०८ फेब्रुवारी २०१५

नेमाडे, यू ग्रम्पी ओल्ड बास्ट..- रश्दी

या नोंदीचं शीर्षक वाचून तुम्हाला जे काही वाटलंय, त्याबद्दल आपली नोंद आहे.

मराठी लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. त्या निमित्तानं ही नोंद होतेय असंच नाही. या नोंदीचं निमित्त इंग्रजी लेखक सलमान रश्दी यांनी पुरवलंय. परवाच्या दिवशी नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाल्याची घोषणा झाली, त्याच दिवशी रश्दी यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून पुढचे शब्द पोस्ट केले.

 

या शब्दांमध्ये 'भालचंद्र नेमाडे' हे शब्द आलेले नसले, तरी रश्दी यांनी त्यासोबत जोडलेल्या लिंकमध्ये ते शब्द उलगडतात. लिंक आहे नेमाड्यांना पुरस्कार मिळाल्यासंंबंधी 'टाइम्स ऑफ इंडिया'त आलेल्या बातमीची. त्यात मग नेमाड्यांनी बातमीदाराला आपली काही मतंही सांगितली. ती नव्यानं आल्यासारखी बातमीत आलीत. उदाहरणार्थ, व्ही. एस. नायपॉल आणि सलमान रश्दी यांच्यासारखे लेखक पाश्चिमात्त्यांना सुखावण्यासाठी लिहितात आणि त्यांच्या लेखनाला काही फारसं साहित्यिक मूल्यही नाही, इत्यादी.

ग्रम्पी (grumpy), या शब्दाचा अर्थ बहुधा चिडखोर, चिडका, रडीचा डाव खेळणारा, असा होऊ शकतो.
ओल्ड (old), म्हणजे म्हातारा.
बास्टर्ड (bastard), म्हणजे- शब्दकोशानुसार, अनौरस, दासीपुत्र, खालच्या दर्जाचा, हलक्या प्रतीचा.

आपल्या लेखनाला साहित्यिक मूल्य नाही, असं कोणी म्हटल्यामुळं रश्दींनी एवढं चिडून जायचं काय कारण होतं? नेमाड्यांच्या 'टीकास्वयंवर'ची प्रत त्यांनी चाळली, किंवा सगळं वाचायचं नाही म्हटलं तरी फक्त शेवटची सूची बघून, त्यात आपलं नाव कुठं आलंय ते पाहून, तेवढं जरी वाचलं असतं, तरी त्यांचा एवढा तळतळाट झाला नसता. 'टीकास्वयंवर'मधल्या 'भारतीयांचे इंग्रजी लेखन' या १९८२ सालच्या लेखात (पान ७६-७७) येणारा उतारा पाहा :
अलीकडे गेल्या दहाएक वर्षांत भारतीय इंग्रजी लेखकांच्या साहित्याबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, वेस्ट इंडीज व काही आफ्रिकी देशांतले साहित्य जोडून कॉमनवेल्थ लिटरेचर असा आणखी एक प्रकार मान्यता पावू घातला आहे. खरे तर वरील ज्या देशांतील लेखकांची मातृभाषा इंग्रजी आहे, त्यांचे साहित्य मराठी-बंगाली-कन्नड-हौसा-स्वाहिली ह्या भाषांमधल्या साहित्याबरोबर अभ्यासले गेले पाहिजे. आफ्रिकेतल्या इंग्रजीत लिहिणाऱ्या लेखकांना तर बाहेरच्या जगात प्रसिद्धी मिळाली, पण स्वतःच्या देशांत कोणी ओळखत नाही. कारण तिथल्या देशी भाषांमध्ये हे लोक लिहीत नाहीत. हा विनोद वसाहतवादी वाङ्मयीन धोरणांमुळे होतो. असाच विनोद मुल्क राज आनंद पंजाबीत लिहीत नाहीत, पण इंग्रजी लेखकांची सर्टिफिकिटे आपल्या पुस्तकांवर छापून 'नॅशनल' किंवा 'इंटरनॅशनल' लेखक होऊ पाहतात तेव्हा होतो. खरे तर पंजाबी लेखक होऊन दाखवणे अधिक कठीण, महत्त्वाचे आणि मानाचे आहे, हे त्यांस कळले नाही. मुळे नसलेली आंतरराष्ट्रीयता अशा लेखकांनी आपल्याकडे सुरू केली. ह्या उलट, जी. व्ही. देसानी (ऑल अबाऊट एच. हॅटर) आणि सलमान रश्दी हे भारताबाहेर राहणारे दोनच लेखक रुडयार्ड किपलिंगनंतर भारतीय स्थितीवर उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती करू शकले. कारण ह्या दोघाही श्रेष्ठ लेखकांनी इंग्रजी भाषेचेच केंद्र मानून लेखन केले. युरेशिअन संस्कृतीचा नेमका छेद घेऊन त्याला योग्य अशी विरूपित शैलीही भारतीयत्वाचा परीघ स्पर्शून त्यांनी निर्माण केली. भारतीयत्वाचे केंद्र त्यांनी मानले नाही.
हे कळल्यावर तरी रश्दींना 'बास्टर्ड' शब्द वापरावासा वाटणार नाही, कदाचित. अभ्यासक मंडळी त्या त्या शब्दाचे सांस्कृतिक संदर्भ तपासतात. मग हा शब्द इंग्लंडमध्ये वापरणं आणि ब्रिटिश नागरिकानं भारतीय नागरिकाला उद्देशून वापरणं यात काही फरक असतो, तो सांगता येतो. आपल्याला जनरल वाचक म्हणूनही तो कळतोच. पण कळून काय होतं? दुसरीकडं, नेमाड्यांनी रश्दींच्या लिखाणाबद्दल १९८२ साली थोडा सकारात्मक सूर लावला असताना आता ते रश्दींनी फटकारत का असतील? विकिपीडिया सांगतो त्यानुसार, रश्दींची 'मिडनाइट्स चिल्ड्रन' ही गाजलेली कादंबरी १९८१ साली प्रकाशित झाली आणि मुस्लीम समाजाच्या भावना दुखवण्यासंदर्भात वादग्रस्त ठरलेली 'द सटॅनिक व्हर्सेस' १९८८ साली प्रकाशित झाली. नेमाड्यांचं रश्दींबद्दलचं बदललेलं मत कदाचित त्या वादापासून सुरू झालं असेल. कारण रश्दी (खरं तर कुठलाही लेखक) कुठला 'समाज' त्यांचा मानतात, हेही या वादाच्या निमित्तानं तपासण्यासारखं असेल! हा फार वेगळा विषय होईल आणि तो आपल्या समजेबाहेरचा आहे, पण समाजाचा संदर्भ नोंदीत पुढं जाण्यासाठी गरजेचा आहे. का, ते पाहा.

नेमाड्यांना ज्ञानपीठ जाहीर झाल्यापासून त्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांसोबतच त्यांच्यावर टीका करणाराही बऱ्यापैकी मजकूर कुठं ना कुठं प्रसिद्ध झालेला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांबद्दलची त्यांची पूर्वीची मतं (राष्ट्रीय पारितोषिकं ही कंपूशाहीतून निर्माण होणाऱ्या दोनचार मूर्ख माणसांच्या मर्जीवर ठरत असतात) आणि आता मधला एवढा काळ गेल्यानंतरच्या घडामोडी यांच्यातला विरोधाभासही दिसतो. पण त्या विरोधाभासासकटही नेमाड्यांबद्दलचा जिव्हाळा मोठ्या प्रमाणावर वाचकांमध्ये शाबूत आहे, असंही वातावरण राहतं. याचं कारण काय असेल? नेमाडे या विरोधाभासाच्या तपशिलाबद्दल स्पष्ट बोलत नसले, तरी कदाचित नेमाडे विरोधाभासाकडं स्वतःच बोट दाखवतात, हे असेल. म्हणजे परिवर्तनाचा वाटसरू या पाक्षिकाच्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात (पान २५) आलेल्या मुलाखतीत ते म्हणतात:
मी वृत्तीनं चक्रधरांच्या जास्त जवळचा आहे. म्हणजे मी 'एक्स्ट्रिमिस्ट'च आहे- विचारामध्ये. तरी असं म्हणा, मला ते 'मॉडरेट' असं काही आवडत नाही. पण त्याचबरोबर मी समूहाची कदर करायला अग्रक्रम देतो. निर्विघ्न जगण्यासाठी हा एक कायमचा कॉम्प्रोमाईज मी केलेला आहे आणि तो पाळलाच पाहिजे असं ठरवून टाकलं आहे. आपला समाज कुठल्या मार्गाने चालतो आहे, ते टाळून तुम्ही काही करू शकत नाही हे मला पटलं आहे. ह्या द्वंद्वामुळे मी नेहमी मागे पडतो ते मला चालतं, पण त्यामुळे सुखानं जगणं होतं.
खुद्द या वाक्यांमध्येही विरोधाभास आहे. पण या वाक्यांमध्ये ज्या सुखाच्या जगण्याचा उल्लेख केलाय, त्यासाठी काही गोष्टी दडपणं आवश्यक असेल. अन्यथा, 'टीकास्वयंवर' वाचण्याची गरज न पडणारे रश्दी त्याच पुस्तकाच्या लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर, आणि त्यासंबंधीची बातमी इंग्रजी पेपरांमध्ये आल्यावर त्या लेखकाची मतं कशाला वाचतील? हे नेमाड्यांना माहीत नसेल असं नाही. माहीत असेल म्हणूनच त्यांनी ह्या द्वंद्वातून मागे पडण्याचा उल्लेख करूनही खरं तर पुढं जाण्याचाच मार्ग शोधलेला असेल. (संस्कृती, समाज या गोष्टींचाही मार्ग हाच असत असेल, अशी शंका यावी अशी परिस्थिती सतत.)

अशा परिस्थितीत ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांचं मनापासून आणि द्वंद्वात्मक अभिनंदन करून थांबू.


भालचंद्र नेमाडे
(छायाचित्र: संतोष हिर्लेकर, पीटीआय)
या पूर्वी 'रेघे'वर:

०२ फेब्रुवारी २०१५

एक बातमी, एक बदली व अदृश्य शासन

भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी पोलिसांकडे माहितीच्या अधिकाराखाली काही गोष्टींची विचारणा केली होती. पंतप्रधानांची पत्नी असण्याच्या नात्यानं आपल्याला काय काय सुविधा मिळू शकतात, अशी म्हटली तर साधीच विचारणा. गुजरातेत मेहसाना जिल्ह्यातल्या उन्झा शहरात राहणाऱ्या, निवृत्त शिक्षिका असलेल्या जशोदाबेनना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यालाही बोलावलेलं नव्हतं किंवा तसा काही गाजावाजाही त्यांच्या वाट्याला हवा तेवढा आला नाही. पण मग एकदम सुरक्षारक्षक घराबाहेर पाहून त्या चकीत झाल्या असल्या तर साहजिक आहे. पंतप्रधानांची पत्नी असल्यामुळं ही सुरक्षा व्यवस्था.  आणि एवढी सुरक्षा देताय, पण त्यातही माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा अनुभव पाहता सुरक्षारक्षकसुद्धा आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, हे पाहून जशोदाबेननी गेल्या वर्षी नोव्हेंबरात माहिती अधिकार कायद्याखाली पोलिसांकडं अर्ज केला. त्यात त्यांनी सुरक्षेविषयीच्या शंकांसोबत पंतप्रधानांची पत्नी म्हणून आपल्याला इतर कोणत्या सुविधा मिळू शकतात, याबद्दल विचारणा केलेली होती. पण हे प्रकरण स्थानिक गुप्तचर विभागाच्या अखत्यारितलं असल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना समाधानकारक प्रतिसाद दिला नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीची ही घटना आहे. पहिल्या प्रयत्नाला यश मिळालं नाही, म्हणून त्यांनी पुन्हा यासंबंधीचा अर्ज केला असल्याची बातमी दोन जानेवारीला प्रसिद्ध झाली.

जशोदाबेन पुन्हा अर्ज करणार असल्याची बातमी काही ठिकाणी आली, तशी ती सरकारी मालकीच्या 'डीडी-गिरनार' या वाहिनीवरही आली. यावर जशोदाबेनना अजूनही काही माहिती मिळालेली नाही, पण दरम्यानच्या काळात डीडी गिरनार वाहिनीचे सहायक संचालक व्ही. एम. वनोल यांची बदली अंदमानला करण्यात आलेय. त्यांच्या निवृत्तीला एकच वर्ष बाकी असताना एवढी गडबडीनं बदली होण्याचं उघड कारण जशोदाबेनची बातमी असं आहे. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाला या संदर्भात 'इकॉनॉमिक टाइम्स'ने संपर्क साधल्यावर त्यांना तशी काहीही उघड माहिती देण्यास मंत्रालयानं नकार दिला. त्यामुळं वनोल यांच्या बदलीमागे जशोदाबेनची बातमी असल्याचं उघडपणे बोलता येणार नाही. ही बातमी प्रसारीत झाल्यावर दूरदर्शनच्या अहमदाबाद केंद्राला मंत्रालयाकडून तंबी देण्यात आल्याचंही वरच्या 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या बातमी म्हटलंय. कोणीही स्वतःचं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती दिलेली आहे. अशाच अटीवर बोलणाऱ्या अहमदाबाद केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी इकॉनॉमिक टाइम्सला अजून काय काय सांगितलं, ते एकत्रितपणे असं आहे :
'खाजगी वाहिन्यांवर जशोदाबेनची बातमी जोरात सुरू होती, म्हणून डीडी गिरनारच्या अधिकाऱ्यानं ती आपल्या वाहिनीवरही दाखवली.  जशोदाबेननी 'आरटीआय'खाली अर्ज दाखल केला, त्याचीही बातमी डीडी गिरनारवरून डिसेंबरमध्ये दाखवली गेली होती. पण ती नजरेतून सुटली असावी. यापूर्वी (काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील) संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकास कार्यक्रमांविषयीच्या जाहिराती डीडी गिरनारवर ब्लॉक करण्यात आल्या होत्या. १६ मे २०१४पासून, खरं तर निवडणुकांचे निकाल येण्याच्याही आधी सगळं बदलून गेलं. आम्हाला आमची वृत्ती बदलण्याच्या सूचना करण्यात आल्या. कोणतंही सरकार येवो, दूरदर्शनला स्वायत्तता नाहीच.'
मोदींच्या दूरदर्शनावर काँग्रेसवाल्यांनी जबरदस्तीनं काही अडथळे आणले, त्याची पुरेपूर भरपाई मोदी आता करत असल्याचं वाचक-प्रेक्षक पाहत असतील. पण यात 'दूरदर्शन' या वाहिनीला उगाच कमीपणा आल्यासारखं होतंय. म्हणजे सरकार कोणतंही आलं तरी त्यांच्या स्वायत्ततेवर टांगती तलवार सततच असते, अशी तक्रार दिसतेय. पण मग बाकीच्या सरकारी मालकी नसलेल्या वाहिन्यांचा उल्लेख असलेली ही जाहिरात पाहा :


महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात 'लोकसत्ते'च्या १३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात पान क्रमांक १७वर ही जाहिरात आपल्याला सापडते. त्याच वेळी मोदी अमेरिकेत मॅडिसन स्क्वेअरात भाषण करून आले, त्या भाषणाचं प्रसारण झी चोवीस तास, एबीपी माझा, आयबीएन लोकमत, टीव्ही नाइन, लेमन न्यूज, जय महाराष्ट्र अशा खाजगी मराठी वृत्तवाहिन्यांवर किती वाजता पाहता येईल, याची बरोब्बर वेळ सकाळी पेपरात छापून आलेली आहे. लक्षात राहायला सोपं जातं मग. ही बहुधा तेव्हा सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये आलेली जाहिरात आहे. आणि भाषणही सगळ्याच वाहिन्यांवर दाखवलं गेलं. पेपरांमध्ये जाहिरात जाहिरातीसारखीच छापून आली, हे सहजी कळेल. पण वृत्तवाहिन्यांवरून भाषणाचं प्रसारण जाहिरातीसारखं झालं का? की, बातमी मूल्यामुळंच ते प्रसारीत होत असल्यासारखं वाटत होतं? बातमी मूल्यामुळं झालं असेल, तर मग त्याचं बरोब्बर टायमिंग भारतीय जनता पक्षाच्या मार्केटिंगवाल्यांकडं कसं पोचलं? असे प्रश्न उघडपणे बोललो तर भाबडेपणाचं ठरेल इतके सगळे आता तयार झालेले आहेत. आणि सगळीकडं एकाच वेळी दाखवल्यामुळं नागरिकांच्या नजरेतून ते सुटू नये याची पुरेपूर तजवीज केलेली. ह्या वाहिन्यांच्या यादीत दूरदर्शन नाहीच, हे अजून एक.

त्यामुळं सरकारी वाहिनी असली का नि खाजगी वाहिनी असली काय नागरिकांच्या नजरेत येऊ नयेत अशा अनेक गोष्टी असणारच. 'दूरदर्शन'ची टॅगलाइन 'सत्यम् शिवम् सुंदरम्' अशी आहे, ती काय उगाच! देशाची टॅगलाइन बोधवाक्य 'सत्यमेव जयते' आहे, हे आणखी वर! आणि या सगळ्या माध्यम रचनेच्या वर 'अदृश्य शासन' कार्यरत असतं, असं जॉन पिल्जर नावाचे म्हातारे झालेले एक पत्रकार आपल्याला सांगतात. मग वाहिनी थेट सरकारी मालकीची आहे किंवा नाही यानं अगदी महाफरक काही पडत नाही, मामुली काही बदल्या होत असतील, काही बातम्यांचा फरक पडत असेल. पिल्जर यांचं 'अदृश्य शासन' याच शीर्षकाचं इंग्रजीतलं भाषण कधी तरी 'रेघे'वर मराठीत येईल अशी आशा आहे. पिल्जर यापूर्वी रेघेवर येऊन गेलेले आहेत. (सत्य, शिव, सुंदर- हे भारदस्त शब्द लिहिण्याएवढी रेघ भारी नाही नि तेवढं खरंच खरं बोललं जातं का याविषयीच शंका आहे, हे इथं उघडपणे नोंदवायला हवं. पण देशात हे शब्द वापरले जात असल्यामुळं वापरले).
***

जोड: आठवड्याभरापूर्वीच, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला पाहुणे म्हणून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या संदर्भात 'एबीपी माझा' या मराठी वृत्तवाहिनीवर जे काही बातम्यांचं प्रसारण झालं, त्याच्या शीर्षकात लिहिलं होतं, 'महासत्तेसमोर लोकशाहीचा महासोहळा'. अमेरिकेची महासत्ता एकदा मान्य केल्यावर मग आपली लोकशाही काय राहिली! महासोहळा असायचा तर असेल!



०६ जानेवारी २०१५

बेकार चित्रपट, चिकार वाद!

- आनंद मा्नवी


'पीके' या चित्रपटासंबंधीच्या वादावर टिप्पणी करणारा सच्चिदानंद शेवडे यांचा लेख [नाहक (?) वाद] तरूण भारत या बेळगावहून प्रसिद्ध होणाऱ्या मराठी वर्तमानपत्राच्या 'अक्षरयात्रा' (४ जानेवारी) पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. या चित्रपटात केवळ हिंदूंवरच जास्त 'प्रहार' करण्यात आले आहेत, असा एकूण लेखाचा सूर आहे. हा गैरसमज जास्त वाढू नये, यासाठी वाचकाच्या भूमिकेतून हे टिपण लिहिलं. अक्षरयात्रा पुरवणीच्या संपादकांशी यासंबंधी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सदरांनी सर्व जागा व्यापली असल्यामुळं वाचकांच्या प्रतिसाद रूपातल्या लेखनाला पुरवणीत जागा देणं शक्य होत नाही. लेखातील आशयाबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं, त्यामुळं त्यांचा नकार आशयासंबंधीचा नव्हता. जागेबद्दलच्या अडचणीमुळं ठरलेला एक संपादकीय नियम म्हणून त्यांची भूमिका समजून घेता येते. पण प्रतिसादाचा प्रयत्न त्या पुरवणीच्या कक्षेबाहेरही करता येऊ शकतो, असं वाटल्यामुळं 'रेघे'ला हा लेख पाठवत आहे.

(काही कारणामुळं एखाद्या ठिकाणी प्रसिद्ध न झालेलं कोणाचं लिखाण यापूर्वीही रेघेवर प्रसिद्ध केलेलं आहे, त्याला धरून ही नोंद होते आहे. मानवी यांचे आभार.)

पीके या चित्रपटाचं पोस्टर

या चित्रपटातील एका प्रसंगात, मुख्य पात्र असलेला हा परग्रहवासी 'पीके' चर्चमध्ये नारळ फोडून फुलं अर्पण करायला जाताना दाखवला आहे. देवळात पाहिलेलीच गोष्ट चर्चमध्ये तो करायला जातो, तेव्हा त्याला ख्रिश्चन मंडळी मूर्खात काढतात आणि त्याच्यासारख्याच माणसांमुळे जीझस ख्राइस्टला सुळावर जावं लागल्याचं सांगत त्याची खरडपट्टी काढतात. त्याच वेळी चर्चमधे ख्रिस्ताला वाइन अर्पण केली जात असल्याचं पीके पाहतो. मग वाइन विकत घेतो नि वाटेत भेटलेल्या एकाला, 'इथं भगवानाचं घर कुठाय' असं विचारतो. तो माणूस मुसलमान असतो आणि तो इलाकाही मुसलमानांचा असल्यामुळे मग त्याला मशिदीचा पत्ता दिला जातो. मग मशिदीत 'वाइन' अर्पण करायला जाणाऱ्या या 'पीके'ला अडवलं जातं आणि हे नापाक कृत्य करू पाहणाऱ्या त्याच्या पाठीमागे मुसलमान मंडळी तलवारी घेऊन लागतात. 

यावर असा युक्तिवाद केला जाईल की, हे एकटेदुकटे प्रसंग आहेत आणि एकूण मिळून हिंदू लोकांवरच टिकेचा मुख्य रोख आहे. शेवडे यांच्या लेखात अशा इतर धर्मांवरच्या टीकेच्या प्रसंगांचा उल्लेख टाळून हाच युक्तिवाद करण्यात आलाय. या चित्रपटातील मुख्य बुवाचे पात्रही पीकेच्या धर्माविषयीच्या प्रश्नांना उत्तरं न देता आपल्याच धर्मावर प्रहार होत असल्याचा असाच युक्तिवाद करतं. पण त्या युक्तिवादामध्ये फारसे तथ्य नाही.

चित्रपटात एका मुस्लीम दहशतवादी संघटनेने घडवलेल्या रेल्वेस्थानकावरच्या बॉम्बस्फोटात पीकेचा (हिंदू) मित्र मारला जातो, असंही दाखवलं आहे. यावर समजा, एखाद्या मुस्लीम व्यक्तीने आक्षेप घेतला आणि म्हटलं की, नुकतीच दहशतवादी हल्ल्यात शंभरहून अधिक मुस्लीम मुलं मारली गेली, त्यांचा उल्लेखही न करता केवळ मुस्लीमांच्या दहशतवादात हिंदू मेल्याचे चित्रण अयोग्य आहे. दहशतवाद केवळ मुस्लीम लोकच करतात काय? शिवाय त्यात मुस्लीमही मरतात त्यांचं काय?’ तर हा आक्षेप या संदर्भात हास्यास्पद ठरेल. कारण मुलं मारली जाण्याचा अतिशय भीषण प्रसंग पाकिस्तानात (शेवड्यांच्या भाषेत- ‘पापस्तान) काही दिवसांपूर्वी वास्तवात घडलेला आहे आणि चित्रपटाचे कथानक भारतामध्ये, दिल्लीत वेगळ्या संदर्भात घडतं आहे, त्यामुळं इथं सार्वजनिक ठिकाणी मरणाऱ्यांमध्ये मुस्लीमही असले, तरी हिंदूच जास्त दिसतील, हे साहजिक आहे. असे त्या त्या ठिकाणचे संदर्भ लक्षात न घेता केलेली कोणतीही टीका गैरसमजांना खत घालणारीच ठरू शकते. भारतात रेल्वेस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सर्वसाधारण दिवशी (विशिष्ट उत्सव वगैरे टाळून) जाऊन तपासणी केली, तर हिंदूच संख्येनं जास्त सापडतील, हे जितकं प्राथमिक तथ्य आहे, तितपतच प्राथमिक पातळीवर चित्रपटात आलेल्या हिंदूंवरच्या टीकेचे प्रसंग संख्येनं जास्त आहे. 

२००७ साली खुदा के लिए नावाचा एक पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यात मुस्लीम धर्मावर टीका होती. चित्रपट म्हणून काही कमी-जास्त असेलही- तो आपला विषय नाही, पण हा चित्रपट पीकेपेक्षा फारच जास्त प्रामाणिक हेतूने बनवलेला होता. तर, त्या चित्रपटात मुस्लीम धर्मावरच का टीका करण्यात आलेय, अशा प्रश्नाला अर्थ नसतो. एक तर, ते गोष्ट सांगणाऱ्याचं स्वातंत्र्य आहे आणि ज्या प्रदेशात, ज्या संदर्भांमध्ये गोष्ट घडतेय, त्यावरून त्यातला तपशील ठरणार हे साहजिक आहे. 

त्यामुळे एखादा परग्रहावरचा प्राणी भारतासारख्या देशात उतरला तर त्याला इथे कोणत्या धर्माचे प्राणी प्रामुख्याने भेटतील, इतपत प्राथमिक अंदाज बांधत कोणी कथा लिहिली, तर हिंदूच लोक या चित्रपटातल्या कथानकात जास्त का आहेत, हा मुद्दा उलगडू शकतो. आणि त्यानं भावना दुखावण्याचं काहीच कारण नाही. कारण मुळात चित्रपटात भावना दुखावण्याएवढं मूलभूत काही म्हटलेलंच नाही.

हा परग्रहावरचा, माणसासारखाच दिसणारा प्राणी (म्हणजे आमिर खान) पृथ्वीवर येतो नि एका महिलेकडून हात-हातात घेऊन तिला येणारी भाषा आपल्या मेंदूत फीड करून टाकतो. ही महिला भोजपुरी बोलत असल्यामुळे त्यालाही भोजपुरीच यायला लागते. विशेष म्हणजे सहा तासांमध्ये हात-हातात घेऊन भाषा शिकणारा हा एवढा बुद्धिमान प्राणी नंतर दुसऱ्या एखाद्या भाषेसंबंधी तसा प्रयत्न करत नाही. त्यामुळं बाकीची पात्रं प्रमाण हिंदी किंवा इंग्रजी बोलत राहिली, तरी हा भोजपुरीच बोलत राहतो. आणि शिवाय परग्रहावरून आल्यामुळं व्यक्तिमत्त्वाभोवती एक वलय आहेच. चेहऱ्यावरच्या भावभावना इथल्या लोकांपेक्षा वेगळ्या दाखवायचा प्रयत्न आहेच. मुळात चित्रपटातला बराचसा विनोद, हा असा चेहऱ्यावर वेगळ्या भावना आणि तोंडात भोजपुरी यांमधून आलेला आहे. ज्यांनी चित्रपट पाहिला असेल, त्यांनी तो सगळा भोजपुरी संवादांमध्ये असेल तर कसा वाटेल किंवा पीके या पात्राचे संवाद बाकीच्या पात्रांसारख्याच हिंदीत बोलले गेले तर कसं वाटेल, याची कल्पना करून पाहावी. संस्कृती-संस्कृतीत काही विरोध असतो, विरोधाभास असतो, निराळेपणा असतो. ह्या संस्कृतीतले नियम त्या संस्कृतीत हसण्याचा विषय ठरू शकतात. सध्या आपल्या देशातल्या मुख्य ग्राहकांना हसवण्यासाठी हिंदी चित्रपटांमधून व इतर मीडियामधून बिहार, यू.पी., लालूप्रसाद यादव, इत्यादींमधून ठसलेली भोजपुरीची गावंढळ प्रतिमा ह्या अल्ट्रा-परकीय पात्रावर रुजवून झालेला विनोद ही चित्रपटाची मुख्य कळ आहे. ती वेळोवेळी दाबून लोकांना हसवण्याचा प्रयत्न आहे. त्यात मूळ मुद्दा ताकदीचा असण्याऐवजी ह्या विरोधाभासातील विनोदाचा खेळ जास्त आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश नि बिहार या राज्यांमध्येच तिथल्या सरकारांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. म्हणजे, त्यांनाही आपल्यावरचा विनोद योग्य वाटत असेल कदाचित. 

या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या राजकुमार हिरानी यांच्यासाठी अशा उथळ कसबी वापरण्याचे तंत्र नवे नाही. यापूर्वी थ्री इडियट्समधे नाही का, एका गरीब मित्राच्या घरची परिस्थिती दाखवताना त्याच्या घरी चपात्या लाटणारी आई, बेडवर आजारी पडलेल्या बारक्या म्हाताऱ्या वडिलांच्या पाठीला खाज उठल्यावर, लाटण्यानंच पाठ खाजवते, आणि ती सगळी पात्रंही आक्रस्ताळेपणाने रडवेली झालेली असतात. ही अशी असंवेदनशी टिंगल आपल्याकडे विनोदाच्या नावावर खपवली जाते.

इतपत वरवरचा विनोद करणारा हा चित्रपट धर्मावरही वरवरचंच काहीतरी बोलू पाहतो. फक्त हिंदू नव्हे तर कुठल्याही धर्मावर तो असं वरवरचंच बोलतो. त्यामुळं पांढरी साडी घालून बसलेली हिंदू विधवा पाहिल्यावर पीके पांढऱ्या रंगाला दुःखाचा रंग समजतो. मग नंतर लग्नासाठी जाणाऱ्या पांढऱ्या पोशाखातल्या ख्रिश्चन तरुणीला दुःखी समजून तिच्याशी तसं कायतरी सांत्वनपर बोलायला जातो. मग ख्रिश्चनांमधे माणूस मेल्यावर काळे कपडे घालतात हे पाहून, काळ्या बुरख्यातल्या मुसलमान बाईला नवरा मेल्याबद्दल सांत्वनपर बोलायला जातो. ती-ती संस्कृती, धर्म, भाषा वेगवेगळ्या प्रदेशात कशी विकसित होते, समूहमन कसं घडतं,  यातले आपण तज्ज्ञ नाही. पण तरी या सर्वांमधलं वैविध्य एवढ्या वरवरच्या टिंगलीनं दाखवून देण्यातून वरवरच्या हसण्यापलीकडं काहीच होत नाही, एवढं आपल्याला कळू शकतंच. आणखी एक वेगळं उदाहरण द्यायचं तर, आपल्याकडे आफ्रिकेतली एखादी काळ्या रंगाची स्त्री दाखवली नि ही किती सुंदर आहे ना, असला संवाद टाकला की लोक हसणारच. कारण सध्या सौंदर्याचा रंग गोरा आहे. तो विविध जाहिरातींमधून आपल्याला सांगण्यात आलेला आहे. आणि आपल्याला भारतापुरतं जे बिहार-उत्तर प्रदेशाबद्दल वाटतं, ते जागतिक पातळीवर आफ्रिकेबद्दल वाटत असेल, असंही असेल. (पण अशा वेळी हिंदू संस्कृतीतल्याच द्रौपदीसारख्या स्त्रीचा कृष्णरंग आपण विसरतो. एवढंच काय, आपण स्वतः अमेरिका-युरोपच्या- म्हणजे तिथल्या बहुसंख्यांच्या तुलनेत काळेच ठरू, हेही विसरतो. मुळात रंगाचा नि भूगोल-हवामान यांचा संबंध असल्याचंही विसरतो. हे असं सोईसोईनं गोष्टी विसरणं गैरसमज जोपासण्यासाठी बरं असतं)

बाकी धर्म, भाषा ह्या गोष्टींबद्दल इतपत वरवर कायतरी मांडणाऱ्या चित्रपटावरून आपल्या भावना दुखावल्या जात असतील, तर त्याही वरवरच्याच म्हणाव्या लागतील. त्या जितक्या वरवरच्या तितकीच चित्रपटावरची टीकाही वरवरची. भाषा हे माध्यम संवादापेक्षा विसंवादाला कसं उपयोगी पडू शकतं, याबद्दल काही लहान-मोठं शेरेवजा बोलण्याचा प्रयत्न या चित्रपटात आहे. खुद्द हा चित्रपट बोलण्याच्या भाषेचा आणि दृश्यांच्या भाषेचाही वापर पोकळ संवादासाठी करतो. धर्म-भाषा-संस्कृती यांबद्दलच्या अनेक मुद्द्यांवर बोलताना चित्रपट हे माध्यमही पोकळपणे वापरतो. या पोकळपणाबद्दल त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ अभ्यासकच बोलू शकतील. आपण तर सामान्य प्रेक्षक-वाचक म्हणून हे टिपण लिहिलं. आणि आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांमुळेच हा चित्रपट आत्तापर्यंतचा सगळ्यांत जास्त पैसे कमावणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. त्यामुळेच चित्रपट बेकार असला तरी त्याच्यावर चिकार चर्चा होणं साहजिक आहे. पण असल्या बेकार-चिकारपणातून आपली अवस्था बडा घर पोकळ वासा अशी (संख्येनं जास्त पण विचारांनी कमी) होत चाललेय की काय, अशी शंका कोणाला येणं अगदी शक्य आहे.
***

'रेघे'ची भर-
पी.के. पाहिलेला नाही, पण वरच्या लेखावरून अंदाज घेतला, तर -
वि. वा. शिरवाडकर यांच्या 'कल्पनेच्या तीरावर' या कादंबरीतला नायक नेपाळला जात असतो. पण काही विचित्र घडामोडींमुळे तो शशशृंग या अज्ञात देशामध्ये जाऊन पोचतो. तिथल्या नीतीनियमांच्या वेगळेपणानं चक्रावून जातो. तिथं जेवणं ही खाजगी बाब आहे, तर लैंगिक भूक उघडपणे बोलली जाते. शिवाय कोणी पार्टी केली, तर आपल्याकडे स्नेहभोजन होईल, तसं तिथं वेगवेगळे सुवासिक रुमाल आणले जातात आणि सगळे पाव्हणे त्यांचा वास घेतात, दाद देतात. असं काय काय या कादंबरीत आहे. (कादंबरीचा आणखी अंदाज येण्यासाठी प्रतिक्रियेमधील मजकूर पाहावा). पण त्यात तसा तीरावरच फेरफटका मारलाय, जास्त खोलात बुडी मारलेली नाही. तरी-

कॉन्टिनेन्टल प्रकाशन । ७० रुपये