२६ जानेवारी २०१३

भारतीय प्रजासत्ताकातील भाषा व आकाशवाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने तयार केलेली भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. तेव्हापासून सुरू असलेला हा प्रजासत्ताक दिन.

भारतीय राज्यघटना इंग्रजीतून इथे वाचता येईल
राज्यघटनेचा सतरावा भाग आहे - 'अधिकृत भाषा'. त्यातला तपशील मुळातून वाचता येईल, आपण फक्त त्या भागाच्या शेवटाकडे दिलेल्या 'विशेष सूचनां'चा आशय इथे आधी नोंदवूया - (कायदेशीर भाषेमधे हे केलेलं नाही, पण आशय चुकवलेला नसावा. कलमांचे क्रमांक आधीच्या प्रकरणांपासून सुरू होऊन आलेले असल्याने मूळ घटनेत वेगळे आहेत. इथे या नोंदीपुरते त्यांना क्रमांक दिलेले आहेत.)
१) तक्रार निवारणासाठी वापरण्याची भाषा - संघराज्याच्या किंवा राज्याच्या एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघराज्यात किंवा राज्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेचा वापर करता येईल.
२) प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षणाची सुविधा - भाषिक अल्पसंख्याक गटाच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक पातळीवर मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी पुरेशा सुविधा देण्यासाठी प्रत्येक राज्य व स्थानिक प्रशासनाने प्रयत्नशील असावे. अशा सुविधांसाठी तरतूद करण्यासाठी आवश्यक वाटल्यास राष्ट्रपती कोणत्याही राज्याला संबंधित आदेश देऊ शकतात.
३) भाषिक अल्पसंख्याक गटांसाठी विशेष अधिकारी - अ) भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक राष्ट्रपतींनी करावी.
ब) राज्यघटनेने भाषिक अल्पसंख्याकांना दिलेल्या अधिकारांसंबंधीच्या प्रकरणांची चौकशी करणं हे विशेष अधिकाऱ्याचं काम असेल. या प्रकरणांसंबंधी राष्ट्रपतींनी केलेल्या सूचनेनुसार त्यांना वेळोवेळी माहिती पुरवणं हेही या अधिकाऱ्याचं काम असेल. राष्ट्रपतींनी हे अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांना व संबंधित राज्यांच्या सरकारांना पाठवावेत.
४) हिंदी भाषेच्या विकासासाठी सूचना - भारताच्या मिश्र संस्कृतीतील सर्व घटकांना अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून हिंदी वापरता येईल एवढा या भाषेचा प्रसार व विकास व्हावा यासाठी प्रोत्साहन देणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे.

प्रशासकीय पातळीव इंग्रजीला डच्चू देऊन हिंदीचा वापर वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत आणि ते पाच वर्षांमधे प्रत्यक्षात यावेत असंही घटनेतील या भागामधे लिहिलेलं आहे.
***

'एथ्नोलॉग' हे जगभरातल्या सुमारे सात हजार भाषांची आकडेवारी प्रकाशित करणारं प्रकाशन आहे. त्यात नवीन आवृत्तीनुसार भर घालण्याचं काम ते लोक करत असतात. त्यांची मदत घेऊन आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळी, मराठी, मैतेई, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, ऊर्दू - या बावीस राष्ट्रीय भाषांची भाषकसंख्या, कुठे कुठे त्या बोलल्या जातात आदी तपशील आपल्याला पाहाता येऊ शकतो. सरकारने अधिकृतरित्या सूचीत घेतलेल्या या भाषा आहेत.
***

आता आपण 'आकाशवाणी'कडे वळू.
तुम्ही रेडियोवरच्या बातम्या ऐकता का?
'ऑल इंडिया रेडियो'ने त्यांच्या वेबसाइटवर भारतातील राष्ट्रीय भाषांमधली वार्तापत्रं ऐकण्याची सोय करून दिलेली आहे. उदाहरणार्थ, कोणाला नागपूर केंद्रावरच्या संध्याकाळी पावणेसातच्या बातम्या ऐकायच्या असतील, तर त्या वेबसाइटवर जाऊन ऐकता येतात. भारतात नक्की कुठल्या भाषांमधे बातम्या सांगितल्या जाऊ शकतात आणि ऐकल्या जाऊ शकतात आणि त्या कशा सांगितल्या जातात हे ऐकण्यासाठी आपण ह्या वेबसाइटवर जाऊ शकतो. मिझोरममधे रेडियोवर कोण काय ऐकत असेल, हे तुम्हाला नागपुरात ऐकता येऊ शकेल. आणि या बातम्यांचा मजकूरही त्यांनी उपलब्ध करून दिलाय. एकूण ज्या मिश्र संस्कृतीचा उल्लेख राज्यघटनेतल्या भाषांविषयीच्या विभागात केलेला दिसतो, त्या मिश्र संस्कृतीची झलक इथे ऐकता येते.


***

२४ जानेवारी २०१३

तोंडाला सुटलेला फेस

वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर दिसणाऱ्यांना एकदम तुच्छ लेखण्याचं किंवा एकदम 'हिरो' करण्याचं टाळून आपण ही नोंद वाचण्याचा प्रयत्न करूया. माध्यमाच्या म्हणून असलेल्या मर्यादा आणि इतर अनेक मर्यादांमधे गोष्टी घडत असल्याचं लक्षात घेऊन ही नोंद वाचूया. 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली'च्या सरत्या आठवड्यातल्या अंकात आलेल्या संपादकीय टीपणाचं हे भाषांतर आहे. या मताची 'रेघे'वर एक नोंद व्हावी एवढाच हेतू.
***

गेले काही दिवस पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यासंदर्भात भारत सरकारकडे एकाच वेळी कठोर आणि गोंधळलेल्या मागण्यांची संख्या वाढत असल्याचं दिसतंय. जम्मूमधे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने दोन भारतीय जवानांना मारून शिरच्छेद केल्याच्या पार्श्वभूमीवर या मागण्या होत आहेत. मुळात हे कृत्य अत्यंत क्रूर होतं आणि शस्त्रसंधी असूनही खऱ्या अर्थाने कधीच पूर्णपणे न थांबलेल्या संघर्षाच्या आगीत तेल ओतण्याचं काम पाकिस्तानी सैन्याच्या या नीच पातळीवरच्या जाणुनबुजून केलेल्या कृत्याने झालं. शस्त्रसंधीच्या करारामुळे नियंत्रण रेषेवरच्या चकमकींची संख्या कमी झाल्याचं आणि नागरिकांना सुटकेचा निश्वास टाकण्यासाठी पुरेसा अवकाश मिळत असल्याचं चित्रं वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांमधून दिसत असलं तरी भारत व पाकिस्तान या दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी या कराराचा विविध वेळी भंग केला आहे.

पाकिस्तानबरोबरच्या वेळोवेळी होणाऱ्या वाटाघाटींमधे कधी चुका करत कधी सामोपचार साधत, गेल्या दोन वर्षांत भारत सरकारने सकारात्मक पावलं उचलत दोन्ही देशांमधले संबंध सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले होते. अजून बरंच काही करता आलं असतं आणि अजूनही करता येईल; दोन्ही देशांमधल्या संबंधांमधल्या सुधारणेचा वेग फारसा उत्साहवर्धक नसला तरी दिशा सकारात्मक आहे. भारतात पाकिस्तानी क्रिकेट संघाला खेळण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय, वृद्धांसाठी व्हिसाच्या अटींमधे शिथीलता आणण्याचा निर्णय, आणि व्यापारवृद्धी यांमुळे संबंध सुधारणेसाठी मदत झाली. यामुळे सीमेवरचं सैन्य कमी करणं, दोन्ही देशांमधल्या लोकशाही आणि पुरोगामी गटांना प्रोत्साहन देणं या गोष्टीही शक्य झाल्या असत्या. भारत - पाकिस्तान संबंध म्हणजे फक्त दोन सार्वभौम राष्ट्रांमधले संबंध नाहीत, तर त्यामागे सांप्रदायिकता, फाळणी, विश्वासघात व द्वेषाच्या भावना असे अनेक संदर्भ आहेत. ते फक्त परराष्ट्र संबंध नाहीत तर देशांतर्गत राजकारणावर परिणाम करणारे हे अतिशय दुर्मीळ स्वरूपाचे आणि अनेकदा भयंकर वाटतील असे संबंध आहेत.

भारतातल्या सार्वजनिक वर्तुळांमधे पाकिस्तानचा उल्लेख कधीच फक्त एक परका देश म्हणून येत नाही, तर अनेकदा स्पष्टपणे किंवा अस्पष्टपणे भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येच्या संदर्भात हा उल्लेख असतो. भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार अनेकदा भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात पाकिस्तानचा उल्लेख करतात. नुकतीच एक बातमी होती की, मुंबईतल्या एका वस्तीमधे वीजबिलावर पत्ता म्हणून 'छोटा पाकिस्तान' असं लिहिलेलं आढळलं होतं!

या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्यांनी भारतीय सैन्यांच्या हत्येची व त्यातील एकाच्या शिरच्छेदाची बातमी उचलून धरली. केवळ बातमी देण्यापुरती ही घटना उरली नाही तर सतत आणि ठरवून गर्दीला उचकवण्यासाठी त्याचा वापर झाला. केवळ एखादी किंवा काही थोड्या वाहिन्या याला जबाबदार आहेत असं नाही. उलट अगदीच थोडे अपवाद वगळता, वृत्तवाहिन्या आणि दूरचित्रवाणी पत्रकार लोकांना भडकावण्यामध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत होते. अर्धवट बातम्या, अर्धसत्य कथन, पूर्ण खोटेपणा, चर्चांसाठी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या 'मत घडवणाऱ्यां'ची आणि 'तज्ज्ञां'ची काळजीपूर्वक केलेली निवड हे सगळं रसायन एकत्र करण्यात आलं, जेणेकरून दर संध्याकाळी घरांच्या दिवाणखान्यामधे (आणि पुढे जाऊन रस्त्यांवर) रागाचा पारा ठराविक पद्धतीने वाढत जाईल; परिणामी, प्रेक्षकांची संख्याही वाढेल. आत्ताच्या संदर्भापुरतं बोलायचं तर गंभीर, पण लहानसा प्रश्न वृत्तवाहिन्यांनी एकहातीपणे राष्ट्रीय उन्मादात बदलून टाकला. पाकिस्तानी हॉकी खेळाडूंवर हल्ला करण्यासाठी जमलेल्या शिवसेनेपासून एकाच्या बदल्यात दहा पाकिस्तानी शिरं घेऊन येण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराजांपर्यंत - उजव्या पक्षांनी व राजकीय नेत्यांनी, वाहिन्यांनी आधीच वाढवलेला हा मुद्दा उचलला.

वृत्तवाहिन्यांच्या या वागणुकीसंदर्भात अनेक कारणं दिली जातात. उपलब्ध जागेपेक्षा वृत्तवाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे जाहिराती मिळवण्याची स्पर्धाही वाढली, त्यामुळे प्रेक्षकसंख्या वाढवण्याची स्पर्धाही वाढली, यातूनच प्रेक्षकांना आपल्याच वाहिनीवर खिळवून ठेवण्यासाठी सनसनाटी बातम्या तयार करण्याची गरज वाढली. दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्यांची स्पर्धा फक्त एकमेकांसोबत नाहीये, तर मनोरंजनपर कार्यक्रमांना वाहिलेल्या वाहिन्या, क्रीडाविषयक वाहिन्या, अगदी दूरचित्रवाणीव्यतिरिक्तचे कार्यक्रम या सगळ्यांसोबत वृत्तवाहिन्यांची स्पर्धा सुरू आहे. वृत्तवाहिन्यांवरचे हे दबाव फक्त भारतातच आहेत असं नाही. विविध ठिकाणच्या माध्यमसंस्कृतींनी तिथले संदर्भ लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधले. पण भारतीय दूरचित्रवाणी माध्यमाने आंधळ्या अभिमानाप्रदर्शनाचा मार्ग निवडल्याचं दिसतंय. १९९९मधल्या कारगील युद्धाच्या वेळी पहिल्यांदा या व्यवसायिक डावपेचाची झलक दिसली, पण २००८मधल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी भारतातले दूरचित्रवाणी पत्रकार उन्मादी वार्तांकनाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसले. या व्यावसायिक डावपेचामधे न टाळता येण्याजोगं काहीच नाही. ज्यांनी ते सुरू केलंय त्यांना त्याची जबाबदारी घ्यावीच लागेल.

अनेक लोकांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांच्या या घडवून आणलेल्या उन्मादाने बाधित होऊन पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना माघारी पाठवणं, वृद्ध व्यक्तींना व्हिसामधे सवलती देण्याचा निर्णय पुढे ढकलणं, यांमुळे भारत सरकारने आपलं परराष्ट्र धोरण वृत्तवाहिन्यांच्या भयंकर उन्मादाला बळी दिल्याचं दिसलं. या 'डेड एन्ड'मधून सुटकेचा कोणताही सोपा मार्ग नाही. माध्यमांचं सरकारकरवी नियंत्रण करणं हेही भयानक आणि अस्वीकारार्ह आहे, पण त्याचबरोबर माध्यमांनी उजव्या गटांना आक्रस्ताळेपणात माघारी टाकणं हेही भयानक आहे. माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी आणि कॉर्पोरेट दबाव नसलेले दुसरे काही नवे मार्ग असू शकतील का? की, आपण दूरचित्रवाणीवरच्या वृत्तवाहिन्या म्हणजे मनोरंजनपर ('बिग बॉस'सारखे 'रिअॅलिटी शो' दाखवणाऱ्या) वाहिन्या आहेत असं समजून त्यांच्याकडे पाहायला हवंय?
***

वरच्या मजकुरासारखंच मत व्यक्त करणारा संपादकीय मजकूर 'बिझनेस स्टँडर्ड'मधेही आला होता.
***

TV Heads (ग्राफिटी : बँक्सी । विकिपीडियावरची नोंद)
***

२१ जानेवारी २०१३

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतली एक नोंद

जॉर्ज ऑर्वेल
जॉर्ज ऑर्वेल (जन्म - २५ जून १९०३.) मृत्यू - २१ जानेवारी १९५०.

जॉर्ज ऑर्वेलच्या डायरीतल्या १९३८ ते १९४२ या काळातल्या नोंदी पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेल्या आहेत. (संपादक - पीटर डेव्हिसन). या नोंदी 'ऑर्वेल डायरीज्' या ब्लॉगवरही अधिकृतपणे उपलब्ध आहेत. त्यातलीच ही एक ('बीबीसी रेडियो'वरच्या कामाच्या संदर्भातली) नोंद, १५ ऑक्टोबर १९४२ची.


इंग्लंडमधे लहानसा भारत रुजवल्यासारखं झालंय. काही आठवडे आमची मराठी वार्तापत्रं कोठारी नावाचे एक लहान चणीचे गृहस्थ भाषांतरीत करत आणि वाचतही. हा गुबगुबीत मनुष्य बुद्धीमान होता आणि माझ्या अंदाजानुसार खरोखरचाच फॅसिस्टविरोधी होता. 'बीबीसी'मधे कर्मचारी भरती करणाऱ्या अधिकाऱ्यांना (ह्या प्रकरणात मला वाटतं, एम१५ला) अचानक एके दिवशी लक्षात आलं की कोठारी कम्युनिस्ट आहेत किंवा होते, विद्यार्थी चळवळीत सक्रीय होते; त्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा आदेश आला. इंडिया हाऊसमधे काम करणारा जथा हा राजकीयदृष्ट्या 'ठीक' असलेला तरुण कोठारींच्या जागी भरती करण्यात आला. या भाषेत भाषांतरकार सापडणं इतकं सोपं नाहीये. जे भारतीय मातृभाषा म्हणून ही भाषा बोलतात ते इंग्लंडमधे असताना ती विसरतात असं दिसतं. काही आठवड्यांनी माझ्या सहायक, मिस् चितळे, दबकत माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की, अजूनही वार्तापत्रं कोठारीच लिहीत आहेत. जथा ती भाषा वाचू शकत असला तरी लिहिण्याबाबतीत मात्र त्याची प्रगती नव्हती, त्यामुळे कोठारीच त्याच्यासाठी लिहीत होते. मानधनही त्या दोघांमधे विभागलं जात होतं. आम्हाला दुसरा सक्षम भाषांतरकार मिळाला नाही, त्यामुळे कोठारींचं काम सुरूच ठेवण्यात आलं होतं आणि अधिकृतरित्या आम्हाला त्याबद्दल काही माहीत नव्हतं. भारतीय लोक सापडतील तिथे अशा गोष्टी होतच राहणार.
***

टीपा -
१) एम१५ : ब्रिटिश गुप्तचर संस्था, ऑर्वेलवरही लक्ष ठेवत असे असं कागदपत्रं सांगतात.
२) मराठी विभाग - 'बीबीसी'ची प्रक्षेपण सेवा १९४०च्या दरम्यान काही पौर्वात्य भाषांमधे निवडक प्रमाणात सुरू करण्यात आली. मराठीही त्यात होती.
३) मिस् चितळे : वेणू चितळे. (जन्म - २८ डिसेंबर १९१२. मृत्यू - १ जानेवारी १९९५). 'बीबीसी'मधे सुमारे पाच वर्षं नोकरी. इंग्रजी कादंबरी प्रसिद्ध करणाऱ्या पहिल्या मराठी महिला. त्यांच्याबद्दल 'लोकसत्ते'त आलेले दोन लेख - एकदोन. त्यांचा एक फोटो.
४) दुसऱ्या महायुद्धाचा साधारण कालावधी : १९३९ - १९४५.
***

ऑर्वेलच्या काही पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या 'पेंग्विन'वाल्यांनी 'जॉर्ज ऑर्वेल दिना'निमित्त बाजारात आणल्यात. त्यातल्या 'नाइन्टीन एटी-फोर'चं मुखपृष्ठ असं आहे-

मुखपृष्ठ : डेव्हीड पीअरसन

हुकूमशाही (किंवा खरंतर कुठल्याही) राजवटीतल्या (किंवा समाजातल्या / संस्थेतल्या) 'सेन्सॉरशिप'ला पीअरसननी असं मुखपृष्ठावर आणलंय. त्यामुळे पुस्तकाचं आणि लेखकाचं काळ्या ठशातलं नाव काळ्या रंगाच्या पट्टीवरतीच असल्यामुळे दिसतंय - न दिसतंय अशा परिस्थितीत ठेवलंय. त्यासंबंधी 'क्रिएटीव्ह रिव्ह्यू'.
***
आपल्याला आजूबाजूला काय दिसतंय?

१८ जानेवारी २०१३

दिवाकर, असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?

नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशीनाथ गर्गे) यांची आज जयंती.
जन्म - १८ जानेवारी १८८९. मृत्यू - १ ऑक्टोबर १९३१.

'विकिपीडिया'वरची दिवाकरांवरची नोंदही बऱ्यापैकी आहे. त्यातून काही अधिकची माहिती हवी असल्यास मिळू शकेल.
***


नाट्यछटा म्हणजे काय?
नाटकाचा तो अति-लहान किंवा सोपा प्रकार नव्हे किंवा ते कथेचे किंचित् नाट्यीकरणही नव्हे. एकीकडे नाटक, नाटिका आणि दुसरीकडे कादंबरी, कथा पाहून या प्रकाराला त्याचे स्वतंत्र, वेगळे अस्तित्त्व दिसते; आणि ते आंग्ल कवी रॉबर्ट ब्राउनिंग यांच्या 'मोनोलॉग' या काव्यप्रकाराच्या वाचनाने १९१३ साली हेरून दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली ती 'महासर्प'.

- विजय तेंडुलकर 
('नाट्यछटा' एका आवृत्तीच्या प्रस्तावनेतून. 'रेघे'वर नोंदीसाठी संदर्भ - समग्र दिवाकर - संपादक : सरोजिनी वैद्य. पॉप्युलर प्रकाशन)

तेंडुलकरांनी १९१३ या वर्षाचा केलेला उल्लेख चुकीचा असावा, कारण 'महासर्प' १८ सप्टेंबर १९११ या तारखेला लिहिली गेल्याची नोंद आहे. : रेघ.
***

ही दिवाकरांची एक नाट्यछटा :

असे केल्याशिवाय जगात भागत नाही!

''...माझे मोठे भाग्य, यात काही शंका नाही! नाहीतर, आपल्यासारख्या थोर लोकांची कोठून गाठ पडायला! - अहो कशाचे, कशाचे! आम्ही कसले कवी! कोठे एका कोपऱ्यात लोळत पडलो आहोत झाले! नाही खरेच! परवाची आपली कविता फारच बहारीची होती बोवा! फारच छान! एक्सलंट! अहो आधी नाव पाहूनच थक्क झालो! 'माझे अंधार अजीर्ण।' वा! किती सुंदर! - नाही, ते आले लक्षात. आहे कविता एकंदर आत्म्यालाच उद्देशून! पण त्यातल्या त्यात या दोन ओळी तर मला फारच आवडल्या! काय पहा! -  हां बरोबर, - 'अजीर्णामुळे। जीव कळवळे।।' काय बहार आहे यात! शब्द सोपे असून किती खोल, गंभीर अर्थ! - काय म्हणता! इतका खोल अर्थ आहे का? शाबास! 'प्रेमभंगामुळे हृदय पिळवटून डोळ्यांतून खळखळा वाहिलेल्या अश्रूंचे अजीर्ण!' क्च! काय विलक्षण मिस्टिक कविता आहे हो! टेरिबल! फारच प्रतिभा अफाट! माझे समजा हो! - कोणती? - कोणती बरी माझी कविता आपल्याला अतिशय आवडली? हां, हां! ती होय? गेल्या मस्तकमंजनातील चहादाणीवरील! अस्से! - हो, तीसुद्धा आहे आत्म्यालाच धरून! - बरे आता रस्त्यात नको - केव्हा? उद्या सकाळी येऊ आपल्या घरी? - ठीक आहे - हं: 'अहो रूपम् अहो ध्वनिः' चालले आहे जगात! म्हणे 'आपली चहादाणीवरील कविता अतिशय आवडली!' हः हः कमाल आहे बोवा या लोकांची! इतकी भिकार कविता की, मला स्वतःलासुद्धा आवडत नाही! 'माझी चहादाणी। साखरपाणी।। अधण येई सळसळा। अश्रू येती घळघळा।।' हः हः यंवरे कविता! पण चालले आहे की नाही! भेंडीरमणाने उठावे बटाटेनंदनाची स्तुती करावी! बटाटेनंदनाने पुढे यावे, भेंडीरमणाची वाहवा करावी! मनात परस्परांना त्यांची कविता मुळीच आवडत नसते! पण जगात याने त्याला शेली म्हणावे, उलट त्याने याला कीट्स म्हणावे! चालला आहे सपाटा! बरे असे केल्याशिवाय जगात भागत नाही! अहो नाही तर, आपली खरी मते सांगून जगात तंटेच करायचे - वैरीच निर्माण करायचे की नाही? रिकामा जीवाला ताप! जाऊ द्या!...''

२२ मे १९१३

('समग्र दिवाकर'मधून. पान क्रमांक ५१-५२)

***

फेसबुक : मराठी साहित्य : मराठी साहित्य संमेलनं : माध्यमं : व इतर अनेक गोष्टी : यांना ही नोंद अर्पण.

सदानंद रेग्यांनी दिवाकरांवर लिहिलेल्या 'गर्गेसाहेब' या कवितेच्या सुरुवातीला कंसात लिहिलं होतं : (काहीही कारण नसताना आज तुमची आठवण झाली. असा का तुम्ही आमचा छळ मांडलाय्?)

'रेघे'वर दिवाकरांची आठवण आली त्याचं कारण आज त्यांची जयंती आहे हे. आणि वरती जे नोंद अर्पण केलेल्या गोष्टी लिहिल्यात तेही एक कारण सांगता येईल.
***


शंकर काशीनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर

***

१५ जानेवारी २०१३

दुःख नाही, पण कंटाळा येतो

'तीन पैशाचा तमाशा'मधून मराठी नाटकांशी संबंध आलेले नि रॉक गायक असलेले नंदू भेंडे यांची मुलाखत निखील वागळे यांनी नुकतीच 'ग्रेट भेट'मधे घेतली. मराठीतले पहिले 'रॉकस्टार' अशी त्यांची ओळख वागळ्यांनी करून दिली. (१९७०च्या दशकातल्या घडामोडी-) 'तीन पैशाचा तमाशा'संबंधी ज्यांना माहिती असेल त्यांना 'एक चिमुकली होती खोली' आठवू शकेल किंवा त्यांचं इंग्रजीतलं नाटकही आठवू शकेल. नाटक, संगीत याबद्दल काही आपल्याला आत्ता बोलायचं नाहीये. त्यात काय कमी-जास्त असेल ते वेगळं. पण ही नोंद करण्याचं कारण हे आहे - 

तुम्ही २५ वर्षं आधी जन्माला आलात असं वाटतं का, या वागळ्यांच्या प्रश्नावर भेंडे हसत सकारात्मक उत्तर देतात. मग वागळे विचारतात की, याचं दुःख वाटतं का? त्यावर भेंडे हसत दुःख वाटत नसल्याचं सांगतात. त्यानंतर अशाच गप्पा होत जातात, त्यात पुन्हा संदर्भ येतो तेव्हा भेंडे म्हणतात की, '... मला कंटाळा आला.' त्यावर वागळे पुन्हा आधीचा संदर्भ देऊन म्हणतात की, म्हणजे दुःख नाही, पण कंटाळा आला, वैताग आला. यावर भेंडे हसतात आणि म्हणतात, हो, वाईटबिईट वाटलं नाही, दुःख नाही, पण कंटाळा आला.

- हे आजच्या नोंदीचं कारण.

वागळ्यांनी पकडलेला पॉईन्ट आणि भेंड्यांचं त्यावरचं हसत हसत उत्तर हे दोन्ही मजेशीर आहे.

एकूण आयुष्यातला कंटाळा ही गोष्ट जरा बाजूला ठेवली, तर फक्त मराठीपुरता असा काही कंटाळा आहे काय की जो जरा लक्ष दिलं तर आपसूक चढू शकतो?
असेल.
त्यावर बोलायचाही कंटाळा आलाय.

मासिकं, साप्ताहिकं. वर्तमानपत्रांचंही साधारण तसंच. त्यांचे स्वतःविषयीचे समज-गैरसमज. रेघेची सुरुवात यासंबंधीच्या कंटाळ्यातून झालेली असल्यामुळे ही नोंद केली. जोपर्यंत हा कंटाळा आहे तोपर्यंत रेघ चालू राहील अशी अपेक्षा करायला पाहिजे.
***

किती हा मठ्ठ चिखल, ही दलदल निलाजरी
किती हे ठाय कंटाळे, विटाळ, ही पारोसी

किती ही मठ्ठ मढवण, गढवण ही रोगणे
असे हे खेटते दिवस, आळस ही माखणी

सांकलेली रब्-रब् सांधी असैल जडावण
थकलेली बुर्-बुर् बसकण, जख्खड ही अळणी

चूळ भरून टाकावं जग

- मनोहर ओक
(मनोहर ओकच्या ऐंशी कविता, लोकवाङ्मय गृह, पान क्रमांक वीस)
***

जाऊ दे, आता गाणं ऐका-


१२ जानेवारी २०१३

a building

This small piece is sent for Regh by Anand Manavi. The accompanying photograph is an addition by Regh.


It's more confusing to think about the confusing emotions that the building brings into the mind.
It makes you nostalgic.
This particular nostalgia makes you sentimental. 
Why does it make you sentimental?
Probably its stone walls have some haunting feature.
Or may be the thought of the hands that have touched the walls over the years brings in the sentimental touch.
Or may be the thought that you could never touch the hands that you saw touching the walls makes the whole thing sentimental.
Somebody may laugh over the sentimentalism of the thought, but that is what the building does to you. You can't stop it.
"Sorry, My Lord, but I can't stop it."
Photo  : Regh

१० जानेवारी २०१३

काश्मीरसंबंधीची बातमी व आइन्स्टाईनचं पत्र

काश्मीरमधल्या ताज्या घडामोडींसंबंधी 'द हिंदू'मधे आलेल्या प्रवीण स्वामी यांच्या बातमीचा गोषवारा :

११ सप्टेंबर २०१२ या दिवशी सत्तर वर्षांच्या रेष्मा बी व त्यांचे पती इब्राहिम लोहार यांनी आपल्या मुलांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याच्या हेतूने पाकव्याप्त काश्मीरमध्ये गुप्त रितीने प्रवेश केला. सीमेवर माणसांची बेकायदेशीर ये-जा करण्यास सहाय्य केल्यासंबंधी चौकशीला सामोरं जावं लागू नये म्हणून काही वर्षांपूर्वीच त्यांच्या मुलांनी व नातवंडांनी पाकव्याप्त काश्मीरमधे मुक्काम हलवला होता. त्यानंतर बरीच वर्षे रेष्मा बी व त्यांचे पती भारतीय हद्दीतील चरोंदा इथेच राहात होते, पण आता शेवटच्या काळात मुलांसोबत राहाण्याची ओढ वाटून ती दोघं तिकडे गुप्त रितीने रवाना झाली.

या घटनेमुळे सावध होत गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेल्या चरोंदा भागात बंकर बांधणी सुरू केली.

भारत व पाकिस्तान यांच्यातील २००३च्या शस्त्रसंधी करारातील अटींचा भंग या बांधकामामुळे होत असल्याची सूचना पाकिस्तानी सैन्याने ऑक्टोबरमधे केली. परंतु भारतीय सैन्याने या बांधकामाच्या बाबतीत माघार घेण्यास नकार दिला. 

यानंतर पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. यात भारतीय सैन्याची हानी झाली नाही, पण मोहम्मद शफी खताना (वय - २५ वर्षं), शहिना बानो (वय - २० वर्षं) आणि नववीत शिकणारा एक विद्यार्थी लिआकत अली यांचा मृत्यू झाला.

यानंतर गेल्या वर्षअखेरीस अनेक वेळा या नवीन बंकरकडे जाणाऱ्या सैन्यावर अनेक वेळा गोळीबार होत होता. यावर ६ जानेवारीला रात्री भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी सैनिक ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला. या दिवशी भारतीय सैन्याने सावनपत्र भागातील आपल्या तळावर हल्लाही केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे, पण तो भारतीय सैन्याने फेटाळलाय.

यानंतर पाकिस्तानी सैन्यानेही आणखी आक्रमक पावित्रा घेतला आणि नंतर ८ जानेवारीला दोन भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा गोष्टी पूर्वीही झालेल्या आहेत, गेल्याच वर्षीही अशीच एक घटना घडली होती, त्यात करनाह इथे दोन भारतीय सैनिकांची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि नंतर भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिकांचे प्राण गेले.

काही वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकीकडे लढाई सुरू असताना दुसरीकडे सौहार्दाचे कार्यक्रम सुरू आहेत असंही घडलेलं आहे. सप्टेंबर २००९मध्ये ईदनिमित्त पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना मिठाई दिली, त्यावेळी कृष्ण घाटी परिसरात व पारगवाल भागात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये गोळीबार सुरू होता.

- असं बातमीत म्हटलेलं आहे.  
***
 

अल्बर्ट आइन्स्टाईन
पहिलं महायुद्ध (१९१४-१९) झाल्यानंतर आणि दुसरं महायुद्ध (१९३९-४५) व्हायच्या आधी (१९३१-३२च्या दरम्यान) अल्बर्ट आइन्स्टाईनने सिग्मंड फ्रॉईडला (सार्वजनिक कारणांसाठी) पाठवलेलं पत्र :

श्री. फ्रॉईड यांस,

लीग ऑफ नेशन् आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटेलेक्च्युअल को-ऑपरेशन (पॅरिस) यांनी मला सूचना केली की, माझ्या मतानुसार एखादी समस्या निवडून त्यावर मोकळेपणाने मत मांडण्यासाठी मी एखाद्या व्यक्तीला निमंत्रित करावं. या सूचनेचं स्वागत करत चालू परिस्थितीत मानवी संस्कृतीला असलेल्या सगळ्यांत भयंकर समस्येवर तुमच्याशी चर्चा करण्याची संधी घ्यायचं मी ठरवलं. समस्या अशी आहे : युद्धाच्या संकटापासून मानवाची सुटका करण्याचा काही मार्ग आहे का? आधुनिक विज्ञानातील प्रगतीनंतरच्या काळात मानवी संस्कृतीच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेली ही समस्या आहे हे आता सर्वज्ञात आहे. आणि यावर उपाय शोधण्यासंबंधात कितीही उत्साह दाखवून झाला असला तरी उपायाचे सर्व प्रयत्न दुःखद रितीने मोडून पडले.

या समस्येवर व्यावसायिकतेने आणि व्यावहारिकतेने उपाय शोधण्याची कामगिरी ज्यांच्यावर आहे त्या लोकांना या बाबतीतली स्वतःची अकार्यक्षमता तीव्रतेने जाणवायला लागलेय. आणि त्यामुळेच काहीसं लांबून समस्येकडे पाहिल्यामुळे येणारा दृष्टीकोन ज्यांना लाभलाय अशा विज्ञानात गढलेल्या व्यक्तींकडून मतं मागवावीत असं या लोकांनी ठरवलं असावं असं मला वाटतं. माझ्यापुरतं बोलायचं तर, माझ्या विचारांची सर्वसाधारण प्रक्रिया मानवी इच्छाशक्ती आणि भावनांच्या काळोख्या जागांबद्दल काही शोधू शकत नाही. त्यामुळे या समस्येबाबत काही प्राथमिक प्रश्नांबद्दल माहिती करून घेण्यापलीकडे मी फार काही करू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या भावनांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाचा काही प्रकाश या समस्येवर पडावा आणि त्यातून काही उपायांची पूर्वतयारी करता येते का ते पाहावं या हेतूने मी लिहीत आहे. काही मानसिक अडथळे असे आहेत की जे सामान्य माणूस आपल्या पातळीवर काही प्रमाणात सोडवू शकेल, पण त्यातील आंतरसंबंध व गुंतागुंत त्याच्या लक्षात येईलच असं नाही; पण तुम्ही यावर काही मार्ग काढू शकाल. कदाचित राजकारणाच्या काहीसं बाहेरच असलेले हे अडथळे मार्गी लावण्यासंबंधी तुम्ही काही सुचवू शकाल.

राष्ट्रवादाच्या पूर्वग्रहापासून सुटकेच्या दृष्टीने आणि या समस्येच्या वरकरणी प्रशासकीय बाजूला तोंड देण्यासाठी मला एक उपाय दिसतो : आंतरराष्ट्रीय मतांनुसार एक न्यायिक संघटना उभारावी जिच्यामार्फत राष्ट्रांमधील संघर्षांमधे मध्यस्थी केली जाईल. या संघटनेच्या सूचनांचे पालन प्रत्येक देशाला बंधनकारक असेल, प्रत्येक वादावर या संघटनेने दिलेला निर्णय अमलात आणावा लागेल, तिने दिलेला निकाल मान्य करावा लागेल. पण इथे मला आणखी एक अडथळा दिसतोय : ही माणसांचीच संघटना असणार, त्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी तिची स्वतःची ताकद कमी पडण्याची शक्यता आहे आणि मग बाहेरच्या शक्तींचा दबाव वाढेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागेल; कायदा आणि सत्ता अपरिहार्यपणे हातात हात घालूनच चालतात. (पण) न्यायिक निर्णय आदर्श न्यायाच्या जवळपास जाऊ शकतात, अर्थात ज्या समुदायाच्या मागणीवरून हा न्याय दिला जातो त्याने त्याच्याशी बांधील असणं यासाठी गरजेचं आहे. सध्या तरी निर्विवाद निकाल देऊ शकेल अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचं अस्तित्त्व कुठे दिसत नाहीये. त्यामुळे मी माझं पहिलं म्हणणं मांडतो : आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रत्येक राष्ट्राची काही प्रमाणात विनाअट शरणागती - कृतीस्वातंत्र्यासंबंधीची (अधिक तपशिलात, सार्वभौमत्त्वासंबंधीची) - आवश्यक आहे. अशा सुरक्षेसाठी याशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही.

गेल्या दशकात यासंबंधी करण्यात आलेले सर्व प्रयत्न प्रामाणिक असूनही अपयशी ठरले यावरून त्यांना अयशस्वी करणारे काही गंभीर मानसिक मुद्दे यामध्ये आहेत हे निश्चित. यातील काही मुद्दे शोधणं अवघड नाही. प्रत्येक राष्ट्रामधल्या सत्ताधारी वर्गामध्ये असलेली सत्तेची अभिलाषा राष्ट्रीय सार्वभौमत्त्वाला पडणाऱ्या कोणत्याही मर्यादेचा स्वीकार करणार नाही. राजकीय सत्तेची ही भूक बहुतेकदा दुसऱ्या एका गटाच्या मदतीने वाढीला लागते; हा दुसरा गट केवळ आर्थिक आकांक्षा बाळगणाऱ्यांचा असतो. प्रत्येक देशामध्ये लहानसा आणि निश्चित लक्ष्य असलेला असा गट असतोच, या गटात सामाजिक भान सुटलेल्या अशा व्यक्ती असतात ज्या युद्ध म्हणजे शस्त्रांचं उत्पादन आणि विक्री एवढंच पाहू शकतात. आपलं वैयक्तिक हित आणि वैयक्तिक मत्ता वाढविण्याचा भाग म्हणूनच ते अशा घडामोडींकडे पाहातात.

पण एकूण घडामोडींचा अंदाज येण्यासाठी हे वास्तव समजून घेणं म्हणजे फक्त पहिलं पाऊल आहे. त्यामागोमाग दुसरा प्रश्न उभा राहातो : या लहानशा गटाला बहुसंख्याकांची इच्छा वळवणं कसं शक्य होतं? आणि हे बहुसंख्याक म्हणजे असे लोक, ज्यांच्यावर युद्धाचा गंभीर परिणाम होणार असतो. (बहुसंख्याकांबद्दल बोलताना मी अशा सैनिकांबद्दलही बोलतोय ज्यांनी हल्ला हा संरक्षणाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे या विश्वासाने युद्ध हे त्यांचं व्यवयासायाचं माध्यम म्हणून स्वीकारलेलं आहे.) याचं एक साधं उत्तर असं असू शकतं की, अल्पसंख्याक वर्ग (आत्ताच्या समस्येसंदर्भात, सत्ताधारी वर्ग) शैक्षणिक संस्था आणि माध्यमं ताब्यात ठेवून असतो, अनेकदा तर धर्मपीठंही त्याच्याच हाताखाली असतात. यामुळे त्या वर्गाला बहुसंख्याकांच्या भावना संघटित करण्याची आणि त्यांचा वापर करण्याची ताकद मिळते.

अर्थात हे उत्तरही पूर्ण उपायाकडे नेत नाही. यातून आणखी एक प्रश्न उपस्थित होतो : हे वर्ग लोकांना एवढं उसळवू कसं शकतात? अगदी आपला जीव देण्याचीही तयारी असण्याइतकी तीव्र भावना कशी निर्माण करू शकतात? याचं एकच उत्तर असू शकतं : माणसाला आतूनच द्वेष आणि विध्वंसाची हाव आहे. सुरळीत काळात ही भावना सुप्त स्वरूपात असते, पण काही विशिष्ट वेळी ती उचल खाते. अशी भावना कार्यरत आहे असं म्हणून ती सार्वजनिक मानसिकतेवर लादणं सोपं आहे, पण इथेच सगळ्यात गुंतागुंतीचा मुद्दा आहे आणि त्याबद्दलच आपल्याला बोलायचंय. मानवी भावनांचा तज्ज्ञच त्याबद्दल बोलू शकेल.

यातूनच आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलोय. द्वेष आणि विध्वंसाच्या भावनेपासून दूर नेण्यासाठी माणसाची मानसिक उत्क्रांती नियंत्रित करता येईल अशी काही शक्यता आहे का? यात मी फक्त तथाकथित असांस्कृतिक लोकांबद्दल बोलतोय असं अजिबातच नाहीये. उलट अनुभव असं सांगतो की, तथाकथित 'विचारवंत' अशा विध्वंसक वृत्तीमध्ये जास्त सहभागी असतात, कारण त्यांचा जमिनीवरच्या खडतर जीवनाशी थेट संबंध नसतो, ते मुख्यत्त्वे छापील पानांतून अशा परिस्थितीशी संबंध ठेवून असतात.

समारोप करताना मला सांगावंसं वाटतं की, आत्तापर्यंत मी राष्ट्रांमधल्या युद्धांबद्दलच बोललो. पण मला माहीत आहे की, आक्रमक भावना इतर पातळ्यांवरही आणि इतर परिस्थितींमध्येही कार्यरत असते. (उदाहरणार्थ, यादवी युद्ध. धार्मिक - वांशिक कारणांनी उसळणारे दंगे). पण माणसा-माणसामधल्या सर्वांत क्रूर आणि मोठ्या स्तरावरच्या या वादावरती बोलण्याचं मी मुद्दामहूनच ठरवलं. कारण कदाचित इथेच आपल्याला सशस्त्र युद्ध अशक्य करण्याचा मार्ग सापडू शकेल.

या तातडीच्या समस्येवर उपायाच्या दृष्टीने तुमच्या लिखाणात काही उत्तरं सापडतील असं मला वाटतं. पण तुमच्या काही नवीन संशोधनाच्या प्रकाशात तुम्ही जगाच्या या समस्येवर काही भाष्य केलंत तर ते आपल्या सगळ्यांनाच उपकारक ठरेल. यातूनच कदाचित नवीन आणि फलदायी कृतींची सुरुवात होऊ शकेल.

आपला विश्वासू,
ए. आइन्स्टाईन

('व्हाय वॉर?' या पुस्तिकेतून)

***

टीप : आइन्स्टाईनच्या या पत्रानंतर सहा वर्षांनी दुसरं महायुद्ध घडून गेल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली (१९४५).
***

काश्मीर. (फोटो : स्टीव्ह मॅकरी - मॅकरींनी कॅमेऱ्यात गोठवलेलं काश्मीर)

***