप्युलर क्षेत्रातल्या गोष्टींचेच बिंदू जोडतोय म्हणून संख्येच्या दृष्टीनं खूप लोकांपर्यंत पोचणाऱ्या वर्तमानपत्रांपर्यंत यायलाच हवं. वर्तमानपत्रं (नि इतर नियतकालिकही) मुख्यत्त्वे जाहिरातींवर चालतात, आता ती अधिकाधिक जाहिरातींसारखीही चालायला लागल्येत. तर, आपण वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिरातींचा आपल्या नोंदीतल्या मुद्द्याशी संबंध आहे का पाहूया. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यात साधारणपणे जाहिरात असतेच. काही दिवसांपूर्वीच एका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर शेजारी शेजारीच दोन अशा जाहिराती दिसल्या-


किती एकमेकांना पूरक आहेत ना जाहिराती. मराठी-इंग्रजी डिक्शनरीची जाहिरात रेघेवरच्या ह्या आधीच्या नोंदीला (जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे.?!) जोडून पाहता येईल. आणि दुसरी जाहिरात आजच्या गोऱ्या गालांच्या नि रंगाच्या संदर्भात वाचता येईल. जाहिरातीचा स्क्रिन-शॉट थोडा अंधुक झालाय तांत्रिक अडचणीमुळे, त्यासाठी माफ करता आलं तर पाहा.

एवढी नोंद केल्यावर कोणी म्हणेल, ही नोंद आज का केली? याचं उत्तर परवा येणाऱ्या चौदा फेब्रुवारी रूपी 'व्हॅलेन्टाइन डे'च्या निमित्तात आहे. तेव्हा वरच्या दोन्ही जाहिरातींचा प्रत्यक्ष उपयोग आजूबाजूला दिसतो म्हणून ते निमित्त. मग कोणी म्हणेल परवाची नोंद आज बारा तारखेला का केली? तर त्याचं उत्तर बारा वाजलेत असं आहे.
***


अमेरिकेत स्त्रियांनाही सिगरेटींचे ग्राहक बनवण्याच्या हेतूनं १९२०च्या दशकात एका कंपनीनं एक जाहिरात मोहीम राबवली. त्या जाहिरातीत सिगरेट पिणाऱ्या स्त्रीचं चित्रं नि सोबत 'टॉर्चेस ऑफ फ्रिडम' अशी ओळ होती. ही जाहिरात मोहीम राबवलेला एडवर्ड बर्नेस नि त्याचं 'प्रॉपगॅन्डा' हे पुस्तक याबद्दल यापूर्वी रेघेवर नोंद झाली आहे. पुस्तक १९२८ साली प्रसिद्ध झालं होतं. आणि तेव्हा त्यात म्हटलेलं की, ''लाखो प्रतींचा खप असलेल्या वर्तमानपत्रांची व नियतकालिकांची वाढ आणि जाहिरातीचं आधुनिक तंत्र यामुळे उद्योजक आणि समाज यांच्यात व्यक्तिगत संबंध निर्माण होऊ घातलाय''. हे संबंध उद्योजकांनी आपल्या सोयीसाठी कसे वापरायचे याचं मार्गदर्शन बर्नेसनं केलं. त्या मार्गदर्शनाचं प्रत्यक्ष रूप लोकांशी व्यक्तिगत संवाद साधू पाहणाऱ्या वरच्या हिरो-हिरोयनींच्या चेहऱ्यात दिसेल कदाचित.
***


अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ।।
मी तूं पण गेलें वायां । पाहतां पंढरीच्या राया ।।
नाहीं भेदाचें ते काम । पळोनी गेले क्रोध काम ।।
देहीं अनुनी तूं विदेही । सदा समाधिस्थ पाही ।।
पाहते पाहणें गेलें दुरी । म्हणे चोख्याची महारी ।।
- सोयराबाई

(स. भा. कदम संपादित 'श्री संत चोखामेळा : चरित्र व अभंग' या पुस्तकातून. शब्दालय प्रकाशन)

३० जानेवारी २०१४

एक्स्क्युज मी, प्लीज । वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फेमस

वार गुरुवारच्या निमित्तानं ही नोंद.

You got to have some English Tuka
if you want to get ahead in the world
- Arun Kolatkar (From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)

***

निळू दामले यांच्या 'यू-ट्यूब' वाहिनीवरचा व्हिडियो-


व्हिडियोतील काही :
किंग ऑफ इंग्लिश आणि क्विन ऑफ इंग्लिश असे उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत काय करायचं, तर असे दहा शब्द आम्ही लिहायचे. आम्ही लिहितो किंवा एखाद्या मुलाचं चांगलं हस्ताक्षर असेल तर त्याला लिहायला सांगतो. एक ते चारच्या सिलॅबसमधले ते शब्द निवडून आम्ही त्याची एक फाइल केलेली आहे. त्यातले शब्द द्यायचे रोज. रोज आम्ही जाणीवपूर्वक मुलांना सांगत नाही की, 'हे शब्द बघा, लिहून घ्या, पाठ करा'. फळ्याची जागा रोज बदलतो, मुलं जाता येता त्याच्याकडे पाहत असतात. पंधरा दिवसांनी आम्ही तुम्हाला हे शब्द विचारणारे. भले ते लक्षात ठेवा रोज किंवा लिहून पाठ करा. पंधरा दिवसांनी ज्याला जास्तीत जास्त शब्द सांगता येतील त्याचा आम्ही सत्कार करणार. पंधरा दिवसांनी रोजचे जे शब्द होते ते मुलांनी वहीत लिहून दाखवायचे. त्याचं स्पेलिंग, त्याचा उच्चार आणि त्याचा अर्थ. आम्ही ते तपासतो. ज्याला जास्त शब्द लक्षात आहेत, तो किंग ऑफ इंग्लिश. आणि आम्ही एक किरीट, एक मुकुट आणलेला आहे. बाहेरून चाललेल्या गावकऱ्याला इथे बोलवून अनौपचारिक वातावरणात त्या विद्यार्थ्याला तो मुकुट घालायचा. दिवसभर तो मुकुट घालून शाळेत वावरणार, गावात वावरणार, संध्याकाळी पण तो मुकुट घालून घरी जाणार. दुसऱ्या दिवशीच तो परत आणणार. म्हणजे त्याला एक, आपण इंग्रजीचा राजा झालो. अशीच एक मुलगी निवडायची, क्विन ऑफ इंग्लिश. म्हणजे त्याला एक अभिमान वाटतो. म्हणजे मुलांच्यात एक ओढ वाटते. त्यांना मुद्दाम हे सांगावं लागत नाही, की हे वाचा. त्यामुळं मुलांकडे आज हजार-दोनतीन हजार शब्द आहेत. आमचा गुरुवारचा उपक्रम असतो, इंग्रजीत बोलायचं. -- इंग्रजीतल्या ऑर्डर आहेत, इंग्रजीतली देशभक्तिपर गीतं आहेत, इंग्रजीतली प्रार्थना मुद्दामहून घेतलेली आहे. -- असा प्रयत्न आमचा छोटासा दहा वर्षांपासूनचा सुरू आहे.-- मुलगा आमचा परिसराच्या आवारात 'एक्स्युज मी' म्हटल्याशिवाय बोलत नाही. सहज कोणाहीबरोबर बोलत असेल, तरी सराईतपणे 'एक्स्युज मी' हा त्याचा शब्द झालेला आहे. 'एक्स्युज मी, मामा', असा त्याचा एक जनरल शब्द झालेला आहे. आपण 'ए मामा', 'ओ मामा' असं म्हणतो, तर ते 'एक्स्युज मी' त्यांच्या व्यवहारात -
इथं आमच्या चौथी यत्तेपर्यंत तरी मुलं आहेत, आम्ही हे पाच-दहा वर्षांपूर्वी शिकवलेलं आहे, पण पहिलीला येणाऱ्या मुलाला हे शिकवलेलं नाही, पण तो (आधीच्यांचं) अनुकरण करतो नि बोलतो. म्हणजे इंग्रजीचा मुलं इतक्या सराईतपणे वापर करतात.
***

Like it or not
I'll make you world famous
          not you alone but both of us
we're going to be famous Tuka
you and I together

These translations are going to make me famous throughout the world

- Arun Kolatkar ((From an Undated Sheet, The Boatride & Other Poems, page 234)
***

अरुण कोलटकर
अरुण कोलटकर (१ नोव्हेंबर १९३२ - २५ सप्टेंबर २००४) यांनी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमधे कविता लिहिल्या. 'द बोटराइड अँड अदर पोएम्स' या 'प्रास प्रकाशना'नं प्रकाशित केलेल्या नि अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांनी संपादित केलेल्या पुस्तकात त्यांच्या काही इंग्रजी कविता, त्यांच्याच काही मराठी कवितांचे इंग्रजी तर्जुमे, तुकारामांसह काही संतकवींच्या कवितांची त्यांनी केलेली भाषांतरं, इत्यादी मजकूर वाचकांना मिळू शकतो. कोलटकर मूळचे कोल्हापूरचे.

नोंदीत ज्या शाळेचा व्हिडियो जोडला आहे, ती शाळा सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या तुंग या गावात आहे. त्या शाळेतील शिक्षक कृष्णनाथ पाटोळे यांना आपण व्हिडियोत बोलताना पाहिलं.

अरुण कोलटकर व कृष्णनाथ पाटोळे यांना आपण शेजारी-शेजारी बसवलं, हे अनेकांना आवडणार नाही किंवा पटणार नाही. ते दोघं जे काही बोलले, त्यावर तज्ज्ञ मंडळी आणखी काही बोलू शकतील. आपल्याला फक्त ते एकमेकांशेजारी दिसले, म्हणून नोंदवलं. आणि जाता जाता एक टांगतं राहणारं वाक्यही लिहूया. ह्या वाक्यापुढे पूर्णविराम, प्रश्न चिन्ह किंवा उद्गारवाचक चिन्ह यांपैकी कुठलं चिन्ह दिलेलं बरोबर नि कुठलं चूक हेच ठरवता आलं नाही राव ह्याला नि नोंद कसली करतोय.?! जाऊ दे. आता वाचकांनीच आपापल्या इच्छेनुसार किंवा मतानुसार किंवा गरजेनुसार या वाक्यापुढे त्यांना योग्य वाटेल ते चिन्ह उमटवावं-

जगात पुढे जाण्यासाठी इंग्रजीची गरज आहे

***


जगी मान्य केले     हा तुझा देकार। 
की काही विचार     आहे पुढे।।
- तुकाराम

२८ जानेवारी २०१४

एका मजकुराचा प्रवास : रेघ < दैनिक भास्कर < द हिंदू

१० ऑगस्ट २०१३ रोजी 'रेघे'वर एक नोंद प्रसिद्ध झाली होती. 'नावात काय आहे? बरंच काही' या शीर्षकाचा मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी लिहिलेला हा मजकूर होता. मुस्लीम नाव असलेल्या व्यक्तीला अहमदाबादमधे घर शोधताना आलेला अनुभव सांगणारा हा लेख होता. रेघेसाठीच खान यांनी लिहिलेला हा मजकूर मुळात इंग्रजीत होता, तो आपण मराठीत केला होता. हा मजकूर त्यानंतर लगेचच १४ ऑगस्टला 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीमधे संपादकीय पानावर (डेंजर शीर्षकासह) प्रसिद्ध झाला होता. मुळात रेघेसाठी लिहिलेला हा मजकूर हिंदीतही प्रसिद्ध झाल्याचं इथं नोंदवता आलं असतं, पण राह्यलं. काही दिवसांपूर्वी हा मजकूर 'द हिंदू'मधे वाचकांच्या लेखनाला प्रसिद्धी देणाऱ्या 'ओपन पेज' या पानावरही प्रसिद्ध झाला नि त्यानंतर आता या घडामोडींची एक बारकी नोंद रेघेच्या मूळ वाचकांपर्यंत पोचवणं आवश्यक वाटलं.

या घडामोडीत 'दैनिक भास्कर'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर मूळ लेखकाला चारशे का पाचशे रुपये मानधन मिळालं, हे आपल्या दृष्टीनं एक नोंदवण्यासारखं. आणि 'द हिंदू'मधे मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर लेखकाकडे ऐंशीहून अधिक प्रतिसाद ई-मेलद्वारे आले. रेघेवर आपण आर्थिक मानधन देऊ शकत नसल्यामुळे इथला मजकूर दुसऱ्या कुठे मुख्य प्रवाहातल्या व्यासपीठावर छापून आला तर बरं, कारण त्यातून मूळ लेखकाला किमान आर्थिक परतावा मिळू शकतो, असा एक प्रयत्न. ह्या मजकुराच्या बाबतीत हे झालं. (लेखकाला मानधनाची अपेक्षा किंवा गरज तर अजिबातच नव्हती, पण माध्यमांसंबंधी एक आर्थिक बाजूचा मुद्दा आपण वेळो-वेळी नोंदवलाय, त्या संदर्भात हे आहे). आणि 'हिंदू'त इंग्रजी मजकूर छापून आल्यामुळे त्याला जरा जास्त प्रसिद्धी मिळाली नि आणखी तामीळमधेही अनुवादाची परवानगी मागणारी विचारणा लेखकाकडे झालेय, हेही एक या नोंदीबद्दल घडलेलं चांगलं.

रेघेवर नोंद करण्याच्या निमित्तानं लेखकानं मुद्दाम त्याचा अनुभव लिहून काढला होता, ते पुढे जाऊन जरा मूळ लेखकाला जास्त समाधान देणाऱ्या घडामोडी घडवणारं ठरलं, तर मोहम्मद नदीमुल्लाह खान यांनी हे  समाधान रेघेच्या इथल्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी खालील मजकूर पाठवला आहे :
''अहमदाबादमधे घर शोधत असताना एक मुस्लीम इसम म्हणून मला ज्या नकारांना सामोरं जावं लागलं त्यानं मी दुःखी झालो होतो, ही सुरुवात. त्यानंतर ज्यांच्या-ज्यांच्याशी बोलताना हा विषय निघायचा त्यांच्यापाशी मी ह्या दुःखातून निघालेला माझा राग व्यक्त करायचो. त्यावेळी 'रेघे'च्या माध्यमातून माझ्या रागाला वाट करून देण्याचा पर्याय माझ्यापुढे ठेवण्यात आला. मी माझा अनुभव इंग्रजीत लिहीन नि नंतर तो मराठीत भाषांतरित करून माझ्या कक्षेत अन्यथा न येणाऱ्या वाचकांपर्यंत तो पोचेल, असा हा पर्याय होता. मी तेवढं केलं नि आठवड्याभरात काही बऱ्या-वाईट प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्या. बहुसंख्य प्रतिक्रिया माझ्या म्हणण्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणाऱ्या होत्या.

दरम्यान, माझा एक जुना मित्र नि 'दैनिक भास्कर'च्या नागपूर आवृत्तीचा संपादक प्रकाश दुबे याला मी हा असा मजकूर लिहिल्याचं कळलं आणि त्याच्या पेपरसाठी मी या मजकुराचं हिंदी भाषांतर करून द्यावं असा आग्रह त्यानं केला. त्याला या लेखासंबंधी काय प्रतिक्रिया मिळाल्या ते मला कळू शकलं नाही, पण आणखी वेगळ्या प्रकारच्या वाचकांपर्यंत लेख पोचला, एवढं तरी झालं. त्यानंतर काही मित्रांनी सुचवलं की, मूळचा इंग्रजी मजकूर तसाही पडून आले, तर तोही कुठे प्रसिद्ध होईल का पाहायला हवं. त्या प्रयत्नातून 'द हिंदू'च्या 'ओपन पेज'वर १९ जानेवारीच्या रविवारी हा लेख छापून आला. आणि त्या दिवसापासून माझ्या ई-मेल बॉक्समधे पत्रांची आवक वाढत चाललेय. हा मजकूर लिहीपर्यंत (२४ जानेवारी) ऐंशीहून अधिक प्रतिक्रिया ई-मेलद्वारे मिळाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाचक माझ्या मुद्द्याशी सहमत आहेत. या लेखाच्या निमित्तानं मला मुस्लिम समुदायातली माझ्यासारखी नास्तिक मंडळी सापडली. ह्या देशात असा मी एकटाच आहे, हा माझा समज त्या निमित्तानं दूर झाला! काही मुस्लिम मंडळींनी मला पापक्षालन करण्याचा प्रमाणिक सल्ला देऊन काही पुस्तकं वाचण्याची शिफारस केली. मी जो मुद्दा मांडू पाहत होतो त्यातून हिंदू-मुस्लिम यांच्यातली असमानता दाखवायची असल्याचा समज काही वाचकांनी करून घेतला असावा, असं काही प्रतिसादांवरून कळलं. मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया बिगरमुस्लिम समुदायातल्या वाचकांकडून आल्या, त्यातल्या जवळपास सगळ्यांनी आपला समाज ज्या कुठल्या दिशेनं जातोय त्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुस्लिम भाडेकरू ठेवण्याबद्दल नकाराची भूमिका घेणाऱ्या हिंदू मंडळींचं समर्थन दोन वाचकांनी केलंय. हरयाणात कुठंतरी असलेल्या ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीतून मला व्याख्यान द्यायला बोलावणं आलं. नव्वद वर्षांच्या एका वाचकानं धर्मावर माझी श्रद्धा पुन्हा बसावी यासाठी माझं मन वळवायचा प्रयत्न सुरू केला. विचाराचा प्रवास सुरू आहे. ती विचाराची रेघ अशीच लांब लांब जाईल. आत्ता ह्या क्षणापर्यंत हे सगळं आनंद देणारं आहे. ह्या रेघेचं वर्तुळ पूर्ण होऊन ती माझ्या पाठीत घुसली नाही म्हणजे मिळवलं.''

पाठ

२३ जानेवारी २०१४

नामदेव ढसाळांच्या निमित्ताने कविता नि चळवळ

कवी नामदेव ढसाळ यांचं १५ जानेवारीला निधन झालं. त्या निमित्ताने ही नोंद इथे प्रसिद्ध होतेय.

नामदेव ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४) [छायाचित्र : हेनिंग स्टेगमुलर]

'चळवळ' हा शब्द अनेक जण अनेक अर्थांनी वापरत असतील. या सगळ्या अर्थांनी बोलणं काही आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ज्या ढसाळांच्या निधनाच्या निमित्ताने आपण बोलतोय त्यांची नि त्यांच्या कवितेची दलित चळवळीशी बांधिलकी होती असं खुद्द तेही म्हणत. शिवाय १९६०च्या दशकात अनियतकालिकांची चळवळ झाली, असंही म्हटलं जातं आणि या चळवळीशीही ढसाळांचा संबंध होता. तर, ह्या अनियतकालिकांच्या चळवळ प्रकरणासंदर्भात कवितेबद्दल लहानसं काही नोंदवता आलं तर पाहू. काही लोक एकत्र येऊन काही ना काही हालचाल करत राहातात, त्यांचे एकमेकांवर किंवा आसपासच्या भवतालावर परिणाम होत राहतात, या अर्थानं या नोंदीत 'चळवळ' हा शब्द वापरला आहे. ढसाळांच्या निमित्ताने आपण बोलतोय. या निमित्तामधे ढसाळांचे समकालीन कवी तुळसी परब आणि मनोहर ओक यांनाही आणतोय. का, ते नोंद पुढे जाईल तसं स्पष्ट होईल अशी आशा. आता पहिल्याच्या निमित्ताने नवीन दोघांसह पुढे जाऊ.

तुळसी परब यांनी चंद्रकान्त पाटील यांच्यासोबत 'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' (लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : जानेवारी १९९९) हे पुस्तक संपादित केलं. या पुस्तकात मनोहर ओकांसंबंधी नि त्यांच्या कवितेसंबंधी दोघाही संपादकांचे लेख आहेत. यात परबांनी ते मुंबईला सचिवालयात असतानाचे काही अनुभवही नोंदवलेत. नामदेव ढसाळ, मनोहर ओक आणि परब यांचा तेव्हा एकमेकांच्या आसपास वावर होता. मैत्री होती असं काही लगेच इथे लिहावं वाटत नाही. तर, त्यासंबंधी परब लिहितात :
त्यावेळी आमच्या तिघांमध्ये प्रचंड सामुहिक कवितावाचन चालत असे. आम्ही तेव्हा एकमेकांना कविता घेऊनच भेटत असू.

नामदेव आणि मनोहरमध्ये हळूहळू फरक पडत चाललेला मला दिसत होता. त्याची एक दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.

सरकारी कारकुनांच्या टेबलावर असतो तसा एकेक पेपरवेट माझ्या टेबलावर पडलेला असे. एकदा नामदेव माझ्या शेजारी बसून पेपरवेटशी चाळा करत होता. तेवढ्यात मनोहर आला. त्यानं नामदेवच्या हातातला पेपरवेट घेतला आणि तो मला म्हणाला, ''साल्या तू दगड आहेस. वर तुला पेपरवेट कशाला? आधीच तू सगळ्या सरकारी कागदांवर नुसता झोपून राहतोस. मी आता या पेपरवेटची काय जादू करतो पाहा.'' मग तो पेपरवेट माझ्या टेबलावर नुसता फिरवत राहिला. मनोहरची कधी काय लहर लागेल त्याचा पत्ता नसायचा. म्हणून मी त्याला थोडा टरकूनच असे. त्याचा भोवरा थांबल्यानंतर तो काचेच्या पेपरवेटच्या आतल्या बुडबुड्यांकडे पाहत राहिला. नामदेवला म्हणाला, ''नाम्या, या पेपरवेटवर कविता लिहायची.'' मी या वेळी अंग काढून घेतलं. नामदेव म्हणाला, ''तू आधी लिही, मग मी लिहीन.'' दुसऱ्या दिवशी मनोहर या संग्रहातील कविता क्र. ६७  'एकुलतेपणाच्या पेपरवेटमधील' ही कविता घेऊन लंच-अवरमधे हजर झाला. त्यातला 'कोणत्याही क्षणी बाजूला सारला जाणारा । कांतीमान निर्लेब उघड पेपरवेट अस्पृश्यासारखा दबलेला नर्म ।' ही ओळ नामदेवला लागली. तिसऱ्या दिवशी नामदेव त्याची 'पेपरवेटमध्ये माणसं कुणी कोंडून टाकलीत' ही कविता घेऊन हजर झाला. या दोन कविता एकमेकांशेजारी ठेवून कुणालाही दोन वेगवेगळ्या धोरणांची जुगलबंदी सहज बघता येईल.
परबांनी ज्या जुगलबंदीची अपेक्षा ठेवलेय, ती इथं या नोंदीत घडवायची आपली इच्छा होती पण यातली ढसाळांची कविता रेघेला उपलब्ध झाली नाही. पण हा मुद्दा तेवढ्याच कवितेपुरता अर्थातच मर्यादित नाहीये. दुसरं एक उदाहरण आहे झाडासंबंधीचं. वरती उल्लेख केलेल्याच लेखात परबांनी लिहिलंय :
मनोहरच्या 'झाड' कवितेची गोष्ट थोडी मजेशीर आहे.... ही 'झाड' कविता नामदेवलासुद्धा तेव्हा खूप आवडली होती. (या आवडीचा उल्लेख चंद्रकान्त पाटलांच्याही लेखात आलेला आहे. 'अशी कविता लिहिता यायला पायजे', असं ढसाळ पाटलांना एकदा म्हणालेले.) मात्र नामदेवचं 'व्हायलन्सचं झाड' पूर्णतः वेगळ्या ध्रुवावरचं आहे.
ढसाळांची ही वेगळ्याच झाडासंबंधीची कविता साडेसहा पानं पसरलेली आहे, त्यामुळे सगळी इकडे नोंदवणं शक्य नाही. पण या कवितेची सुरुवात आणि शेवट इथे नोंदवूया. अशा अर्धवटपणासाठी माफी, वाचकांना मूळ कविता ढसाळांच्या 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (लोकवाङ्मय गृह) या कवितासंग्रहात सापडेल.

सुरुवात :
तुळशीवृंदावनासारखे त्यांनी आपल्या दारासमोर व्हायलन्सचे झाड लावले. लावणे अटळ होते. ते रोज झाडाला भक्तिभावनेने पाण्याऐवजी रक्त घालू लागले. खत म्हणून मांससुद्धा. नाकर्तेपणाचा चेहरा घेऊन येणारा सूर्य वरातीतला नवरा बनून पृथ्वीवर अवतरत होता. प्रत्येक संध्याकाळी नित्यनियमाने मरत होता. सूर्यमंडळे तारामंडळे यांचा शिवणापाण्याचा खेळ रोजच चालू होता. व्हायलन्सचे झाड वाढत होते. कणाकणाने आकाशाचा वेध घेत होते. माणसाचे रक्त पिणाऱ्या तस्करी शहराची हवा झाडाला भलतीच मानवत होती.
शेवट :
झाडाची शेकडो हजारो लाखो कोट्यवधी झाडे
झाडे झाडे झाडेच झाडे वाढत जातील
परिस्थितीवर घाव न घालणारं शासन मोडलं जाईल
जनतेकडून राजरोस मारलं जाईल
पार्लमेंट भातखेचरात भरून जाईल
मांगवाड्यातनं, मेहतरवाड्यातनं
महारवाड्यातनं, चांभारवाड्यातनं शेतकारखान्यातनं
तोरणं गुंफली जातील नव्या देशाच्या वेशीसाठी
आणि व्हायलन्सचं झाड देशाच्या आयुष्यात 
कल्पतरूची भूमिका बजावेल
बजावेल.

ओकांची झाड कविता सुरू होते अशी : 
झाड 
हे झाड नसतं
एक जंगल
अवघं साम्राज्य
हिरवी अभेद्य गढी
पानबंदी चहुवार

                    परतवत सूर्य
                    नमवत वारा
आणि संपते अशी :
झाड बेफिकीरपणे लुटवतं
सावली, असावध म्हशींवर 
गाई-बकऱ्यांवर

येणारे मोहोर दरवळते
वयात येणारी फळं डोलदार
गाणारे कोकिळ का कर्कटणारे कावळे
वाढणारे अंगावर वेल, फुलहीन वा ऋतुमती
या अवांतर घटनात संभवत नाही ते

ते असतं तेच मुळी निवांत म्हणून
जे असतं तेच मुळी एक आरोप घेऊन
या दोन झाडांबद्दल वाचकांनी आपापलं मत बनवावं. पेपरवेटसंबंधीची जी जुगलबंदी अपेक्षित होती ती इथे तितकी नाहीच. पण तरी..

तरीही असं खूप शोधता येऊ शकतं. त्या काळच्या परिसराशी या हालचालींचा संबंध, शब्दांचा संबंध, एकूण वातावरणातलं वारं, याचा परिणाम होत होत काय काय कसं घडत गेलं असेल? परबांनी ओक आणि ढसाळ यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिलेलं आपण वाचलं आणि या अनुभवांमधून काही कविता कशा उभ्या राहिल्या तेही त्यात आलंय. यात सुटा कवी महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतीनं त्याच्या आसपासातल्या घडामोडी तेव्हा चळवळ म्हणता येईल अशा जोरकसपणे घडत होत्या असतील का? आणि या जोरकसपणात एकमेकांना आधारही मिळत असल्यामुळे पुन्हा जोरकसपणाला जोर मिळत असेल का? तपासायला हवं. इथे आपण वर काही उदाहरणं नोंदवली. तशी आणखीही देता येईल.

आणखी उदाहरणार्थ, मुंबईवर ढसाळांनी लिहिलेली कविता
मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुन्दर प्रतिमासृष्टी
अश्विनीरूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी
सर्पस्वरूप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्या
हे कामेच्छेच्या माते
हे अदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे
अशी सुरू होते. (कवितासंग्रह - खेळ. प्रास प्रकाशन. प्रकाशन - नाताळ १९८३)

तर, ओकांना मुंबईत गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणून ते म्हणतात :
मी गुदमरतोय या मुंबईत
दारू पिऊन पावलं नीट पडतात
उघडा दरवाजे मोकळ्या खिडक्या
सुटी हवा द्या खुली मोकळी
- अशी सुरू होणारी त्यांची मुंबईवरची कविता
झुगारून दे बागुल संबंधांचे
या शरीराचं पान आत उघड कर
सगळी पदरीची लालूच वाऱ्याला दे.
- अशी संपते.

अनियतकालिकांशीच संबंधित आणखी एक कवी अरुण कोलटकर यांनी या मुंबईनं भिकेस लावलं हे एका कवितेतून नोंदवलं होतं, तेही इथे आठवू शकतं (अरुण कोलटकरच्या कविता, प्रास प्रकाशन, ऑगस्ट २००७). कोलटकरांना आपण यात जास्ती आणत नाहीयोत, कारण परबांच्या ज्या अनुभवाच्या सोबतीनं आपण ही नोंद करतोय त्या अनुभवात त्यांच्यासोबत ढसाळ आणि ओक होते. पण तरी-

तरी तरी खूप काही शोधता येईल. परत उदाहरणार्थ, ढसाळांच्या गोलपीठ्यात 'पाणी' नावाची एक कविता आहे. त्यात शेवटाकडे ते म्हणतात :
नदी राखते जन्मसिद्ध हक्क माण्सावरला
आम्ही जिथं जिथं पाय टाकू तिथं तिथं फुटतील उपाळ निवाळचंग पाण्याचं
आणि मग आमच्यासकट कुणीच राहणार नाही तहानेला
आणि भाजणार नाही हीर पाण्याचा
पाण्याला जातीय रंग देणारा तुमचा
एकुलता एक ईश्वर त्याला लागेल आफलातून बुळगा
न मग तुम्ही धोतराचे सोगे ओले ठेवण्यासाठी
मागाल भीक पाण्याची
आम्ही तुम्हाला पाण्याने भरलेले रांजण देऊ
हे छळकऱ्यांनो
पाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात
पाणीटंचाई आली तर
तुम्ही शर्टासारखी शहरं बदलता
मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी
काय बदलावं
(गोलपीठा, लोकवाङ्मय गृह, पाचवी आवृत्ती - जुलै २००८)

परबांचा बाजारात कदाचित उपलब्ध असलेला एकमेव कवितासंग्रह आहे - कुबडा नार्सिसस (लोकवाङ्मय गृह, पहिली आवृत्ती मे २००२). या कवितासंग्रहातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे - 'पाणी : निळेभोर । काळे । सावळे ।'
मी तुम्हाला सांगतोय
ती सगळी पाण्याची हकिगत नाही
ही हकिगत आहे
पातळ्यांवर
जगणाऱ्या दुर्दम्य माणसांची
- असं परबांनी म्हटलंय. ही कविता पूर्ण वाचण्यासाठी वरती तिचं नाव दिलंय त्यावर क्लिक करा. ढसाळ ज्या पाण्याबद्दल बोलत होते त्या पाण्यात आणि परबांच्या कवितेतल्या पाण्यातही काही थेंब सारखे सापडतील.

मुळातला मुद्दा आपण काहीसा स्पष्ट करत आणला असावा अशी अपेक्षा आहे. चळवळ या शब्दाची प्रत्यक्षातली अंमलबजावणी घोषणांमधून किंवा व्यक्तिगत हेव्यादाव्यांमधून पण होत असावी. ती अगदी या अनियतकालिकांच्या घडामोडींमधेही झालेली सापडू शकेल. पण त्यापलीकडेही काही १९६०च्या दशकातल्या या शब्दांच्या वावरात सापडेल. तेही परबांच्या शब्दांत एकदा शेवटचं नोंदवूया, ते म्हणतात :
आम्हा तिघांच्यात तेव्हा कविता-लेखनाच्या बाबतीत निर्वैर स्पर्धा चाले. 'सुहास राखेचा आणि संगमरवराचा चेहरा' ही कविता नामदेवला खूप आवडली होती. आपल्या 'मंदाकिनी पाटील : मला अभिप्रेत असलेलं कोलाज'वर या कवितेचा प्रभाव असल्याचं त्यानं मान्य केलं होतं. अर्थात दोन्ही ठिकाणी रसायन वेगवेगळ्या प्रकारचं आहे.

एवढं सगळं सांगत बसणं म्हणजे आत्मप्रौढी केल्यासारखं होईल म्हणून आता आटोपतं घ्यायला हवं. पण चळवळीच्या संदर्भात अशा अनेक घटना घडत असतात आणि म्हणूनच तिला चळवळ म्हणतात.
नामदेव ढसाळ चळवळीचे कवी होते असं म्हणताना 'चळवळ' या शब्दाचे म्हटलं तर बारकेसारके पण कवितेच्या बाबतीत इंटरेस्टिंग ठरू शकणारे मुद्दे लक्षात ठेवावे वाटले तर ठेवता येतील. यात व्यक्तीच्या कामाचं महत्त्व कमी करण्याचा काही संबंध नाही, उलट व्यक्तीच्या आसपासाचा काही अंदाज त्यातून बांधावा वाटला म्हणून फक्त. आणि त्या आसपासामधून या व्यक्तींना काय सापडलं ते तपासावं वाटलं म्हणूनही. हा आसपास कसाही असू शकतो. ढसाळांच्या वेळी तो जसा होता तसा होता आणि आता जसा आहे तसा आहे. यात चळवळीचा मुद्दा आला तो प्रत्येक वेळी असायलाच हवा या आग्रहाने नाही, तर तो जेव्हा लागू होता तेव्हा त्याचा परिणाम कसा झाला याची नोंद करण्यासाठी आला.
***

जोड नोंद : १९६०च्या आसपास सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल ढसाळांच्या निमित्ताने आपण काही मुद्दा नोंदवला, पण मुळात ती चळवळच नव्हती, असं मत या घडामोडींना जोर देणाऱ्या प्रमुख मंडळींपैकी एक अशोक शहाणे यांनी एकदा दिलेलं आहे. 'पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही', असं त्यांचं म्हणणं. आपल्या नोंदीतला मुद्दा तर या म्हणण्याच्या उलटा. आणि तो मुद्दा लागू करायचा झाला तर-

शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. आणि नेमाडे यांनी 'कोसला'बद्दल एकदा असं नोंदवलेलं : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.

हे जे एकमेकांचे आधार आपापल्या घडामोडींना लागलेत ते मान्य केल्यावर या आधाराला कोणी चळवळ म्हटलं तर काय हरकत. भाषेशी जवळीक साधायची एक चांगली हातोटी या आधारांमधून प्रवाहात कशी आली हे उलट यात जास्तीचं स्पष्ट होईल.

हरकत घ्यायचीच तर यातल्या काही मंडळींच्या एका कंटाळवाण्या सवयीवर घेता येईल. आपलं काही चुकलं असेल असं उघडपणे मानायचं नाही, आपल्याला काही बाबतीत कमी माहिती असेल हे उघडपणे कबूल करायचं नाही आणि उघडीबाघडी शेरेबाजी करत राहायची ही (तशी नेहमीच वातावरणात असलेली पण या घडामोडींमुळे जास्त जोर मिळालेली) सवय या चळवळीतल्या अनेकांना होती. या सवयीची झाडं मात्र वर्तमानपत्रांपासून फेसबुकपर्यंत रुजलेली दिसतील. ज्या चळवळीच्यासंबंधीची ही नोंद आहे तिला काय वाट्टेल ते म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण त्यात असलेली किंवा त्यात नसलेलीही एकेक म्हातारी झाडं कोलमडत असताना नवीन बरं-वाईट काय रुजलं किंवा रुजतंय हे तपासायला हवं. हे काम रेघेच्या क्षमतेबाहेरचं आहे, पण सक्षम लोकांना ते करता येईल.

३० डिसेंबर २०१३

थोडं थांबण्यापूर्वीची नोंद

१६ ऑक्टोबरला 'रेघे'वर नोंद केल्यानंतर दोन महिने कुठलीही नोंद केली नव्हती. ज्या नोंदीवर आपण थांबलेलो ती नोंद माध्यमांसंबंधी आर्थिक संदर्भात एखादा बिंदू नोंदवण्याच्या इच्छेने झालेली. त्यानंतर करण्यासारख्या काही नोंदी होत्या, पण काही कारणांमुळे त्या जमल्या नाहीत, मग पुन्हा २५ डिसेंबरला एक नोंद केली. आणि आता ही नोंद आज होतेय.

दरम्यानच्या दोन महिन्यांमधे आपल्याला वाचकांच्या काही प्रतिक्रिया प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळाल्या. कधी कौतुक आणि क्वचित व्यक्तिगत पातळीवरची निंदा, अशा स्वरूपातल्या प्रतिक्रिया. यातल्या पहिल्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल आपल्याला काही प्रमाणात आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या प्रकारातल्या प्रतिक्रियांबद्दल काहीच आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आश्चर्य वाटण्यासारख्या ज्या कौतुक प्रकारातल्या प्रतिक्रिया आहेत त्या ज्यांच्याकडून आल्या त्यामुळे आश्चर्य! म्हणजे इतिहासात संशोधन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला 'रेघे'वर काय सापडत असेल किंवा साहित्याबद्दल काही संशोधन करणाऱ्या कुणाला इथे काय सापडत असेल, अशा शंका आपल्या मनात आहेत. अर्थात, काहीच न सापडता नुसता वाचून आनंद होत असेल अशीही शक्यता आहे. पण जे आहे ते ठीक आहे.

आणखी एका प्रकारातल्या वाचक-प्रतिक्रियांचीसुद्धा मुद्दाम दखल घ्यायला हवी ती पत्रकारांमधून आलेल्या. यातही काही वरिष्ठ पदावरच्या व्यक्ती आणि काही उप-संपादकीय काम करणाऱ्या व्यक्ती अशा ठिकाणांहून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रतिक्रिया 'रेघे'पर्यंत आल्या. हेही बरं. आणखी खोलातलं सांगायचं तर यातल्या उप-संपादकीय मंडळींच्या असण्यातून रेघेची सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात तशी पाचेक वर्षांपूर्वी आणि आत्ता ह्या पत्त्यावर तीन वर्षांपूर्वी झाली. ह्या उप-संपादकीय पातळीवर काम करणाऱ्या उदास मंडळींसाठी रेघेचा काही उपयोग झाला असेल तर बरंय. उदास म्हणजे तशी चोवीस तास उदासी असेल असं नाही, पण एक ती सांगता न येण्यासारखी गोष्ट ही मंडळी आजच्या मराठी वर्तमानपत्रांमधे अनुभवतायंत. ते त्यांना तसं का होत असावं, याचे काही संदर्भ रेघेवरच्या नोंदींमधे सापडू शकतील. अर्थात, तरीही ती खूश असतात नि त्या उदासीन खुशीतच रेघेचं मूळ आहे. ह्यातल्या काही मंडळींना तरी रेघेमुळे काही बरं वाटलं असेल असं त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटतं आणि ते चांगलं झालं. 

हे मुद्दाम आज बोलण्याचं कारण काय? तर आपण वास्तविक ऑक्टोबरच्या नोंदीसोबत रेघेला थोडं थांबवणार होतो, पण नंतर एक नोंद करण्याची वेळ आली. आणि आता ही नोंदसुद्धा करण्याची वेळ आली म्हणून. वाचकांच्या प्रतिक्रियांची दखल घेण्याच्या इच्छेमुळे वेळ आली. आणि त्यासोबत गो. पु. देशपांड्यांची आठवण ठेवण्याचीही एक इच्छा जाता जाता लक्षात आली. नाटककार म्हणून मराठीत जास्त ओळख असलेल्या गो. पु. देशपांडे यांचं १६ ऑक्टोबरला निधन झालं. म्हणजे आपण ज्या दिवशी एक नोंद प्रसिद्ध केली त्याच दिवशी. त्यानंतर थोडा काही काळ नोंदींविना गेला नि आता पुन्हा थोडा काही काळ नोंदींविना जाणार आहे, त्यापूर्वी गो.पुं.ची आठवण ठेवू नि वाचकांनाही रेघेच्या थोड्या थांबण्याविषयी कळवू, या हेतूनं ही नोंद.

गो. पु. देशपांडे (२ ऑगस्ट १९३८ - १६ ऑक्टोबर २०१३)
[फोटो : 'नाटकी निबंध'च्या मलपृष्ठावरून]

गो. पु. देशपांडे यांचं रेघेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं काम सांगायचं तर त्यांनी 'रहिमतपुरकरांची निबंधमाला' या मालिका शीर्षकाखाली 'नाटकी निबंध' आणि 'चर्चक निबंध' अशी दोन पुस्तकं उभी केली. गो.पु. हे एक मिश्कील विद्वान होते, अशी त्यांची प्रतिमा या निबंधांमधून वाचकाच्या मनात आपसूक तयार होऊ शकते. हा मिश्किलपणा 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मधे प्रसिद्ध झालेल्या लिखाणात एवढा असा नव्हता, असं आपलं सर्वसामान्य वाचक म्हणून मत आहे. पण त्यांच्या मराठी निबंधांमधे मात्र तो मुबलक सापडतो आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काळ घालवलेले लोक त्यांच्याबद्दल नंतर जे बोलले त्यावरून प्रत्यक्ष त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही तो मुबलक सापडत असावा.

'चर्चक निबंधां'मधे एका ठिकाणी गो.पु. मराठी साहित्याबद्दल एक ढोबळ निरीक्षण मांडतात ते असंय पाहा :
आजचे लोकप्रिय मराठी साहित्य 'लोकप्रिय' चित्रपटापेक्षा फारसे निराळे नाही. लोकांना वाचून वाचून (पाहून पाहून) काही संकेतांची, मांडणीची काही तऱ्हांची सवय झालेली असते. त्यात अगदी सामान्य आशय व्यवस्थितपणे बसविता येण्याचे तंत्र माहिती असले तर 'लोकप्रिय' होणे फारसे अवघड नाही. मर्ढेकरांनी लय तोंडवळणी पडली आणि शब्दावर थोडी हुकमत असली की कविता लिहिणे फार अवघड नसते असे म्हणून या प्रक्रियेचे साररूप वर्णन केलेच आहे.

त्याच्या जोडीला उच्चर्गीय-उच्चवर्णीय भावभावना दुखावतील असे काही लिहू नये, शक्यतो त्यांच्या भावभावना, त्यांचे पूर्वग्रह जोपासतील असेच लिहावे हा मराठी साहित्याचा एक नियम होऊन बसला आहे. काही वैचारिक लिहायचे असेल तर गांधी थोर, मार्क्स थोर, सावरकर थोर, गोळवलकर थोर, राष्ट्र सेवादलही थोर, अशी सबगोलंकार उदारमतवादी-मानवतावादी या सर्वसाधारण शीर्षकाखाली येऊ शकेल अशी भूमिका घेतली की काम झाले. हे करणारा थोर चिंतक, विचारवंत अशी आजकाल चलती आहे.

त्याचा परिणाम नाही म्हटले तरी सार्वजनिक अभिरूचीवर होतोच. हिंदी चित्रपटाला इतके जण नावे ठेवतात म्हणून हिंदी चित्रपट बघणे कोणी सोडून देते का? ते शक्य नसते. विशुद्ध कलावादी विचारवंताला पटणार नाही इतकी कलेची आणि (दुर्दैवाने) अपकलेची ताकद असते. त्यामुळे माल विकला जातो. त्यात कमी अधिक कस असतो यात शंका नाहीय. पण 'लोकप्रिय' लेखनाचा सध्या माल (कमॉडिटी) झालेला आहे. त्याला इलाज नाही. मी त्याच्याविरुद्ध तक्रार करीत नाही. परंतु बाजारावर आधारलेल्या या समाजात ते अटळ आहे एवढेच मी म्हणतो आहे.

त्यामुळेही कदाचित् ही मरगळ जात नसावी. या सांस्कृतिकदृष्ट्या मंद, बाजारी पण उच्चभ्रू समाजाला एखादी कॅसेट लावून ऐकण्याव्यतिरिक्त साहित्यादी गोष्टीत रस राहिलेला नाही.
यावरून गो.पुं.च्या म्हणण्याचा आणि एकूणच आपण ही नोंद का करतोय याचा काहीसा अंदाज यावा. प्रसारमाध्यमांबद्दल आपण मर्यादित क्षमतेच्या का होईना पण ज्या नोंदी रेघेवर करू पाहत आलोय, त्याचा संबंध वरच्या परिच्छेदाशी आहेच आहे. गो.पुं.चे या पुस्तकांमधले निबंध काहीसे खेळकर पद्धतीचेही वाटू शकतील कोणाला, आणि त्यामुळे मतभेदालाही जागा राहते. पण ती कुठे नसते? आणि ती असते हे बरंच एका अर्थी, नायतर मतभेदालाही जागा नसणं म्हणजे डेंजर अवस्था!
संध्याकाळी 'वॉश' घेऊन 'फ्रेश' झाल्यानंतर 'कॉर्नर'वरच्या एका 'जॉईन्ट'वर 'तंदूरी' खायची त्याच्याआधी जरा 'ड्रिंक्स' घेऊ. नंतर एखादं हिंदी 'पिक्चर' आणि रात्री झोपण्यापूर्वी भीमसेन जोशींच्या 'अभंगवाणी'ची 'कॅसेट' ऐकू! सध्या लोकांच्या कलेविषयी वेगळ्या अपेक्षा नसतात. वेळ जात नाही मग कळले तर थोडे साहित्य. पु.ल. वाचू किंवा सोप्पं म्हणजे ऐकू! म्हणजे हे 'सपर' नंतर 'बेड टाईम'पर्यंतचे 'लाँगएज' जरा सुसह्य होईल.
असं गो.पुं.नी लिहिलं त्याला झाली आता बरीच वर्षं. शिवाय हे एक ठराविक आर्थिक वर्गापुरतंच निरीक्षण म्हणता येईल, पण उर्वरित जनतेच्या बाबतीत कदाचित यातले काहीच तपशील बदलतील. आणि वरचं निरीक्षण लिहिलं गेलं तेव्हा आजच्यासारख्या विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरती इतक्या अशा मराठी मालिकांच्या मालिकांवर मालिकाही सुरू नव्हत्या. तरीही आपण हे इथे रेघेवर कायतरी बडबडत बसलो. काय म्हणायचं ह्याला!