०६ फेब्रुवारी २०१३

आफ्रिका, चीन, भारत आणि माध्यमं


फोटो : इथून
चीन आणि आफ्रिका यांच्यातला व्यवहार 'खूप गुंतागुंतीचा आहे. प्रत्येकवेळी त्याचं आकलन होतंच असं नाही. फक्त उर्वरित जगालाच आकलन होत नाही असं नाही, तर आफ्रिकी आणि चिन्यांनाही त्याचं आकलन होत नाही', असं 'चायना डेली'च्या प्रकाशकांनी त्यांच्या 'आफ्रिका वीकली' आवृत्तीच्या पहिल्या अंकात म्हटलंय. ही आवृत्ती म्हणजे चिनी प्रकाशकांच्या मालकीचं आफ्रिकेत प्रकाशित होणारं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र आहे.

यासंबंधी 'अल-जझिरा'वरचा लेख वाचण्यासारखा आहे. माध्यमांच्या माध्यमातून चीनचा नक्की काय खटाटोप चाललाय त्याचा थोडासा अंदाज कदाचित यातून येईल.
अमेरिकेतल्या 'इकॉनॉमिस्ट' साप्ताहिकाने आफ्रिकेचा उल्लेख 'निराशाजनक' असा केला होता आणि तिथेच चिनी माध्यमं का उतरतायंत, त्याबद्दल या लेखात काही सापडू शकेल. आफ्रिका म्हणजे दुष्काळ, हिंसाचार एवढीच प्रतिमा पाश्चात्त्य माध्यमांच्या प्रभावामुळे होत असली, तरी तिथे आर्थिक हितसंबंध गुंतवण्यासाठी माध्यमांचा वावर आवश्यक असल्याचं चिनी मंडळींना साहजिकपणेच लक्षात आलंय. चिनी माध्यमं ही सरकारी मालकीची आहेत हे नोंदवून आता पुढे वळू.

नोंदीच्या सुरुवातीला जे विधान चीन आणि आफ्रिका संबंधांबद्दल दिलंय, ते भारत आणि आफ्रिका यांच्या संबंधांबाबतही लागू पडतं. त्याचा शोध 'कॅरव्हॅन' मासिकाच्या ताज्या (फेब्रुवारीच्या) अंकात घेतलाय.
'उदयोन्मुख आफ्रिकेत भारत चीनसोबत स्पर्धा करू शकेल का?' असा प्रश्न विचारून त्यांनी 'आफ्रिका शायनिंग' हा दीर्घ लेख लिहिलाय.

कॅरव्हॅन : फेब्रुवारी
आफ्रिका व्यवसायाच्या नवीन संधी घेऊन येणारं ठिकाण ठरतंय आणि या खंडामधे आणखी अनेक शक्यता येत्या काळात दिसणार आहेत, असं विधान करून या संधी व शक्यतांचा उपभोग घेण्यात भारत आणि चीन यांच्यातल्या स्पर्धेत कोण बाजी मारतो, यासंबंधी काही सांगत हा लेख फिरतो.

नैसर्गिक साधनसंपत्तीची समृद्धता, वाढता मध्यमवर्ग या आफ्रिकेच्या बाजूंमुळे वाढलेलं खंडाचं महत्त्व, त्यातून वाढलेले ग्राहक, त्यातून वाढलेली विक्रेत्या देशांची आफ्रिकेतली रूची आदी गोष्टींमधून काही चित्र उभा करण्याचा प्रयत्न या लेखात आहे. (जगातल्या सोन्याच्या ज्ञात साठ्यांपैकी ४० टक्के साठे आफ्रिकेत आहेत. प्लॅटिनमच्या ज्ञात स्त्रोतांपैकी ८० टक्के याच खंडात. इत्यादी.)

या संदर्भात सत्तरच्या दशकात जे लोक अस्तित्त्वात होते, त्यांना युगांडात हुकुमशहा इदी अमीनने भारतीय (आशियाई) व्यावसायिकांना हिंसकपणे देशाबाहेर काढण्याची सुरुवात केल्याच्या बातम्या आठवू शकतील.
***

वरच्या दोन लेखांमधे आफ्रिकेचे जे संदर्भ आलेत त्यांची चर्चा तशी गेला काही काळ चांगल्यापैकी सुरू आहे, पण सोमाली चाच्यांनी जहाज पळवलं या व अशा पद्धतीच्या आखूड बातम्यांशिवाय फारसं काही या संदर्भांचं मराठीत आपल्यासारख्या सामान्य वाचकांपर्यंत पोचत नसल्यामुळे 'रेघे'वर ही लहानशी नोंद करून ठेवली. दुसरं काय करणार?
***

विश्वाचा विस्तार केवढा?
ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा
- केशवसुत

०४ फेब्रुवारी २०१३

गाव : सावरगाळी । जिल्हा : बेळगाव । एक मराठी शाळा

कोल्हापुरातून बेळगावात गेल्यानंतर पुढे खानापूर तालुक्यातून जरासं पुढे गेल्यानंतर रस्त्याला लागून असलेलं गाव : सावरगाळी. कोल्हापुरापासून अंतर साधारण सव्वाशे किलोमीटर. बेळगावापासून तीसेक किलोमीटर.
लोकसंख्या : पाचशेच्या आसपास.
तिथली 'सरकारी उच्च प्रा. मराठी शाळा'

पहिलीतली मुलगी - नाव : साक्षी.
तिच्या वर्गात मुलं : सात.
तिला येणाऱ्या भाषा : दोन : मराठी आणि कन्नड.
शाळेच्या पडवीतल्या गोल खांबावरचे ''हे (शब्द) वाच बघू.''
गाय
बैल
म्हैस
घोडा
शेळी
मेंढी
मांजर
कुत्रा
हरण
ससा
उंट

सगळं रांगेत पाठ केल्यामुळे पटापट म्हणून दाखवलं.

मग कागदावर लिहून दाखवला शब्द : मजबूत.
तिला जमत नाहीये.
''एकेक अक्षर जमतंय का बघ.''
हळूहळू म - ज -
                    एवढं जमलं. मग 'बू' सांगितलं. मग 'त' जमला. एकूण : 'मजबूत' म्हणता आलं.

पहिली ते सातवीची मराठी माध्यमाची शाळा.
सकाळी आठच्या वेळेतली गोष्ट वर सांगितली.
त्यानंतर समोरच्या मैदानात रांगेत उभ्या राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू झाली.
राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात-
जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता

नंतर मुलांची उपस्थिती मोजण्यासाठी प्रत्येकाला सरांनी आकडे घ्यायला सांगितले. एक - दोन करत एकोणतीसच्या इथे असलेला मुलगा गडबडला. सरांच्या सूचनेवरून रांगेत त्या मुलाच्या पुढे उभा असलेला मुलगा मागे वळतो. मागच्या आकडा चुकलेल्या मुलाचं नाक धरून त्याच्या थोबाडीत मारतो. शिक्षा झाल्यानंतर पुढची गणती होऊन मुलांची त्या दिवशीच्या प्रार्थनेच्या वेळची उपस्थिती नोंदवली जाते : ३४.

एकूण वर्गांच्या खोल्या चार.
मुलं आत गेली. आणि पुन्हा आतून वेगळ्या प्रार्थनेचे आवाज : बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.
***

शाळेच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात शेकोटी पेटवून तासभर बसून असलेल्या काळ्या बारक्या आजोबांचं वय : ८६ वर्षं.
त्यांना बोलता येणारी भाषा : एक : मराठी.
समजणाऱ्या भाषा दोन : मराठी आणि कन्नड.
''कन्नड कितपत?''
समजतंय, पण काय बोलू, कसं बोलू समजत नय.
***



***

शनिवार : फेब्रुवारी २०१३ या दिवशीची ही प्रत्यक्ष नोंद आहे. फोटो काढतो तशा हेतूने केलेली.

३० जानेवारी २०१३

काही 'धार्मिक' बातम्या आणि नरहर कुरुंदकर

पंधरा मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला ठेवलं तर भारतातले २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना धडा शिकवतील, असं वक्तव्य 'ऑल इंडिया मज्लिस ए इत्तिहाद अल- मुस्लीमीन' या आंध्रप्रदेशातील पक्षाचे हैदराबादेतून तिथल्या विधानसभेवर गेलेले आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केलं. त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली, हा सर्व तपशील घडल्याला आता महिना उलटलेला आहे. यासंबंधी 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'मधलं संपादकीय वाचून अधिकची काही माहिती मिळू शकेल. बाकी, 'विकिपीडिया'वरही काही सापडू शकेल.

या घटनेनंतर त्या संदर्भात व अशा पद्धतीच्या विविध आडव्यातिडव्या वक्तव्यांविषयी टीव्ही चॅनलांवर चर्चाही झालेल्या आहेत. वर्तमानपत्रांमधे लेखही आलेले आहेत. आता आपण जरा पूर्वीच्या हैद्राबादी निजामाच्या संस्थानाचा भाग असलेल्या, आताच्या मराठवाड्यात नांदेडमधे होऊन गेलेल्या नरहर कुरुंदकरांची आठवण जागवूया.

का?

अशा वक्तव्यांमागचा इतिहास पडताळून पाहाणं का आवश्यक आहे ते कळावं म्हणून. 

वरच्या ओवेसींच्या वक्तव्याबद्दल बोलायचं, तर हैद्राबाद संस्थान भारत राष्ट्रात विलीन झालं तो लढा जवळून पाहिलेल्या आणि लहान वयात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात त्यात सहभागी झालेल्या कुरुंदकरांनी त्यांच्या 'जागर' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय नोंदवलंय ते पाहाणं महत्त्वाचं ठरू शकेल.
भारताच्या इतर प्रांतातील लढ्यापेक्षा हैद्राबाद संस्थानातील लढ्याचे स्वरूप निराळे होते. तो केवळ लोकशाही स्वातंत्र्याचा आणि जनतेच्या बाजूने संस्थानिकाच्या विरुद्धचा लढा नव्हता. त्या लढ्याचा आशय कितीही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी तो मुस्लिम जातीयवादाच्या एका प्रबल केंद्राविरुद्ध चालू असणारा हिंदू प्रजेचा लढा होता, ही गोष्ट नाकारता येणारी नव्हती. कै. सिराजुल हुसेन तिरमिजी, हुतात्मा शौयेबुल्लाखान, कोप्पल येथील चार-पाच मुस्लिम सहकारी, लढ्याच्या शेवटच्या काळात लढ्यात सहभागी झालेल्या सात मुस्लिम नेत्यांची नावे कितीही उच्चारवाने घोषित केली तरी हैद्राबाद संस्थानातील खालपासून वरपर्यंतचा संपूर्ण मुस्लिम समाज हैद्राबाद संस्थान भारतातून वेगळे रहावे, स्वतंत्र रहावे, या मताचा होता, ही गोष्ट लपणे शक्य नव्हते. आमच्या डोळ्यांसमोर वस्तुस्थितीचे चित्र स्पष्टपणे उभे होते. अशा अवस्थेत १४-१५ वर्षांच्या मुलालासुद्धा काँग्रेस संघटनेची अधिकृत भूमिका खोटी आणि चुकीची आहे, हे जाणवतच होते.
त्या वेळच्या काँग्रेसची अधिकृत भूमिका अशी होती की, मुस्लिम लीग आणि हैद्राबाद संस्थानातील 'इत्तेहादूल मुसलमीन' यांसारख्या संघटना वरिष्ठवर्गीय मुस्लिम भांडवलदारांच्या व जमीनदारांच्या संघटना असून त्या परकीय सरकारच्या तालावर नाचणाऱ्या इंग्रजधर्जिण्या संघटना आहेत, पण सर्वसामान्य मुसलमान असा नाही. तोही देशावर प्रेम करणारा, राष्ट्रीयत्वाचे आव्हान पोहोचणारा, स्वातंत्र्याला उत्सुक असणारा असा समाज आहे. लीगचा आवाज हा मुसलमानांचा प्रातिनिधिक आवाज नव्हे. मोठमोठ्या नेत्यांनी ही अधिकृत भूमिका अनेक पुराव्यांनी तपशीलवार समजावून सांगितली, तरी आम्हांला पटणे शक्य नव्हते. मुस्लिम समाज व जनता या संघटनेत आहे; या संघटनेचे नेते वरिष्ठवर्गीय असतील, पण त्यांच्याच मागे मुस्लिम समाज आहे, हे सत्य आम्ही नाकारू शकत नव्हतो, सर्वसामान्य मुस्लिम माणूस धार्मिक राष्ट्रवादी राजकारणाचा भाग आहे व होता.

(जागर, पान १०-११)

हैद्राबादचा हा इतिहास लक्षात घेतला तर तिथे ओवेसींचा पक्ष काय करू शकतो, कशाचा फायदा उपटवू शकतो आणि कोणत्या वक्तव्यातून काय घडवू शकतो ते स्पष्ट होईल.
***

ओवेसींच्या वक्तव्य एकीकडे झाल्यानंतर भारताचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वक्तव्य केलं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष भगव्या दहशतवादाला खतपाणी घालतायंत. शिद्यांच्या वक्तव्याचं स्वागत पाकिस्तानातल्या 'जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनेचा संस्थापक (आणि मुंबईवरच्या '२६/११' हल्ल्यांचा सूत्रधार) हफीझ सईद याने केलं. यापूर्वीही अशी वक्तव्यं होत आल्येत. आणि होत राहातीलही. यातल्या कुठल्याही मुद्द्यावर टीव्हीवर झालेल्या चर्चांमधे इतर वक्तव्यांचे दाखले देण्यात आले. त्यामुळे हा गुंता एकमेकात किती घुसलाय हे समजू शकतं.

या सर्व विधानबाजीसंबंधी थोडीफार 'सेक्युलर' स्पष्टीकरणं कुरुंदकरांच्या वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात सापडतील.

कशी?

हे समजून घेण्यासाठी त्यांचा हा परिच्छेद पाहूया-
हिंदूंचा जातीयवादसुद्धा नीट समजून घेतला पाहिजे. जनसंघ, आर.एस.एस., हिंदुमहासभा असल्या प्रकारच्या पक्षांतच हिंदू जातीयवाद असतो, असे नाही. तसे असते, तर फार बरे झाले असते! भारतीय निवडणुकीत सर्व सेक्युलर पक्षांना मिळून ७० टक्क्यांच्या आसपास मतदान होत असते. हिंदू जातीयवाद्यांचे सर्वांत मोठे समूह निधर्मीपणाचा बुरखा पांघरून सेक्युलर पक्षांतच ठाण मांडून बसलेले आहेत! म्हणून मुस्लीम जातीयवादाविरुद्ध झगडण्याचा कोठलाही कार्यक्रम पुढे रेटणेच कठीण झाले आहे. कोठलाही प्रश्न उपस्थित झाला, की हिंदू जातीयवाद दोन-तीन सोज्ज्वळ भूमिका घेत असताना दिसतो. पहिली सोज्ज्वळ भूमिका सर्व धर्म सारखेच आहेत, हे तुणतुणे वाजवीत सर्व धर्मांची तोंडभर स्तुती करण्याची आहे. म्हणजे कोणत्याही धर्माबाबत धर्मचिकित्सेची किंवा धार्मिक गुलामगिरीविरुद्ध झगडण्याची गरजच बाजूला झटकून टाकता येते! दुसरी तितकीच सोज्ज्वळ भूमिका धर्माविषयी काहीच न बोलता सर्व जातीयवाद्यांशी तडजोडी करण्याची आहे. या तडजोडीची आत्मघातकी चढाओढ मशावरतला पाठिंबा देण्यात साम्यवादी व समाजवादी पक्षांनी जी एकमेकांवर ताण केली, तेथे दिसून येते. तिसरी सोज्ज्वळ भूमिका हृदयपरिवर्तनाची आहे. मुस्लिम समाजाबाबत कोणताही प्रश्न निघाला की, 'हा प्रश्न मुसलमानांना समजावू सांगा, त्यांना पटू द्या, त्यांना मागणी करू द्या म्हणजे सोडवू,' असे सांगण्यात येते. हा पदर झटकण्याचा एक प्रकार आहे!
(पान १७७)
***

'सामना'चे दिवंगत संपादक किंवा सध्याचे अस्तंगत होत असलेले संपादक काय म्हणतात ते वाचून मुस्लीम धर्माबद्दल मतं बनवणं काही बरं नाही. पण त्याबरोबरच सगळे धर्म सारखेच आहेत असं म्हणत भाबडी भूमिका घेणंही फारसं बरं नाही. हे फक्त मुस्लीम धर्माला लागू नाही, हिंदू असो, ख्रिस्ती असो किंवा इतर कोणी. सबगोलंकारीपणाऐवजी, त्या-त्या संदर्भात काही समजून घेता येईल का, असा प्रयत्न बरा वाटतो. सबगोलंकारीपणाने मूळ प्रश्नाची तड लागत नाही. किंबहुना अशी भूमिका एकूणच जातीयवादाला पूरक ठरते, असं कुरुंदकरांचं म्हणणं आहे. या त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य महाराष्ट्रातही नुकतंच दिसून आलंच, चिपळूणला झालेल्या जानेवारीच्या मध्यात झालेल्या ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात.

साहित्य संमेलनासंदर्भात कुरुंदकरांचं म्हणणं कसं लागू होतं, हे स्पष्ट होण्यासाठी आधी त्यांचं म्हणणं सांगूया-
हिंदू मनाला कोणते परिवर्तन मानवतच नाही. ज्या वेळी हिंदू समाजात पुरोगामी विचार निर्माण झाले, त्या वेळी हिंदू समाजातही पुरोगामी शक्तींना फारसा पाठिंबा नव्हता. सतीबंदी मागणारे, इंग्रजी शिक्षण मागणारे मूठभर, पाचपन्नास लोक होते. याविरोधी तक्रार करणाऱ्यांचे अर्ज व प्रस्थापित मूल्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे अर्ज हजारो सह्यांनी भरलेले होते. हा आपलाच इतिहास विसरून जाऊन सेक्युलर बुरख्यातले हिंदू नेते मुस्लिम बुरख्याच्या बाबतीत मात्र हृदयपरिवर्तनाच्या गोष्टी बोलतात! मुस्लिम समाजात परिवर्तन होत नाही, याचे मुख्य कारण हे आहे की, हिंदू समाजातील सेक्युलर नेतृत्वही परंपरेने चालत आलेल्या परंपरावादी नेत्यांच्याच हातात आहे! आणि या परंपरावाद्यांना कर्मठ मुस्लिमांशी हातमिळवणी करणे मतदानाच्या दृष्टीने सुरक्षित वाटते. परिवर्तनविरोधी स्थितीवादी असणारा हिंदू जातीवादी मुस्लिम जातीयवादाचे संरक्षण करतो, --

(पान १८०)

कुरुंदकरांच्या पुस्तकातल्या वरच्या परिच्छेदातलं शेवटचं वाक्य साहित्य संमेलनामधे लागू पडलं.

कसं?

तर, ब्राह्मण व हिंदुत्त्ववादी जातीयवादाने मुसमुसलेल्या संयोजकांनी मराठी लेखक आणि मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या घरापासून सुरू होणारा ग्रंथदिंडीचा मार्ग स्थानिक मुस्लिम टोळक्याच्या विरोधापायी बदलून टाकला.
***

'जागर' : प्रकाशक - देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. : किंमत - दोनशे रुपये.
कुरुंदकरांच्या राजकीय लेखांचा हा ग्रंथ आहे. साधारण १९६७पासून पुढच्या दोन वर्षांत हे लेख लिहिले गेल्याचा अंदाज प्रस्तावनेवरून बांधता येतो. एकूण पुस्तकाची पानं २६३ आहेत. त्यात चाडेचार पानं भरणारी १२० संदर्भग्रंथांची यादी आहे.

आपण वरच्या मजकुरात जे दाखले दिले ते या ग्रंथातल्या तिसऱ्या विभागातले आहेत. त्यात 'सेक्युलॅरिझम् आणि इस्लाम', 'धर्मग्रंथ-अनुयायी-जीवन', 'राजकीय शोध व बोध' अशी तीन प्रकरणं आहेत.

हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा कोणत्याही धर्माबद्दल काहीएक स्पष्ट आणि संदर्भावर आधारित मांडणी या लेखांमधून आहे. मतभेदांना जागा आहे.

२६ जानेवारी २०१३

भारतीय प्रजासत्ताकातील भाषा व आकाशवाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. तेव्हापासून सुरू असलेला हा प्रजासत्ताक दिन.

भारतीय राज्यघटना इंग्रजीतून इथे वाचता येईल
राज्यघटनेचा सतरावा भाग आहे - 'अधिकृत भाषा'. त्यातला तपशील मुळातून वाचता येईल, आपण फक्त त्या भागाच्या शेवटाकडे दिलेल्या 'विशेष सूचनां'चा आशय इथे आधी नोंदवूया - (कायदेशीर भाषेमधे हे केलेलं नाही, पण आशय चुकवलेला नसावा. कलमांचे क्रमांक आधीच्या प्रकरणांपासून सुरू होऊन आलेले असल्याने मूळ घटनेत वेगळे आहेत. इथे या नोंदीपुरते त्यांना क्रमांक दिलेले आहेत.)
१) तक्रार निवारणासाठी वापरण्याची भाषा - संघराज्याच्या किंवा राज्याच्या एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघराज्यात किंवा राज्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचा वापर करता येईल.
२) प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षणाची सुविधा - भाषिक अल्पसंख्याक गटाच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रत्येक राज्य व स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील असावे. अशा सुविधांसाठी तरतूद करण्यासाठी आवश्यक वाटल्यास राष्ट्रपती कोणत्याही राज्याला संबंधित आदेश देऊ शकतात.
३) भाषिक अल्पसंख्याक गटांसाठी विशेष अधिकारी - अ) भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी करावी.
ब) राज्यघटनेने भाषिक अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांसंबंधीच्या प्रकरणांची चौकशी करणं हे विशेष अधिकाऱ्याचं काम असेल. या प्रकरणांसंबंधी राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसार त्यांना वेळोवेळी माहिती पुरवणं हेही या अधिकाऱ्याचं काम असेल. राष्ट्रपतींनी हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांना व संबंधित राज्यांच्या सरकारांना पाठवावेत.
४) हिंदी भाषेच्या विकासासाठी सूचना - भारताच्या मिश्र संस्कृतीतील सर्व घटकांना अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून हिंदी वापरता येईल एवढा या भाषेचा प्रसार व विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन देणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे.

प्रशासकीय पातळीव इंग्रजीला डच्चू देऊन हिंदीचा वापर वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत आणि ते पाच वर्षांमधे प्रत्यक्षात यावेत असंही घटनेतील या भागामधे लिहिलेलं आहे.
***

'एथ्नोलॉग' हे जगभरातल्या सुमारे सात हजार भाषांची आकडेवारी प्रकाशित करणारं प्रकाशन आहे. त्यात नवीन आवृत्तीनुसार भर घालण्याचं काम ते लोक करत असतात. त्यांची मदत घेऊन आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळी, मराठी, मैतेई, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, ऊर्दू - या बावीस राष्ट्रीय भाषांची भाषकसंख्या, कुठे कुठे त्या बोलल्या जातात आदी तपशील आपल्याला पाहाता येऊ शकतो. सरकारने अधिकृतरित्या सूचीत घेतलेल्या या भाषा आहेत.
***

आता आपण 'आकाशवाणी'कडे वळू.
तुम्ही रेडियोवरच्या बातम्या ऐकता का?
'ऑल इंडिया रेडियो'ने त्यांच्या वेबसाइटवर भारतातील राष्ट्रीय भाषांमधली वार्तापत्रं ऐकण्याची सोय करून दिलेली आहे. उदाहरणार्थ, कोणाला नागपूर केंद्रावरच्या संध्याकाळी पावणेसातच्या बातम्या ऐकायच्या असतील, तर त्या वेबसाइटवर जाऊन ऐकता येतात. भारतात नक्की कुठल्या भाषांमधे बातम्या सांगितल्या जाऊ शकतात आणि ऐकल्या जाऊ शकतात आणि त्या कशा सांगितल्या जातात हे ऐकण्यासाठी आपण ह्या वेबसाइटवर जाऊ शकतो. मिझोरममधे रेडियोवर कोण काय ऐकत असेल, हे तुम्हाला नागपुरात ऐकता येऊ शकेल. आणि या बातम्यांचा मजकूरही त्यांनी उपलब्ध करून दिलाय. एकूण ज्या मिश्र संस्कृतीचा उल्लेख राज्यघटनेतल्या भाषांविषयीच्या विभागात केलेला दिसतो, त्या मिश्र संस्कृतीची झलक इथे ऐकता येते.


***

२४ जानेवारी २०१३

तोंडाला सुटलेला फेस

वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर दिसणाऱ्यांना एकदम तुच्छ लेखण्याचं किंवा एकदम 'हिरो' करण्याचं टाळून आपण ही नोंद वाचण्याचा प्रयत्न करूया. माध्यमाच्या म्हणून असलेल्या मर्यादा आणि इतर अनेक मर्यादांमधे गोष्टी घडत असल्याचं लक्षात घेऊन ही नोंद वाचूया. 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'च्या सरत्या आठवड्यातल्या अंकात आलेल्या संपादकीय टीपणाचं हे भाषांतर आहे. या मताची 'रेघे'वर एक नोंद व्हावी एवढाच हेतू.
***

गेले काही दिवस पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात भारत सरकारकडे एकाच वेळी कठोर आणि गोंधळलेल्या मागण्यांची संख्या वाढत असल्याचं दिसतंय. जम्मूमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने दोन भारतीय जवानांना मारून शिरच्छेद केल्याच्या पार्श्वभूमीवर या मागण्या होत आहेत. मुळात हे कृत्य अत्यंत क्रूर होतं आणि शस्त्रसंधी असूनही खऱ्या अर्थाने कधीच पूर्णपणे न थांबलेल्या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचं काम पाकिस्तानी सैन्याच्या या नीच पातळीवरच्या जाणुनबुजून केलेल्या कृत्याने झालं. शस्त्रसंधीच्या करारामुळे नियंत्रण रेषेवरच्या चकमकींची संख्या कमी झाल्याचं आणि नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी पुरेसा अवकाश मिळत असल्याचं चित्रं वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमधून दिसत असलं तरी भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी या कराराचा विविध वेळी भंग केला आहे.

पाकिस्तानबरोबरच्या वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींमधे कधी चुका करत कधी सामोपचार साधत, गेल्या दोन वर्षांत भारत सरकारने सकारात्मक पावलं उचलत दोन्ही देशांमधले संबंध सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले होते. अजून बरंच काही करता आलं असतं आणि अजूनही करता येईल; दोन्ही देशांमधल्या संबंधांमधल्या सुधारणेचा वेग फारसा उत्साहवर्धक नसला तरी दिशा सकारात्मक आहे. भारतात पाकिस्तानी क्रिकेट संघाला खेळण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय, वृद्धांसाठी व्हिसाच्या अटींमधे शिथीलता आणण्याचा निर्णय, आणि व्यापारवृद्धी यांमुळे संबंध सुधारणेसाठी मदत झाली. यामुळे सीमेवरचं सैन्य कमी करणं, दोन्ही देशांमधल्या लोकशाही आणि पुरोगामी गटांना प्रोत्साहन देणं या गोष्टीही शक्य झाल्या असत्या. भारत - पाकिस्तान संबंध म्हणजे फक्त दोन सार्वभौम राष्ट्रांमधले संबंध नाहीत, तर त्यामागे सांप्रदायिकता, फाळणी, विश्वासघात व द्वेषाच्या भावना असे अनेक संदर्भ आहेत. ते फक्त परराष्ट्र संबंध नाहीत तर देशांतर्गत राजकारणावर परिणाम करणारे हे अतिशय दुर्मीळ स्वरूपाचे आणि अनेकदा भयंकर वाटतील असे संबंध आहेत.

भारतातल्या सार्वजनिक वर्तुळांमधे पाकिस्तानचा उल्लेख कधीच फक्त एक परका देश म्हणून येत नाही, तर अनेकदा स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येच्या संदर्भात हा उल्लेख असतो. भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार अनेकदा भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात पाकिस्तानचा उल्लेख करतात. नुकतीच एक बातमी होती की, मुंबईतल्या एका वस्तीमधे वीजबिलावर पत्ता म्हणून 'छोटा पाकिस्तान' असं लिहिलेलं आढळलं होतं!

या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्यांच्या हत्येची व त्यातील एकाच्या शिरच्छेदाची बातमी उचलून धरली. केवळ बातमी देण्यापुरती ही घटना उरली नाही तर सतत आणि ठरवून गर्दीला उचकवण्यासाठी त्याचा वापर झाला. केवळ एखादी किंवा काही थोड्या वाहिन्या याला जबाबदार आहेत असं नाही. उलट अगदीच थोडे अपवाद वगळता, वृत्तवाहिन्या आणि दूरचित्रवाणी पत्रकार लोकांना भडकावण्यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत होते. अर्धवट बातम्या, अर्धसत्य कथन, पूर्ण खोटेपणा, चर्चांसाठी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या 'मत घडवणाऱ्यां'ची आणि 'तज्ज्ञां'ची काळजीपूर्वक केलेली निवड हे सगळं रसायन एकत्र करण्यात आलं, जेणेकरून दर संध्याकाळी घरांच्या दिवाणखान्यामधे (आणि पुढे जाऊन रस्त्यांवर) रागाचा पारा ठराविक पद्धतीने वाढत जाईल; परिणामी, प्रेक्षकांची संख्याही वाढेल. आत्ताच्या संदर्भापुरतं बोलायचं तर गंभीर, पण लहानसा प्रश्न वृत्तवाहिन्यांनी एकहातीपणे राष्ट्रीय उन्मादात बदलून टाकला. पाकिस्तानी हॉकी खेळाडूंवर हल्ला करण्यासाठी जमलेल्या शिवसेनेपासून एकाच्या बदल्यात दहा पाकिस्तानी शिरं घेऊन येण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजांपर्यंत - उजव्या पक्षांनी व राजकीय नेत्यांनी, वाहिन्यांनी आधीच वाढवलेला हा मुद्दा उचलला.

वृत्तवाहिन्यांच्या या वागणुकीसंदर्भात अनेक कारणं दिली जातात. उपलब्ध जागेपेक्षा वृत्तवाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे जाहिराती मिळवण्याची स्पर्धाही वाढली, त्यामुळे प्रेक्षकसंख्या वाढवण्याची स्पर्धाही वाढली, यातूनच प्रेक्षकांना आपल्याच वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी सनसनाटी बातम्या तयार करण्याची गरज वाढली. दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्यांची स्पर्धा फक्त एकमेकांसोबत नाहीये, तर मनोरंजनपर कार्यक्रमांना वाहिलेल्या वाहिन्या, क्रीडाविषयक वाहिन्या, अगदी दूरचित्रवाणीव्यतिरिक्तचे कार्यक्रम या सगळ्यांसोबत वृत्तवाहिन्यांची स्पर्धा सुरू आहे. वृत्तवाहिन्यांवरचे हे दबाव फक्त भारतातच आहेत असं नाही. विविध ठिकाणच्या माध्यमसंस्कृतींनी तिथले संदर्भ लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधले. पण भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाने आंधळ्या अभिमानाप्रदर्शनाचा मार्ग निवडल्याचं दिसतंय. १९९९मधल्या कारगील युद्धाच्या वेळी पहिल्यांदा या व्यवसायिक डावपेचाची झलक दिसली, पण २००८मधल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी भारतातले दूरचित्रवाणी पत्रकार उन्मादी वार्तांकनाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसले. या व्यावसायिक डावपेचामधे न टाळता येण्याजोगं काहीच नाही. ज्यांनी ते सुरू केलंय त्यांना त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल.

अनेक लोकांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या या घडवून आणलेल्या उन्मादाने बाधित होऊन पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना माघारी पाठवणं, वृद्ध व्यक्तींना व्हिसामधे सवलती देण्याचा निर्णय पुढे ढकलणं, यांमुळे भारत सरकारने आपलं परराष्ट्र धोरण वृत्तवाहिन्यांच्या भयंकर उन्मादाला बळी दिल्याचं दिसलं. या 'डेड एन्ड'मधून सुटकेचा कोणताही सोपा मार्ग नाही. माध्यमांचं सरकारकरवी नियंत्रण करणं हेही भयानक आणि अस्वीकारार्ह आहे, पण त्याचबरोबर माध्यमांनी उजव्या गटांना आक्रस्ताळेपणात माघारी टाकणं हेही भयानक आहे. माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी आणि कॉर्पोरेट दबाव नसलेले दुसरे काही नवे मार्ग असू शकतील का? की, आपण दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्या म्हणजे मनोरंजनपर ('बिग बॉस'सारखे 'रिअॅलिटी शो' दाखवणाऱ्या) वाहिन्या आहेत असं समजून त्यांच्याकडे पाहायला हवंय?
***

वरच्या मजकुरासारखंच मत व्यक्त करणारा संपादकीय मजकूर 'बिझनेस स्टँडर्ड'मधेही आला होता.
***

TV Heads (ग्राफिटी : बँक्सी । विकिपीडियावरची नोंद)
***

२१ जानेवारी २०१३

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतली एक नोंद

जॉर्ज ऑर्वेल
जॉर्ज ऑर्वेल (जन्म - २५ जून १९०३.) मृत्यू - २१ जानेवारी १९५०.

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतल्या १९३८ ते १९४२ या काळातल्या नोंदी पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेल्या आहेत. (संपादक - पीटर डेव्हिसन). या नोंदी 'ऑर्वेल डायरीज्' या ब्लॉगवरही अधिकृतपणे उपलब्ध आहेत. त्यातलीच ही एक ('बीबीसी रेडियो'वरच्या कामाच्या संदर्भातली) नोंद, १५ ऑक्टोबर १९४२ची.


इंग्लंडमधे लहानसा भारत रुजवल्यासारखं झालंय. काही आठवडे आमची मराठी वार्तापत्रं कोठारी नावाचे एक लहान चणीचे गृहस्थ भाषांतरीत करत आणि वाचतही. हा गुबगुबीत मनुष्य बुद्धीमान होता आणि माझ्या अंदाजानुसार खरोखरचाच फॅसिस्टविरोधी होता. 'बीबीसी'मधे कर्मचारी भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांना (ह्या प्रकरणात मला वाटतं, एम१५ला) अचानक एके दिवशी लक्षात आलं की कोठारी कम्युनिस्ट आहेत किंवा होते, विद्यार्थी चळवळीत सक्रीय होते; त्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा आदेश आला. इंडिया हाऊसमधे काम करणारा जथा हा राजकीयदृष्ट्या 'ठीक' असलेला तरुण कोठारींच्या जागी भरती करण्यात आला. या भाषेत भाषांतरकार सापडणं इतकं सोपं नाहीये. जे भारतीय मातृभाषा म्हणून ही भाषा बोलतात ते इंग्लंडमधे असताना ती विसरतात असं दिसतं. काही आठवड्यांनी माझ्या सहायक, मिस् चितळे, दबकत माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की, अजूनही वार्तापत्रं कोठारीच लिहीत आहेत. जथा ती भाषा वाचू शकत असला तरी लिहिण्याबाबतीत मात्र त्याची प्रगती नव्हती, त्यामुळे कोठारीच त्याच्यासाठी लिहीत होते. मानधनही त्या दोघांमधे विभागलं जात होतं. आम्हाला दुसरा सक्षम भाषांतरकार मिळाला नाही, त्यामुळे कोठारींचं काम सुरूच ठेवण्यात आलं होतं आणि अधिकृतरित्या आम्हाला त्याबद्दल काही माहीत नव्हतं. भारतीय लोक सापडतील तिथे अशा गोष्टी होतच राहणार.
***

टीपा -
१) एम१५ : ब्रिटिश गुप्तचर संस्था, ऑर्वेलवरही लक्ष ठेवत असे असं कागदपत्रं सांगतात.
२) मराठी विभाग - 'बीबीसी'ची प्रक्षेपण सेवा १९४०च्या दरम्यान काही पौर्वात्य भाषांमधे निवडक प्रमाणात सुरू करण्यात आली. मराठीही त्यात होती.
३) मिस् चितळे : वेणू चितळे. (जन्म - २८ डिसेंबर १९१२. मृत्यू - १ जानेवारी १९९५). 'बीबीसी'मधे सुमारे पाच वर्षं नोकरी. इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध करणाऱ्या पहिल्या मराठी महिला. त्यांच्याबद्दल 'लोकसत्ते'त आलेले दोन लेख - एकदोन. त्यांचा एक फोटो.
४) दुसऱ्या महायुद्धाचा साधारण कालावधी : १९३९ - १९४५.
***

ऑर्वेलच्या काही पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या 'पेंग्विन'वाल्यांनी 'जॉर्ज ऑर्वेल दिना'निमित्त बाजारात आणल्यात. त्यातल्या 'नाइन्टीन एटी-फोर'चं मुखपृष्ठ असं आहे-

मुखपृष्ठ : डेव्हीड पीअरसन

हुकूमशाही (किंवा खरंतर कुठल्याही) राजवटीतल्या (किंवा समाजातल्या / संस्थेतल्या) 'सेन्सॉरशिप'ला पीअरसननी असं मुखपृष्ठावर आणलंय. त्यामुळे पुस्तकाचं आणि लेखकाचं काळ्या ठशातलं नाव काळ्या रंगाच्या पट्टीवरतीच असल्यामुळे दिसतंय - न दिसतंय अशा परिस्थितीत ठेवलंय. त्यासंबंधी 'क्रिएटीव्ह रिव्ह्यू'.
***
आपल्याला आजूबाजूला काय दिसतंय?

१८ जानेवारी २०१३

दिवाकर, असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशीनाथ गर्गे) यांची आज जयंती.
जन्म - १८ जानेवारी १८८९. मृत्यू - १ ऑक्टोबर १९३१.

'विकिपीडिया'वरची दिवाकरांवरची नोंदही बऱ्यापैकी आहे. त्यातून काही अधिकची माहिती हवी असल्यास मिळू शकेल.
***


नाट्यछटा म्हणजे काय?
नाटकाचा तो अति-लहान किंवा सोपा प्रकार नव्हे किंवा ते कथेचे किंचित् नाट्यीकरणही नव्हे. एकीकडे नाटक, नाटिका आणि दुसरीकडे कादंबरी, कथा पाहून या प्रकाराला त्याचे स्वतंत्र, वेगळे अस्तित्त्व दिसते; आणि ते आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकाराच्या वाचनाने १९१३ साली हेरून दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली ती 'महासर्प'.

- विजय तेंडुलकर 
('नाट्यछटा' एका आवृत्तीच्या प्रस्तावनेतून. 'रेघे'वर नोंदीसाठी संदर्भ - समग्र दिवाकर - संपादक : सरोजिनी वैद्य. पॉप्युलर प्रकाशन)

तेंडुलकरांनी १९१३ या वर्षाचा केलेला उल्लेख चुकीचा असावा, कारण 'महासर्प' १८ सप्टेंबर १९११ या तारखेला लिहिली गेल्याची नोंद आहे. : रेघ.
***

ही दिवाकरांची एक नाट्यछटा :

असे केल्याशिवाय जगात भागत नाही!

''...माझे मोठे भाग्य, यात काही शंका नाही! नाहीतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गाठ पडायला! - अहो कशाचे, कशाचे! आम्ही कसले कवी! कोठे एका कोपऱ्यात लोळत पडलो आहोत झाले! नाही खरेच! परवाची आपली कविता फारच बहारीची होती बोवा! फारच छान! एक्सलंट! अहो आधी नाव पाहूनच थक्क झालो! 'माझे अंधार अजीर्ण।' वा! किती सुंदर! - नाही, ते आले लक्षात. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून! पण त्यातल्या त्यात या दोन ओळी तर मला फारच आवडल्या! काय पहा! -  हां बरोबर, - 'अजीर्णामुळे। जीव कळवळे।।' काय बहार आहे यात! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ! - काय म्हणता! इतका खोल अर्थ आहे का? शाबास! 'प्रेमभंगामुळे हृदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचे अजीर्ण!' क्च! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो! टेरिबल! फारच प्रतिभा अफाट! माझे समजा हो! - कोणती? - कोणती बरी माझी कविता आपल्याला अतिशय आवडली? हां, हां! ती होय? गेल्या मस्तकमंजनातील चहादाणीवरील! अस्से! - हो, तीसुद्धा आहे आत्म्यालाच धरून! - बरे आता रस्त्यात नको - केव्हा? उद्या सकाळी येऊ आपल्या घरी? - ठीक आहे - हं: 'अहो रूपम् अहो ध्वनिः' चालले आहे जगात! म्हणे 'आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली!' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची! इतकी भिकार कविता की, मला स्वतःलासुद्धा आवडत नाही! 'माझी चहादाणी। साखरपाणी।। अधण येई सळसळा। अश्रू येती घळघळा।।' हः हः यंवरे कविता! पण चालले आहे की नाही! भेंडीरमणाने उठावे बटाटेनंदनाची स्तुती करावी! बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी! मनात परस्परांना त्यांची कविता मुळीच आवडत नसते! पण जगात याने त्याला शेली म्हणावे, उलट त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''

२२ मे १९१३

('समग्र दिवाकर'मधून. पान क्रमांक ५१-५२)

***

फेसबुक : मराठी साहित्य : मराठी साहित्य संमेलनं : माध्यमं : व इतर अनेक गोष्टी : यांना ही नोंद अर्पण.

सदानंद रेग्यांनी दिवाकरांवर लिहिलेल्या 'गर्गेसाहेब' या कवितेच्या सुरुवातीला कंसात लिहिलं होतं : (काहीही कारण नसताना आज तुमची आठवण झाली. असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?)

'रेघे'वर दिवाकरांची आठवण आली त्याचं कारण आज त्यांची जयंती आहे हे. आणि वरती जे नोंद अर्पण केलेल्या गोष्टी लिहिल्यात तेही एक कारण सांगता येईल.
***


शंकर काशीनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर

***