०१ नोव्हेंबर २०१५

इंग्रजीची जादू आणि तलवार, गदा, धनुष्यबाण, ढाल

"पूर्वी मी एका सर्वसाधारण मराठी शाळेत पाच हजार रुपयांवर शिकवायचे. पण नंतर मी 'माय इंग्लिश मॅजिक' वापरलं आणि.. आणि मी आता सीबीएसईच्या शाळेत ऐंशी हजार रुपयांवर शिक्षिका म्हणून काम करते", ही तीन वाक्यं आपण मराठीत लिहिली, पण प्रत्यक्षात ती बोलणारी तरुण मुलगी ही वाक्यं अर्थातच इंग्रजीत बोलते. 'माय इंग्लिश मॅजिक' या यंत्राने जणू तिचा कायापालटच झालाय! या यंत्रासंबंधीच्या जाहिराती टीव्हीवर काही छोट्या वाहिन्यांवर तासतासभर सुरू असलेल्या कदाचित काहींनी पाहिल्या असतील. नवज्योत सिंग सिद्धू या कार्यक्रमाचं निवेदन करतात. याच यंत्राच्या त्याच पद्धतीच्या दुसऱ्या तशाच जाहिरातीचं निवेदन सुधांशू पांडे हा छोटेखानी अभिनेता आणि मुख्यत्वे मॉडेलिंगमधला काम केलेला माणूस करतो.

सिद्धू आणि माय इंग्लिश मॅजिक

या जाहिरातीत मग अनेक सर्वसामान्य वाटतील अशा लोकांची नाट्यमय उदाहरणं प्रत्यक्ष पडद्यावर दाखवली जातात. कोणा मुलीचं अमेरिकेतल्या मुलाशी लग्न ठरलंय, पण तिला इंग्रजी बोलायची अडचण आहे, त्यामुळं ती दुःखी आहे. सूरतमधल्या कोणा तरुणाला नोकरीत बढती मिळण्याएवढी त्याची कामाची कुवत आहे, पण इंग्रजी येत नाही ही त्याची अडचण आहे. दिल्लीतला कोणी एकदम गरीब मुलगा जोरदार अभिनेता आहे, पण इंग्रजी येत नाही, म्हणून गाडी अडतेय. एका पंजाबी तरुणाला कॅनडात त्याच्या भावासोबत बिझनेस करायची इच्छा आहे, पण इंग्रजी येत नसल्यामुळं कॅनडास्थित भावानं त्याची टिंगल केलेय. अशा या सगळ्या मंडळींना 'माय इंग्लिश मॅजिक' हे यंत्र दिलं जातं आणि मग त्यांच्या आयुष्यातल्या या सगळ्या पोकळ्या भरून निघतात आणि ते आता आनंदानं जीवन जगायला लागलेत. 

जाहिरातीतल्या स्टुडिओत भाषेसंबंधीचे तज्ज्ञही उपस्थित असल्याचं प्रेक्षकांना सांगितलं जातं. माय इंग्लिश मॅजिक या यंत्राबद्दल यातले एक तज्ज्ञ सांगतात, 'हे म्हणजे लिफ्टसारखं आहे. लिफ्टमधे तुम्ही ग्राउन्ड फ्लोअरवर असाल तर एक बटन दाबल्यावर तुम्ही कित्येक मजले वर जाऊन पोचता. त्यासाठी काही मेहनत करावी लागत नाही. तसंच इंग्रजीच्या बाबतीत ग्राउन्ड फ्लोअरवर असलेला माणूस इंग्लिश मॅजिकच्या माध्यमातून एकदम पल्लेदार इंग्रजी बोलू लागेल.' 

आत्मविश्वास, पैसा, जनरल यश, प्रतिष्ठा, करिअर या सगळ्या बाबतीत जीवनात असलेल्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे यंत्र उपयोगी असल्याचं जाहिरातीवरून कळतं. भाषेचा आणि या कमतरतांचा काय संबंध आहे हे दाखवण्यासाठीच बहुधा सिद्धू यांना निवेदनाला घेतलं असावं. पूर्वी क्रिकेटपटू असताना बॅटिंगला आल्यावर खचलेल्या आत्मविश्वासामुळं थरथरल्यासारखे वाटणारे सिद्धू भाषा आत्मविश्वासानं वापरतात आणि मग बाकींच्यानाही चिंता न करण्याचा सल्ला देतात. या यंत्रात वापरण्यात आलेल्या तंत्राचा इतिहासही जाहिरातीत सांगितला जातो, तो तर भयानक रोचक आहे. 'अमेरिकेनं १९५०मध्ये रशिया, चीन वगैरे देशांविरोधात लढताना, तिथल्या भाषा आपल्या सैनिकांना शिकवण्यासाठी हे तंत्र शोधून काढलं होतं. एखादं मूल जसं पाहून आणि ऐकून भाषा शिकतं, तसंच कुठलीही भाषा थेट मेमरीचा भाग बनवून टाकण्याचं हे तंत्र होतं आणि त्याचा उपयोग करून हे जगातलं एकमेवाद्वितीय यंत्र बनवण्यात आलंय- 'माय इंग्लिश मॅजिक'!'

इंग्रजीची ही अशी जादू तुम्हाला सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरातही दिसून येऊ शकते. जून महिन्यात शहरातील एका रस्त्यावर लागलेले हे काही फलक पाहा. 
 
कराड व इंग्रजी: १
कराड व इंग्रजी:२
कराड व इंग्रजी: ३
  (फोटो: अश्विनी कांबळे)

सिद्धूचं इंग्लिश मॅजिक आणि कराडमधले फलक काही समान गोष्टी सांगतायंत. गृहिणींपासून ते व्यावसायिक क्षेत्रातल्या योद्ध्यांसाठीही इंग्रजीचं शस्त्र महत्त्वाचं असल्याचं सिद्धू सांगत होता आणि कराडमधले फलकही तेच सांगतायंत. हे अर्थातच यापेक्षाही गुंतागुंतीचं  आहे. जग जिंकायला निघालेल्यांची भाषा म्हणून इंग्रजी आवश्यक आहे, हे एक म्हणणं झालंच. पण साधं इथल्याइथं मामुली व्यावहारिक फायद्यांसाठी, आर्थिक पत थोडीतरी बरी व्हावी यासाठी इंग्रजीचं शस्त्र आवश्यक असल्याचंही म्हणणं वरच्या फलकांमधून मांडलेलं दिसतंय.

'इंग्रजी हटाओ' नावाचं आंदोलनच ज्यांनी सुरू केलं होतं त्या राममनोहर लोहियांना हे फलक बघून काय वाटलं असतं? आधीच ते इतके चिडलेले इंग्रजीवर. ते किती चिडलेले याचे दाखले 'भाषा आणि जाती: दोन हत्यारे सत्ताधाऱ्यांची' या पुस्तकात मिळतात. श्रीपाद केळकर आणि इंदुमती केळकर यांनी १९५६ ते १९६७ या काळातल्या लोहियांच्या वेगवेगळ्या जाहीर भाषणांमधून मजकूर संकलित करून भाषांतर केलेलं हे पुस्तक आहे. भाषणं असल्यामुळं पुस्तकात लोहियांचा रागरागच जास्त दिसतो. इंग्रजी ही भारतीयांना गुलाम ठेवणारी भाषा आहे, सत्ताधीश आणि शासित अशी विभागणी करणारी भाषा आहे, कायदापण इंग्रजीत असलेला कसला स्वतंत्र देश, अशा प्रकारे लोहिया बोललेले आहेत. ही पन्नास वर्षांपेक्षाही पूर्वीची गोष्ट आहे. तेव्हापेक्षा आता परिस्थिती बरीच बदलली असेल, पण तरी जुन्या काळात चिडलेल्या लोहियांचं मत नोंदवून ठेवू. या पुस्तकात पान क्रमांक ५२वर लोहिया म्हणतात:
प्रेेस्टिज प्रकाशन । जानेवारी १९९४
जनतेच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल जे प्रेम आहे त्यापासून तिला परावृत्त केले पाहिजे असा उपदेश वारंवार केला जातो. सरकारी धोरण बदलवण्याऐवजी जनतेची मनोवृत्ती बदला असाही एक सल्ला दिला जातो. हा सल्ला वाह्यात आहे. प्रतिष्ठा, सत्ता आणि संपत्ती इंग्रजी भाषेशी निगडीत आहेत. अशा परिस्थितीत जनतेला इंग्रजीचा मोह वाटणे स्वाभाविक आहे. अशा स्थितीत एखाद्या संपन्न व्यक्तीने आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळेत घालू नये अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळा चालू द्यावयाच्या आणि त्या शाळांत जाऊ नका असा उपदेश करावयाचा हा दुटप्पीपणा आहे. खाजगी, मिशनरी आणि कॉन्व्हेंट आदी फॅन्सी शाळांमधील मुलांचे शिक्षण प्रारंभापासून इंग्रजीतून होते. उलटपक्षी म्युनिसिपल अथवा सरकारी शाळांमध्ये मातृभाषेतून शिकवले जाते. अशा दोन प्रकारच्या शाळा असता कामा नयेत. सर्व शाळांचे माध्यम मातृभाषाच असले पाहिजे. गरिबांची मुले म्युनिसिपालिट्यांच्या शाळेत शिकतात तर अधिकारसंपन्न व साधनसंपन्न व्यक्तींची मुले या फॅन्सी शाळांतून शिकतात. परिणामान्ती बड्या लोकांची मुले बडी बनतात. कलेक्टरचा मुलगा कलेक्टर, मंत्र्याचा मुलगा मंत्री. साधारण विद्यार्थी तिसऱ्या अथवा दुसऱ्या वर्गात पास होऊनही त्याला कॉलेजात प्रवेश मिळू शकत नाही पण मंत्र्यांची मुले नापास होऊनही युरोप-अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊ शकतात. या जगात न्याय म्हणून काही उरलाच नाही असेच विद्यार्थ्यांना वाटते.
खरं म्हणजे एवढं म्हणूनही पुन्हा लोकांनी इंग्रजी हटाओचं आंदोलन रस्त्यावर उतरून करावं, मुळात इंग्रजीचा सार्वजनिक वापरच बंद व्हायला हवा, अशी लोहियांची अपेक्षा दिसते. त्यासाठी इंग्रजी पाट्यांवर डांबर फासा, वगैरेसारखे उपायही त्यांनी नोंदवलेले आहेत. पण लोहियांचा इंग्रजीविरोध चालला नाही. लोकांनी सरकारचं धोरण बदलायला लावावं, असं त्यांचं म्हणणं दिसतं. प्रत्यक्षात लोकांनी स्वतःचंच धोरण बदलून टाकलं बहुतेक. नेहमीप्रमाणे 'प्रेस्टिज प्रकाशना'नं त्यांचं हे मराठी पुस्तक काढलंय (पहिली आवृत्ती: नोव्हेंबर १९७१, दुसरी आवृत्ती: जानेवारी १९९४), ते आत्ताही दुर्मीळ असल्यासारखंच वाटतं. हळूहळू ते मिळायचं बंद होईल बहुधा. दरम्यान, भारताचे सध्याचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊनही हिंदीत बोलतात, ते इथं टीव्हीवर दिसतं, वगैरे घडामोडी आहेत. तरीही वरची सिद्धूची जाहिरात आणि फलक आपण पाहिले.

वरच्या पुस्तकात भाषा आणि जात हे दोन वेगवेगळे विभाग म्हणून आलेले आहेत. त्यांना एकत्र असं घेऊन त्यात फारसं काही आलेलं नाही. भारतात कुठल्याही इतर मुद्द्यांप्रमाणे भाषेलाही जातीचा संदर्भ असतो. म्हणजे मराठी बोलायची तरी ती आपल्याला येते तशीच बोलून पुरत नाही, तुम्ही पुण्याला शिकायला आलात, तर मग तुम्हाला तुमची मराठी 'अशुद्ध' असल्याचं जास्त तीव्रतेनं कळेल, आणि मग काही लोकांची मराठी जास्त 'शुद्ध' असल्यामुळं ती जास्त आत्मविश्वासानं वावरतात, असं एक वाटू शकतं. तर मराठीतल्या मराठीत या छोट्यामोठ्या पायऱ्या चढण्यापेक्षा सरळ इंग्रजीचीच पायरी चढलेली काय वाईट!

'दलित्स अँड इंग्लिश' या इंग्रजी लेखात कांचा इलाया म्हणतात: 'जागतिकीकरणाच्या युगातील भारतासाठी गरजेचा असलेला आधुनिक दृष्टिकोन आत्मसात करायला इंग्रजी शिक्षण महत्त्वाचं आहे. इंग्रजी व देशी संस्कृतीतील विरोधाभास उच्च जातीयांनी चांगल्यापैकी काळजीपूर्वक हाताळला आहे. पण कनिष्ठ जातीयांना इंग्रजी शिकवण्याचा मुद्दा आल्यावर ते (उच्च जातीय) असा युक्तिवाद करतात की, इंग्रजीमुळे 'स्थानिक संस्कृती' (कल्चर ऑफ द सॉइल) नष्ट होईल.'

लोहिया राजकीय नेते होते, तर इलाया मूळचे राज्यशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आता थेट भाषेशी संबंधित अभ्यास केलेल्या कोणाचं काही जमवता येतंय का पाहू.

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात इंग्रजीचे सहायक प्राध्यापक असलेल्या दिलीप चव्हाण यांनी 'लँग्वेज पॉलिटिक्स अंडर कलोनिअलिझम: क्लास, कास्ट अँड लँग्वेज पेडगॉजी इन वेस्टर्न इंडिया' या विषयावर पीएच.डी. केलेली आहे. त्यांनी हा अभ्यास पुणे विद्यापीठातून (आता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) केला होता. त्या अभ्यासाचं इंग्रजी पुस्तक २०१३ साली प्रकाशित झालेलं आहे. पुस्तक परदेशी प्रकाशकानं काढलं असून, बहुधा विद्यापीठीय वापरापुरतंच ते असावं, असं दिसतंय. पण चव्हाण हे मराठीतही लिहितात आणि आपल्यासारख्या वाचकांसाठी त्यांची 'साम्राज्यवाद: भाषा आणि संस्कृती' ही पुस्तिका (क्रांतिसिह नाना पाटील अकादमी/ मावळाई प्रकाशन) इंटरनेटवर पीडीएफ स्वरूपात मोफत उपलब्धही आहे.

या साधारण पन्नास पानांच्या पुस्तिकेत बरेच संदर्भ देऊन चव्हाणांनी मांडणी केलेली आहे. त्यांचंही मत साधारणपणे असंच दिसतं की, वर्चस्व असलेला वर्ग स्वतःच्या सोईनं भाषेविषयीची धोरणं बनवतो आणि सर्वसाधारण लोकांची भाषा व अभिजनांची भाषा असा एक भेद ठेवूनच देतो. यात अधिक रस वाटल्यास पुस्तिका मुळातून वाचता येईल. विषय तर खूप मोठा आहे, आणि वादग्रस्तही. आपण तर कुठल्या तरी बारक्या टीव्ही चॅनलवरची जाहिरात आणि कराडमधल्या रस्त्यावरचे बोर्ड यांची नुसती बातमी नोंदवू पाहात होतो. पण कराडमधल्या बोर्डांशी सुसंगत असं एक अवतरण चव्हाणांच्या पुस्तिकेत सापडलं. एका अमेरिकी अधिकाऱ्याने म्हणे असं म्हटलंय की:
'आयडियॉलॉजीकल वर्ल्ड वॉर-थ्री'मध्ये भाषिक व भाषावैज्ञानिक क्षमता हे अमेरिकेच्या भात्यातले सर्वांत प्रभावी बाण आहेत. 
('Competence in languages and linguistics [are] the big guns ofAmerican armament in the Ideological World War III'.  चव्हाणांनी इंग्रजीत दिलेल्या अवतरणाचं रेघेनं केलेलं मराठी भाषांतर वर दिलं आहे. मूळ अवतरणाचा पुस्तिकेत नोंदवलेला संदर्भ: Frederic Newmeyer, "The Politics of Linguistics", Chicago: The University of Chicago Press, 1986.)

'भात्यातले बाण' हे 'बिग गन'चं 'सक्षम' भाषांतर वाटत नाही ना. शस्त्रं म्हणून तरी गनसमोर बाण टिकत नाही. पण मराठीत एक वापरायची पद्धत आहे तसं आपण केलं. कराडमधल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासवाल्यांचं आणि या अमेरिकी अधिकाऱ्याचं कनेक्शन मताच्या बाबतीत जुळलं, पण कराडमधल्या फलकांवरची शस्त्रं एवढी जुनी कशाला? नवीन काही एके-४७ किंवा त्यापुढची ठेवली असती तर जास्त कालसुसंगत झालं नसतं का?

बरं आणखी एक अवतरण चव्हाणांच्याच पुस्तिकेत आहे, 'संयुक्त राष्ट्रां'च्या २००४च्या मानव विकास अहवालातील हे अवतरण चव्हाणांनी मूळ इंग्रजीत आणि स्वैर मराठी अनुवादात दिलेलं आहे. आपण त्यांच्या संदर्भावरून मूळ अहवाल पाहून, मुख्यत्वे अहवालातल्या मूळ अवतरणावरून आणि चव्हाणांच्या अनुवादातल्या दोन शब्दांचा आधार घेत इथं पुढची मराठी वाक्यं लिहिली आहेत. तर, हा अहवाल पान क्रमांक ३३वर म्हणतो:
प्रभुत्त्वशाली संस्कृतीमध्ये सामील होण्यासाठी लोकांना/व्यक्तींना 'प्रोत्साहित' करायचं असेल तर, त्यांची मातृभाषा आणि त्यांना मिळणारे आर्थिक, सामाजिक व राजकीय लाभ या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधात उभं करणं, हा सर्वांत ताकदवान मार्ग आहे. मातृभाषा आणि भवितव्य या दोन पर्यायांमधून निवड करायला लावल्यावर संबंधित व्यक्तीला निवडीचं स्वातंत्र्य राहिलेलंच नसतं. (आणि त्यामुळे प्रभुत्त्वशाली संस्कृतीत सामील व्हायचा निर्णयही निवडस्वातंत्र्याचा वापर करून झालेला नसतो).
या अवतरणासोबतच, भाषेचा आणि कायद्याचा काही संबंध असतो, असंही हा अहवाल म्हणतो. 'कायद्याचं राज्य आहे' असं म्हटलं जातं जनरली आपल्याकडे, तर त्या संदर्भात आणखी काही ओळी नोंदवू:
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषेचा वापर हे एकमेकांपासून अभिन्न आहेत. कायद्याच्या बाबतीतही भाषा हा मुद्दा महत्त्वाचा का ठरतो, याचं एक कारण या अभिन्नत्वात मिळतं. (पान ६०). न्यायव्यवस्थेसंबंधीच्या भाषिक धोरणांमुळे न्याय नाकारला जाऊ नये. ब्रिटिश कायद्यावर आधारित न्यायव्यवस्था असलेल्या अांग्लभाषी आफ्रिकेत कायदेशीर बाबींमध्ये मुख्यत्वे इंग्रजीचा वापर होतो. पण बहुतेकांना इंग्रजी येत नाही किंवा कमी प्रमाणात येते, त्यामुळे लोक कायद्यापासून दुरावलेले असतात. (पान ६३)
संयुक्त राष्ट्रं, २००४

लोहिया आणि इलाया यांनी या प्रश्नावर ठाम निष्कर्ष आणि उत्तरंच दिलेली आहेत! त्याचं भवितव्य काय, हे माहीत नाही. चव्हाणांचा जास्तकरून प्रयत्न अभ्यासकाचा आणि बराचसा प्रश्न स्पष्ट मांडण्याचा आहे. पण शेवटी अशा उघड दिसणाऱ्या कुठल्याच प्रश्नोत्तरांमध्ये न रमणारी अज्ञात माणसं या प्रश्नाशी जास्त झगडत असतात. या सगळ्या गोष्टींचं भवितव्य काय असतं, या चर्चा त्या त्या तज्ज्ञांनी करायच्या आहेत. आणि राजकीय नेते मंडळी त्यावर आणखीच वर्तमान घडवत असतील. आणि आपण सर्वसामान्य लोक काय करत असतो, वाटलंच तर जमेल त्या किंवा बहुधा परवडेल त्या भाषेत बोलत असतो. एवढंच!

याच लाइनवर रेघेनं पूर्वी केलेल्या नोंदी:

१२ ऑक्टोबर २०१५

पुरस्कार: स्वीकार आणि नकार

कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांची हत्या आणि त्यानंतर उत्तर प्रदेशात दादरी इथं गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून झालेली अखलाख या मुस्लीम व्यक्तीची हत्या, हे अगदी अलीकडचे प्रसंग. या व इतर काही प्रसंगांच्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी 'साहित्य अकादमी' या सरकारस्थापित स्वायत्त संस्थेचे पुरस्कार परत केल्यासंबंधीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये येत आहेत. स्वतः कलबुर्गींना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला होता; त्यामुळं अकादमीनं या संदर्भात काहीच भूमिका न घेतल्याची टीका झाली. मराठी वृत्तवाहिन्यांवर यासंबंधी चर्चा झाल्या का, ते कळलं नाही. पण कदाचित तशा चर्चा झाल्या असतील किंवा आता होतीलही. काही वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधी लेख वा वाचकांची पत्रं अशा प्रकारचा मजकूर आलेला दिसला. यामध्ये साधारण दोन बाजू ऐकू आल्या: ज्यांनी पुरस्कार परत केले ते 'निवडक नैतिकता' पाळतात किंवा ज्यांनी पुरस्कार परत केलेले नाहीत ते तर बहुधा प्राथमिक पातळीवरचेही 'नैतिक' नाहीत. रेघेच्या कानापर्यंत आलेल्या मतांवरून या दोन ढोबळ बाजू नोंदवल्या आहेत.

ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, त्यांनी आत्ताच का केले? आधी अमुकतमुक झालं असताना त्यांनी पुरस्कार परत का केले नाहीत? एखाद्या लेखिकेनं १९८४च्या शीखविरोधी दंगलींनंतर काँग्रेसचं सरकार असताना पुरस्कार स्वीकारला आणि आता 'हिंदुत्ववादी' मोदी सरकारचा निषेध करत पुरस्कार परत दिला, हा दुटप्पी नैतिकतेचा प्रकार नाही का? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीतलं पद सोडते, पण अकादमीचा पुरस्कार परत करत नाही, हे कसं काय? एखादी व्यक्ती साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करते, पण सरकारने दिलेला 'पद्मश्री' सन्मान परत करत नाही, हे कसं काय?... असे अनेक प्रश्न पुरस्कार परत करणाऱ्यांवर टीका करताना काहींनी विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यायची की नाही हे ज्यांना उद्देशून प्रश्न विचारलेत, त्यांनी ठरवायचं आहे. ज्यांनी पुरस्कार परत केले त्यांना देशात सध्या घडणाऱ्या घडामोडींचा निषेध करण्यासाठी एक प्रतिक्रिया म्हणून अशी कृती करावी वाटली, त्यांनी ती केली- असं या घटनांबद्दलचं रेघेचं आकलन आहे. पुरस्कार परत करताना सन्मानचिन्हच नव्हे, तर पुरस्काराची रक्कमही परत करणार असल्याचं यांपैकी काहींनी म्हटलं आहे. पैसे परत करणं, ही गोष्ट ज्याच्यात्याचा आर्थिक परिस्थितीवरही अवलंबून आहे. तर ही कृती अशा पद्धतीनं करणं त्यांना योग्य वाटलं असेल, तर त्यांना तसं करायची मोकळिक असायला हवी- असं वाटतं. त्यांच्या कृतीविरोधात होणारी सरकारसमर्थकांची किंवा इतरही कोणाची आक्रस्ताळी टीका बरोबर नाही, असं वाटतं.

पण रेघेची नोंद पुरस्कार परत न करण्यासंबंधीची आहे. 

'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन', असं तुकाराम म्हणाले होते. यातलं युद्ध खरं म्हणजे कोणत्याही माणसाला लढावं लागू शकतं, पण आत्ता या नोंदीपुरतं आपण लेखकाच्या युद्धाचा विचार करू. तुकाराम म्हणतायंत तो युद्धाचा प्रसंग कोणी आपल्याला सांगितलेला नसतो. तो आतूनच वाटायला हवा. जगाशी नि मनाशी चालू असलेल्या या युद्धावरचा तोडगा म्हणून तुकोबांनी कविता लिहिली असेल. त्यांची ती कृती होती. 'लिहिणं ही कृतीच अशा रोजच्या युद्धाच्या प्रसंगाशी संबंधित आहे', हे वाक्य लिहिण्याची रेघेची लायकी आहे असं आपल्याला वाटत नाही, पण ते लिहिलंच नाही, तर ते बाहेर येईल कसं, त्यामुळं लिहिलं. 

ही रेघ ओढणाऱ्या व्यक्तीचा अशा एक-दोन पुरस्कारांशी आपसूक संबंध आल्यामुळं त्यालाही साहजिकपणेच या संदर्भात काही लोकांनी काही गोष्टी विचारल्या, सल्ले दिले, कोणी अप्रत्यक्षपणे टीका केली. हे सगळं साहजिक आहे. यावर आता मनापासून वाटलं म्हणूनच आपण ही नोंद करतोय. 

आत्ता देशात घडत असलेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही लेखकाची नैतिक जबाबदारी आहे, आणि कोणी ती पार पाडत नसेल, तर त्याला जाब विचारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे- असा काही लोकांचा सूर दिसला. ज्याला त्याला आपला सूर लावायची मुभा आहे. त्यामुळं फेसबुक, किंवा व्हॉट्स-अॅप, किंवा ट्विटर, किंवा जिथं बोलायचा अवकाश आहे, तिथं सर्वसाधारणपणे नैतिक सूर लावले जातातच. हे सर्वसाधारणपणे सार्वजनिक पातळीवर, बाहेरच्या जगाशी संवादी किंवा विसंवादी अशा प्रकारचं चालू असतं. तिथं प्रचंड नैतिक बोलणं आवश्यक असतं बहुतेक. कुठल्याही समारंभात जसं औपचारिक चांगलंचुंगलंच वागलं जातं, तसं. मग कोणी व्यक्ती साहित्य अकादमी मिळालेल्या मराठी लेखकांची यादी देऊन असंही विचारू शकते की, 'हे कधी परत करणार पुरस्कार?' या यादीतले काही लेखक आता मेलेले आहेत, हेही अशी यादी प्रसिद्ध करणाऱ्याला माहीत नसलं तरी चालतं. कारण शेवटी त्याचा प्रश्न सगळ्यांना भिडणारा नि 'नैतिक' असतो!

हे आपण मराठीत लिहितोय, म्हणून फक्त मराठीचा संदर्भ घेऊ. मराठी भाषेत साहित्याला, लेखकाला मुळात किंमत काय आहे, हे कळण्यासाठी वरचं यादीचं प्रत्यक्षात घडलेलं उदाहरण दिलं. लेखक जिवंत असला किंवा मेलेला असला, तरी इथं फारसा फरकच पडत नाही. तुम्ही काय लिहिलंय, यावरून काहीच ठरत नाही. तुम्ही रोजच्या युद्धाच्या प्रसंगातून काही उभं करताय का, याची कोणाला फारशी पडलेली नाही. एखाद्या कादंबरीत, कवितेत, कथेत लेखकानं राज्ययंत्रणा, प्रस्थापित संस्कृती याबद्दल त्याच्या कुवतीनुसार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न कदाचित केला असेल, तर त्यावर इथं काहीच बोललं जाणार नाही. पण आता अमुकएक युद्धाचा प्रसंग सुरू आहे त्यात तुम्ही कसं लढावं, याचे तात्पुरते सल्ले मात्र दिले जातील. 

रेघेला आपण नैतिक समजत नाही. या सगळ्या मुद्द्यावर बोलणारे लोक खरोखरच स्वतःच्या कृतीचा नि बोलण्याचा नि त्यातल्या विरोधाभासाचा विचार करतात का, याचा पत्ता नाही. पण करत असतील. 'लोक' असं म्हटल्यावर सरसकटीकरण होतं. त्यामुळं बहुतेक जण जेवढं नैतिक बोलतात तेवढं खरोखरंच वागत असतील, असं मान्यच करू. नैतिकतेच्या पातळ्या काय असतील, राज्ययंत्रणेचे पुरस्कार म्हणजे काय, पुरस्काराची रक्कम ही पुरस्काराचाच भाग असेल तर ती परत द्यायची की कसं, ते परवडत नसेल तर मग फक्त सन्मानचिन्ह परत करणं कितपत बरोबर आहे, वगैरे मुद्दे मोठे आहेत. शिवाय, राज्ययंत्रणा ही गोष्ट लेखक-पुरस्कार वगैरेपलीकडे आपल्या सगळ्यांशी कशी जोडलेली आहे, हा त्यातला एक मुद्दा. हे सगळे विषय एका नोंंदीचे नाहीत.

एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण करू शकत नाही. फक्त विषयांतर वाटेल असा एक मुद्दा इथं नोंदवू. रेघेवर दोन ऑक्टोबर रोजी आपण एक नोंद केली होती. बिहारमधली दलित हत्याकांडं, मध्य भारतातील आदिवासी भागातील हिंसा, या संदर्भात ही नोंद होती. सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा व इतरही काही सरकारांचा संदर्भ त्यात होता. साधारण सहा हजार शब्दांची ही नोंद होती. एवढी मोठी नोंद ब्लॉगवर वाचणं अनेक वाचकांना सोईचं नसणार, याची कल्पना असूनही आपण ती नोंद केली. त्यामागं काही नैतिक भूमिका नव्हती, त्यामागं अपराधभाव होता. आदिवासींपुरतं बोलायचं, तर हा एक समूह सध्याच्या प्रस्थापित व्यवस्थेत काय भोगतोय, याचा एक मामुली बिंदू त्या नोंदीत होता. ही ब्लॉगवरची फुटकळ नोंद होती. ती फारशी वाचली जाणार नसूनही करावी वाटली म्हणून केली. अशा विषयावर कोणाला मराठीत कादंबरी लिहावी वाटली, तरी ती फारशी वाचली जाणार नसूनही लिहायला लागेल. ही तक्रार नाही. पण जे जाणवतंय ते असं आहे.

तर, अशा पार्श्वभूमीवर पुरस्कार परत करणं ही कृती ज्यांना योग्य वाटली, त्यांनी ती केली. त्यांना एका विशिष्ट भूमिकेकडे लक्ष वेधण्यासाठी हीच कृती योग्य वाटली. ती त्यांची निवड आहे. त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. पण अशी निवड नि नैतिकता असं थेट समीकरण मांडणं सोपं वाटलं तरी पुरेसं आहे असं वाटत नाही.

पण अलीकडच्या काळात कोणी कशावर नि काय भूमिका घ्यावी, हे प्रसारमाध्यमं-समाजमाध्यमं यांच्या तणावातूनच निश्चित होतं का? अशी शंका येते. लेखकाची भूमिका इतकी सोपी असू शकते, असं वाटत नाही. प्रसारमाध्यमांमधून गदारोळ उठणाऱ्या नैतिकतेचं माहीत नाही, पण तिथं उल्लेखही न होणाऱ्या अपराधभावाबद्दल मात्र आपण बोलू शकतो. त्यासाठी ब्लॉग हेच प्रसारमाध्यम त्यातल्यात्यात परवडणारं आणि कमी आडपडदा असलेलं आहे, म्हणून इथं ही नोंद. वास्तविक आता चाललेला गदारोळ असा झालाय की, मूळ मुद्दा दूर राहिला नि पुरस्कार परत देणं किंवा न देणं हाच चर्चेचा विषय होत जाईल.

आपण रेघेवर यापूर्वीही जमेल त्या नि शक्य असेल त्या प्रसंगांबद्दल काही नोंदी केलेल्या आहेतच. त्यामुळंच साहित्य अकादमीचा पुरस्कार घेत असताना आपल्याला अपराधी वाटलं. आदिवासी समूह खलास होत असतो, तेव्हा त्यात किंचित तरी आपलाही हातभार लागत असतो, याचंही आपल्याला अपराधी वाटतं. फाशीच्या दोन प्रसंगांसंबंधी रेघेवर आपण नोंदी केलेल्या, त्याही अपराधीभावामुळंच. अशा कित्येक गोष्टींबद्दल रोजच्यारोज अपराधी वाटतं. हे अपराधीपण, वरची नैतिक मतं देणाऱ्यांमुळं आलेलं नाही, तर रोजच्या युद्धाच्या संदर्भात आलेलं आहे. ते युद्ध फक्त लेखकाशीच संबंधित असतं असं नाही, न लिहिणाऱ्या लोकांमधल्याही काहींना ते लढावं लागतंच. ते युद्ध टिपण्याची रेघेची कुवत आहे का, माहीत नाही. तरीही आपण ही नोंद केली. आणि त्यासोबतच २०१४चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार स्वीकारताना केलेलं एक अपराधीपणाचं भाषण, इथून पुढं कोणाला वाचावं वाटलं तर जोडलं आहे. या भाषणात काही प्रसंगांचा उल्लेख आला आहे, त्या प्रसंगांमध्ये अलीकडच्या आणि पलीकडच्या अनेक भीषण प्रसंगांची भर टाकता येईल. त्या प्रसंगांचा निषेध करताना आपला त्यातला सहभाग विसरला जाऊ नये म्हणून अपराधभाव. (हा अपराधभाव हे काही लेखनाशी संबंधित एकमेव किंवा मूलभूत कारणही नसावं, पण लेखनानुभवाच्या काठावर तरी हात मारल्यासारखं).
०००

प्रतिसाद न मिळालेलं पत्र
-    
(मेघालयची राजधानी शिलाँग इथे १०-११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या साहित्य अकादमी युवा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केलेलं भाषण.)
-

लेखक म्हणूनचे माझे अनुभव मी सांगावेत, असं मला सुचवण्यात आलंय. अख्ख्या लेखन प्रक्रियेच्या खोलात जाणं बहुतेक माझ्या क्षमतेच्या बाहेरचं काम आहे. किमान आत्ता या क्षणी तरी तो शोध घेणं मला शक्य नाही. त्यामुळं मी काही काळापूर्वी साहित्य अकादमीलाच लिहून पाठवलेलं एक छोटं पत्र वाचून दाखवतो. त्यामुळं किमान माझ्या लेखनानुभवाच्या आजूबाजूला तरी हात मारून काही शोधता येईल, असं वाटतं.

पत्र असं होतं-
प्रिय श्रीमान/श्रीमती,

काही दिवसांपूर्वी ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर मी एक रिपोर्ट वाचला- ‘साहित्य अकादमीच्या कार्यक्रमामध्ये एका दलित कवीची मुस्कटदाबी’ (हाउ ए दलित पोएट वॉज ब्राउबिटन इन्टू सायलेन्स अॅट ए साहित्य अकादमी इव्हेन्ट) असं त्याचं शीर्षक होतं. साहित्य अकादमीनं १६ नोव्हेंबर २०१४ रोजी नागरकोएल, तामिळनाडू इथं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात तामीळ कवी एन.डी. राजकुमार यांच्याशी गैरवर्तणूक करण्यात आल्याचा घटनाक्रम या रिपोर्टमध्ये नोंदवला होता. हा रिपोर्ट एस. आनंद यांनी लिहिला होता. त्यांच्याच ‘नवयान’ या प्रकाशनानं राजकुमार यांच्या इंग्रजीत अनुवादित झालेल्या कवितांचा संग्रह प्रकाशित केला आहे. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांचा त्या कार्यक्रमातील अनुभव त्यांच्याच शब्दांत देण्यात आलाय, त्यात ते लिहितात-

‘‘१६ नोव्हेंबर २०१४ रोजी, राष्ट्रीय ग्रंथ सप्ताहादरम्यान, मी राहतो त्याच ठिकाणी- नागरकोएलमध्ये साहित्य अकादमीच्या पुस्तक प्रदर्शनादरम्यान बोलण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आलं होतं. विषय होता- ‘माझी कविता आणि मी’. साहित्य अकादमीबद्दल मला प्रचंड आदर असल्यामुळं, मी निमंत्रण स्वीकारलं आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. कार्यक्रमाचं निवेदन करताना आदरणीय आयझॅक सॅम्युअल नायगम (नागरकोएलमधल्याच स्कॉट ख्रिश्चन महाविद्यालयातील तामीळ विभागातील शिक्षक) यांनी माझी ओळख करून देताना सांगितलं की, ‘कन्नदसन, मु. मेहता, वैरमुथू, इत्यादींच्या परंपरेतील जादुई कवी एन. डी. राजकुमार आता आपल्यासमोर मनोगत मांडणार आहे.’ त्यानंतर ते त्यांच्या जागी जाऊन बसले.

मी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच म्हणालो, ‘आदरणीय आयझॅक सॅम्युएल नायगम यांनी माझी ओळख करून देताना कन्नदसन, मु. मेहता व वैरमुथू (हे सर्व तामिळमधील आदरणीय आजी-माजी कवी आहेत) यांच्या परंपरेतच माझा उल्लेख केला. परंतु मी नम्रपणे हे सांगू इच्छितो की, मी स्वतःला त्याच साहित्यिक परंपरेतला मानत नाही. मी पूर्णपणे वेगळ्या साहित्यिक मार्गावरून चालतो आहे. मला त्यांच्या साहित्यिक कामाबद्दल काहीही मत द्यायचं नाही. असो. आता मी मला देण्यात आलेल्या विषयावर विचार मांडतो..’ तेवढ्यात प्रेक्षकांमधले पाच लोक उठले आणि त्यांनी अद्वातद्वा भाषेत माझ्या विरोधात घोषणा करत माझं बोलणं मधेच तोडलं. पाचांपैकी एकानं मला मूठ वळून दाखवली. धमकी दिल्यासारखं बोट रोखून धरत तो मला म्हणाला की, कन्नदसन यांचा ‘अपमान’ केल्यावर आता तू सभागृहातून सुरक्षितपणे बाहेर कसा जाशील.. त्याच्यासोबतचे इतर चौघेही उठले नि मला धमकावू लागले. परिणामी मला माझं व्याख्यान सुरू करता येईना.

मी कन्नदसन यांच्यावर टीका केली नाही. मी त्यांच्याबद्दल वेगळं काही बोललोही नाही. फक्त मी त्यांच्या परंपरेत बसत नाही एवढंच मत नोंदवलं. शिवाय मला देण्यात आलेल्या विषयावर मला बोलू द्यावं, अशी विनंती शांत सुरात मी केली. पण तरीही ते माझ्याविरोधात धमकावणीच्या सुरातच बोलत होते. मला बोलताच येऊ नये इतका गोंधळ ते घालत होते. त्यानंतर मी कार्यक्रमाच्या संयोजकांना विनंती केली की, त्यांनी मला बोलता येईल इतपत वातावरण कायम ठेवण्यासाठी उपाययोजना करावी. पण त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांकडं दुर्लक्ष केलं, उलट मंचावर येऊन मला धरून खाली बसवलं.’’


या कथनातील घटनाक्रमात तथ्य असेल तर- साहित्य अकादमीच्या मंचावरून राजकुमार यांना अशा प्रकारची गैरवागणूक मिळावी हे अतिशय दुःख देणारं आहे.

मी स्वतःला फारसा नैतिक माणूस मानत नाही. पण एक व्यक्ती जी नैतिकता पाळू शकणार नाही, ती पाळण्याची क्षमता एका संस्थेमध्ये असू शकते, असा विश्वास वाटतो. आणि इथं साहित्य अकादमीसारख्या संस्थेचा संदर्भ आहे. राजकुमार यांनीही तिच्याबद्दल मोठा आदर असल्याचं म्हटलं आहे. तर मग या घटनाक्रमाबद्दल साहित्य अकादमीनं स्वतःची वेगळी बाजू असल्यास ती मांडायला हवी, आणि त्यासंदर्भात राजकुमार यांच्याशी बोलायला हवं. ‘नवयान’च्या संकेतस्थळावर राजकुमार यांच्या कथनानंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात साहित्य अकादमीनं माफी मागावी अशी मागणी करण्यात आलेय.

साहित्य अकादमीतील कोणाशीही माझी व्यक्तिगत पातळीवर ओळख नाही किंवा नवयान प्रकाशन वा राजकुमार यांच्याशीही माझा व्यक्तिगत परिचय नाही, पण साहित्य अकादमीचा पुरस्कारार्थी म्हणून ही मेल पाठवणं ही मला माझी जबाबदारी वाटली.
माझं पत्र इथं संपतं. हे पत्र साहित्य अकादमीचे सचिव (२६ नोव्हेंबर २०१४) व अध्यक्ष (१९ डिसेंबर २०१४) अशा दोन्हींना अकादमीच्या संकेतस्थळावर दिलेल्या त्यांच्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर मी पाठवलं. दरम्यानच्या काळात, ३१ डिसेंबर २०१४पूर्वी हे भाषण लिहून पाठवण्यासंबंधीची सूचना माझ्यापर्यंत आली, जेणेकरून अकादमी भाषण छापून घेऊन पुरस्कार सोहळ्याच्या वेळी (१०-११ फेब्रुवारी २०१५) त्याच्या प्रती वितरीत करू शकेल. ती मेल इथं उपस्थित सर्वांना फॉरवर्ड करायचा हा प्रयत्न म्हणजे हे भाषण. समस्या सोडवण्याचा मार्ग शब्दांच्या वाटेवरून सापडू शकतो, यावर विश्वास ठेवण्यापलीकडं एका लेखकाकडं दुसरा कुठला पर्याय आहे! अक्षरांवरची नि शब्दांवरची श्रद्धा कायम राहावी या पलीकडं एक लेखक करतो तरी काय?

हे भाषण लिहून काढण्यापूर्वी मी राजकुमार यांचा काही मोबाइल नंबर वगैरे मिळतोय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. या मुद्द्यावर काही नवीन घडामोड झाली आहे काय, हे विचारता येईल म्हणून. त्यासाठी मी ‘नवयान’ला संपर्क केला. या विषयावर पुढं काहीच झालेलं नाही, असं त्यांनी कळवलं, पण राजकुमार यांचा नंबर मिळवण्याचा माझा प्रयत्न मात्र यशस्वी झाला नाही (हे भाषण लिहेपर्यंत तरी. पण नंतर काही दिवसांनी ‘नवयान’कडून राजकुमार यांचा नंबर मिळाला. त्यावर त्यांना संपर्क साधला, पण आमच्या दोघांनाही कळेल अशी कुठलीच एक भाषा निघाली नाही, त्यामुळं फारसं बोलता आलं नाही). दरम्यान, ‘नवयान’च्या संकेतस्थळावरच्या माफीची मागणी करणाऱ्या निवेदनावर सही केलेल्यांपैकी एक, आणि मला ज्यांच्याबद्दल आदर वाटतो, अशा एका व्यक्तीला मी संपर्क साधला. या मुद्द्यावर आणखी तिसऱ्याच व्यक्तीकडून खातरजमा करून घ्यावी, एवढाच हेतू. हे सगळं करून झाल्यावर आता मी हे पत्र तुमच्यासमोर का वाचतोय, याबद्दल मी निश्चिंत झालोय.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशात आपण राहतो. आपण राहतो त्या या देशातली ‘नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स’ एका कार्यक्रमात वीसेक भाषांमधल्या लेखकांना पुरस्कार देते. या देशाचा नुसता भौगोलिक पसारासुद्धा अचंबित करणारा आहे. आपण एकच इतिहास राखून आहोत का किंवा आपल्यामध्ये काही सांस्कृतिक साम्य आहे काय, याबद्दल मला खात्री नाही. काही प्रमाणात असेल, पण त्याबद्दल खात्रीनं काही सांगावं अशी माहिती माझ्याकडं नाही. पण, आपण हा भूगोल मात्र आपापसात वाटून घेतलेला आहे, एवढं नक्की. आपल्याकडच्या काही कागदपत्रांवरून आपण भारत नावाच्या देशाचे नागरीक आहोत, हे सिद्ध होतं, एवढ्यापुरतं तरी नक्की. पण मग यामुळं, या देशात होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अन्यायाबद्दलचा किंवा दडपशाहीबद्दलचा अपराधीपणा वाटून घ्यायची जबाबदारीही आपल्यावर येते का? भूगोल नि देशाची मर्यादा इथं नोंदवतोय त्याचं कारण एवढंच की हा भूगोल नि त्यावर पसरलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतींचा उत्सव साजरा करणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला ह्या उत्सवाचा आदर आहे आणि त्याचा भाग होण्याचा आनंदही वाटतोय, पण त्यासोबतच अपराधीही वाटतंय. आनंद कशाचा, तर अपराध भाव तुमच्यासोबत वाटून घ्यायला मला किमान शब्द तरी वापरता येतायंत, याचा. पण त्याच वेळी दुःखी पण वाटतं, कारण ह्या शब्दांना काही प्रतिसाद मिळत नाही.

वरती लिहिलेल्या पत्रामध्ये जो काही घटनाक्रम सांगितलाय त्याबद्दलचा अपराधीभाव मला जाणवला, म्हणून मुळात ते पत्र लिहिलं. पण असं स्वतःबद्दल अपराधी वाटावं अशी ती एकच घटना आहे असंही नाही. यापेक्षा अधिक गंभीर कित्येक घटना आहेत. आपण इथं शिलाँगमध्ये (मेघालय) साहित्याचा उत्सव साजरा करतोय आणि शेजारच्या मणीपूर राज्यात, शस्त्रांपेक्षा माणसांवर जास्त विश्वास दाखवावा, या मागणीसाठी ४२ वर्षांच्या इरोम शर्मिला गेली १४-१५ वर्षं उपोषण करतायंत. सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीला सहानुभूतीनं प्रतिसाद देण्याऐवजी आपण तिला जबरदस्तीनं अन्न भरवत राहतो. त्याच राज्यात दहाएक वर्षांपूर्वी मनोरमा देवी या तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. त्या प्रकरणातले आरोपी सशस्त्र दलांमधले होते, त्यामुळं न्याय मिळाला नाहीच. इथं पण माणसांपेक्षा शस्त्रांवरचा विश्वास दिसून आला. या दोन उदाहरणांवरून आपली राज्ययंत्रणा कशावर विश्वास ठेवते हे कळून येतं. दुसरीकडं, काही काळापूर्वीच सत्तरेक आदिवासींना आसाममधल्या बंडखोरांनी मारून टाकल्याची घटनाही ताजी आहे, प्रस्थापित राज्ययंत्रणेवर विश्वास नसलेल्या या मंडळींनाही माणसांपेक्षा शस्त्रांना प्राधान्य द्यावंसं वाटतं. पण हे तर युद्ध सुरू आहे नि मग लोक मरणारच, असा युक्तिवाद करून प्रत्येक वेळी आपली सुटका होऊ शकत नाही. हा युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जाऊ शकतो आणि प्रत्येक वेळी त्यात काही तथ्य असतंच असं नाही. आणि लोक जर मरायचेच असतील, तर मग उपोषणाला बसलेल्या एका स्त्रीला बळजबरीनं अन्न कशाला भरवायचं?

माझ्या माहितीतल्या या काही घटना सांगितल्या, पण अशी दुःखद उदाहरणं अर्थातच कित्येक असतील. शिवाय हे भाषण लिहीत असताना, आपल्या या उत्सवाचं ठिकाण आणि या घटनांची ठिकाणं जवळजवळ असल्याचं साहजिकपणे मनात आलं, म्हणून त्यांच्याबद्दल बोललं गेलं. पण अन्यायाला भूगोलाची मर्यादा असण्याचं कारण नाही. त्यामुळं भूतकाळातल्या नि वर्तमानकाळातल्या, जगाच्या कुठकुठल्या कोपऱ्यात अशा कित्येक घटना असतील, ज्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. पण अशा घटनांसंबंधीच्या माझ्या अपराधीपणाची तरी माहिती मला आहे. किंवा असं म्हणूया की, या अपराधभावातला माझा वाटा काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न मी करतोय.

साहित्य अकादमीच्या नागरकोएलमधल्या कार्यक्रमात जे काही झालं, त्यासंबंधीचा अपराधभाव- अकादमीच्या युवा साहित्य पुरस्काराचा स्वीकार करत असतानाच  मी तुमच्यासोबत वाटून घेतोय. किमान आता तरी अकादमी त्या संदर्भात काही हालचाल करेल, अशी आशा आहे.

हा अपराधभाव- लेखकाचा अपराधभाव फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही. अन्यायासारखाच तोसुद्धा भूगोलाच्या नि संस्कृतीच्या मर्यादा ओलांडतो. या अपराधभावामुळंच हा लेखक दुःखी होतो. आणि हा अपराधभाव व्यक्त करण्याची क्षमता असल्याचा त्याला आनंदही होतो. कारण ह्या क्षमतेमुळं कधी तरी हा अपराधभाव संपेल अशी शक्यता तरी राहते. पण त्यापूर्वी त्या अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करायला हवा. लिहिण्याचा पर्याय स्वीकारून मी अपराधभावामागचं कारण तपासायचा प्रयत्न करतो. हा पर्याय टिकावा अशी आशा करावी असं मला वाटतं, पण या पर्यायाला माणसासारखं जबरदस्तीनं अन्न भरवून तो जगेल काय, याविषयी शंका वाटते. सध्याच्या हायपर-कनेक्टेड नि माध्यमप्रेमी जगात, लेखकाचे शब्द ऐकलेच जात नसतील आणि त्यांना केवळ पुरस्कार मिळत असतील, तर मग ते बळजबरीनं अन्न भरवण्यासाखंच आहे. पण शब्दांच्या बाबतीत अशा बळजबरीच्या भरवण्याला मर्यादा पडते. हे शब्द, ही अक्षरं मरू नयेत, अशी आशा मला आहे.

हा अपराधभाव मी तुमच्यासोबत वाटून घेतोय, कारण आपण हे सगळं असणंच वाटून घेतोय आणि त्या दरम्यान आपल्याला काय वाटतं हे आपण भाषेचा वापर करून एकमेकांसमोर मांडू शकतो, व्यक्त करू शकतो. खरं तर, अक्षरांच्या नि शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या ह्या महान कलेचा उत्सव आपण इथं साजरा करतोय. पण ह्या वाटून घेण्यातून काही परिणाम होतो काय? व्हावा, अशी आशा मला वाटते. आशा वाटते, कारण मला लिहीत राहायचंय. आणि मी लिहितो, म्हणून मला आशा वाटते.
०००
(‘अ लेटर, अ रायटर अँड लेटर्स’ या इंग्रजी मजकुरावरून लेखकानंच मराठी भाषांतर केलं.)
०००

०२ ऑक्टोबर २०१५

बिहारचे गांधी आणि हिंसक मोसमी वारे

आज २ ऑक्टोबर- गांधी जयंती.

शिवाय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबरला फेसबुक या कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी तिथल्या 'वॉल'वर त्यांनी लिहिलं की, 'अहिंसा परमो धर्म:। सत्यमेव जयते'. किती सुंदर, किती आदर्श विचार, किती नैतिकतेचा प्रचार, लाइक लाइक लाइक!

या दोन निमित्तांनी ही नोंद.

ही नोंद थोडी मोठी झालेय. तीन भागांमध्ये केलेय. त्यामुळं वाचकांना आपापल्या वेळेच्या सोईनं तीन टप्प्यांमध्ये वाचावी वाटली तरी तसं करता येईल.
०००

एक

दीड महिन्यापूर्वी, १७ ऑगस्टला दिल्लीत एक पत्रकार परिषद झाली. कोब्रापोस्ट या संकेतस्थळानं आयोजित केलेली. या वेळी 'ब्लॅक रेन' या नावाची सुमारे दीड तासाची एक चित्रफीत दाखवली गेली, असं आपल्याला इंटरनेटवरून कळतं. ही चित्रफीत सहा भागांमध्ये यू-ट्युबवर पाहायला मिळते आणि त्यासंबंधीचा मजकूर कोब्रापोस्टच्या संकेतस्थळावर आहेच.


या चित्रफितीत आपल्याला बिहारमधल्या रणवीर सेनेशी संबंधित अनेक तपशील सांगितले जातात. या सेनेच्या काही सदस्यांची बोलणी त्यांच्याच तोंडून ऐकायला-पहायला मिळतात. बिहारमधील भूमिहार जातीच्या मंडळींची ही सशस्त्र संघटना. सप्टेंबर १९९४मध्ये भोजपूर इथे स्थापन झाली आणि नोव्हेंबर १९९५मध्ये तिच्यावर बंदीही आली. पण विविध पातळ्यांवर संघटनेच्या कारवाया नंतरही सुरू राहिल्या हे त्या राज्यात झालेल्या हत्याकांडांमधून दिसून आलं. 'अखिल भारतीय राष्ट्रवादी किसान संघटन' हा आता या सेनेचा मुखवटा आहे, हेही या चित्रफितीतून कळतं.

रणवीर सेनेनं १९९४ ते २००० या काळात बिहारमधल्या १६ हत्याकांडं घडवली आणि त्यात सुमारे अडीचशे ते तीनशे दलित-आदिवासींना आपले प्राण गमवावे लागले. या विविध हत्याकांडांमध्ये वेगवेगळी भूमिका निभावलेल्या सेनेच्या सदस्यांच्या मुलाखती कोब्रापोस्टनं छुप्या कॅमेऱ्यानं चित्रीत केल्या. शिवाय हल्ला झेललेल्या काही व्यक्तींशीही कोब्रापोस्टच्या प्रतिनिधीनं संवाद साधलेला आहे. त्याशिवाय या संदर्भातील एक सदस्यीय चौकशी आयोगाचे अध्यक्ष- माजी न्यायाधीश अमीर दास यांचीही मुलाखत आहे.  रणवीर सेना आणि काही राजकीय पक्षांमध्ये हितसंबंध आहेत का, याची चौकशी करण्याची जबाबदारी दास यांच्या आयोगावर होती. अनेक अडचणीचे निष्कर्ष दास यांच्या चौकशीतून पुढे येत होते. पण शेवटी २००५मध्ये आयोगाचा गाशा गुंडाळण्यात आला. (दास यांच्याशी साधण्यात आलेला संवादही छुप्या कॅमेऱ्यानं का चित्रीत केला, याबद्दल या चित्रफितीत काही कारण दिलेलं दिसत नाही. रणवीर सेनेच्या बाबतीत छुप्या कॅमेऱ्याचा वापर समर्थनीय ठरत असला, तरी दास यांच्या बाबतीत तसं म्हणता येईल का? दास यांनी आधी काही माहिती लपवली होती आणि ती उघड करायला असा छुप्या कॅमेऱ्याचाच मार्ग फक्त खुला होता, असं काही असल्याचं ही चित्रफीत सांगत नाही. शिवाय दास हे अनेक राजकीय नेत्यांची स्पष्ट नावं घेऊन, रणवीर सेनेशी या नेत्यांचे कसे संबंध होते हे सांगतात. त्यांना दिलेलं चौकशी आयोगाचं काम ते त्यांच्या परीनं नीटच करत होते, असंही चित्रफितीतून दिसतं. आरोपींच्या अपराधाच्या कबुलीची नोंद होण्यासाठी कॅमेऱ्यात ते चित्रीत केलं, हे समजू शकतं. पण दास यांना उघडपणे कॅमेऱ्यावर मुलाखतीची विचारणा केली होती का? त्यासंबंधी ते काय म्हणाले? या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. दास यांनी यापूर्वी आपल्या अहवालाबद्दल तेहेलकाला मुलाखत दिलेली होती, नेत्यांची नावं घेतलेली नसली, तरी त्यांनी बऱ्यापैकी स्पष्ट भाषा वापरलेली आहे. शिवाय हा अप्रकाशित अहवाल काही प्रसारमाध्यमांच्या हातीही लागलेला होताच.)

यातल्या बाथनी टोला आणि लक्ष्मणपूर बाथे या दोन हत्याकाडांबद्दल आपण ओझरती नोंद करू. बाकी तपशील वाचक चित्रफितींमधून समजून घेऊ शकतीलच. आपण नोंदीत चिकटवलेला व्हिडियो हा फक्त या चित्रफितीचा पहिला भाग आहे.

जुलै १९९६मध्ये भोजपूरमध्ये बथानी टोला गावात २१ दलित व मुस्लिमांची भर दिवसा हत्या करण्यात आली. या हत्याकाडांसंबंधीच्या खटल्यात आरा सत्र न्यायालयाने रणवीर सेनेचे सदस्यांपैकी तिघांना देहदंड, तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण ऑक्टोबर २०१२मध्ये पटना उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता केली.

बथानी  टोला हत्याकांडासंबंधी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कॅमेऱ्यासमोर सांगतो:
रणबीर सेना द्वारा जनसंहार पे जनसंहार हो रहा था. आप को हम बतलाए.. तीन (पुलीस) कॅम्प था. सब एक किलोमीटर, आधा किलोमीटर की दुरी पर. रात में नही, दिन में, हत्या हो रहा था. और तीनो कॅम्प देख रहे थे. लोग यहाँ पे भाग कर के जा रहे थे की, भाई, हम लोगो की मदद किजीए. तो बोले, नही करेंगे. जब की, सरे आम पुरे लोग देखा. और हम भी नहीं. ये गाव में अगलबगल के लोग, फिल्म जैसे देख रहे थे. पुलिस देख रही है. और यहाँ पे कत्ले आम हो रहा है.
त्यानंतर, १ डिसेंबर १९९७मध्ये आरवल जिल्ह्यातल्या लक्ष्मणपूर बाथे गावात रणवीर सेनेनं दलित हत्याकांड घडवलं. या हत्याकाडांत ५८ दलितांचा मृत्यू झाला. रात्री दहा वाजता हा हल्ला झाला होता. त्यात २७ स्त्रिया, १६ मुलं, आणि अगदी गर्भातली बालकंही मारून टाकली. 'स्वतंत्र भारताच्या इतिहासातला हा सगळ्यांत लाजीरवाणा दिवस आहे', अशी प्रतिक्रिया तत्कालीन राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनी तेव्हा दिली होती. या प्रकरणात पटणा सत्र न्यायालयाने ४६ आरोपींपैकी १६ जणांना फाशी आणि दहा जणांना जन्मठेपेची शिक्षा दिली. पण पुढे पटणा उच्च न्यायालयाने २०१३मध्ये या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. रात्रीच्या वेळी हल्लेखोरांचे चेहरे ओळखण्याच्या बाबतीत साक्षीदारांच्या साक्षी विश्वासार्ह ठरत नाहीत, असा न्यायालयानं या निकालावेळी म्हटलं होतं!

या हत्याकांडांमध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये स्त्रिया आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे, हे तर दिसतंच. त्यासंबंधी बोलताना रणवीर सेनेचा सदस्य रवींदर चौधरी असं म्हणतो की, तुम्हाला पिकलेले आंबे आणायला पाठवलं आणि तुम्ही एखाद्या काठीनं ते पाडायला गेलात, तर दोन पक्क्या आंब्यांसोबत समजा आठ कैऱ्याही खाली पडल्या, तर मग त्याही कापूनच टाकणार ना. तरुणासोबत पोरगं सापडलं तर तेपण साफ करून टाकलं.
दुसरे एक रणवीर सेनेचे आणखी ज्येष्ठ सदस्य सिद्धनाथ सिंग म्हणतात, तो इस तरह की निर्मम हत्या करते हैं, तो हम कहे की हुजूर हमारा इंडिया मे हमारा धर्म जो है वो ऐसा नही बताता है की बुढा को मारिएगा तो पाप नही लगेगा और जवानका को मारेगा तो पाप लगेगा और लडका को मारेगा तब पाप लगेगा, ऐसा कोई धर्म नही, ऐसा कोई कानून नही. आप जवान को मारेगा तभी बीस साल सजा और बुढवा को मारेगा तो दो साल सजा और लडका को मारे तो पचास साल सजा, ऐसा कोई कानून नही है. हत्या हुजूर हत्या होता है, हत्या हत्या है, जो जीव मर गया वो हत्या है, समान सब के लिए है. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री राहिलेले यशवंत सिन्हा यांनी रणवीर सेनेला आर्थिक मदतीपासून राजकीय संरक्षणापर्यंत काय काय दिलं, हे सगळं सांगताना सेनेचा सदस्य राहिलेला प्रमोद सिंग चित्रफितीत दिसतो. केवळ सिन्हाच नव्हे तर मुरली मनोहर जोशींचाही उल्लेख चित्रफितीत येतो. ही सर्व मदत मिळवताना रणवीर सेनेचे संबंध केवळ भारतीय जनता पक्षाच्याच नेत्यांशी होते असं नाही, तर माजी पंतप्रधान व जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांनीही या रणवीर सेनेला पाठबळ दिलं होतं. रणवीर सेनेच्या सदस्यांना प्रशिक्षण देण्यात भारतीय सैन्यात काम करणारे त्यांचेच जातबंधू कसे मदत करत होते, भारतीय सैन्याचा 'रिजेक्टेड' शस्त्रास्त्रांचा माल यांच्यापर्यंत कसा पोचत होता, असे अनेक तपशील या चित्रफितीत प्रत्यक्ष रणवीर सेनेच्या सदस्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतात. यातल्या काही सदस्यांना, वर उल्लेखित हत्याकांडांमध्ये उच्च न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे आणि खटले सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत.

लिबरेशन, सप्टेंबर २०१५ । मुखपृष्ठ
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (लिबरेशन गट) [सीपीआय-एमएल-लिबरेशन], हा मूळचा नक्षलवादी पक्षांमधला एक पक्ष. या पक्षाचं जास्त अस्तित्व बिहारमध्ये आहे. आणि याच पक्षाचा 'मा.ले.' असा उल्लेख चित्रफितीत अनेकदा येतो. या पक्षाच्या माध्यमातून स्थानिक शेतमजूर संघटित होत होते. जमिनीच्या प्रश्नाची पार्श्वभूमी या सर्व घडामोडींना असल्याचं या चित्रफितीतून ओझरतं स्पष्ट होतंच. इथं ज्या सीपीआय-एमएल-लिबरेशन पक्षाचा उल्लेख झालाय, त्याची मुळं नक्षलवादी फाटाफुटींमध्ये आहेत, पण हा पक्ष आता संसदीय मार्गानं चालणारा राजकीय पक्ष आहे. आरा मतदारसंघातून १९८९च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार रामेश्वर प्रसाद विजयी झाले होते. त्या अर्थी, संसदेचे पहिले 'नक्षलवादी' खासदार, असं त्यांचं वर्णन करणारे करतात. तर, रणवीर सेनेनं घडवलेल्या हत्याकांडांच्या प्रदेशात हा राजकीय पक्ष क्रियाशील आहे आणि आता अधिकृतरित्या तो निवडणुकीच्या मार्गांवरून चालतो. काही वेळा बिहार विधानसभेत त्यांचे काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उमेदवार निवडूनही गेलेले आहेत. २०१०च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा कोणीच उमेदवार निवडून आला नसला, तरी काही मोजक्या ठिकाणी त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं आकडेवारी सांगते. आणि आता बिहारमध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. (मूळ नक्षलवादी चळवळीच्या काळातलं 'लिबरेशन' हे मुखपत्र याच पक्षाकडून चालवलं जातं आता. त्या मासिकानं सप्टेंबर २०१५च्या अंकात 'कोब्रापोस्ट'च्या 'स्टिंग ऑपरेशन'संबंधी पक्षाच्याच कविता कृष्णन यांचा सविस्तर लेख छापला होता.)

रणवीर सेनेचा संस्थापक ब्रह्मेश्वर सिंग याचीही जून २०१२मध्ये हत्या करण्यात आली. हे ब्रह्मेश्वर सिंग 'आयुष्यभर खऱ्या अर्थाने गांधीवादी मूल्यांना धरून चालले', अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे खासदार व सध्या केंद्र सरकारमध्ये लघुउद्योग राज्य मंत्री असलेले गिरीराज सिंग यांनी जून २०१२मध्ये दिली होती. 

या सर्व घटनांमध्ये जातीय राजकारणाचा भाग मोठा आहेच आणि त्याबद्दल थोडासाच तपशील इथं वर नोंदवला गेलेला आहे. रणवीर सेनेनं घडवलेली हत्याकांडं झाली तो बहुतेकसा काळ बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचं/ लालूप्रसाद यादव-राबडी देवी यांचंच राज्य होतं. शिवाय, त्यांच्याच काळात १९९७ साली वर उल्लेख झालेला अमिर दास आयोग स्थापन झाला. नंतर २००५ साली नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल व भारतीय जनता पक्षाचं राज्यात सत्तेवर आलं आणि मग लगेचच हा आयोग बंद करून टाकण्यात आला.

या संबंधी अधिक तपशिलासाठी इच्छुक वाचकांना खालील लेख उपयोगी पडू शकतील. हे लेख बाथनी टोला आणि लक्ष्मणपूर बाथे इथल्या हत्याकांडांसंबंधी पटना उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालांनंतर त्या त्या वेळी आलेले आहेत. बथानी टोलासंबंधीचे लेख २०१२च्या मध्यातले, तर लक्ष्मणपूर बाथेसंबंधीचे लेख २०१३च्या शेवटाकडे प्रसिद्ध झालेले आहेत. तिसऱ्या कप्प्यातले लेख गेल्या महिन्यातले, कोब्रापोस्टच्या वार्ताफितीनंतरचे आहेत. केवळ या दोन हत्याकांडांचीच नाही, तर साधारण या घटनांमागची पार्श्वभूमी स्पष्ट व्हायला या लेखांची मदत व्हावी. यातले काही लेख पत्रकारांचे आहेत. रूढ अर्थानं पत्रकार नसलेल्यांपैकी बेला भाटिया यांनी मध्य बिहारमधल्या नक्षलवादी घडामोडींवर केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. केलं आणि त्यांनी स्थानिकांशी बोलून खोलवर अभ्यास केलेला आहे, त्यामुळं त्यांचा या संदर्भातल्या लेखाचा दुवा जोडला आहे. दिपांकर भट्टाचार्य आणि कविता कृष्णन ही सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाशी संबंधित आहेत: 

'फ्रंटलाइन' या पाक्षिकातले लेख
-
- बॅक टू बथानी टोला

'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली' या साप्ताहिकातले लेख-
- जस्टिस नॉट व्हेन्जिअन्स- बेला भाटिया
- रणवीर सेना रिव्हिजिटेड- दिपांकर भट्टाचार्य
- डीपली एम्बेडेड इनजस्टिस- संपादकीय टिपण
- नो वन किल्ड देम- संपादकीय टिपण

कोब्रापोस्टच्या निमित्तानं आलेले दोन लेख-
- पब्लिक सिक्रेट्स नाऊ प्रुव्हन- कविता कृष्णन यांचा लिबरेशनमधला लेख
- प्रोसिक्युशन अॅज डिफेन्स- इपीडब्ल्यूचं संपादकीय टिपण
०००

दोन

'लोकसत्ते'मध्ये १ सप्टेंबर रोजी 'सह्याद्रीचे वारे' या सदरात देवेंद्र गावंडे यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता लेखाचं शीर्षक होतं, 'मुख्यमंत्री उद्योगस्नेही, तरीही...'. लेखासोबतच्या 'इंट्रो'तला मजकूर असा:
उद्योगस्नेही धोरण यशस्वीपणे राबवल्याची पावती आता कुठे विदर्भाला मिळू लागलेली असताना, विदर्भाच्या नक्षलग्रस्त सूरजागड भागात खाणउद्योगास अहिंसक विरोधाचे काम नक्षलसमर्थक संघटना करीत आहेत. दुसरीकडे, हा भाग नक्षलग्रस्त राहू नये म्हणून जी काही पावले राज्य सरकारने उचलली, ती पुढे पडलीच नसल्याने हिंसेचा धोका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच  गृह खातेही सांभाळतात, त्यामुळे हे आव्हान थेट त्यांच्यापर्यंत पोहोचते..
या लेखावर एक वाचक-पत्र ४ सप्टेंबर रोजी याच वर्तमानपत्रात छापून आलं, ते असं:
‘मुख्यमंत्री ‘उद्योगस्नेही’, तरीही..’ हा १ सप्टेंबरच्या अंकातील देवेंद्र गावंडे यांचा लेख वाचला. लेखाच्या सुरुवातीलाच असं म्हटलंय की, राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी म्हणून मुख्यमंत्री सतत प्रयत्नशील आहेत, आणि त्यांच्या प्रयत्नांना ‘सर्व’च स्तरांतून दादही मिळत आहेत, त्यांचे प्रयत्न यशस्वी व्हावेत, अशी ‘सर्वां’ची इच्छा आहेत, इत्यादी. लेखात उल्लेख केलेले हे ‘सर्व’ म्हणजे कोण?

लोहखनिजाचे मोठे साठे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलसमर्थक संघटना स्थानिक जनतेला संघटित करून, ‘पेसा’ कायद्याचा आधार घेऊन उद्योगांना विरोध करत आहेत, असे सरसकट आरोप या लेखात आहेत. या नक्षलसमर्थक संघटना कोणत्या, हे स्पष्ट न केल्यामुळे वाचकांचा असा गैरसमज होऊ शकतो की, या भागात अहिंसक मार्गानेही जे कोणी सरकारच्या ‘उद्योगस्नेही’ धोरणांना विरोध करतायंत ते नक्षलसमर्थकच असावेत! मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली शहरात पेसा कायदा, वनहक्क, भूमीअधिग्रहण कायदा, इत्यादी संबंधी एक राष्ट्रीय परिषद, भारत जन आंदोलन व अखिल भारतीय आदिवासी महासभा या संघटनांच्या पुढाकाराने झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारिप-बहुजन महासंघ या राजकीय पक्षांचा पाठिंबा या परिषदेला होता. परिषदेच्या शेवटच्या दिवशी पाच हजार ते आठ हजार आदिवासींनी शहरामध्ये एक मोर्चा काढला, त्या मोर्चातली एक घोषणा अशी होती ‘ना लोकसभा ना विधानसभा, सबसे उंची ग्रामसभा’. उद्योग उभारण्यासंबंधी स्थानिकांच्या म्हणण्याला किंमत द्यावी, अशी मागणी करणारे हे हजारो लोक नक्षलवादी नव्हते आणि त्यांनी लोकशाही मार्गाने मोर्चा काढला होता.

मे २०१०मध्ये रिलायन्सच्या अंबानी बंधूंमधल्या, नैसर्गिक वायूविषयीच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी एक निरीक्षण नोंदवलं होतं, ते असं- ‘खाजगी उद्योग व राज्ययंत्रणा यांच्यातील कंत्राटी संबंधांमुळे... राज्ययंत्रणेची लोकांप्रति असलेली कर्तव्यं दुय्यम ठरावीत हे पाहून आम्हाला गोंधळून जायला झालंय... भांडवलशाहीची लुटारू रूपं एकत्र येऊन पहिल्यांदा नैसर्गिक स्त्रोतांसारख्या मर्यादित उपलब्धतेच्या उत्खननक्षम उद्योगांना घेराव घालतात, हे इतिहासात आणि जगभर सिद्ध झालेलं आहे...’  रेड्डी यांचं काहीसं आक्रस्ताळं वाटू शकणारं निरीक्षण संपूर्ण इथं देणं शक्य नाही. पण हा सरकारीच दस्तावेज असल्यामुळे त्यातल्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही! गडचिरोलीतल्या लोहखनिजाचे साठे भाडेतत्त्वावर खाजगी उद्योगांना दिल्याचा उल्लेख आपल्या लेखात आहे. तर, हे स्त्रोत खाजगी उद्योगांना भाडेतत्त्वावर देताना सरकार आदिवासींच्या म्हणण्याला किती महत्त्व देतं? हा प्रश्न या लेखात कुठेच नाही.

केंद्र सरकारच्याच नियोजन आयोगाने एप्रिल २००८मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात पुढील मत नोंदवलेलं होतं, ‘आदिवासी आणि राज्ययंत्रणा यांच्यातला अंतर्विरोध तीव्र झाल्यामुळे अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे... लोकांच्या जगण्याशी नि उदरनिर्वाहाशी संबंधित विविध समस्यांकडे लक्ष देण्यातलं राज्ययंत्रणेचं अपयश, अपुरेपण आणि तिची अन्यायकारक भूमिका यांमुळे नक्षलवादी कारवायांना (पाय पसरायला) अवकाश मिळाला.’

वर दिलेले दोन दाखले सरकारी यंत्रणेतूनच आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर तरी ‘नक्षलसमर्थक’ असल्याचा आरोप होणार नाही कदाचित. उद्योगांना होणाऱ्या (आंधळ्या किंवा डोळस) विरोधाचा मुद्दा निव्वळ नक्षलवाद्याच्या धोक्याशी जोडणं हेच धोकादायक आहे. भारत सरकारच्या मालकीचे नैसर्गिक स्त्रोत खाजगी उद्योगांना दिले जाताना साट्यालोट्याचे व्यवहार होतात का? आदिवासीबहुल भागांमध्येच हे स्त्रोत मुबलक प्रमाणात असतील, तर त्यांचं उद्योगात रूपांतर करताना आदिवासींच्या भूमिकेला महत्त्व दिलं जातं का? आदिवासींच्या इलाक्यातली ही श्रीमंती आपण लुटणार की त्यांना त्याबद्दल काय म्हणायचंय याला थोडीतरी किंमत देणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याऐवजी नक्षलवादाच्या धोक्याला केंद्रस्थानी आणणं म्हणजे साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. आणि ती भुईही आदिवासींच्या  मालकीची आहे!
(हे वरचं पत्र रेघेनं पाठवलेलं)

या पत्रावर प्रतिक्रिया म्हणून आणखी एक पत्र, ११ सप्टेंबरच्या अंकात आलं, त्यात असं म्हटलं होतं:
‘सहय़ाद्रीचे वारे’ सदरातील ‘मुख्यमंत्री उद्योगस्नेही, तरीही..’ हा देवेंद्र गावंडे यांचा लेख (१ सप्टेंबर) व त्यावरील ‘आदिवासीस्नेही कधी व्हायचे?’ ही प्रतिक्रिया (लोकमानस, ४ सप्टेंबर) वाचली. ‘गडचिरोली जिल्हय़ात नक्षलसमर्थक संघटना जनतेला संघटित करून ‘पेसा’ कायद्याचा आधार घेऊन उद्योगांना विरोध करीत आहेत’ या मुद्द्यावर पत्रलेखकाचा रोष आहे. बस्तर-गडचिरोलीसारख्या माओवादग्रस्त भागांपासून बऱ्याच दूर पुण्यासारख्या शहरात असल्याने पत्रलेखकास माओवादी संघटनेच्या क्रूर हिंसाचाराचा अनुभव आलेला नसावा. जंगलात बंदूक घेऊन फिरणारा हाच फक्त माओवादी, अशा चुकीच्या समजुतीतून हे पत्र लिहिले गेले आहे असे वाटते. सशस्त्र दलम हे फक्त एक चतुर्थांश भाग आहेत, तर तीन चतुर्थांश माओवादी शहरी भागात शस्त्राशिवाय काम करीत आहेत, याची कदाचित पत्रलेखकास जाणीव नसावी. तरुण, स्त्रिया, आदिवासी, दलित या समाजघटकांमध्ये माओवादी फ्रंट संघटना कशा बांधाव्यात, त्यांची गोपनीय कार्यपद्धती, त्यांचे उद्देश, याचा मुद्देसूद ऊहापोह या संघटनेने त्यांच्या ‘स्ट्रॅटेजी अ‍ॅन्ड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन’ आणि ‘अर्बन परस्पेक्टिव्ह’ या त्यांच्या कागदपत्रांमध्ये केलेला आहे. माओवादाबद्दल असलेल्या प्रचंड अज्ञानामुळे शहरांमधील असंख्य ‘भाबडे’ विचारवंत, कार्यकर्ते हे आज माओवादी फ्रंट संघटनांमध्ये काम करीत आहेत. दुर्दैवाने याची या अभावित समर्थकांना जाणीवही नाही.

माओवाद्यांच्या ‘मायावी’ प्रचाराला बळी पडून चंद्रपूर येथील अनेक कॉलेज युवक-युवती शेवटी अजाणतेपणाने माओवाद संघटनेत भरती झाले व स्वत:चे आयुष्य बरबाद करून बसले. पुणे आणि परिसरांत ‘फुले-आंबेडकर’ यांच्या नावाच्या आडून प्रचार व जलसे करणाऱ्या ‘कला-मंच’च्या नादी लागून कासेवाडी झोपडपट्टीतील काही तरुण-तरुणी आजही गडचिरोली-बस्तरमधील माओवादी सशस्त्र दलममध्ये काम करत आहेत, हेही कदाचित पत्रलेखकास माहिती नसावे.

‘पेसा’ कायद्याच्या आडून गडचिरोलीत सामान्य जनतेला संघटित करण्याचा कार्यक्रम राबविणाऱ्या संघटनेतील ‘सूत्रधारा’चे हिंसक माओवादी संघटनेशी असलेले घनिष्ठ संबंध जर शहरी समर्थकांना समजले, तर त्यांना जबर मानसिक धक्का बसेल. ज्या मोर्चाचा उल्लेख प्रस्तुत पत्रात आहे, त्यात सहभागी व्हावे म्हणून माओवाद्यांनी आदिवासींवर कशा प्रकारे प्रचंड दबाव टाकलेला होता, याचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. कधी बंदूक, तर कधी आदिवासींचा मोर्चा असे करण्याऐवजी हे माओवादी, आदिवासी विकासासाठी अहिंसक मार्गाने सरळ रस्त्यावर का उतरत नाहीत, हा प्रश्न मला त्या वेळेला पडला होता. सामान्य जनतेचे जीवनमान उद्ध्वस्त करून ‘सरकार’ नावाच्या यंत्रणेने फक्त भांडवलदारांच्या हितासाठीच काम करावे या मताचा मी मुळीच नाही, परंतु माओवाद्यांसारखी ‘पाशवी’ संघटना मजबूत होऊ नये, असे मात्र माझे ठाम मत आहे.

आदिवासी भागांतील शाळा बंद पाडणे, निष्पाप आदिवासींचे कुऱ्हाडीने हातपाय तोडून तुकडे करणे, या प्रकारांविरोधात कोणीही का बरे कधीच आवाज बुलंद करीत नाही? माओवाद्यांनी एकटय़ा गडचिरोलीत १९ दलितांची क्रूर हत्या केलेली असताना कोणीही त्याविरोधात का बरे आंदोलन करीत नाही? हिंसक साम्यवादाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर विरोध केलेला आहे. आजचे माओवादी व त्यांच्या ‘मायावी’ फ्रंट संघटना आपल्या देशाची राज्यघटना नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘भाबड्या’ शहरी विचारवंत व कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे म्हणून हा लेखनप्रपंच.
– प्रा. धम्मदीप मेश्राम, दिघोरी, नागपूर
पहिलं पत्र ज्यानं पाठवलं होतं, त्याचा पत्ता लोकसत्तेनं स्वतःहून 'पुणे' असा टाकल्यामुळं दुसऱ्या पत्रलेखकानं त्याचा वापर करून मूळ मुद्द्याला बगल द्यायची संधी मिळवलेय. त्यामुळं पहिल्या पत्रलेखकानं पुन्हा एक पत्र लिहिलं, ते न छापून आलेलं पत्र असं:
मूळ मुद्द्याला बगल!
देवेंद्र गावंडे यांच्या 'सरकार उद्योगस्नेही, तरीही' (१ सप्टेंबर) या लेखावरच्या 'आदिवासी स्नेही कधी व्हायचं?' (४ सप्टेंबर) या माझ्या प्रतिक्रियेवरची प्रतिक्रिया (प्रा. धम्मदीप मेश्राम: 'भाबड्या' शहरी लोकांनी सावध व्हावे, ११ सप्टेंबर) वाचली. माझ्या पत्रात कुठेच माओवादी हिंसेबद्दल 'भाबडं' किंवा भाबडं नसलेलं समर्थन नव्हतं. सरकारच्या उद्योगस्नेहाला होणारा प्रत्येक विरोध माओवादी हिंसेशी नेऊन जोडणं आदिवासींच्या मुळावर येणारं आहे, असा माझ्या पत्राचा सारांश; त्यासाठी सरकारच्याच दोन दस्तावेजांचे दाखले दिलेले होते. त्यावर काहीही न बोलता प्राध्यापक मेश्राम यांनी 'शहरी लोक' अशा एका ढोबळ संकल्पनेखाली काही बेछूट विधानं केली आहेत. निव्वळ पुण्यातून एखाद्यानं पत्र लिहिलं म्हणून तो तिथंच बसून असतो आणि त्याला गडचिरोली किंवा बस्तरमधली काही माहिती तिथं जाऊन घेताच येत नसेल, अशा 'भाबड्या' दृष्टीने मेश्राम यांनी पत्र लिहिलेलं 'असावं'. (वास्तविक पत्रासोबत 'पुणे' हा पत्ता मी दिलेला नव्हता, तो माझा सध्याचा पत्ता नसेल तर?). पण त्यावर बोलण्यातच मतलब नाही. एवढं व्यक्तिगत जाण्याची गरज नाही आणि त्यामुळे त्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याची इच्छाही नाही. फक्त, उद्योगांच्या उभारणीत स्थानिकांना, म्हणजे बस्तर-गडचिरोलीच्या बाबतीत आदिवासींना त्यांचं म्हणणं मोकळेपणानं मांडण्याची संधी असायला हवी, एवढाच माझ्या पत्राचा हेतू होता. तोही भाबडाच ठरणारा असावा, हे मान्य! कदाचित, आदिवासींच्या मतांचं काही मोठ्या स्तरावरचं सर्वेक्षण लोकसत्तेनं केलं तर मग सरकारचा उद्योगस्नेह, माओवादी हिंसा, याबद्दलची खरी मतं समोर यायला मदत होईल.
या पत्रांवरून आपोआप वाचकांना काय ते स्पष्ट होईलच. मूळ मुद्द्यावर बोलण्याऐवजी पुन्हा 'माओवादी हिंसा' हा विषयच केंद्रस्थानी आणून, त्यात आणखी पहिल्या पत्रलेखकावरही शिक्का मारायचा प्रयत्न नागपूरच्या पत्रलेखकानं केलेला आहे. मूळ लेख आणि नागपूरहून आलेलं पत्र दोन्हीत आणखीही साम्य आहे, ते म्हणजे कोणतीही तथ्यावर आधारलेली माहिती न देता अनेक गोष्टींकडे नुसती बोटं उठवलेली आहेत, शिवाय त्यातही खूप विरोधाभास आहेत. सूरजागडला प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊच शकत नाही, असं म्हणायचं आणि तिथंच शेकडो आदिवासी उद्योगांच्या बाजूने एकेकाळी रस्त्यावर उतरल्याचा उल्लेख करायचा. त्यातही कुठला काळ, गावांचा किमान ढोबळ तपशील काय, यातली काहीही माहिती द्यायची नाही.. मूळ परिषदेच्या आयोजकांबद्दल स्पष्ट न बोलता परिषदेला जाण्यासाठी कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी नक्षलवाद्यांनी दबाव टाकल्याचा उल्लेख फक्त करायचा.. शिवाय हिंसक माओवाद्यांशी कोणाचे संबंध आहेत ते सगळं आपल्याला माहितीच आहे, असं नुसतं सूचित करून ठेवायचं पण कोणत्याच संघटनेचं, परिषदेचं, व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, किमान तपशीलही द्यायचा नाही.. पुण्यातल्या माणसाला गडचिरोलीचं कळणार नाही असं म्हणायचं आणि स्वतः मात्र नागपुरातून पुण्यातल्या कासेवाडी झोपडपट्टीतला सगळा तपशील कळल्यासारखं लिहायचं.. काही ठिकाणी माहितीच्या स्त्रोताचं नाव देता येत नाही, हे खरं; पण इथं या मंडळींनी माहितीपेक्षा आरोप आणि मतांचा भडीमार केलेला आहे.. हिंसेचं वर्णन तर विकृत म्हणावं असं केलेलं आहे, कुऱ्हाडीनं हातपाय तोडणं हे असं नुसतं इथं मधेच कुठल्याही संदर्भाशिवाय एकतर्फी नोंदवणं म्हणजे हिंदी चित्रपटांसारखा भडक प्रकार आहे.. ज्या परिसरात नुसतं काळं-पांढरं काही बघता येत नाही, शिवाय कोणाचेही कुणाशीही संबंध असू शकतात, तिथं इतक्या सहजी निकाल लावणं आणि पुरावे न देता सहज मतं देणं बरोबर नाही, असं वाटतं.

इथं एक उदाहरण नोंदवू. छत्तीसगढमधल्या बस्तर लोकसभा मतदारसंघात १९९८पासून भा.ज.प.चाच उमेदवार निवडून येतो आहे. माओवाद्यांचा प्रभाव सर्वाधिक असलेल्या या इलाक्यातल्या निवडणुकांमध्ये कोणाच्या बाजूनं मतदान व्हावं हे कोण ठरवतं? जो-तो नागरिक आपल्या मनानं स्वतंत्रपणे ते ठरवतो का?  यासंबंधीचं हे उदाहरण. आत्ता फक्त समजा-- एका माजी माओवादी नेत्याला मध्य भारतातल्या एका गावचा सरपंच फोन करतो आणि विचारतो की, आम्ही कोणाला मतदान करू? मग तो माजी नेता सरपंचाला सांगतो की, अरे, आता मी चळवळीशी संबंधित नाहीये, गेली पाच वर्षं तर नाहीच, त्यामुळं आता तुला मी सांगू शकत नाही!-- हे रेघेनं माहिती मिळवलेलं उदाहरण आहे. माओवादी नेत्याच्या आयुष्यातल्या काही घडामोडींमुळं तो चळवळीपासून दूर गेला, ही माहिती दरम्यानच्या काळात सरपंचाला न झाल्यामुळं त्यानं या माजी नेत्यालाच मतदानाविषयीचा सल्ला मागितला होता. हीच परिस्थिती प्रत्येक गावाची असते, असा या उदाहरणाचा अर्थ नाही. पण अशी परिस्थिती या निवडणुकांवर प्रभाव पाडत असते. यामागे माओवादी पक्षाचं त्या त्या वेळचं डावपेचात्मक धोरण असेल त्यानुसार ते ठरवतील, आर्थिक व्यवहार असतील, अशा कित्येक स्थानिक मुद्द्यांचा संदर्भ याला असतो, हे तिथल्या लोकांकडून कळतं. मग अशा निवडणुकीत भा.ज.प.चा उमेदवार निवडून येत असेल, तर अख्ख्या भा.ज.प.वर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला जातो काय?

वर उल्लेख झालेल्या परिषदेचा संदर्भ रेघेवर मागे आलेला आहे. त्या परिषदेच्या आयोजकांमधली एक संघटना होती भारत जन आंदोलन. ही संघटना भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या बी.डी. शर्मा यांनी स्थापन केलेली विख्यात संस्था आहे. आदिवासी समस्यांवर ही संघटना १९९२पासून मध्य भारतात काम करतेय. ही संघटना किंवा इतरही आयोजक संस्थांबद्दल माओवादी असण्याचा आरोप कोणी अजून केलेला नाही. तसा आरोप करायलाही हरकत नाही, पण पुराव्यानं तो करायला हवा. किंवा अशा संघटनांमध्ये कोणी ना कोणी माओवादी घटक कार्यरत असणंही या इलाक्यात शक्य असतंच. पण म्हणून अख्ख्या परिषदेवर शिक्का मारणं बरोबर नाही. आणि आपण रेघेवर मागंही एकदा नोंदवल्यानुसार आयोजक कोणीही असलं नि त्याला अगदी माओवाद्यांचं समर्थनही असलं, तरी तिथं आलेले हजारो आदिवासी लोक हे 'हिंसक माओवादी' असतात का? गडचिरोली शहराच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या या मोर्चातल्या ज्या लोकांशी रेघेनं संवाद साधला त्यावरून आपण एवढंच नोंदवू शकते, की असं एवढं सरसकट शिक्के मारणं बरोबर नाही. थेट तीव्र नक्षलग्रस्त नसलेल्या भागांमधून आलेले लोकही इथं आपलं म्हणणं मांडून गेले. त्यातल्या काहींना माओवाद्यांपासून अंतर राखण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो, वगैरे तपशील इथं काही मंडळींमध्ये अनौपचारिकपणे बोललाही गेला. तर, अशा ठिकाणी आयोजकांना सोडून देऊ, मोठमोठ्या वक्त्यांना सोडून देऊ, जनरल पब्लिकच म्हणणं समजून घ्यायचं की नाही? शिवाय हा फक्त एका परिषदेचा नि मोर्च्याचाही मुद्दा नाहीये. त्याबद्दल आपण नोंदीच्या शेवटाकडं थोडंसं नोंदवण्याचा प्रयत्न करू.

बरं जाता जाता, लोकसत्तेतला मूळ लेख आणि नागपूरहून आलेल्या पत्रातला सूर एवढा सारखा कसा काय, याबद्दल 'भाबडं' आश्चर्य मात्र वाटून घेऊ नका बरं का! या पूर्वी नोव्हेंबर २०१४मध्ये नगरमधल्या जवखेडा दलित हत्याकांडासंबंधी एक सत्यशोधन समिती घटनास्थळी गेली होती. त्यासंबंधीही 'लोकसत्ते'त अशीच तथ्यांशिवायची बातमी आली होती. त्यावर मग समितीतल्या सदस्यांना खुलासा करावा लागला होता: ‘जवखेडा हत्याकांडप्रकरणी नक्षलवाद्यांकडून दलितांना चिथावणी देणे सुरू, राज्यात दंगली घडविण्याचा कट?’ या  मथळ्यासह २ नोव्हें. २०१४ रोजी ‘रविवार लोकसत्ता’ आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर ठळकपणे जे वृत्त नागपूरच्या विशेष प्रतिनिधीने दिले आहे, ते आम्हा खालील सत्यशोधन समितीमधील सदस्यांना व सत्यशोधन समितीला नाहक बदनाम करण्यासाठी अत्यंत खोडसाळपणे प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्ताचा आम्ही समितीचे सर्व सदस्य जाहीर निषेध करीत आहोत. आपल्या वृत्तात जे बिनबुडाचे आरोप व विपर्यास माहिती दिली आहे त्याचा तपशीलवार खुलासा करीत आहोत. रंगनाथ पठारे, जतीन देसाई, सुबोध मोरे, वगैरे मंडळी या समितीची सदस्य होती आणि त्यांचा हा खुलासा वाचकांच्या पत्रव्यवहारात छापून आला, त्या खुलासारूपी पत्राखाली लोकसत्तेची संपादकीय टीप अशी होती: या बातमीतील अप्रस्तुत उल्लेखाबाबत दिलगिरी व्यक्त करतानाच, हा वाद येथे थांबवणे उचित ठरेल. म्हणजे दिलगिरीही खुल्या मनानं दिलेली नाही, वाद थांबवणं 'उचित' होईल या निकालासह दिलेली दिलगिरी आहे. वाद म्हणजे काय, तर एक बातमी आणि त्यावरचं खुलाशाचं पत्र, संपलं! एवढ्याशा देवाणघेवाणीला झटपट 'वाद' म्हणायचं, हे ठीक. त्यात तो थांबवावा वाटत असेल, तरी ठीक. पण मग 'हा वाद इथेच थांंबवत आहोत', एवढंच वाक्यही पुरलं असतं. पण त्यात उचित-अनुचितचा निकाल आपणच द्यायची घाई प्रसारमाध्यमांनी करायला हवी की तथ्यावर आधारलेल्या माहिती खेळायला अधिकाधिक मोकळा अवकाश द्यायला हवा?

या सोबत हेही नोंदवायला पाहिजे की, लोकसत्तेमधे येणारं 'लोकमानस' हे वाचकांच्या पत्रव्यवहाराचं सदर इतर मराठी वर्तमानपत्रांमधल्या अशा सदरांपेक्षा जास्त जागा व्यापणारं आणि विरोधी सुरांना बऱ्यापैकी जागा देणारं असतं.
०००

तीन

या नोंदीच्या पहिल्या दोन भागांमधला एक धागा आपण या तिसऱ्या भागात पुढं नेणार आहोत. तो धागा हिंसेशी संबंधित आहे. फाटकन या सगळ्यावर मत देण्याची रेघेची कुवत नाही, त्यामुळं आपल्या क्षमतेनुसार आधीच्या दोन भागांना जोडणारी काही तथ्यं नोंदवता येतायंत का, याचा पत्रकारी प्रयत्न करू.

चारू मुजुमदार आदींनी स्थापन केलेला मूळ जो नक्षलवादी पक्ष, सीपीआय (एमएल), त्याची फाटाफूट झाल्यानंतर जे अनेक छोटे-मोठे पक्ष आहेत, त्यातला सी.पी.आय (एमएल)- लिबरेशन हा एक. हा पक्ष आता संसदीय मार्गावर चालणारा पक्ष आहे, हे नोंदीच्या पहिल्या भागात आलं आहेच. दुसऱ्या भागात सरसकटपणे नक्षलवादी-माओवादी असा उल्लेख होणारा पक्ष आहे तो- कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी). २००४मध्ये काही नक्षलवादी गटांनी एकत्र येऊन स्थापन केलेला हा पक्ष संसदीय मार्गानं चालण्याच्या विरोधातला. आपल्या नोंदीचा हा तिसरा भाग, आधीच्या दोन भागांप्रमाणेच फक्त पत्रकारी भूमिकेतला आहे. हे मुद्दाम नोंदवावं लागतंय. स्वतःचं मत देण्याची घाई करण्याऐवजी मूळ प्रदेशांमधल्या लोकांच्या (कुठल्याच नेत्यांच्या नव्हे, तर जनरल पब्लिकच्या) म्हणण्याला अधिक अवकाश मिळावा, एवढ्यापुरताच हा छोटासा प्रयत्न चाललाय. आणि रेघेवर सुरुवातीपासून त्यातल्या त्यात फक्त याच विषयासंबंधी आपल्याला असा प्रयत्न करता आलाय. हाही आपला दावा नाहीच, फक्त या विषयावर बोलताना काही खुलासे आवश्यक आहेत, असं अनुभवामुळं लक्षात आलंय, तेवढ्यापुरतंच हे स्पष्टीकरण. बाकी, वाचकांना 'उचित-अनुचित' काय ते ठरवता येईलच.

या नोंदीच्या पहिल्या भागात आपण हिंसेच्या थैमानाबद्दल पाहिलं-ऐकलं आणि वाचलं. दुसऱ्या भागात सरकारच्या उद्योगविषयक धोरणाच्या संदर्भात पुन्हा हिंसेचा मुद्दा आल्याचं वाचलं. या दोन्हीत हिंसेचा एक भाग मार्क्सवादी/साम्यवादी/नक्षलवादी विचारांशी जोडलेला दिसतोय. आणि एक भाग, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेशी जोडलेला दिसतोय. प्रसारमाध्यमांमध्ये मध्य भारतातल्या माओवादी हिंसेच्या बातम्या हल्ली, म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००६ साली नक्षलवादाला 'देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वांत मोठा धोका' म्हटलं तेव्हापासून वाढलेल्या आहेत.  पण अर्थातच या घडामोडी त्यापूर्वीपासून सुरू आहेत. एकदम पूर्वी, म्हणजे 'नक्षलवादी' हा शब्द अस्तित्वात येण्यापूर्वीही या घडामोडी होत्याच. आंध्र प्रदेशात, आता नव्या तेलंगण राज्यात कम्युनिस्ट चळवळीची बरीच खळबळ सुरुवातीपासून आहे. आणि 'प्रेमपंथ अहिंसेचा' असं म्हणणाऱ्या विनोबांना याच तेलंगणमधल्या एका गावात भूदान चळवळीची कल्पना सुचली होती.

'भूदाना'ची ही कल्पना आपल्याला कशी सुचली, याबद्दल विनोबांनी इंग्रजी लेखक-पत्रकार आर्थर कोस्लरला तो भारतात आला असताना काही सांगितलं होतं. ते कोस्लरनं नोंदवून ठेवलंय:
(१८ एप्रिल १९५१ रोजी तेलंगणातल्या पोचमपल्ली या गावात विनोबा गेले होते). त्या गावातल्या अस्पृश्यांनी त्यांची व्यथा विनोबांना सांगितली. किमान उदरनिर्वाहासाठी किती जमीन तुम्हाला लागेल, असं विनोबांनी या मंडळींना विचारलं. त्यावर थोडी का-कू करून उत्तर आलं, 'ऐंशी एकर'.

(यावर विनोबा कोस्लरला म्हणाले) 'त्यांना ही ऐंशी एकर जमीन सरकारनं द्यायला हवी, असं मला वाटत होतं. पण या मार्गानं काहीच लोकांना जमीन मिळेल, पण मूळ समस्या काही सुटणार नाही, असं मला वाटलं. त्यामुळं मी मग गावातल्याच लोकांशी बोलणं काढलं नि विचारलं की, हे आपले भाऊ भुकेनं मरू नयेत यासाठी त्यांना जमीन देऊ इच्छितंय का? मग एक माणूस पुढं आला आणि त्याने शंभर एकर जमीन देऊ केली.'

त्या माणसाचं नाव होतं व्ही.आर. रेड्डी. तो एक छोटा जमीनदार होता आणि त्याच्या नातलगांपैकी कोणी लोक कम्युनिस्ट झाले होते.

'त्या रात्री मी झोपायसाठी आडवा झालो, पण मला झोपच येईना. मी त्या प्रसंगाबद्दल विचार करत होतो. मला आज काय झालंय? एक माणूस पुढं येतो काय आणि कोणतीही जोरजबरदस्ती नसताना शंभर एकर जमीन दान करतो काय. यामध्ये काही दैवी संकेत आहे काय? मी गणितीही असल्यामुळं, भारतातल्या भूमिहीन लोकांना किती जमीन लागेल याची आकडेमोड लगेच सुरू केली. आणि माझ्या असं लक्षात आलं की, एकंदर वाटपासाठी पाच कोटी एकर जमीन लागेल. म्हणजे भारतातील एकूण सुपीक जमिनीपैकी एक षष्ठांश. एवढी जमीन लोक देऊ करतील या कल्पनेवर माझा विश्वास बसत नव्हता. त्या कल्पनेनं डोक्यात ठाण मांडलं होतं, पण मी ती स्वीकारायला तयार नव्हतो. माझ्या मनानं या कल्पनेला विरोध करायचा प्रयत्न केला. त्यामुळं मी द्विधा मनस्थितीत होतो. पण मी शंका घेतली आणि प्रेमाच्या नि देवाच्या ताकदीवर विश्वास ठेवला नाही, तर मला अहिंसेवरचा माझा विश्वास सोडून द्यावा लागेल नि साम्यवाद्यांचा हिंसक मार्ग स्वीकारावा लागेल, असं माझ्या आतला आवाज मला सांगत होता. अशा वेळी आपण शांत नाही बसू शकत. एक तर या मार्गानं नायतर त्या मार्गानं जायला लागणारच. देव बालकाच्या पोटात भूक घालतो आणि मातेच्या स्तनामध्ये दूध ठेवतो. त्यामुळं आपण देवाच्या नावानं भिक्षा मागितली, तर प्रतिसाद मिळणारच.'
(तिरपा ठसा रेघेचा)

देव आणि प्रेम यांच्यावरच्या विश्वासामुळं आपण हिंसेपासून दूर राहू शकलो, असं विनोबा म्हणतायंत. तर, सध्याच्या काळात 'देव' रुपर्ट मरडॉकच्या, म्हणजे माध्यमसम्राटांच्या घरात राहातो की काय, अशी शंका रेघेवरच्या गेल्या महिन्यातल्या नोंदीत अनिकेत जावऱ्यांनी नोंदवलेय. जावऱ्यांची शंका १९९७ सालातली आहे. तेव्हापासून आता अनेक लोकल मरडॉक तयार झालेले आहेत. मराठीतही असे मरडॉक आहेतच. शिवाय गुगल, फेसबुक हे एकदमच जगभर पसरलेले नवीन मेंबर आहेत. तर या देवांवर ठेवायचा का विश्वास? थोडासा तरी ठेवायलाच लागेल, कारण इंटरनेट देवाच्या देवळात गुगल-ब्लॉगर बडव्यानं जागा दिल्यामुळंच आपण रेघ ओढतोय. विनोबांची दुसरी श्रद्धा 'प्रेम' या तशा बेभरवश्याच्या गोष्टीवर आहे. आपल्याला इथं भूदान चळवळीवरच्या परिणामांबद्दल मत द्यायचं नाही, कारण त्याबाबतीत रेघेची माहिती तितकी पुरेशी नाही. भूदान चळवळीचा जोर का ओसरला? तिचा मुळात नक्की काय काय परिणाम झाला? यावर अभ्यासकांचं काही सापडलं तर आपण पुढं कधी तरी रेघेवर ते आणायचा प्रयत्न करू.

सध्या, विनोबांनी हिंसा आणि अहिंसा या दोन मार्गांचा विचार ज्या संदर्भात केलाय तो संदर्भ आपल्याला महत्त्वाचा आहे. हा संदर्भ जमिनीचा आहे, म्हणजेच 'जल, जंगल, जमीन' यांपैकी एक. म्हणजेच नोंदीच्या पहिल्या भागातला वाद आणि दुसऱ्या भागातला वाद काही ना काही प्रमाणात या संदर्भाशी जोडलेले आहेत. कायदा करून काही गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत, त्यासाठी लोकांच्या मनातच कायतरी बदलायला लागेल, असा एक विनोबांचा भूदानाबद्दलचा सूर जाणवतो. सज्जनांनी आपलं सारं लक्ष गुण-विकासावर केंद्रित केलं पाहिजे. समाजरचनेच्या फंदात पडणं म्हणजे नसता अहंकार ओढवून घेणं होय. अहिंसा, सत्य, संयम, संतोष, सहकार, इत्यादी यम-नियमांची निष्ठ दृढ करणं, हे गुण आपल्या नित्याच्या व्यवहारात उत्तरोत्तर प्रकट होतील असं करणं, एवढंच आपलं काम आहे. एवढं केलं म्हणजे बाकीचं सारं आपोआप होईल. मुलाला दूध पाज हे आईला सांगावं लागत नाही. दुःख झालं म्हणजे रडावं हे लहान मुलाला शिकवावं लागत नाही. वात्सल्य असू दे, दूध आपोआप पाजलं जाईल. दुःख असू दे, सहजच रडलं जाईल, असं विनोबांचं म्हणणं. (विनोबा, साम्यवाद की साम्ययोग, पान ८ ते ११, परंधाम प्रकाशन, पवनार.)

आईच्या दुधाचा संदर्भ दोनदा आला पाहा. याच्या बरोब्बर उलटं म्हणणं माओवादी पक्षाचं आहे. अख्ख्या साम्यवादी विचारसरणीबद्दल वाद घालणारे घालू शकतात. इथं आपण फक्त नोंदीत उल्लेख आलेला माओवादी पक्षच गृहीत धरलेला आहे. सध्या भारतात जी राजकीय व्यवस्था आहे ती सशस्त्र मार्गांनी उलथवून टाकणं, एवढा एकच मार्ग त्यांना मुख्यत्वे दिसतो आहे. पण हे सगळं निव्वळ एवढंच नाही. नोंदीत वर एका पत्रात या पक्षाच्या काही कागदपत्रांचा उल्लेख झालेला आहे. यातला एक 'अर्बन परस्पेक्टिव्ह' हा दस्तावेज घेतला, तर त्यात नुसतं गोपनीय कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं नाही. देशातला कोणता भाग शहरीकरणाच्या दिशेनं कसा कसा जातोय, त्यामध्ये श्रमजीवी वर्गाच्या बाबतीत काय पोकळी तयार होणार आहे, वगैरे तपशील या दस्तावेजात सुरुवातीला दिलेला आहे. मग अहमदबाद-पुणे पट्टा, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू- असा नीट शहरीकरणाचा विचार करून त्यात कोणत्या समस्यांमुळं कुठं पोकळी तयार होणार आहे, ती व्यापून काढायची संधी आपल्याला कशी आहे, याचा आराखडा या दस्तावेजात आहे. तर, समस्यांमुळं तयार होणारी पोकळी, हा मुद्दा विचारात न घेता नुसतं सुटं 'माओवादी हिंसे'कडं पाहता येणार नाही, असं वाटतं. आता सध्याच्या पंतप्रधानांनी तर देशात शंभर 'स्मार्ट सिट्या' उभारण्याची घोषणा केलेय. महाराष्ट्रातही अमरावती, औरंगाबाद, बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे ही दहा शहरं यात आहेत. प्रत्येक शहराला शंभर कोटी रुपये केंद्र सरकार दर वर्षी देणार आणि शिवाय स्थानिक प्रशासन काही कोट रुपये उभे करणार, वगैरे तपशील या संदर्भातल्या बातम्यांमध्ये आला होता. तर आता 'अर्बन परस्पेक्टिव्ह' आणखी बदलला असणार, हे साहजिक आहे. तरी शहरांमधे मुख्य धारेतल्या प्रसारमाध्यमांचे ग्राहक असतात, त्यामुळं माहितीच्या प्रवाहाला थोडा तरी अवकाश असतो. पण नोंदीच्या पहिल्या दोन भागांमध्ये उल्लेख आलेल्या ग्रामीण किंवा आदिवासी भागांमधल्या संदर्भांचं काय करायचं?

नोंदीच्या पहिल्या भागाबद्दल थोडं परत बोलू. बथानी टोला हत्याकांडासंदर्भात भोजपूर जिल्ह्याचे न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचं निलंबन करावं व महसूल मंडळाकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा काही मागण्या करत सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाचे नेते सप्टेंबर १९९६मध्ये उपोषणाला बसले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या. 'हा लोकशाही शक्तीचा विजय आहे', अशा शब्दांत तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. (संदर्भ: इपीडब्ल्यू, २ नोव्हेंबर १९९६). एखादा नक्षलवादी पक्ष उपोषण करतोय, हे चित्र याच पक्षाला त्याच्या आधीच्या रूपात पटलं नसतं. पण कालांतरानं बदल झालेला दिसतोय. या बदलाबद्दलही अनेक मतमतांतरं असतीलच. असे बदल झालेले डावे पक्ष हे आत्ताच्या माओवादी पक्षाला अर्थातच कमअस्सल वाटतात. शिवाय सीपीआय-एमएल-लिबरेशन या पक्षाला त्यांचा इतिहास सोबत घेऊनच वागावं लागत असल्यामुळं आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार. पण एका 'हिंसक' नक्षलवादी पक्षाच्या बाबतीत झालेला बदल इथं नोंदवला.

आता माओवादी पक्षाच्या आणखी एका दस्तावेजाकडं वळू. पक्षाच्या गोंदिया-गडचिरोली विभागानं सप्टेंबर २०१३मध्ये पक्षांतर्गत वितरणासाठी काढलेल्या हिंदी सर्क्युलरमधले दोन उतारे पाहा:
आदिवासींबद्दल चांगली भावना राखून असलेली आपली एक मित्र संघटना आहे. आदिवासींच्या सोबत उभं राहून इमानदारीनं लढण्याची त्यांची इच्छा असते, व्यवस्था परिवर्तनाच्या गोष्टीही ते बोलतात, पण त्यांचे हे सगळे विचार सनदशीर चौकटीत होत असतात. लोकसंघर्षाच्या मर्यादेपर्यंतच त्यांचा विचार जाऊ शकतो. आणि अखेरीस त्यांचा हा विचार गांधीवादामध्ये जाऊन मिसळतो. त्यांना आदिवासींमध्ये वर्गसंघर्ष दिसत नाही. सशस्त्र संघर्षाशिवाय व्यवस्थेत परिवर्तन शक्य नाही, ही गोष्ट ते स्वीकारत नाहीत. त्यांच्यातल्या वर्गदृष्टीच्या अभावामुळंच हे होतं. (पण) आपल्याला त्यांना गांधीवादातल्या अहिंसेच्या पैलूचीच आठवण करून द्यायची आहे. राज्यसंस्थेच्या हिंसेला टीकात्मक विरोध करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे.
...
आपल्याकडं जगातला सगळ्यांत चांगला विचार असल्याचा गर्व आपल्याला झाला आहे. आपल्याएवढा त्याग कोणी केलेला नाही, आपण पवित्र आहोत, आपल्या मार्गाशिवाय दुसरा कुठलाच मार्ग जनतेच्या मुक्ततेसाठी योग्य ठरणारा नाही, अशी घमेंड आपल्यात निर्माण झालेली आहे. आपलाच मार्ग बरोबर आहे, हे खरंच. पण काही मित्र आपल्या विचारांशी पुरेसे परिचित झालेले नसतात, आपल्याएवढा त्याग करण्यासाठी तयार नसतात.. अशा वेळी आपण आपल्या विचारांबद्दल घमेंड बाळगली, तर असे मित्र आपल्या जवळ येण्यापूर्वीच आपल्यापासून दूर जातात. चांगल्या विचाराचा अहंकार वाईट परिणाम घडवू शकतो, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आपण स्वतःला संत-महात्मा समजणं बरोबर नाही. समर्पित भावनेचा राजकीय कार्यकर्ता म्हणूनच स्वतःकडं पहावं.
आपण या नोंदीत आधी काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, त्यात काही संघटनांमध्ये माओवादी घटक असणं शक्य आहे, काही परिषदांच्या आयोजनातही ते असू शकतात, वगैरे नोंदवलंय. तर ते तसं होणं साहजिक का आहे, हे या उताऱ्यांवरून कळू शकतं. शेवटी हा पक्ष संसदीय राजकारण करत नसला, तरी तात्पुरते काही मित्र, काही तात्पुरते शत्रू याच पद्धतीनं राजकीय डावपेच लढवतो, त्यामुळं काही वेळा कुठल्या ना कुठल्या घडामोडीत प्रस्थापित लोकशाही चौकटीतही असे घटक येऊन-जाऊन राहणारच. त्यातही ज्या आदिवासी भागांमध्ये प्रसारमाध्यमांचा काहीच झोत पोचत नाही, तिथं माणसांना साधं जगतानाही प्रत्येक वेळी कोणाशी संबंध ठेवायचा, याच्या निवडीचं स्वातंत्र्य असेलच असं नाही. तर, अशा वेळी लगेच शिक्के घेऊन बसणं वर्तमानपत्रांना किंवा वृत्तवाहिन्यांना आणि त्यांच्या ग्राहकांनाही नैतिक मतांची कारंजी उडवायला सोईचं असेल, पण ते बरोबर नाही, असं वाटतं.

माओवाद्यांच्या या सर्क्युलरमध्ये गांधीवाद्यांना अहिंसेची आठवण करून देण्याचा उल्लेख आहे. आणि हा गांधीवाद फक्त सरकारी हिंसेच्या संदर्भातच आठवावा, अशी अपेक्षाही दिसतेय. त्यापेक्षा अधिक आठवण ठेवू नये, अशी सूचना ते याच सर्क्युलरमधे एका ठिकाणी देतात. काही व्यक्तींच्याद्वारे गांधीवादी आणि उत्तर-आधुनिकतावादी असे वर्गसंघर्षाच्या विरोधातले विचार पसरवले जात आहेत.. अशी तक्रारही या सर्क्युलरमधे आहे. तर, आपल्या सोईनं काही विचार आठवले जावेत, अशी माओवादी पक्षाची साहजिकपणे राजकीय अपेक्षा आहे. तेवढ्यापुरती का होईना अहिंसा आठवणीत ठेवावी असं माओवादी पक्षाला वाटतंय, एवढं तरी खरं!

'हिंसक' माओवाद्यांना अहिंसेचा उल्लेख का करावा वाटला, ते आपण पाह्यलं. आता 'अहिंसक' विनोबांना हिंसेचा उल्लेख का करावा वाटला, ते पाहू. विनोबा एका ठिकाणी म्हणतात:
क्रांतीसाठी हिंसक साधने वापरलीच पाहिजेत, हिंसेशिवाय क्रांती होऊच शकत नाही, असे कम्युनिस्ट मानतात; तसे आम्ही मानीत नाही. हिंदुस्थानसारख्या देशात आणि लोकशाही राज्यात हिंसक साधनांचा अवलंब न करता केवळ बॅलट-बॉक्सच्या बळाने राज्य-क्रांती घडवून आणता येईल असा आम्हाला विश्वास वाटतो. त्यासाठी लोकमत तयार करायला पाच-पंचवीस वर्षे लागली तरी आम्हाला हरकत वाटणार नाही. आम्ही धैर्याने लोकमत तयार करीत राहू. पण समजा, सत्ताधारी पक्षाने निवडणुकीचे पावित्र्य राखले नाही, आणि सत्तेच्या जोरावर निवडणुकी लढविल्या गेल्या तर अशा प्रसंगी साधन-शुद्धीचा आग्रह राखणे म्हणजे सतत मार खात राहणेच होईल. म्हणून अगतिकपणे केवळ विशिष्ट प्रसंगापुरता अन्य साधनांचा अवलंब करणे आम्हाला गैर वाटत नाही. आम्हाला तो नैमित्तिक धर्म वाटतो. वाटल्यास तुम्ही आपद्-धर्म म्हणा, पण अधर्म म्हणू नका, एवढीच आमची विनंती आहे. तेवढ्याने शाश्वत मूल्ये ढासळण्याचे कारण नाही. नैमित्तिक कारणापुरता स्क्रू ढिला करून घेतला तर मागाहून चांगला कसता येईल. सत्तांतर झाल्याबरोबर शाश्वत मूल्ये अधिकच पक्की करून घेऊ. हलवून खुंटा बळकट करावा म्हणतात, तसेच हे समजा. अहिंसेच्या लाभासाठीच हा हिंसेचा तात्पुरता अवलंब आहे. एरवी अहिंसा दुरावेल. झाड जोराने वाढण्यासाठीच आपण त्याची कापकूप करतो की नाही? झाडाच्या मुळावर घाव घालणे वेगळे आणि फांद्यांची छाटाछाट करणे वेगळे. भांडवलवाद, साम्राज्यवाद, जाति-वंशवाद, हे सारे अहिंसेच्या मुळावरच घाव घालीत असतात. कम्युनिस्टांच्या सर्रास हिंसेच्या तऱ्हेमुळे, त्यांचाही घाव अहिंसेच्या मुळावरच बसतो. जरी त्यांचा तसा उद्देश नसतो, तरी फलितार्थ तोच निघतो. म्हणून आम्ही तसल्या प्रकाराला संमती देऊ शकत नाही. पण विशिष्ट गुणांच्या निष्ठेच्या नावाने सबंध समाजाची प्रगती रोखून धरणे, आणि गरीब लोकांची गांजणूक दीर्घ काळ चालू देणे ही आम्हाला अतिरेकी गुण-निष्ठा वाटते. शिवाय परचक्राच्या निवारणासाठी आणि अंतर्गत बंडाळी मोडण्यासाठी शस्त्र-बल वापरावे लागले तर त्याची गणना हिंसेत न करता तो दंड-धर्म समजावा, असे आमचे म्हणणे आहे. एवढे अपवाद वगळता बाकी सर्व प्रसंगी अहिंसक साधनांचा आग्रह राखणे अत्यंत योग्य आहे, असे आम्ही समजतो.
(साम्यवाद की साम्ययोग, पान ११-१२)
(तिरपा ठसा रेघेचा)

हिंसेला निमित्तापुरती जागा करून देणारे विनोबा, हा हिंसेचा निर्णय चूक आणि बरोबर आहे का ते कसं ठरवतील? आतला आवाज आणि दैवी संकेत, यावर अवलंबून हा निर्णय घेतला तर मग अवघडच होईल. त्या तुलनेत माओवाद्यांना त्यांच्यापुरती स्पष्टता असल्याचं दिसतं, भासवलं तरी जातं. त्यांच्या बाबतीत त्यांचीच स्पष्टता खरी असल्याचा अहंकार तयार होऊ शकतो, याचा उल्लेख आलाच आहे. विनोबांनी समाजरचनेच्या फंदात पडण्यासंबंधीच्या अहंकाराचा उल्लेख केलेला आहे, माओवादी सर्क्युलरमध्येही अहंकाराचा उल्लेख सापडतात. म्हणजे मूळ मुद्द्यात कुठंतरी लिंक जुळतेय. हिंसा-अहिंसा हे त्यानंतरचे धोरणांचे प्रश्न आहेत. त्याबद्दल मतभेद होऊ शकतात, काळाकाळानं धोरणं बदलत जाऊ शकतात, त्या त्या ठिकाणची परिस्थिती बदलत जाते, तसं लोकांचं समर्थनही कमी-अधिक होत जातं, बंदुकीच्या वापराचीही एक लिमिट राहतेच, वगैरे मुद्दे गडचिरोली किंवा बस्तरमध्येही स्थानिकांच्या बोलण्यात रेघेला जाणवले.

सीपीआय-एमएल-लिबरेशनच्या नेत्यांना काही कारणानं का होईना उपोषण करावं लागलं. त्यांचं राजकीय काम ज्या भागात आहे, तिथं काही प्रमाणात तरी अशा प्रकारच्या मार्गांना अवकाश असल्यामुळंच हे शक्य झालं, हे साहजिक आहे. असा अवकाश बस्तरच्या जंगलात नाही. आपण रेघेवर आधी नोंदवल्याप्रमाणे हजारो आदिवासींच्या मोर्च्याचीही जर माध्यमरूपी देवाघरी दाद लागत नसेल, तर मग उपोषण करून काय होईल? त्या उपोषणाचा परिणाम कोणावर होईल? या सर्व संदर्भात इंग्रजी लेखिका अरुंधती रॉय जे काही लिहितात त्यातलं बहुतेकसं रेघेला पटत नाही. बंदूक हातात घेतलेली सोळा-सतरा वर्षांच्या गोंड आदिवासी मुलांच्या नजरा बघून एखाद्या रॉकबँडच्या कट्टर चाहत्यांच्या डोळ्यांमधली चमक रॉय यांना आठवू शकते. अशी अनेक करुण ठिकाणं निव्वळ शैलीवर दडपून न्यायची त्यांच्या लिखाणाची पद्धत असल्यासारखं वाटतं. पण तरी त्यांनी २०११मध्ये मांडलेला एक मुद्दा नोंदवण्यासारखा आहे, तो असा: 'तुम्ही जंगलातल्या एखाद्या गावात राहणारे आदिवासी असाल आणि आठशे सीआरपी जवान तुमच्या गावात येऊन वेढा घालून राहिले, जाळपोळ करू लागले, तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? अशा वेळी तुम्ही उपोषणाला बसणं अपेक्षित आहे का? भुकेली माणसं उपोषणाला बसू शकतात काय? अहिंसा हे एक प्रकारचं नाट्य असतं. त्यासाठी प्रेक्षक असावा लागतो. पण प्रेक्षकच नसतील तर तुम्ही काय करू शकता?'

रॉय यांनी उल्लेख केलेली परिस्थिती गडचिरोलीत तुलनेनं कमी प्रमाणात आणि बस्तरमधल्या काही भागांमध्ये जास्त तीव्रतेनं अगदी रेघेनंही पाहिलेली आहे. कोणाला काहीच कोणत्याच बाजूचं बोलता येणार नाही, अशी ही परिस्थिती असते. अशा वेळी झालेल्या हिंसेचाच फक्त गवगवा करून मूळ मुद्द्याला बगल द्यायची का, हे ठरवायला लागेल.

नोंदीच्या पहिल्या भागात जातीय संदर्भ आणि जमिनीचा प्रश्न- हा महत्त्वाचा मुद्दा होता. दुसऱ्या भागात नैसर्गिक स्त्रोत, आदिवासींच्या जमिनी- हा मुख्य मुद्दा होता. या मुद्द्यांची योग्य दखल न घेता फक्त हिंसेची दखल घेतली तर प्रसारमाध्यमांचाही हिंसेत सहभाग असल्यासारखं होत नाही का? कोब्रापोस्टच्या वार्तांकनात जे काही तथ्य किंवा त्रुटी असतील त्यासकट ही माहिती आपल्यापर्यंत पोचली का? ही पत्रकार परिषद देशाच्या राजधानीत झाली होती. अशा अवस्थेत गडचिरोलीत किंवा बस्तर-दांतेवाडामधे निघालेल्या मोर्च्यांची काय बात! त्यामुळं हिंसा-अहिंसेचे मुद्दे कुठंही सहज फेकणं गैर ठरेल असं वाटतं. नोम चोम्स्की म्हणतात तसं:
विवेकबुद्धी शाबुत असलेला कोणताही माणूस हिंसा आणि दहशत यांचं समर्थन करणार नाही. विशेषतः क्रांतिउत्तर राज्ययंत्रणेच्या दहशतीसंबंधी बोलायचं तर, निर्दय अनिर्बंध सत्ताधीशाच्या हातात अशी राज्ययंत्रणा गेल्यामुळे क्रौर्याची सीमा ओलांडली गेल्याची एकाहून अधिक उदाहरणं (इतिहासात) आहेत. अर्थात, प्रदीर्घ काळ दबून राहिलेले लोक जेव्हा त्यांच्या जुलूमकर्त्यांच्या विरोधात लढू पाहतात किंवा स्वातंत्र्य आणि सामाजिक पुनर्बांधणीच्या दिशेनं वाटचाल करू पाहतात, तेव्हा होणाऱ्या हिंसेचा तत्काळ धिक्कार करण्याची घाई कोणतीही समजूतदार व माणुसकी असणारी व्यक्ती करणार नाही.
('लँग्वेज अँड फ्रिडम', द इसेन्शिअल चोम्स्की, पान ८०. द न्यू प्रेस प्रकाशन/पेग्वीन बुक्स इंडिया)

चोम्स्कींचं मत जनरल स्वरूपाचं आहे. माओवाद्यांच्या राजकारणाच्या बाबतीत हे फक्त काही घटना-प्रसंगांपुरतं उरत नाही, तर एक दीर्घकालीन धोरण म्हणून ते या मार्गाचा अवलंब करत असतात. त्यामुळं त्याची मर्यादा ओलांडली जातेच. आणि दुसरीकडे देशाच्या सरकारला तसाही विविध पातळ्यांवर सशस्त्र दलांचा वापर करावा लागत असतोच, त्यामुळं त्यांच्या मर्यादाभंगाची उदाहरणं शहरांमधेही दिसतातच, तर जिथलं बाहेर कोणालाच काही दिसणार नाही अशा ठिकाणी ती किती तीव्रपणे दिसतील याचा अंदाज यावा. निव्वळ देशाच्या चलनी नोटांवर गांधींचं चित्र छापल्यानं सुटणारा हा प्रश्न नाही. पण त्यातल्या त्यात माध्यमांनी एकाच हिंसेबद्दल बोलणं बरोबर नाही, एवढं तरी आपल्याला नोंदवता येईल. माओवादी हिंसा करतात का? होय, करतात. फक्त प्रस्थापित सरकारच्या सशस्त्र दलांसोबतच्या युद्धातच नाही, तर अनेकदा मर्यादा ओलांडून सर्वसामान्य लोकांचाही जीव जातो. त्यात कधीकधी नंतर चुकीची कबुली देणारी पत्रकंही प्रसिद्ध करतात. पण त्यानं मेलेला परत येत नाही. आणि भारत सरकार हिंसा करतं का? होय, करतं. सरकार स्थापण्यासाठी निवडणुका लढवणारे पक्ष काय करू शकतात ते नोंदीच्या पहिल्या भागात आलेलं आहेच. ते सध्या प्रस्थापित असल्यामुळं चुकीची कबुली वगैरे द्यायची गरज नाहीच! काहीही झालं तरी मेलेले काही परत येतच नाहीच, पण जिवंत असल्यांचं म्हणणं तरी आपण नोंदवू शकतो.

तर, आता आपण चोम्स्की किंवा अशा वर उल्लेखलेल्या कोणाही मंडळींपेक्षा जास्त लक्ष द्यावं अशा गडचिरोलीतल्या एका व्यक्तीचं म्हणणं उदाहरणादाखल नोंदीच्या शेवटाकडं नोंदवू. ही व्यक्ती म्हणजे एक पंचविशीजवळ आलेला प्राथमिक शिक्षक. स्वतः आदिवासी असलेल्या या मनुष्याच्या जवळच्या नात्यातल्या एका व्यक्तीला माओवादी पक्षाचा भाग बनावं लागलेलं आहे, तर हा स्वतः आणखी काही उच्चशिक्षण घेऊ पाहतोय. त्याचा साहजिकपणेच या सर्व घडामोडींशी सर्वांत प्रत्यक्ष सामना होतो. तर ही व्यक्ती म्हणते:
'त्यांचं (नक्षलवाद्यांचं) नाही बरोबर वाटत. पण कधी कधी.. त्यांनी सूरजागडच्या वेळी जे केलं, ते बरोबर वाटतं. असं कधी कधी त्यांचं पटतं.'
ज्या वृत्तपत्रीय लेखाचा संदर्भ नोंदीतल्या दुसऱ्या भागाला आहे, त्या लेखाच्या 'इंट्रो'त उल्लेख आलेला हाच तो सूरजागडचा खाणप्रकल्प. हा तरूण प्राथमिक शिक्षक गडचिरोलीचा आहे म्हणजे फक्त तिथेच थांबलेला आहे असं नाही. काही झालं तरी तो बंदूक हातात घेणार नाहीयेच. तर मग त्याच्या आणि अशा तिथल्या अनेक मतांना जागा करून द्यायचं काम मुख्य धारेतली प्रसारमाध्यमं करतायंत का? एवढाच एक भाबडा प्रश्न. या विषयावर काहीही नोंदवलं तरी अपुरंच वाटेल, असं वाटूनही एवढी ही पत्रकारी नोंद केली. अपुरेपण असेल तर ते रेघेचं.

या विषयावर रेघेवर यापूर्वी केलेल्या काही नोंदी:
- जीव देऊ, पण जमीन नाही (३१ ऑगस्ट २०१२)
०००

गडचिरोलीत एका ठिकाणी (फोटो: रेघ/शेळी)

०२ सप्टेंबर २०१५

ख़बर वहीं जगजानी हैं

प्रॉब्लेम काय आहे? 

समजा, तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. आणि तुमच्या तरण्या मुलीचं कोणातरी मुलासोबत लफडं आहे, असं तुमचा एक शेजारी तुमच्या घरात सांगतो. घरात तुमच्यासोबत आणखीही लोक आहेत- बायको, तरूण मुलगा, तुमचा धाकटा भाऊ, भावाची बायको, त्यांचा शाळकरी मुलगा, असे कोण ना कोण लोक. तर अशा घरात मग आता या मुलीच्या प्रकरणानं वातावरण तापलंय. पोरगी कॉलेजात जाऊन काय हेच करते काय, तोंडात शेण घातलं- टाइपचं काही ना काही बोललं जातंय, समजा. मग कोणीतरी सुचवतं की, त्या पोरग्यालाच जाऊन दम द्यायला पायजे. मग तसं ठरतं. वर दम द्यायला जाताना आपणच एक हवालदारपण घेऊन जायचं ठरतं. तर मग असे तुम्ही, तुमचा भाऊ, तुमच्या बायकोचा भाऊ, तो काल पोरीच्या लफड्याची बातमी सांगून गेलेला शेजारचा तरणा पोरगा, असे सगळे लोक त्या मुलीच्या प्रियकराच्या खोलीत जातात. घुसतातच, म्हणा. आणि त्याची कॉलर पकडतात, दोन-तीन झापडा मारतात. हा पोरगा मुलीवर प्रेम तर करतोय ओ, पण तो काय हिरो नाहीये हिंदी पिक्चरचा, त्यामुळं तो एवढ्या लोकांना नि हवालदाराला बघून बावचळतो नि रडायलाच लागतो सरळ. आता काय? आता काय करणार दम द्यायला गेलेले लोक. किंवा तुम्ही असे दम द्यायला गेलात, तर तुम्ही काय कराल?


तुम्ही काय कराल ते तुम्हालाच ठरवता येईल. पण, सेम अशाच प्रसंगात आपले हे बाऊजी काय करतात बघा. त्यांना तसं आधीपासूनच एवढं आवेशात त्या पोराला धमकवायला जाण्यात इंटरेस्ट नसतो, पण लोक बोलतात म्हणून ते जातात. आणि समोर मग पोरगा रडायला लागल्यावर मात्र ते जरा स्वतःला सावरतात नि ज्येष्ठतेचा दाब आणत बाकीच्यांना खोलीबाहेर जायला सांगतात. मग त्या पोराला जरा धीम्यानं समजावतात. तर, तो पोरगा खरंच प्रेम करत असतो ओ त्यांच्या मुलीवर. म्हणजे सिरियसली त्याला तिच्याशी प्रेम आणि मग लग्न असं सगळं रितसर करण्यात इंटरेस्ट असतो, असं त्यांना जाणवत असेल, समजा. आणि मग प्रॉब्लेम काय आहे? हा प्रश्न बाऊजींना पडतो.

हा पोरगा सरळ-साधा दिसतोय, म्हणजे त्याचा काही प्रॉब्लेम असेलसं दिसत नाही. शेजारचा कोणतरी उडाणटप्पू आपल्या घरात येऊन कायतरी सांगतो नि आपण विश्वास ठेवून टाकतो. आणि मुलीशी तर आपण याबद्दल नीट बोललेलोच नाहीये, आणि ती त्या मुलाबद्दल काय वाटतं ते खरंच सांगतेय. म्हणजे तिचाही प्रॉब्लेम असेलसं वाटत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे?


झूठ और सच
 
बाऊजी म्हणजे समजा, जुन्या दिल्लीतला एकदम मध्यमवर्गीय माणूस. वर दिसतायंत ना रडणाऱ्या मुलासमोर उभे, लोकरीची टोपी घातलेले, तेच, समजा. (आणि दुसऱ्या फोटोत दिसतेय आरशात, म्हणजे आरशासमोर ती त्यांची सुंदर मुलगी). तर, हे बाऊजी काय करतात? ते घरी जातात, रात्री बायकोला थोडं समजवायचा प्रयत्न करतात. तर, ती पुन्हा त्यांच्यावर डाफरते. म्हणते, 'हां हां, तुम्हीच बिचारे, तुमची मुलगी बिचारी, तो मुलगा बिचारा, बाकी सगळे येडेच आहेत ना घरातले!' असा या बाऊजींचा प्रयत्न फसतो. आणि मग ते रात्री काय विचार करत असतील काय माहीत, पण सकाळी उठल्यावर त्यांना लक्षात येतं की, लोक तर कायपण थोपवत असतात आपल्यावर आणि आपण जातो त्यावर विश्वास ठेवत.. हम लोगों के साथ कितना बडा धोका हुआ है. मार मार के मार मार के, दुनिया भर का झूठ हमारे अंदर ठूस दिया है. और उसी झूठ को अपना सच समज रहे है...

हा तसा एकदम सर्वसामान्य नोकरदार माणूस. त्यामुळं त्याला तर चकितच व्हायला होतं. म्हणजे इतकी वर्षं आपण असंच लोकांचंच ऐकलेलं खरं मानत आलो. हे सगळं बाऊजी सकाळी उठल्यावर आपल्या घरच्यांनाही सांगायचा प्रयत्न करत असतात. पण कोण ऐकणार ओ एवढं. कोणाची आंघोळीची घाई असते, कोणाला बाकीची आवराआवर असते, त्यात या बाऊजींचा भाऊ सकाळी सकाळी पेपर वाचत बसलेला असतो. त्यावर पण बाऊजी म्हणतो, फिर झूठ सुभे सुभे. बकवास है ये. खबर नही है ये. खबर वही होती है जो हम आँखो से देखते है, कानों से सुनते है. बाकी सब बकवास. 














असं सकाळी उठल्या उठल्या वेड्यासारखं वागायचं म्हणजे आधी काय घरचे दुर्लक्षच करतात. नायतरी हा जरा ढिसाळच प्राणी आहे, तर आज कायतरी आलं असेल डोक्यात, असं बाकीच्यांना वाटतं. पण ते तसं तेवढ्यापुरतं नसतं. बाऊजी अगदी मनावरच घेतात हे खरं-खोट्याचं. म्हणजे कोणतरी शेजारचा पोरगा येतो नि आपल्या मुलीबद्दल कायतरी सांगतो, तर आपण विश्वास ठेवतो. हे रोज पेपरात कायतरी छापतात नि आपण त्यावर बातमी म्हणून विश्वास ठेवतो. असं या बाऊजींना सगळ्याच गोष्टींबद्दल वाटायला लागतं. आणि एकदम टोकालाच जाऊन पोचतात ते. जगभर कुठं ना कुठं प्रवासासाठी तिकीट वगैरे काढून देण्याची सोय करणाऱ्या कंपनीत ते कामाला असतात. तर रोजच्यासारखं ऑफिसात जाऊन बसल्यावर त्यांना कोणातरी कस्टमरचा फोन येतो, त्याला अॅमस्टरडॅमचं तिकीट काढून हवं असतं. बाऊजी समोर कम्प्युटरवर बघतात, तिकीट उपलब्ध असतं. मग तो माणूस जायची-यायची वेळ विचारतो. तर त्यावर हे बाऊजी म्हणतात, 'ते मी नाही सांगू शकत, मी तिथं गेलो नाहीये ना कधी, मग तिथं जायला किती तास लागतात, तिथं बर्फ पडतोय की नाही, हे मी कसं कायतरी खोटं सांगू?'

असं होतं या बाऊजींचं. त्यांच्या डोक्यात आलेला सच-झूठचा तर्क ते एकदम टोकालाच नेतात. त्यांच्या त्यांच्या परीनं जसजसं उलगडत जातं तसतसं बोलत जातात. म्हणजे कोणी त्यांना विचारलं समजा, की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, हे तरी तुम्हाला मान्य आहे ना? तर, त्यावरही बाऊजींकडून उत्तर मिळेल, 'असतील'.  रोज रोज पेपरांमधून, टीव्हीवरून, व्हॉट्स-अॅपवरून, रेडियोवरून, फेसबुकवरून आणि कुठून कुठून या ज्या माणसाचं पंतप्रधान म्हणून नाव ऐकू येतं, त्याबद्दलही खात्री वाटू नये, अशा पातळीला जाऊन पोचतात हे बाऊजी! 

तुमचं असं होतं का? एवढं नाही, समजा. पण, याकूब मेननला दिलेली फाशी चूक की बरोबर, हे समजायच्या आत ब. मो. पुरंदरे यांना दिलेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार चूक की बरोबर, हा प्रश्न. फाशी नि पुरस्कार तसे एकाच पारड्यात तोलता येणार नाहीत. याकूब तर आता परत येऊच शकणार नाही, आणि पुरंदऱ्यांचा पुरस्कारही आता देऊन झाला. पण या दोन्ही घडामोडींमध्ये न्याय मिळाला का? तुमचं उत्तर काय? दोन पर्याय आहेत: हो किंवा नाही? हो, असेल तर उजवा डोळा मारा. नाही, असेल तर डावा डोळा मारा. यातलं काहीच करायचं नसेल, तर पुन्हा दोन पर्याय आहेत. एक- दोन्ही डोळे बंद करा आणि झोपा. किंवा दुसरा पर्याय- दोन्ही डोळे उघडून 'आँखो देखी' हा (रजत कपूर दिग्दर्शित) हिंदी चित्रपट पाहता येईल. त्याच चित्रपटावरून आत्तापर्यंतची नोंद केली आपण. त्यातल्या बाऊजींचं पुढं काय होतं, ते त्या चित्रपटात पाहून समजेल. ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहा, कानांनी ऐका. आपण रेघेच्या विषयातलं फक्त इथं नोंदवलं.

खरं तर हे बाऊजींचं म्हणणं असं टोकाला नेत गेलं, तर मग घड्याळातल्या वेळेलाही अर्थ नाही, कारण घड्याळात काटे काहीही दाखवतील, पण तितकेच वाजलेत कशावरून? किंवा आपल्याच खोलीत बघितलं, तर पृथ्वीचं गोलपणसुद्धा जाणवत नाही, त्यामुळं पृथ्वीही गोल नाहीच बहुतेक. किंवा 'वाघ डरकाळी फोडतो', या वाक्यातला डरकाळी फोडलेला वाघही आपण पाहिलेलाच नाही, मग कदाचित तो 'म्याँव' करत असेल असंही असेल. असं हे तर्कट वाढत जाऊ शकतं. मग अमुक शब्दाला अमुकच अर्थ का, इथपर्यंत येऊन पोचलं, की मग बोलती बंद. कारण अमुक शब्दाला अमुक अर्थ, बाकीचे लोक तसंच बोलतात म्हणूनच येतो ना. तर बाकीच्या लोकांवर विश्वासच ठेवला नाही, तर हे शब्द-अर्थाचं गणित बरोबर येणंच अवघड. असं 'आँखो देखी'तल्या बाऊजीचं होतं थोडा वेळ. शेवटी पाच इंद्रियांवर तरी किती विसंबून राहणार!

मग आता आपण समाज-माध्यमांवर विसंबून काही हाती लागतंय का पाहू या. समजा, तुम्ही कोल्हापुरात राहाताय. तर गेल्या महिन्यात शहरात चोरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हॉट्स-अॅप मेसेज तुम्ही वाचला असाल. एक साखर कारखाना बंद झालाय नि तिथून शेकडो बिहारी कामगार बेरोजगार झालेत, ते टोळक्यानं लोकांवर झडप घालून चोऱ्या करतायंत, असा मेसेज वाचला होतात का? वाचून विश्वास ठेवलात का? मग कारखाना कुठला होता सांगा बरं? किंवा हे तर सोडा, छोट्यामोठ्या शहरांमधलं. भारत देशाचं जे इंग्रजी नाव आहे 'इंडिया', ते कशावरून आलं माहितेय का? हे बघा:


म्हणजे ज्या देशाच्या सिंधू का हिंदू संस्कृतीचं कौतुक ऐकू येतं नि इंडसबिंडस सिव्हिलायझेशनांच्या गप्पा होतात, तर त्याच्या नावामागं इतका सोपा तर्क आहे, ही माहिती व्हॉट्स-अॅपवरून मिळू शकते. यावर कोणी म्हणू शकतं, की असले मेसेज आम्हाला नाही येत, आम्ही फक्त कामाचे/ वैचारिक असे ग्रुपच जॉइन केलेत. किंवा कोणी असंही म्हणेल की, एवढं कोण विश्वास ठेवतं काय असल्या मेसेजांवर! तर असं म्हणणारे म्हणू शकतातच, पण मेसेजवर विश्वास ठेवणारे विश्वास ठेवतात, हेसुद्धा आहेच. काही दिवसांपूर्वीच, ही नोंद लिहिणाऱ्याला एकानं असं सांगितलं की, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाइम्स या सगळ्या वर्तमानपत्रांचे मालक मुस्लीम आहेत! अनुक्रमे जैन, गोएंका, बिर्ला अशा नावांचे मालक असलेल्या या पेपरांबद्दलची ही माहिती संबंधित व्यक्तीला व्हॉट्स-अॅपवरूनच मिळाली होती, आणि त्याला खऱ्या मालकांची नावं सांगूनही पटलं नाही. पण यावरही कोणी म्हणेल, हे असे अपवाद आहेत! तर, तसं म्हणायला हरकत नाही, पण आपण इथं नोंदवून ठेवलं.

काळं आणि पांढरं

बरं, ज्या माणसाच्या निमित्तानं आपण नोंद करतोय तो हा कोण बाऊजीफाऊजी, त्याची काय अक्कल, काय बुद्धी- असंही कोणी म्हणू शकतं. शिवाय रेघेचीही काय बुद्धी, सारखं माध्यमांना नावं ठेवायची, आपली काय अक्कल नाही साधी! असं हे बुद्धीचं स्तोम फार जाणवतं का तुम्हाला आजूबाजूला? सोशल-मीडियामधून किंवा एकूणच असं बुद्धी-माहिती-ज्ञान यांची फार हवा जाणवते का? ढोबळ प्रश्न आहे, बाऊजीसारख्या माणसाला पडेल असा. म्हणजे दुर्लक्षही करता येईल असा. पण मग आपण एका पुस्तकाची मदत घेऊ. त्या पुस्तकाकडे तरी दुर्लक्ष करणं बरोबर नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक असलेल्या अनिकेत जावरे यांचं 'काळे पांढरे अस्फुट लेख' हे १३१ पानांचं आणि १४० रुपयांचं पुस्तक आहे. २०११ साली प्रकाशित झालेलं. या पुस्तकात एक लेख आहे, 'माध्यमे, प्रसार आणि प्रसारमाध्यमे' असा. त्यात जावरे एका ठिकाणी म्हणतात:
हर्मिस प्रकाशन, पहिली आवृत्ती: १ एप्रिल २०११
मुखपृष्ठ: अनिकेत जावरे, गिरीश सहस्रबुद्धे
शिक्षणाचा उपयोग वर्तमानपत्र वाचण्यासाठीच होणार असेल तर निरक्षर, वन्य जीवन परवडले. वृत्तपत्रातील 'वर्तमान' संध्याकाळपर्यंत भूतकाळ आणि विस्मृतीत गडप होणारेच असावे लागते. रोज एक वेळ जग किती विस्तृत, चमत्कारिक आणि भयावह आहे याची स्वतःला आठवण करून देण्याची गरज निर्माण होण्यासाठी एक विशिष्ट ज्ञानसमाजव्यवस्था कारणीभूत आहे. दूरदेशी काय घडले हे रोज आणि त्वरित जाणून घेण्याची आवश्यकता; आणि जाणून घेतले तर त्या माहितीचा दैनंदिन जीवनात काही उपयोग असतो यावर विश्वास ठेवणे- तोही दरेक दिवशी- कठीण आहे. बातम्या पसरवण्याची वर्तमानपत्री लेखनशैली अशीच असावी लागते की आजची बातमी उद्या वाचली जाणार नाही. बातमीच्या ताजेपणाला (ताजेपणाच्या रूपकाचे विश्लेषण इथे करत नाही) इतके महत्त्व का असते? ज्ञान प्रसारणाचा हा कोणता प्रकार आहे की जो दुसऱ्या दिवशी बेचव ठरतो? 'त्वरित' प्रक्षेपण पाहण्यात विशेष काय असते? ते अधिक 'सत्य' का भासते? 'ऑनलाइन' संपादन, कॅमेऱ्याचे मर्यादित दृष्टिकोन यामुळे असे प्रक्षेपण तितकेच संपादित असते जितके मणि कौलचे किंवा स्पीलबर्गचे सिनेमे. पण एक खोटे, दुसरे सत्य ठरते.

अर्थातच वृत्तपत्रे आपण सत्यान्वेषी आहोत असे गर्वाने सांगणार; पण एका पी. साइनाथच्या 'व्हॉक्स पॉप्युली'मुळे सर्व वृत्तपत्रव्यवहार सत्यान्वेषी ठरत नाही. वृत्तपत्रातली भाषा हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे तिच्या मध्यमतेविषयी इथे फक्त इशारा करतो.

टीव्हीमुळे तर 'प्रत्यक्ष' या शब्दाचा अर्थ व त्याचे दार्शनिक लागेबांधे आणि आमचा आणि सत्याचा संबंध नष्ट होण्यापर्यंत आले आहे. जे वास्तव अन्यथा अगोचर असते ते काही सेकंद-मिनिटांच्या फरकाने दृष्टिगोचर करण्यात आपणही फार मोठे तांत्रिक यश मिळवले. पेपर आणि चहा जसे एकमेकांची चव वाढवतात, तसेच टीव्ही आणि रोजचा वरणभात एकमेकांना सुसह्य करतात. शिवाय 'स्वाभिमान', 'हम लोग' अशा जवळीक साधणाऱ्या नावांच्या मालिका पाहून टीव्ही बंद करण्याचा हा अधिकार गाजवण्याची क्षमता पुनःपुन्हा वापरल्याने असे भासते की आपण अधिकारी आणि टीव्ही ही वस्तू आपला सेवक. प्रत्यक्षात वस्तुस्थिती उलट असते.

प्रसारमाध्यमांचा प्रसार म्हणजे प्रसारण यंत्रांचा विस्तृत आणि विकसित क्रय-विक्रय. आता या क्रय-विक्रयात जे काही घडते, ते सर्वच दुष्ट असते असे नव्हे. परंतु माध्यमांतून होणाऱ्या ज्ञानव्यवहाराची कठोर परीक्षा करणे अतिशय निकडीचे आहे. अन्यथा पश्चिमेत जो प्रकार घडला तो येथेही घडेल. 'सत्य', 'वास्तव', 'प्रत्यक्ष' या शब्दांचे त्यांच्या अर्थांशी असलेले संबंध बदलले आहेत. या बदलांची नोंद घेऊन त्यांचे वर्णन आणि विश्लेषण करणे हे बुद्धिजीवी आणि बुद्धिवाद्यांचे कर्तव्य आहे. अशा विश्लेषणांची एक तात्पुरती सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे केला आहे. प्रसारमाध्यमांद्वारेच हा प्रयत्न करता येतो हा अंतर्विरोध आपल्याला जागीच थांबवणारा नसून चालना देणारा आहे.
(पान ८३-८४)  
[लेख मुळात 'अभिव्यक्ती' या नियतकालिकाच्या ऑक्टोबर-डिसेंबर १९९७च्या अंकात प्रकाशित]

हा लेख मूळ १९९७ सालचा आहे, तेव्हापासून आता प्रसारमाध्यमांचा व्यवहार कित्येक पटींनी वाढलाय, पण लेखातलं निरीक्षण त्याला लागू होतयंच. जावऱ्यांच्या या लेखात 'अगोचर' असा शब्द आलाय, त्याचा शब्दकोशातला एक अर्थ आहे: 'ज्ञानेंद्रियांनी समजून येत नाही ते'. असं 'अगोचर' कायतरी टीव्हीवरून एकदम दृष्टीगोचर होतं, म्हणजे डोळे या इंद्रियातून आपल्या आत येतं. आणि अर्थातच कान या इंद्रियातून पण येतं. तर हे एवढं सगळं येतं आपल्या आत, ते बरेचदा नुसतं काळं नि पांढरं होऊन येतं, त्यातल्या मधल्या सगळ्या राखाडी छटा प्रसारमाध्यमांमधून येतंच नाहीत! बाऊजी बोअर झाला त्याचंही कारण हेच असेल का? जावऱ्यांच्या निरीक्षणातही चांगलाच राग दिसतोय, तोही म्हणूनच आला असेल काय?

कळलं ते काय? 

जावऱ्यांच्या पुस्तकातल्या एकाच लेखातला निव्वळ एकच उतारा सुटा देऊन आपण थोडा त्या पुस्तकावर अन्याय करतोय, असं वाटतंय. पुस्तक थोडं विद्यापीठीय शैलीतलं आहे, त्यामुळं त्या प्रवाहातलं कोणी त्याबद्दल लिहील, असं आपण पाहणार होतो, पण नेहमीप्रमाणे ते जमवता आलं नाही. तर, आपण थोडं नोंदवू. आणि ते नोंदवणं बाऊजींच्या वाटण्याला धरूनही आहे.

आपल्याला काही वादबिद असल्या फंदात पडायचं नसेल, तरी जावऱ्यांच्या पुस्तकातले 'उत्तर-आधुनिकतावादा'वरचे दोन लेख वाचण्याजोगे आहेत. उत्तराधुनिकता, उत्तर-आधुनिकता, आधुनिकोत्तर- असे शब्द वर्तमानपत्रांमधल्या पुस्तक परीक्षणांमधून किंवा जनरलही एखाद्या लेखातून आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांच्याही वाचनात आलेले असू शकतात. तर, त्या शब्दांशी, त्यांच्या अर्थाशी संवाद साधणारे दोन लेख या पुस्तकात आहेत. या तीन शब्दांपैकी 'उत्तर-आधुनिकता' हा शब्द योग्य असल्याचं काही स्पष्टीकरण जावरे देतात, ते असं:
पूर्व आणि उत्तर-मीमांसेतील जो फरक, तोच आधुनिकवाद आणि उत्तर-आधुनिकतावादात. पण हा मुद्दा एवढ्यावर संपवून चालत नाही, कारण संस्कृतोद्भव मराठीत आणखी एक शब्द उत्तरादाखल आहे: 'उत्तरादायित्व' म्हणजे उत्तरादायी, जबाबदार असणे, ऋणी असणे, इत्यादी. 'उत्तर'-आधुनिकच्या 'उत्तर'चा प्रश्न असा सोडवता येतो. आपले सर्व आयुष्य कुणाच्या तरी नंतर (उत्तर) असते, कुणीच नाही तर आदम आणि हव्वा (किंवा फारच आग्रह असेल तर मनू आणि इला) आपल्या आधी असतातच, आणि भाषाही असतेच. मानवाच्या आधी भाषा? देव कुठली भाषा बोलतो? मराठी? दिव्यागिर्वाण भारती? का इंग्रजी?

देव सध्या कुठे राहतो? अमेरिकेत? की प्रच्छन्न स्वरूपात रूपर्ट मडॉकच्या घरी?[..] 
(पान ६९)

इथंही आपण या पुस्तकातला एक छोटासा तुकडाच तोडला. जावऱ्यांचे हे लेख नुसती ओळख करून देणारे नाहीत, तर त्यातल्या मुद्द्याशी संवाद करणारे आहेत. या पुस्तकातले बाकीचे लेखही असेच आहेत. त्यातले सगळे विषय रेघेच्या कक्षेतले नाहीत. शिवाय काही वेळा पुस्तकातल्या भाषेमुळं अडखळायला झालं. हा पुस्तकातल्या भाषेचा दोष असण्यापेक्षा, रेघेची वाचण्याची मर्यादा असण्याचीच शक्यता जास्त आहे. पण तरी त्यासंबंधीचं एक उदाहरण नोंदवू. जावऱ्यांच्या पुस्तकात 'फुको आणि आंबेडकर' असा एक सुंदर लेख आहे. यातल्या मिशेल फुकोबद्दल काही बोलण्याएवढी रेघेची माहिती नाही. पण आंबेडकरांबद्दल एक मुद्दा जावरे मांडतात, तो असा:
राज्यव्यवस्थेला आपण न्याय देऊ शकत नाही हे राज्यव्यवस्थेच्या यंत्रणेतूनच कबूल करायला लावताना आंबेडकरांनी वाटते त्यापेक्षा अधिक विलक्षण कायदेशीर कृती केली नाही काय?
(पान ३६)

हा मुद्दा निव्वळ रोचक नाही, तर डॉ. आंबेडकरांबद्दल काही अधिक खोलवर गोष्ट मांडणारा आहे, असं वाटतं. फक्त ते वाक्य सर्वसामान्य वाचक म्हणून आपण असं वाचलं- 'आपण न्याय देऊ शकत नाही, हे राज्यव्यवस्थेला तिच्या यंत्रणेतूनच कबूल करायला लावताना आंबेडकरांनी केलेली कृती, वाटते त्यापेक्षा अधिक विलक्षण कायदेशीर नाही काय?' मूळ वाक्यापेक्षा हे आपल्या मनातलं वाक्य अधिक सोपं झाल्यासारखं वाटलं. पण या बाबतीत वाचक म्हणून आपली चूक झाली असण्याचीही शक्यता आहे. यात आणखीही काही चूक सापडली नि वाचकांनी प्रतिक्रियेत नोंदवली तर जास्त कळण्याच्या दृष्टीनं बरं जाईल. आत्ता कळलं ते इथं नोंदवलं. वाचकाच्या कळण्याबद्दलही जावऱ्यांचंच एक म्हणणं नोंदवू:
न लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमधलं काही ना काही प्रत्येक (नव्या) पुस्तकात यायचं राहून गेलेलं असतं. पीएच.डी.चे प्रबंध, कविता आणि बहुतेकशा भाषिक कृतींच्या बाबतीत हे खरं आहे. त्यामुळंच लोक पुस्तकं वाचतात- जे आपल्या हातून निसटलेलं असतं, ते वाचण्यासाठी; आणि त्या अर्थी हे पुस्तक वाचनीय आहे. बहुतेक वेळा होतं तसंच, वाचकांना लेखकाच्या हेतूपेक्षा वेगळ्या रितीने या पुस्तकाचं आकलन होऊ शकतं.
(प्राची देशपांडे यांच्या 'क्रिएटिव्ह पास्ट्स: हिस्टॉरिकल मेमरी अँड आयडेन्टिटी इन वेस्टर्न इंडिया १७००-१९६०' या पुस्तकाच्या जावऱ्यांनी लिहिलेल्या परीक्षणातून, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, २८ नोव्हेंबर २००९.
मूळ इंग्रजी मजकुराचं साधारण भाषांतर इथं नोंदवलंय).

मराठीत नीट जमलं नसेल, तर मूळ इंग्रजी वाक्यंही नोंदवूया: 
Every book misses something from the books that were not written. This is true of Ph.D. dissertations, poems and most linguistic utterances. That is the reason people read books- to read what one misses, and in this sense this book is readable. As in most cases, readers may understand the book differently from what is intended by the author.
***

आता इथं नोंद संपतेय. कंटाळा आला का वाचताना. मग शीर्षकातलं गाणं ऐकून थांबू- खबर वहीं जगजानी है, आँख देखी तो मानी है.