२८ नोव्हेंबर २०१२

-



एक रस्ता. डांबरी. काळा रस्ता.
कुठे एक डबकं. म्हटलं तर पाणी खराब आहे. माणूस पिऊ शकत नाही म्हणून खराब म्हणायचं, पण तसं खराब नव्हे. वेळ पडल्यास माणसालाही प्यायला लागू शकतं असं पाणी. सुंदर त्यात शेवाळ. त्या शेवाळावर पक्षीही बसू शकतो वेळ पडल्यास आणि त्याची तशी ताकद असल्यास. पिवळ्या फिकट चोचीचा लहानसा पक्षी त्यावर बसलेला. ठप्प. आणि त्याच्यावरही पडलेलं काळोखं ऊन.
आजूबाजूला झाडीचा गुंता. एकएका झाडाचं खोड न् फांद्या यांच्यातला फरक कळू नये असा गडद हिरवट गुंता. झाडांची जाळीच.
त्या जाळीत पडलेलं ऊन. जाळीत पडल्यामुळे व्यवस्थित असलेलं. कुठे जखमबिखम झालेली नाही.
काही वेलींसारख्या गोष्टी. वेली म्हणजे नाजूक असतात त्याही आणि मजबूत असतात त्याही. नाजूक वेली कुठेही सरपटत गेलेल्या, एकमेकांवर चढलेल्या, एकमेकांत गुंतलेल्या, दोन झाडांना सांधणाऱ्या. मजबूत वेली जाड्या खोडाच्या, त्यांची त्यांची विचित्र रचना झालेली, काहीतरी गोल एकमेकांत गुंतल्यासारखी रचना, करड्या रंगाच्या खोडांची एकमेकांतली रचना. कधी त्यावरही पडलेलं ऊन, त्यामुळे स्पष्ट होणाऱ्या वेटोळ्या सावल्या. हे सगळं एकत्र एकमेकांत.

फोटो 'रेघे'वरचाच

















ब्रह्म भरलें ते सदोदित पाही। चालावया नाहीं, वाट कोठे।।
चालतां चालतां करें निवारावें। कोठें हे थुंकावे, कोणे ठायीं।।
जळांत मासोळी मासोळींत जळ। ऐसा हा पाल्हाळ, आहे बापा।।
तुका म्हणे वोहे गुरुकृपेविण। ऐसी आहे खूण सत्य बापा।।

संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग - संपादक : वा. सी. बेंद्रे (कॉन्टिनेन्टल प्रकाशन). पहिली आवृत्ती - २००३
 - या पुस्तकातून वरचा अभंग

०८ नोव्हेंबर २०१२

७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा

७ नोव्हेबर १९०५ रोजी केशवसुत यांचं निधन झालं. त्यांच्या कवितेबद्दल आपण शाळेत ऐकलं असेल, आपली त्याबद्दल कायतरी मतं असतील ती असतील. त्यांचं मराठी आधुनिक कवितेतलं स्थान काय असेल ते असेल. त्यांनी काय केलं, कोणाचा त्यांच्यावर प्रभाव होता त्याबद्दलही कायतरी असेल. मग ते म्हणाले 'एक तुतारी द्या मज आणुनि फुंकीन ती मी स्वप्राणाने', तर त्यावर असाही युक्तिवाद केला गेलाय, की तुम्हाला एवढी स्वप्राणानेच फुंकायची होती तुतारी, तर मग ती दुसऱ्यानं कशाला आणून द्यायला हवी? - असं ते सगळं एका बाजूनं सुरू राहील आणि राहूदे. आपला इथला हेतू आत्ताचा वेगळा आहे.

आपण काल अल्बेर कामूचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं त्याबद्दल नोंद केली. ७ नोव्हेंबर १९१३ ही त्याची जन्मतारीख. (४ जानेवारी १९६०ला अपघातात त्याचा मृत्यू झाला.)
ती नोंद केल्यानंतर सदानंद रेग्यांनी कामूवर केलेली कविता आठवली. ती जाऊन शोधली. ती अशी -

निरर्थालाहि अर्थ येऊ पहात होता...
(आल्बेर कामू यांच्या स्मृतीस)
त्या दिवशी अचानक
          असे काय झाले?
तुझ्या मोटारीचे डोके
          अकस्मात् कसे फिरले?
अचानक...
अकस्मात्...
अघटित...
अपघात...
निरर्थालाहि काही अर्थ येऊ पहात होता.
पण तो झाला भस्मसात्...

तुला विचारले तर तू काही बोलत नव्हतास.
चुरगाळलेल्या बगळ्यासारखा मान टाकून बसला होतास.
गाठाळत चाललेल्या रक्ताच्या नुक्त्यावर
एक डास तेवढा गुं गूं करीत होता.

म्हटला तर या साऱ्याला अर्थ होता.
म्हटला तर काहीच नव्हता.
नुसता अॅब्सर्ड काळोख...


('देवापुढचा दिवा'मधून)


ही कविता शोधताना रेग्यांची '७ नोव्हेंबर १९०५' असं शीर्षक असलेली कविता दिसली. ती पाहिली तेव्हा लक्षात आलं की काल केशवसुतांची पुण्यतिथी होती.
केशवसुतांबद्दल 'मराठी विश्वकोश' इतर माहिती देतोच, पण रेग्यांच्या कवितेतले काही संदर्भ स्पष्ट व्हावेत म्हणून विश्वकोशातली ही माहिती - केशवसुतांनी 'मॅट्रिकनंतर (१८८९) मुंबईला १८९७ पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. पुढे प्लेगमुळे मुंबई सोडून ते खानदेशात गेले. आरंभी भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. १९०१ पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. १९०४ मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. १९०५ साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांची पत्नीही मरण पावली.'

ही आता रेग्यांची कविता -

७ नोव्हेंबर १९०५

प्लेग... प्लेग... प्लेग...
जणू उभ्या हुबळी गावाच्याच
आली आहे खाकेत
                    प्लेगची गाठ
लोक मरताहेत त्याला काही सुमार!
सकाळपास्नं प्रेतांचे पास लिहून लिहून
                    दुखायला आले हात...
आणखी एक आलं हे तशात!
करीत होता म्हणे धारवाडला मास्तरकी
मग इथं कशाला आला
                    मरायला फुकाफुकी?...
काय नाव म्हणालंत?
          कृष्णाजी
               केशव
                    दामले?
चला, सुटले बिचारे!
आता नाही अपमान गिळावा लागणार
की नाही दारिद्र्याचा उंदीर चावणार
आता...
          हर्ष खेद ते मावळले
               हास्य निमाले
                    अश्रु पळाले...
 ('अक्षरवेल'मधून)

केशवसुतांवर एक संकेतस्थळ सापडलं ते असं- http://keshavsut.com/
इथं त्यांची 'तुतारी' कविताही वाचता येईल.

केशवसुत (फोटो- keshavsut.com )

दरम्यान,
'झपूर्झा' कवितेत केशवसुत काय म्हणतात बघा -

हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !             १


शेवटच्या कडव्यात म्हणतात-

सूर्य चन्द्र आणिक तारे
नाचत सारे
हे प्रेमभरें
खुडित खुपुष्पें फिरति जिथें;
आहे जर जाणें तेथें
धऱा जरा, नि:संगपणा,
मारा फिरके,
मारा गिरके,
नाचत गुंगत म्हणा म्हणता –
झपूर्झा ! गडे झपूर्झा !         ६


उरलेली कविता इथं वाचा.
***

झपूर्झा काय, अॅब्सर्ड काय नि ७ नोव्हेंबर काय
केशवसुत काय, कामू काय नि काय काय

०७ नोव्हेंबर २०१२

सिसिफसचं मिथक

- आल्बेर कामू

आल्बेर कामू (फोटो : हेन्री कार्तिअर ब्रेसाँ)
आल्बेर कामूचं जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू होतंय. त्यानिमित्तानं त्याच्या 'द मिथ ऑफ सिसिफस' या गाजलेल्या पुस्तकातल्या अगदीच छोट्या भागाचं हे भाषांतर. 


भला मोठा खडक सतत पर्वतावर ढकलत नेण्याची शिक्षा सिसिफसला देवानं दिली आणि खडक स्वतःच्या वजनानं परत खाली पडणार हेही निश्चित. निष्फळ आणि निराशाजनक कष्टांपेक्षा दुसरी कुठलीही कठोर शिक्षा असू शकणार नाही असं देवाला वाटलेलं.

होमरवर विश्वास ठेवायचा झाला, तर सिसिफस हा मर्त्य प्राण्यांपैकी सर्वांत हुशार आणि विवेकी होता. पण दुसऱ्या एका परंपरेनुसार, त्याला लुटारूचं काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. यामध्ये मला कोणताही विरोधाभास दिसत नाही. अधोविश्वातला तो एक निष्फळ कामकरी का बनला याच्या कारणांसंबंधी मतभेद असू शकतील. सुरुवात करायची तर, देवांसंबंधी काहीतरी थिल्लरपणा केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यांची गुपितं त्यानं चोरली. इसोपसची मुलगी एगिना ज्युपिटरनं पळवली. ती गायब झाल्यानं वडिलांना धक्का बसला आणि त्यांनी सिसिफसकडे तक्रार केली. या अपहरणाबद्दल सिसिफसला माहिती होती; पण, ती देण्यापूर्वी एसोपसने कोरिन्थच्या गढीला पाणी पुरवावं अशी अट त्यानं घातली. आकाशी गाजेपुढं त्यानं पाण्याचा वर मागितला. यामुळे त्याला शिक्षा झाली. होमर आपल्याला असंही सांगतो की, सिसिफसनं मृत्यूला साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. प्लुटोला त्याच्या उद्ध्वस्त, सुन्न साम्राज्याकडे पाहावलं नाही. त्यानं युद्धाच्या देवाला पाठवलं आणि मृत्यूला सोडवून आणलं.

असं म्हटलं जातं की, मृत्यूच्या जवळ असल्यामुळे, सिसिफसला त्याच्या बायकोचं प्रेम तपासून पाह्यचं होतं. आपलं दफन न केलेलं शरीर सार्वजनिक चौकाच्या मध्यभागी फेकण्याची सूचना त्यानं तिला केली होती. सिसिफस अधोविश्वात जागा झाला. आणि मानवी प्रेमाच्या एवढा विरोधी जाणारा आज्ञाधारकपणा पाहून, त्यानं प्लुटोकडून पृथ्वीवर परतून आपल्या बायकोला दंड करण्यासाठीची परवानगी मागितली. पण त्यानं पुन्हा जगाचं तोंड पाहिलं, पाणी, सूर्य, दगड आणि समुद्र अशांचा आनंद घेतला तेव्हा त्याला परत नरकाच्या अंधारात जावंसं वाटेना. सूचना करून झाल्या, कठोर भाषेत सांगून झालं, तरी उपयोग नाही. अनेक वर्षं तो आखातात समुद्राजवळ राहिला. यानंतर मात्र देवांचा आदेश आवश्यक बनला. मग मर्क्युरी आला आणि या बेशरम माणसाची बखोटी धरून सगळ्या आनंदांपासून त्याला दूर नेलं नि जबरदस्तीनं पुन्हा अधोविश्वात नेऊन टाकलं. इथं त्याच्यासाठीचा खडक वाटच पाहात होता.

सिसिफस हा आपला असंगत (अब्सर्ड) नायक असल्याचं एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याचे आनंद आणि त्याच्यावरचा अत्याचार यातून तो पुरेपूर उरला होता. देवांवरचा त्याचा राग, मृत्यूविषयीचा द्वेष आणि जगण्यावरचं त्याचं प्रेम त्याला ही बोलता न येण्याजोगी शिक्षा मिळाली- यात काहीही पूर्ण न करण्याकडेच त्याच्या अस्तित्त्वाला ढकलून देण्यात आलं. या पृथ्वीवरच्या अभिलाषेपोटी ही किंमत मोजणं भाग होतं. अधोविश्वातील सिसिफसविषयी आपल्याला काही कळण्याचा मार्ग नाही. कल्पनेत जीव ओतण्यासाठी मिथकं तयार केली जातात. या मिथकामधे फक्त प्रचंड खडक वर ढकलण्यासाठीचे प्रयत्न आहेत, शेकडो वेळा केलेले; वेडावाकडा झालेला चेहरा आणि खडकाला चिकटून असलेला गाल, खांद्यानं दिलेला जोर, पायांचा आधार, ताणलेले हात याकडेच आपलं लक्ष जातं. कोणतीही खोली नसलेल्या अवकाशात आणि वेळेत शेवटाकडे त्याचं काम फत्ते झालेलं आहे. पण काही क्षणातच सिसिफसच्या समोरच तो खडक पुन्हा खाली गडगडत जातो. तिथून त्याला परत शिखरापर्यंत खडक ढकलत आणायचाय. तो परत पायथ्याकडे जातो.

त्या परतीच्या वेळी, तेव्हा तो थांबलेला असतो, तिथला सिसिफस मला आकर्षित करतो. दगडाच्या एवढा नजिक राहून तो चेहराच दगड बनल्यासारखा असतो. आपल्याला माहित नसलेल्या या कष्टाकडे जड पण ठाम पावलांनी निघालेला तो माणूस मी पाहातो. त्याच्या कष्टाप्रमाणेच परत परत येणारा तो श्वास घेण्यापुरता काळ हा जाणिवेचा काळ आहे. उंची सोडून तो पुन्हा खाली चालायला लागतो त्या प्रत्येक क्षणी तो त्याच्या प्रारब्धाच्या वरचढ ठरतो. तो त्याच्या खडकापेक्षाही सक्षम आहे.

हे मिथक दुःखदायक आहे कारण त्यातला नायक जागरूक आहे. जर प्रत्येक पावलाबरोबर तो पुढच्या प्रयत्नाकडे जातोय तर त्याचं दुःख कुठाय? सध्या कामकरी तेच काम आयुष्यात दर दिवशी करतात, त्यांचं प्रारब्धही असंगतच आहे. पण ज्या दुर्मिळ क्षणी जागरूकता येते तेव्हा ते दुःखद बनतं. देवांचा कामकरी असलेला सिसिफस सत्ता नसलेला आणि बंडखोर आहे; त्याच्या निष्ठूर परिस्थितीचा आवाका त्याला माहिती आहे. परत खाली येताना तो त्याचाच विचार करतो. त्याच्या यातनांमधे येत जाणारी स्पष्टता हाच त्याचा विजय आहे. तुच्छतेने कमी लेखता येणार नाही असं प्रारब्ध असत नाही.

दुःखानं जर खाली येता येत असेल तर आनंदानंही ते करता येईल. ही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीला दुःख आहे. पण जेव्हा आठवणीत पृथ्वीची चित्रं यायला लागतात, आनंदाची हाक अनावर होते, तेव्हा माणसाच्या हृदयात खिन्नता येते : हा खडकाचा विजय असतो. किंबहुना हाच खडक असतो. अमर्याद दुःख झेपायला अतिशय जड असतं.

आनंदाच्या नोंदी करण्याचा मोह झाल्याशिवाय कोणाला असंगतीचा शोध लागत नाही. 'काय! असल्या खुज्या मार्गांनी?' पण जग एक आहे. आनंद आणि असंगती हे एकाच पृथ्वीचे दोन पुत्र आहेत. ते अविभाज्य आहेत. आनंद हा असंगतीच्या शोधातूनच येतो असं म्हणणं चूकच ठरेल. अर्थात आनंदातूनच असंगतीची भावना येते. 'सगळं आलबेल आहे असं सांगून थांबतो', असं इडिपस म्हणतो आणि हे विधान पवित्र आहे. माणसाच्या मर्यादित विश्वात ते घुमत राहातं. सगळं संपलेलं नव्हतं आणि संपलेलं नाही याची जाणीव त्यातून होते. असमाधानातून आलेला आणि निष्फळ दुःखाला प्राधान्य देणाऱ्या देवाला हे विधान हुसकावून लावतं. प्रारब्धाला ते मानवी कृती बनवून टाकतं.

सिसिफसचे सगळे अबोल आनंद यात आले. त्याचं प्रारब्ध त्याच्याकडेच आहे. त्याच्या यातनांची पूर्वकल्पना तो समजावून घेतो तेव्हा सर्व मूर्ती गप्प होतात. विश्वातील शांतता पूर्ववत झाल्यामुळे पृथ्वीतील लहान लहान आवाज पुन्हा उठतात. सावलीशिवाय सूर्य नसतो आणि रात्रीचीही ओळख ठेवणं गरजेचं असतं. असंगत मनुष्य होकार देतो आणि न थांबणारे प्रयत्न करत राहातो. त्याच्या दिवसांचा तोच राजा आहे हे त्याला उमजलंय. आपल्या आयुष्याकडे परतून पाहण्याच्या त्या सूक्ष्म क्षणी, सिसिफस दगडाकडे परतत असतो तशाच प्रकारे, त्याला त्याचे प्रारब्ध निर्माण करणाऱ्या असंबद्ध कृती दिसतात; त्यानेच तयार केलेल्या या कृती त्याच्या आठवणीत जमा होता आणि त्याच्या मृत्यूनं त्या थांबतात. सगळ्या मानवी गोष्टींचा मानवी उगम समजल्यामुळे, रात्राचा शेवट नसल्याचं समजलेल्या अंध व्यक्तीप्रमाणे, तो चालतच राहातो. खडक अजूनही ढकलला जातोयच.

सिसिफसला मी पर्वताच्या पायथ्याशी सोडून देतो! प्रत्येकाला आपलं ओझं सापडतं. पण देवांना नकार देणारी आणि खडकांना ढकलणारी अत्युच्च बंडखोरी सिसिफस दाखवतो. सगळं काही आलबेल आहे असाच त्याचा निष्कर्ष आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्याशिवाय असलेलं हे विश्व त्याला वांझही वाटत नाही आणि निष्फळही वाटत नाही. त्या दगडाचा प्रत्येक अणू, काळोखानं भरलेल्या त्या पर्वतावरच्या प्रत्येक धातूचा कण या सगळ्यानंच जग बनतं. उंचीपर्यंत जायची ही लढाईच माणसाचं मन भरून ठेवण्यास पुरेशी आहे. सिसिफस आनंदीच आहे अशी कल्पना करायलाच हवी.

०३ नोव्हेंबर २०१२

तथागत कवी

- अशोक शहाणे

१९३१च्या १ नोव्हेंबरला अरुण कोलटकरांचा जन्म झाला. त्याचं निमित्त साधून कोलटकरांचे मित्र
आणि प्रकाशक अशोक शहाणे यांचा हा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतोय. कोलटकरांचं ('विकिपीडिया'सह अनेक ठिकाणी) नोंदवलेलं जन्मवर्ष १९३२ आहे, पण ते वास्तविक १९३१ आहे. हा उल्लेख प्रास प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या 'बोटराईड अँड अदर पोएम्स' ह्या कवितासंग्रहात आलेला आहे.
शहाण्यांचा लेख कोलटकर गेल्यानंतरच्या ३ नोव्हेंबर २००४ रोजी 'सकाळ'च्या 'सप्तरंग' ह्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. आज ३ नोव्हेंबर २०१२ आहे. शहाण्यांच्या परवानगीनं लेख इथं-




अरुण कोलटकर (photo from here)
नाहीतरी प्लेटोनं आपल्या मनातल्या प्रजासत्ताकात कवींसाठी जागा ठेवलीच नव्हती. कवी मंडळी अत्यंत कुचकामी व बेभरवशाची असतात, असं कारण देऊन.

या आक्षेपाला तडाखेबंद उत्तर भवभूतीनं दिलं होतं, की कविताबिविता तुमच्यासारख्यांसाठी लिहिलेलीच नाही मुळी. ती समजणारा आत्ता कुणी नसला तरी पुढं कधीतरी निपजेल. इथं नाही तर आणखी कुठंतरी. माझा 'समानधर्मा' कुणीतरी कधीतरी निपजेलच निपजेल. कारण काळाला काही मर्यादाच नाहीत अन्‌ जगसुद्धा खूप मोठ्ठं आहे.

कवितेसाठी 'धर्म' शब्द वापरणारा बहुधा भवभूतीच पहिला. जरी का तुकोबांना तेच अभिप्रेत असावं त्यांच्या या ओळीत : 'माझीया जातीचे मज भेटो कोणी.' ही जात कोणती? तर अर्थातच कवीची. कारण तसा तर तमाम कवीमंडळींचा जाहीरनामा त्यांनीच तर लिहून टाकला होता : 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने.'

हे सगळं भारुड आत्ता आठवायचं कारण म्हंजे कैक वर्षांपूर्वी अरुणनं दिलीपला (चित्रे) टीव्हीवरल्या मुलाखतीत दिलेलं मासलेवाईक उत्तर. दिलीपनं कोणत्याही मुलाखतीत शोभण्याजोगा मामुली प्रश्‍न विचारला होता : 'तू कविता कसा लिहायला लागलास?' यावर अरुणचं उत्तर होतं : 'देवानं मला सांगितलं, अरुण, पृथ्वीतलावर जा अन्‌ कविता लिही.'

यातला देव अर्थात उगाच. प्रश्न करणाऱ्यानं आणखी खोलात शिरू नये म्हणून त्याच्या वाटेत एक भलीथोरली धोंड म्हणून वापरलेला. पण त्याचबरोबर आपली कवितेबद्दलची समज भवभूती-तुकोबांशी जोडणारा.

या तुकोबांबद्दल पण मागं बोलताबोलता अरुण म्हणाला होता, 'विठोबाची न्‌ आपली डायरेक्ट ओळख नाही, तुकारामाची न्‌ आपली आहे, अन्‌ तुकाराम विठोबाला ओळखत होता.'

तुकोबांबद्दल आणखीसुद्धा त्याचं एक बिनछापील विधान मोठं मार्मिक होतं : साक्षात मरण पुढं उभं ठाकलेलं असताना माणसानं मोठ्ठ्यानं हसावं अशी तुकारामाची कविता आहे.

हे कुणा समीक्षकाला सुचणं दुरापास्त आहे. तिथं जातिवंत कवीच हवा.

आमच्या मित्रमंडळींपैकी अरुणनं अन्‌‌‌ दिलीपनं आपापल्या परीनं मराठी माणसाला तुकारामाची कवी म्हणून ओळख करून दिली. तुकाराम जाऊन साडेतीनशे वर्षं उलटून गेल्यावर. एरवी तुकारामाला थोर करून, संत करून, टिळेबिळे लावून, त्याच्या नावानं चमत्कारांची कुभांडं रचून त्याच्या कवितेचा विसर पाडण्यासाठी काय कमी खटपटी-लटपटी झाल्या होत्या का?

दिलीपनं लोकांना समजावणीच्या सुरात, जवळजवळ त्यांची मनधरणी करत, तुकारामाची कविता लावून धरली. अरुणनं त्याचा रोखठोकपणा लावून धरला. इतका, की अरुणच्या बहुतेक कविता प्रत्यक्ष घटनांवर किंवा प्रत्यक्ष माणसांवर रचलेल्या आढळतात. मग ती अगदी पहिल्या पुस्तकातली 'मुंबैनं भिकेस लावलं' असो, की इस्पितळाच्या कवितांची मालिका असो, की 'चिरमिरीत'ल्या तर सगळ्याच कविता, अन्‌‌‌ 'भिजक्‍या वही'तला यच्चयावत्‌ मजकूर. ही सगळीच माणसं खरीच आहेत, या सगळ्याच घटना पण खऱ्याच आहेत. अन्‌ तरी त्यांची कविता बनू शकते. जशी तुकारामाची बनली, जशी त्याच्याआधी नामदेवाची बनली.

अरुणला वस्तुस्थितीच वेगळी दिसायची. कवीच्या चष्म्यामुळंच हे होत असेल. एका बंगाली कवीनं समजून सांगितल्याप्रमाणं : कवीच्या लेखी देशाला काहीच खरेपणा असत नाही; त्याच्या लेखी एक नदी, एक झाड, एक फूल, एक दगड, एक बाई. या गोष्टी कितीतरी जास्ती खऱ्या आहेत किंवा तुकारामानं म्हटल्याप्रमाणं 'देश वेष नव्हे माझा, सहज फिरत आलो.'

हे अरुणमध्ये जोरदार होतं. 'चिरमिरी'त बळवंतबुवा 'त्यापेक्षा मी नाहीच मरत' म्हणतो ते त्यातनंच.
हे कोण म्हणतं? बळवंतबुवा की अरुणच? मरायच्या अठ्ठेचाळीस तास आधी पण तो म्हणत होता, 'ह्या गोष्टी मी मुंबईला परतल्यावर आपण बोलून ठरवू.' म्हंजे मरण त्याच्या लेखी नव्हतंच. तेव्हा तरी. ते प्रत्यक्ष येईल तेव्हाच खरं होणार होतं. त्याच्याआधी ती आपली निव्वळ एक कल्पना. काल्पनिक गोष्ट.

हे म्हंजे बुद्धाच्या 'तथात्व' सिद्धांतासारखं झालं. गोष्ट जशी मुळात आहे तशी ती जाणून घ्यायची. स्वतःला पार वगळून. तिच्या 'तथा'पणाला धक्का न लावता. बुद्धाला ही हातोटी जमून गेली होती. म्हणूनच तर त्याला 'तथागत' नाव पडलं. दुसरा तथागत मी पाह्यला तो अरुण.

०२ नोव्हेंबर २०१२

रेघ : दोन वर्षं


 'रेघ' हा ब्लॉग आत्ता ज्या पत्त्यावर सुरू आहे तिथं सुरू झाल्याला आत्ताच्या ऑक्टोबरला दोन वर्षं पूर्ण झाली. ह्या ब्लॉगवरची पहिली नोंद २३ ऑक्टोबर २०१०ची आहे.

यापूर्वी दुसऱ्या पत्त्यावर रेघ सुरू होती, पण तिथं तिची मर्यादा स्पष्ट झाली म्हणून ती थांबवली. रेघेचा तो पहिला टप्पा थांबला ती तारीख होती २ नोव्हेंबर २०१०. म्हणजे एकूण असे टप्पे टाकत आपण इथपर्यंत आलोय त्यात आजचा दोन नोव्हेंबर.

दरम्यान, अनेक गोष्टी झाल्यात.
'रेघे'वरच्याच गोष्टी म्हणून एकूण आठ ब्लॉग तयार करता आले.
ते असे-
भाऊ पाध्ये
नपेक्षा... अशोक शहाणे
श्री. दा. पानवलकर
हमीद दलवाई
कमल देसाई
सदानंद रेगे
तुळसी परब
वसंत दत्तात्रेय गुर्जर

हे ब्लॉग ज्या व्यक्तींसंबंधीचे आहेत त्याच व्यक्ती का निवडल्या याला कोणतंही लॉजिक नाही. आपण कोणाचंतरी वाचतो आणि मग ते आवडलं तर त्याबद्दल काहीतरी शोधायला पाहातो. पण शोधून शोधूनही काही सापडत नाही अशी अवस्था मराठीत अनेकदा होते. अशी अवस्था झाली तेव्हा आपल्या कुवतीनुसार जे जमवता आलं ते कात्रणांसारखं जमवून तयार झालेले हे ब्लॉग आहेत. अशा कित्येक माणसांबद्दल असं काहीतरी करता येईल, पण शेवटी आपली मर्यादा पडतेच. मूळ मुद्दा एवढाच की हे आठही ब्लॉग म्हणजे कात्रणवहीच्या पातळीवरचं दस्तावेजीकरण आहे. त्या पलीकडे त्यात काही आहे असा दावा नाही. संबंधित माणसांची काही प्राथमिक माहिती, काही फोटो, असल्यास पुस्तकांच्या नावांची यादी अशी कात्रणं एकत्र इंटरनेटवर सापडावीत एवढाच हेतू.

हे सगळं आज स्पष्ट करण्याची कारणं आहेत.
ह्या ब्लॉगांसंदर्भात एका ठिकाणी आपसूक छापून आल्यामुळे काही बरं म्हणणारे आणि काही वाईट म्हणणारे फोन आले. त्या निमित्तानं ह्याबद्दल आपण बोलून ठेवू, एवढ्याच हेतूनं ही नोंद.

बाकी, 'रेघे'बद्दल बोलायचं तर त्यात पर्यायी माध्यमं, भाषा, आणि मराठी साहित्य अशा तीन रस्त्यांनी रेघेचा प्रवास होत आलेला आहे, तो कितपत होत राहाणार याचा पत्ता नसला तरी साधारण 'रेघ' आणि इतर आठ ब्लॉग यांच्याबद्दल एकसंध बोलणं व्हावं यासाठीही ही नोंद आहे. 

'रेघे'चं फेसबुकवर खातं उघडून ठेवलं, त्याचा कितपत उपयोग होतो याची शंका आहेच. तरी ते अजून सुरू आहे.

माध्यमं उभ्या पद्धतीनं नाही तर आडव्या पद्धतीनं पसरायला हवीत, म्हणजे आडव्या रेघेसारखी. त्यात अशा एका ब्लॉगनं काही मोठा फरक पडत नाही. पण तरी आपली रेघ मारून ठेवावी ह्या हेतूनं हा ब्लॉग सुरू केला होता.

वरती जे आठ ब्लॉगांच्या लिंका दिल्यात, ते 'रेघे'चेच प्रकल्प म्हणण्याचं कारणही हेच आहे. आपण आपल्या पातळीवर माध्यमांचा वापर कसा करू शकतो? एक जनरल रस्त्यावरचा माणूस म्हणून आपण काय करू शकतो? आपल्याला वाटतं ते माध्यमांच्या माध्यमातून करू शकतो का? या प्रश्नांची खूप मोठी उत्तरं असतील. पण एका फुटकळ माणसाला समजा वाटलं की त्याला काही लेखक मंडळींबद्दल माहिती जमवायचेय आणि ती एकत्र करून ठेवायचेय आणि ती अजून कोणाला वाटल्यास उपलब्ध व्हावी, तर त्याच्या प्रयत्नाला व्यासपीठ आहे, ते सध्यातरी इंटरनेटचं. हे आधी जेवढे पैसे खर्च करून करावं लागलं असतं त्या तुलनेत खूपच स्वस्तात होतंय त्याचं कारणही इंटरनेटच.

म्हणजे या 'रेघे'चा हेतू काय तर पर्यायी माध्यमांचा वापर आपल्या कुवतीनुसार कसा करता येईल याचं एक उदाहरण तयार करणं. त्यात रेघ - हा ब्लॉग आणि वरती दिलेले आठ ब्लॉग यांच्या मदतीनं हे उदाहरण पूर्ण होतंय.

हे सगळं एकदा नोंदवून ठेवणं आवश्यक वाटलं आणि सध्या काही लोकांनी त्याबद्दल विचारलं, कोणी दुसऱ्या कोणीतरी विचारलेलं सांगितलं, अशा सगळ्या गोष्टींमुळे हे आज नोंदवून ठेवलं एवढंच.

३० ऑक्टोबर २०१२

मध्यमवर्गीयांचा पुढारी

- भाऊ पाध्ये

आपण कोसळल्याचं गेल्याच आठवड्यात बाळ ठाकरेंनी मान्य केलंय  आणि आता वर्षअखेरीपर्यंत तोंड उघडणार सल्याचं राज ठाकरे बोलून गेलेत. त्यामुळं दरम्यानच्या काळात आपण बोलू शकतो. आणि या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज भाऊ पाध्यांची पुण्यतिथी आहे. अशी सगळी निमित्तं साधत भाऊंचा हा बाळ ठाकरेंवरचा लेख 'रेघे'वर प्रसिद्ध होतो आहे. हा लेख मूळ १९९४-९५च्या आसपास 'महानगर'मध्ये आला असावा. पण त्याचा नक्की अंदाज नाही. जी फोटोकॉपी केलेली प्रत हातात आलेय ती फक्त या लेखाची चार पानं आहे, त्यात प्रकाशनाचा उल्लेख नाही, पण साधारण अंदाज. कोणाला या लेखाच्या मूळ प्रसिद्धीचा तपशील माहीत असल्यास सांगितला तर तसा बदल इथं करून घेता येईल.
भाऊंबद्दलचा ब्लॉगही 'रेघे'वरचा एक प्रकल्प आहे, तोही वाटल्यास पाहाता येईल.





मध्यवर्गीयांचा पुढारी
- भाऊ पाध्ये

प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात मला बाळ ठाकरेंचा एक निकटवर्तीय भेटला. गप्पा मारता मारता ठाकरे बंधू आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदर कसा दाखवतात, हे तो साभिनय सांगू लागला. ठाकरे बंधूंची ती रीत इतकी हास्यास्पद आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या कुचेष्टा करणारी की मला कपाळावर हात मारून घ्यावासा वाटला. ठाकरे बंधूंना आता सत्ता मिळवण्याची खाज सुटली होती. सत्तेमध्ये पैसा आणि लौकिक असतो एवढंच त्यांना ठाऊक होतं.

तीस-चाळीस वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्र बनवण्याचं श्रेय घेण्यात प्रसोपा (प्रजा समाजवादी पार्टी) आणि कम्युनिस्ट पक्षात स्पर्धा सुरू झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यापासून बाळ ठाकरे नावाचा एक नवा नेता क्षितिजावर चमकू लागला. दैनिक 'नवशक्ति'मध्ये छापण्यात येणारी त्यांची व्यंग्यचित्रं फारच लोकप्रिय झाली. मराठी माणसाचं कल्याण करण्यासाठी त्यावेळी जो तो धडपडत होता. एक एक मराठी माणूस आपल्या कळपात ओढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे एक ओंगळवाणी परंपराच सुरू झाली होती. ज्येष्ठ व्यक्तींबद्दल अनादर व्यक्त करण्याची. कोणीही कितीही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती असली तरी तिच्याबद्दल अनादर व्यक्त होईल असं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवरून बोललं जाऊ लागलं. याने काम केलं, त्याने काम केलं? असे प्रश्न विचारून प्रत्येकाच्या समाजसेवेची शंका घेतली जाऊ लागली. यातल्या अहमहिकेमुळे आपण किती खालच्या पातळीवर जातो याचं ज्याला त्याचा भूषण वाटू लागलं आणि कम्युनिस्ट-प्रसोपा या मराठी माणसाचं कल्याण करणाऱ्या मंडळींत 'शंकर्स विकली'च्या धर्तीवर मराठीतील 'मार्मिक'सारखं व्यंग्यचित्रं साप्ताहिक काढणाऱ्या बाळ ठाकरे यांची शिवसेनाही आली. प्रथम हे नवीन लोक कोण आहेत असं प्रत्येकाला कुतूहल होतं. पण एका दसऱ्याला त्यांनी प्रचंड सभा घेऊन आपली शक्ती सर्वांना दाखवली.

बाळ ठाकरे (Photo courtesy: BCCL)
बाळ ठाकरेंनीही सार्वजनिक सभेत बोलताना कोणत्याही आदरणीय व्यक्तीबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन बोलायला सुरुवात केली. म्हणूनच, शिवसेनेला काही शहाणे लोक संयुक्त महाराष्ट्राचं कार्टून म्हणत. याने देशासाठी काय केलं, त्याने देशासाठी काय केलं? ही ठाकरेंची भाषा. काहीही न करणाऱ्या मध्यमवर्गाला प्रिय. ही मध्यमवर्गीय प्रवृत्तीच बाळ ठाकरेंनी जोपासली. मध्यमवर्गाला नेहमी काळजी, देशावर प्रेम करण्याचा अधिकार कुणाला आहे? शिवसेनेने ठरवलं की तो इझमच्या मागे लागणाऱ्या मंडळींना नाही. आपल्याकडे ओंगळ बोलणाऱ्यांना मौलिक विचार मांडण्याचं श्रेय मिळतंच.

डाळिंब्या, दात कोरून पोट भरण्याची कला, किडकिडीत देहयष्टी या सी.के.पी. जमातीतील बाळ ठाकरे. त्यांच्या अंगावर प्रतिष्ठितपणाचा आव आणणारी शाल, त्यांच्या मनगटावर धार्मिक खूण असणारी रुद्राक्षाची माळ अशी हल्ली बाळ ठाकरेंची मूर्ती. मी 'नवशक्ति'मध्ये आलो तेव्हा त्या ऑफिसमध्ये त्यांचा संदर्भ आमच्या बोलण्यात निघत असे, बिनमहत्त्वाचा असा. खरं म्हणजे तो चांगला व्यंग्यचित्रकार होता. आमचा बाबा दळवी एक किस्सा सांगायचा. एका संपादकाला एक रेखाचित्र हवं होतं स्टॅलिनचं. तेव्हा बाळ ठाकरेने ते काढून दिलं. तो संपादक म्हणाला, 'धिस इज द पिक्चर आय वॉन्ट'. असा हा रेषांचा जादूगार मी येण्यापूर्वीच 'नवशक्ति- फ्री-प्रेस'मधून नाहीसा झाला. त्याची एक फूटपट्टी मात्र राहिली. तिच्यावर त्याची बाळ ठाकरे अशी सही (इंग्रजीतली) होती. ती तेवढी माझ्याजवळ राहिली. त्याच्याविषयी बोलणारा एक मित्र मला भेटला तो म्हणजे हरिन मेहता. तो अनेक गोष्टी सांगायचा माझ्याकडे. गुरुदत्तविषयी, व्ही. शांतारामविषयी आणि ठाकरेंच्या शिवेसेनेच्या हस्तकांविषयी. इंग्लिश भाषेतील शंकर्स विकलीच्या धर्तीवर त्याने त्याच वेळी मार्मिक नावाचं व्यंग्यचित्र साप्ताहिक काढलं होतं. पण शंकर आणि बाळ ठाकरे यांच्यात फरक होता की, शंकरने लहान मुलांसाठी लायब्ररी काढली, त्यांच्यासाठी चित्रकलेची स्पर्धा ठेवली, तर बाळ ठाकरेंनी मार्मिकमधून दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची यादी द्यायला सुरुवात केली. व्यंग्यचित्रकारात असलेल्या माणुसकीचा हा ऱ्हास होता. बाळ ठाकरेंमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही. सत्ताबाजांचं असंच असतं. ते आपले जुने मित्र विसरतात. मित्रांची किंमत लावून त्यांना जवळ किंवा दूर ठेवतात.

१९६२ साली भारताने चीनकडून मार खाल्ला. पासष्ट साली लालबहादूर शास्त्रींमुळे भारताची अब्रू जेमतेम वाचली. त्यावेळेस भारताची इमेज उजळ करणारी आशा दिसायला हवी होती. त्याकाळामध्ये प्रत्येक भारतीयाला आपण देशासाठी बलिदान करायला हवं असं वाटत असे. पण त्यापूर्वी युद्ध संपून जात असे. फक्त त्याला एक नेत्याचा आदर्श मिळत असे.

१९६५ साली आपल्याला लालबहादूर शास्त्री मिळाले. १९७१ साली आपल्याला इंदिरा गांधी मिळाल्या. पण आपली कर्तृत्वाच्या अतृप्ततेची भावना अतृप्तच राहिली. आपले निखारे कधी बुजत नसत. बाळ ठाकरेंसारखा त्यावर फुंकर घालायला होता एवढंच.

बाळ ठाकरे हे उजवे नेते की डावे? ज्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसमध्ये फूट पाडली, त्यावेळी डावे आणि उजवे गट स्पष्ट झाले. मोरारजी देसाई, स. का. पाटील, संजीव रेड्डी ही उजव्या गटाची माणसं एका बाजूला आणि इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम ही डावी मंडळी दुसऱ्या बाजूला एकत्र आली. यात अशाही काही व्यक्ती होत्या की ज्यांची आयडेन्टीटी स्पष्ट झाली नाही. त्यात बाळ ठाकरे. देशभक्त म्हणून उजवे, महाराष्ट्राचे कनवाळू म्हणून डावे. त्यांना स. का. पाटलांचे चमचेही म्हणत. पण निवडणुकांमध्ये डाव्या जॉर्ज फर्नांडिसांनी स. का. पाटलांचा पराभव केल्यानंतर स. का. पाटील राहिले नाहीत. मग महाराष्ट्राला वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री लाभले. त्यावेळी शिवसेनेला वसंतसेना म्हणण्यात येऊ लागलं. बाळ ठाकरेंनी उजव्या मोरारजींना मुंबईमध्ये प्रवेशास बंदी करून डावखोरेपणा दाखवला. पाकिस्तानाकडून होणारी फरफट आणि चीनकडून मार मिळाल्याची नामुष्की यामुळे भारतीयांमध्ये श्रेष्ठ कर्तृत्वाची व्यक्ती राहिली नाही आणि काही मंडळींना प्रमोशन मिळालं, त्यापैकीच एक बाळ ठाकरे होते.

चीनकडून दणदणीत पराभव आणि पाकिस्तानकडून होणारी फरफट यामुळे भारतीय कर्तृत्व नष्ट झाल्यासारखंच होतं. चीनच्या हल्ल्यानंतर जवाहरलाल नेहरू 'ए मेरे वतन के लोगो'च्या तालावर रडले तेव्हा आपलं रडकं कॅरेक्टर स्पष्ट झालं आणि आपल्याला कर्तृत्ववान नेतृत्वाची गरज तातडीने वाटू लागली. माझी एकदा एका अमेरिकन तज्ज्ञाशी गाठ पडली. ते दिवसत अमेरिकेच्या निवडणुकांचे होते. तो अमेरिकन तज्ज्ञ म्हणाला, ''तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाही होणार. ही निवडणूक निक्सनच जिंकणार. पण तुम्ही का त्यामुळे नाराज होता? जगातल्या चार बलाढ्या राष्ट्रांपैकी तुम्ही आहात.'' पाकिस्तानचा पासष्ट साली आणि एकाहत्तर साली पराभव करूनही आपण त्यांना पुढेही मार देऊ असं म्हणण्यास आम्ही धजत नाही. तसं म्हणण्याची आमची हिंमत नाही. म्हणूनच रडकेपणाला मिसाल नाही असं म्हणावं लागतं. या आपल्या स्वभावाचा फायदा बाळ ठाकरेंनी पुरेपूर घेतला. 

'अधिकार कसा जमवतो' याकडेच त्यांचं लक्ष लागलं असावं. म्हणूनच 'कभी ये कभी वो' करत सत्ता संपादन करण्याचा जुगार बाळ ठाकरे खेळत राहिले. एकदा ते मधु दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर बसले, तर एकदा आठवले-ढसाळ यांच्याबरोबर बसले. पण त्यांना ठाऊक होतं, प्रसोपा, आठवले-ढसाळ यांच्याबरोबर युती करण्यात अर्थ नाही. कारण त्यांना इँटलेक्च्युअल म्हणून ओळखतात. त्यांनी इँटलेक्च्युअल्स कधीच जमवले नाहीत. कारण त्यांना ठाऊक होतं की, इंटलेक्च्युअल्सच्या हातून काहीच व्हायचं नाही. त्यापेक्षा हे भाजपवाले (भारतीय जनता पक्ष) आपलं डोकं वापरत नाहीत हे बाळ ठाकरेंना बरं वाटायचं. त्यांच्याशी युती करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढून व्ही. पी. सिंग सरकारमध्ये फूट पाडली. त्यावेळी त्यांनी बेकेट मित्र राजा हेन्सीसारखं या भाजपवाल्यांना विचारलं असेल की, 'डू यू युज यूअर हेड?' बाळ ठाकरेंनी भाजपसारखे बिनडोक आणि टची सहकारी मिळवले आणि युतीचं सरकार बनवलं. जोपर्यंत इंदिराजी होत्या तोपर्यंत त्यांच्या मुसलमानधर्जिण्या स्वभावाचे दृष्टांत घेऊन भाजपवाले शरद पवारांच्या पाठीमागे उभे राहिले. पण इंदिराजींच्या पश्चात त्यांनी शिवसेनेबरोबर युती केली आणि शरद पवारांच्या विरोधी झाले.

अखेर बाळ ठाकरेंना सत्तेच दर्शन घडलं. काँग्रेसच्या उद्दाम सत्तेला त्यांनी आव्हान देऊन काबूत आणलं. या कामी त्यांना भाजपची मदत झाली. त्यांचा मुस्लिमविरोध आणि टचीनेस हा अयोध्येपासून महाराष्ट्रापर्यंत प्रसिद्ध होता. त्याचा बाळ ठाकरेंनी चांगलाच फायदा घेतला. भाजपवाले उच्चवर्णीय. काँग्रेसला प्रथम शत्रू मानणारे. शिवसेनावाले काही वेगळे नव्हते. हे एकत्र आल्यानंतर काय मन्वंतर घडतं ते सर्वांना बघायचं होतं. मन्वंतर घडणार नव्हतंच. दोघांचं राजकारण काँग्रेसच्याच मागील पानावरून पुढे जाणार होतं. देशभक्तीचा दावा करणाऱ्या या दोघांनाही रान मोकळं झालं. आता त्यांनाही देशभक्त म्हटलं जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

अत्रे ते बाळ ठाकरे यांच्यामध्ये शिवीगाळ नेहमी चाले. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांचे सहकारी असणारे बाळ ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे मुलाच्या बाजूने उतरले याचं मला आश्चर्य वाटलं. असो. आचार्य अत्रे कालांतराने वारले आणि या प्रकरणावर पडदा पडला.

बाळ ठाकरेंनी मग कम्युनिस्ट विरोधी टाकला आणि दाक्षिणात्य विरोध सुरू केला. दाक्षिणात्य परप्रांतीय असून ते मुंबईकर महाराष्ट्रीयांची गळचेपी करत आहेत असा प्रचार सुरू केला. फ्री-प्रेसमध्ये असं पिकलं की, बाळ ठाकरेंना एका दाक्षिणात्याने असा दम दिला होता की, त्याला नेहमी घरी जाताना संरक्षण लागत असे. दाक्षिणात्यांशी बाळचं वाकडं झालं त्याचं पुढे काय झालं ते मला ठाऊक नाही.

आपल्याविषयी जितके गैरसमज होतील तितके बाळला हवेच होते. गैरसमज हे एका सामान्य कर्तृत्वाच्या व्यंग्यचित्रकाराला राजकीय नेता होण्यासाठी आवश्यक असावेत. माझी खात्री आहे, प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला सत्तेचं आकर्षण असावं आणि आपण चार लोकांमध्ये गाजावं असं त्याला वाटत असतं. बाळला हे माहीत आहे की आपल्याला जे मिळतं ते याचमुळे. आपलं लोक ऐकतात ते त्यांना आपल्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे. भाजपवाल्यांना आपला मुस्लिमविरोध का, हे समजलं नाही. मुस्लिमांना ते देशाशी देणं-घेणं लागतात हे मानतच नव्हते. म्हणूनच देशभक्ती हा हिंदूंचाच मक्ता आहे असं ते समजत. त्यामुळेच मुसलमानांना ते देशभक्तीपासून वगळतात. त्यांना ज्याप्रमाणे जनता पक्षाला दूर फेकता आलं त्याचप्रमाणे आपल्यालाही दूर करता येईल, असंही बाळ ठाकरेंना वाटतं. बाळ ठाकरे याचसाठी मुस्लिमविरोधी भूमिका घेऊन भाजपचा काटा काढायचं नाटक खेळत आहेत.
***

भाऊ पाध्ये

०५ ऑक्टोबर २०१२

खऱ्या सोशल मीडियाच्या शोधात : शुभ्रांशू चौधरी

नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वांत मोठा धोका आहे, असं विधान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्याला आता सहा वर्षं उलटून गेली. बस्तर, दांतेवाडा हा छत्तीसगढमधला परिसर म्हणजे नक्षलवादी कारवायांचं देशातील एक मुख्य केंद्र. या परिसरासंबंधी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये बातम्या येत असतातच, पण या बातम्या म्हणजे बाहेरच्यांनी आतल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यासारखं असतं.    
या पार्श्वभूमीवर आदिवासींना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी स्वतःचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीबीसीसोबत काम केलेले पत्रकार शुभ्रांशू चौधरी यांनी 'सीजी नेट स्वरा'चा प्रयोग चालवला आहे. चौधरी स्वतः मूळचे छत्तीसगढचेच. त्यांचं शालेय शिक्षणही आदिवासीबहुल शाळेत झालं. अर्थात, त्याही वेळी आपण पहिल्या बाकावर बसायचो आणि आदिवासी मंडळी मागच्या बाकांवर, हे अजून त्यांच्या आठवणीत आहे. पुढं पत्रकारितेत आल्यानंतर त्यांनी बहुतांश काळ 'बीबीसी'साठी आणि दोन वर्षं 'द गार्डियन'साठी वार्तांकनाचं काम केलं. नक्षलवादी भागातून वार्तांकनाचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.


शुभ्रांशू चौधरी
'बीबीसी'सोबत दहा वर्षं काम केल्यानंतर वयाच्या पस्तिसाव्या वर्षी चौधरी यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, त्यामागं आदिवासींना स्वतःचं माध्यम मिळवून देण्यासंबंधी काय करता येईल याचा शोध घेणं हे मुख्य कारण होतं. पण असं आदिवासींसाठी माध्यम उभारण्याचं काम अवघड होतं. मुळात वर्तमानपत्र किंवा टीव्हीसाठी लागणारा पैसा परवडण्याजोगा नव्हता. मर्यादित अंतरात प्रसारण करणाऱ्या कम्युनिटी रेडियोच्या स्तरावर काही प्रयत्न करता आला असता, पण त्यासंबंधीच्या सरकारी नियमांमुळं बातम्यांशी संबंधित कृती या माध्यमातून करता येत नाही, त्यामुळं हा पर्याय रद्द झाला. या भागात इंटरनेटचा प्रसारही झालेला नसल्यानं तोही मार्ग बंद होता. एक माध्यम मात्र आदिवासी भागातही चांगल्यापैकी रुळलं असल्याचं चौधरींच्या लक्षात आलं. हे माध्यम म्हणजे मोबाइल फोन. या माध्यमाचा वापर करून, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन चौधरींनी 'सीजी नेट स्वरा'ची कल्पना २०१०मध्ये प्रत्यक्षात आणली. ('सीजी' ही 'सेंट्रल गोंडवन' या नावाचं प्रतिनिधित्त्व करणारी अक्षरं. इंटरनेटची या मॉडेलमधली महत्त्वाची भूमिका म्हणून 'नेट'. आणि मौखिकतेला यात प्राधान्य म्हणून 'स्वरा'.)

लोकशाही देशात सगळ्या लोकांना बोलण्याचा हक्क असणं आणि सगळ्यांनी एकमेकांचं बोलणं ऐकून घेणं हा समस्या सोडवण्याचा एक मुख्य मार्ग असावा, एवढाच 'सीजी नेट स्वरा'मागचा आशावाद.
०००

'सीजी नेट स्वरा'चं काम अशा प्रकारे चालतं -
छत्तीसगढमधील आदिवासी भागातील व्यक्तीला एखाद्या घटनेसंबंधी काही संदेश द्यायचा असेल तर तिनं आपल्या मोबाइलवरून 'सीजी नेट स्वरा'च्या फोन नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. 'सीजी नेट स्वरा'चं कार्यालय व या यंत्रणेचा सर्व्हर बंगळूरमध्ये आहे; तिथे एखाद्या व्यक्तीचा मिस्ड कॉल आल्यानंतर त्या व्यक्तीला फोन केला जातो. मग ती व्यक्ती कुरुख, गोंडी किंवा हिंदी भाषेमध्ये आपला संदेश सांगते.

हा संदेश सीजी नेट स्वराच्या बंगळूरमधील मुख्य कार्यालयातले पत्रकार रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड केलेला संदेश साधारण तीन मिनिटांचाच असतो. त्यानंतर या संदेशाची शहानिशा केली जाते. मुळात संबंधित व्यक्तीला आपल्या खऱ्या नावानंच असा संदेश देता येतो. या संदेशाचा सारांश इंग्रजीमध्ये सीजी नेट स्वराच्या वेबसाइटवर मूळ रेकॉर्डिंगसह प्रसिद्ध केला जातो. यामुळं जगभरातील माध्यमांना, पत्रकारांना व इतर सर्वांना तो संदेश ऐकता येतो. शिवाय एखाद्याला आपल्या फोनवरून संदेश ऐकायचा असेल तर तो बंगळूरमधील कार्यालयातील नंबरवर फोन करून संदेश ऐकू शकतो. साधारण दिवसाला तीन ते चार संदेश 'सीजी नेट स्वरा'वर रेकॉर्ड केले जातात.

image courtesy : CGNet Swara



संदेशाची शहानिशा करणं हा भाग काही प्रमाणात 'सीजी नेट स्वरा'च्या पत्रकारांच्या जबाबदारीवर होतो. पण त्यापलीकडे त्या संदेशाची बातमी करावी असं एखाद्या वर्तमानपत्राला वाटलं तर ते त्यांच्या स्त्रोतांमार्फत या संदेशातून दिलेल्या माहितीची तपासणी करतातच. आतापर्यंत द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांनी 'सीजी नेट स्वरा'च्या संकेतस्थळावरील संदेशांचा आधार घेऊन बातम्या दिल्या आहेत. (५ एप्रिल २०१० रोजी तादमेटला येथे सुरक्षादलांच्या  जवानांना मारल्याच्या घटनेनंतर वर्षभराने मार्च मध्ये याच गावाच्या पंचक्रोशीतील काही घरं जाळली जात असल्याची मूळ माहिती सीजी नेट स्वरावरच्याच माध्यमातून मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रांपर्यंत पोचली होती. अर्थात अशा वेळी बातमीची शहानिशा करणं 'सीजी नेट स्वरा'च्या यंत्रणेमधून शक्य होत नाही.)
०००

---मुलाखत---

- 'सीजी नेट स्वरा'च्या निर्मितीमागची भूमिका कोणती होती?
 आपल्या माध्यमांच्या व्यवस्थेत कुठल्याही विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वरून खाली पाहिल्यासारखा असतो. उदाहरणार्थ, नक्षलवादाची समस्या असेल, तर दिल्लीतील एखादी वृत्तसंस्था माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला छत्तीसगढमधल्या जंगलात पाठवेल आणि मग ती व्यक्ती तिथून दिल्लीला माहिती पाठवेल. यात त्या भागात राहणाऱ्या मंडळींचं खरं म्हणणं मांडलंच जात नाही. दिल्लीहून येणाऱ्या पत्रकाराला आदिवासींची भाषा पुरेशी येत नसते. त्यामुळे जे हिंदीत संभाषण साधू शकतात त्यांच्याशीच तो बोलू शकतो.  छत्तीसगढपुरता विचार केला तर मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रं व दूरचित्रवाणी वाहिन्यांत काम करणाऱ्या पत्रकारांमध्ये आदिवासी समाजातून आलेल्यांचं प्रमाण नगण्य आहे. या भागांमधील आदिवासींमध्ये गोंड व कुरुख या भाषा मुख्यत्त्वे बोलल्या जातात. या भाषा जाणणारे पत्रकार माध्यमांमध्ये कमी संख्येने असल्यामुळे आदिवासींच्या भावनांचं प्रतिबिंब माध्यमांमध्ये पडणं कठीणच आहे. कुरुख भाषेचं उदाहरण द्यायचं, तर ही भाषा बोलणारे २० लाखांहून अधिक लोक आहेत, पण या भाषेत ना एखादं वर्तमानपत्र आहे, ना टीव्ही चॅनल, ना एखादं रेडियो केंद्र.
'बीबीसी'मधली नोकरी सोडल्यानंतर आदिवासींशी संवाद साधताना मला लक्षात आलं की, नक्षलवादाच्या समस्येला भाषेचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. तुम्ही आमच्याशी संवाद साधत नसाल तर आम्हाला तिसऱ्या कोणाशी तरी संवाद साधावाच लागणार आणि हे तिसरे म्हणजे जर नक्षलवादी असतील तर त्याला दोषी कोण, असा सवाल आदिवासींकडून ऐकायला मिळाला. नक्षलवादाची समस्या ही मुळात नक्षलवादाशी संबंधित समस्या नसून संवादाच्या तुटीची समस्या आहे. ही संवादाची तूट भरून काढण्यासाठी मीडियाचं पर्यायी मॉडेल उभारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आणि त्यातून 'सीजी नेट स्वरा'चा जन्म झाला. आदिवासी परंपरा ही मुख्यत्त्वे मौखिक आहे याचं महत्त्व लक्षात घेऊन आणि या भागातील मोबाईलचा बऱ्यापैकी प्रसार पाहून मोबाईलचंच माध्यम वापरून आम्ही या मॉडेलचा पाया घातलाय.


- गेल्या दोन वर्षांतल्या 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदी पाहिल्या तर त्यातल्या ८५ टक्के हिंदीमध्ये आहेत तर १० टक्केच कुरुख भाषेत आहेत आणि उरलेल्या ५ टक्के गोंडी आदी आदिवासी भाषांमध्ये. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आदिवासी भाषांना प्रतिनिधित्त्व नाही, हा दोष दूर करण्याच्या हेतूनं सुरू झालेल्या 'सीजी नेट स्वरा'च्या उपक्रमातही आदिवासी भाषांमधून बोलल्या जाणाऱ्या नोंदीचं प्रमाण कमी आहे, असं का? यावर काय उपाय करता येईल?
तुमचं निरीक्षण रास्तच आहे. ही आमच्या क्षमतेची कमतरता आहे असं म्हणता येईल. ज्या लोकांना फक्त आदिवासी भाषाच बोलता येते त्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही. या भागातली परिस्थिती अशी आहे की, जिथपर्यंत डांबरी रस्ते आहे किंवा ज्या भागात जाणं सुरक्षित आहे तिथपर्यंतच 'सीजी नेट स्वरा'चं काम पोचलं आहे, रस्त्यांना लागून असलेल्या परिसरात राहणाऱ्या आदिवासींपैकी बहुतेकांचा हिंदीशी परिचय असतो, त्यामुळं ते आपलं म्हणणं मांडण्यासाठी पुढं येतात. पण त्या पलीकडे जंगलाच्या अधिक आतल्या भागात पोहोचणं विविध कारणांसाठी अतिशय अवघड आहे. त्यासाठी जेवढी सक्षम यंत्रणा हवी तेवढी आमच्याकडे आत्ता नाही. गेल्या तीन वर्षांत आम्ही प्रायोगिक तत्त्वावर 'सीजी नेट स्वरा'चा उपक्रम राबवतोय आणि किमान 'थिअरी'च्या पातळीवर आम्ही काही गोष्टी सिद्ध करायचा प्रयत्न केल्या आहेत. ज्याला 'मीडिया डार्क झोन' असं म्हणतात, म्हणजे जिथं माध्यमांचा अजिबात वावर नाही, अशा ठिकाणी माध्यमांचा रितसर नियमित वावर असू शकतो असं एखादं मॉडेल तयार करायचा आमचा प्रयत्न आहे. सध्या हे मॉडेल थिअरीच्या पातळीवर दिसत असलं तरी भविष्यात आपल्या मातृभाषेमध्येच बोलणाऱ्या आदिवासींचा या उपक्रमातील सहभाग वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. (अर्थात, 'सीजी नेट स्वरा'च्या माध्यमातून जेवढ्या कुरुख भाषेतील बातमी स्वरूपातील नोंदी झाल्यात तेवढ्याही पूर्वी कधीच कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या नाहीत.)


- आदिवासी भागातील गैरप्रकाराबद्दल एखाद्या व्यक्तीनं 'सीजी नेट स्वरा'वर माहिती दिली, तर पहिली शक्यता ही आहे की त्या व्यक्तीला संबंधित प्रशासकीय किंवा अन्य यंत्रणेकडून धोका निर्माण होईल. अशा प्रकारचे काही अनुभव तुमच्या पाहण्यात आलेत का? अशा घटनांमुळे 'सीजी नेट स्वरा'च्या कामाची व्याप्ती मर्यादित राहील का?
समाजातील रूढ पद्धतीमध्ये कोणताही बदल होऊ घातला की त्या बदलानं ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात ते त्या बदलांना हाणून पाडायचा प्रयत्न करतातच. 'सीजी नेट स्वरा'च्या बाबतीतही अशी अनेक उदाहरणं आहेत.
लिंगाराम हा छत्तीसगढमधला पहिला प्रशिक्षित आदिवासी पत्रकार आहे. मुळात आदिवासी पत्रकारांची छत्तीसगढमधील संख्या दोन आकडीही नाही. या पार्श्वभूमीवर लिंगाराम दिल्लीला पत्रकारितेचा अभ्यासक्रम करण्यासाठी गेला. पण नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नक्षलवादी असल्याच्या आरोपावरून त्याला तुरुंगात डांबण्यात आलंय. त्याची आत्या, शिक्षिका असलेल्या सोनी सोरी याही वास्तविक लिंगाराममुळंच अजूनही रायपूरच्या तुरुंगात खितपत पडून आहेत! लिंगारामला परत बोलावण्यासाठी त्यांना धमकावण्यात आलं आणि अखेरीस त्यांनी साहाय्य न केल्यामुळं पोलिसांनी त्यांनाही तुरुंगात डांबलं. त्यांच्यावरचे अत्याचार सुरूच आहेत. सोनी सोरी प्रकरणामुळे याबद्दल मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्येही चर्चा होतेय. लिंगाराम हा आदिवासींमधून पहिल्यांदा प्रशिक्षित पत्रकार म्हणून पुढं येत असलेला तरुण होता, आता त्याला पत्रकार म्हणून काम करायची संधी मिळण्याऐवजी तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
असंच दुसरं उदाहरण भान साहू यांचं. त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल 'सीजी नेट स्वरा'वर बातमी दिली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरमालकानं घर सोडण्यास सांगितलं. काहीच कारण दिलं नाही. साहू आदिवासी भागात राहात नव्हत्या, मात्र तिथल्या घटनांचं वार्तांकन त्या करत, पण त्यांच्या या कामामुळेच त्यांच्यावर दबाव येऊन घर सोडण्याची वेळ आली.
तिसरं उदाहरण अफझल खान यांचं. भोपाळ पट्टनम इथे मेकॅनिक असलेले खान 'सीजी नेट स्वरा'साठी बातम्या पाठवतात म्हणून पोलिसांनी अनेकदा त्यांच्या घराची झडती घेतली, धमकावणी केली.
अशी अनेक उदाहरणं आहेत. आदिवासी भागांमधून 'सीजी नेट स्वरा'साठी काम करणाऱ्यांना एकतर धमकावून काम थांबवण्यास सांगितलं जातं किंवा दुसरा मार्ग म्हणजे त्यांना काम थांबवण्यासाठी पैसे दिले जातात. 'लिंगारामची जी अवस्था झाली तीच तुमचीही होईल' अशा धमक्या दिल्या जातात. एखाद्या सरकारी कंत्राटादरम्यान पैसे दिले जातात. या अडथळ्यांमुळे अनेकांनी आमच्यासाठी बातमीदारी करणं थांबवलं, संपर्क तोडला.
पण याला पर्याय नाही. या गोष्टींना तोंड देणं हाच एक मार्ग असू शकतो. त्यासाठी आमची यंत्रणा सक्षम करणंही आवश्यक आहे.
याच मुद्‌द्यावर अजून एक सांगण्यासारखं म्हणजे आमचा सर्व्हर बंगळूरला आहे. तोही बंद पाडण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे कोणी केलं याचे पुरावे मी देऊ शकत नाही कारण अशा गोष्टी कायदेशीररित्या केलेल्या नसतात. बंगळूरमध्ये एका घरामध्येच आमचं कार्यालय होतं आणि तिथे सर्व्हर होता, तो तीनदा बंद पाडण्यात आला. आम्हाला आमची जागाही बदलण्यास भाग पाडण्यात आलं. यामुळं अनेक कटकटी होतात, एकतर आम्ही जो लँडलाईन फोन 'सीजी नेट स्वरा'च्या कामासाठी वापरायचो त्याचा नंबर सारखा बदलावा लागला. लँडलाईन फोनमुळं एकाचवेळी ३० जणांना 'सीजी नेट स्वरा'वरचे संदेश ऐकवण्याची सोय होती, पण आता जागा बदलण्याच्या त्रासामुळं आम्हाला या कामात मोबाइलचा वापर करावा लागतो, ज्याच्या माध्यमातून एका वेळी केवळ एकच व्यक्ती संदेश ऐकू शकते. यावर काही तांत्रिक उपाय करण्याच्याही प्रयत्नात आम्ही आहोत.


- 'सीजी नेट स्वरा'संबंधी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा आतापर्यंतचा प्रतिसाद कसा आहे?
अनेक पत्रकार व वर्तमानपत्रं 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदींकडे लक्ष ठेवून असतात असं आमचं निरीक्षण आहे. मुळात आम्ही मुख्य प्रवाहाशी स्पर्धा करत नाही, तर मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ज्या काही रिकाम्या जागा राहून जातात त्या भरण्याचं काम आम्ही करतो. उदाहरणार्थ, काही काळापूर्वी एका सचिव पातळीवरच्या अधिकाऱ्याची माओवाद्यांनी हत्या केल्याची बातमी आली. ही बातमी आम्ही 'सीजी नेट स्वरा'वर प्रसिद्ध करत नाही. कारण ही एवढी मोठी बातमी असते की त्यासंबंधी प्रत्येक माध्यमातून काही ना काही माहिती बाहेर येतेच, त्यामुळे 'सीजी नेट स्वरा'च्या व्यासपीठावर त्यासंबंधी नोंद प्रसिद्ध करण्यात आधीच मर्यादित असलेले स्त्रोत खर्च करण्यात अर्थ उरत नाही. या उलट काही घटनांची किंवा समस्यांची थेट आदिवासी भागांमधून आलेली माहिती मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना मदतशीर ठरू शकते. आमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार, मुख्य धारेतली माध्यमं 'सीजी नेट स्वरा'वरच्या नोंदीची दखल घेतात असं दिसतं. अनेक वर्तमानपत्रं ती माहिती स्वतःच्या स्त्रोतांकडून तपासून घेऊन प्रसिद्ध करतात.


- गेल्या महिन्यापर्यंत 'नाइट इंटरनॅशनल फेलोशिप'च्या माध्यमातून 'सीजी नेट स्वरा'ला आर्थिक सहकार्य मिळत होतं. येत्या काळात आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी इतर कोणते आर्थिक स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे?
सुरुवातीला आमच्या प्रयोगासाठी आम्ही इतर काही संस्थांकडून निधी मिळण्याच्या संधी तपासल्या. गेली तीन वर्षं 'नाइट इंटरनॅशनल फेलोशिप'ने पैशाची चिंता काही प्रमाणात मिटवली. यापुढे स्वतःच्या बळावर 'सीजी नेट स्वरा'चं काम चालावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणते आर्थिक स्त्रोत असू शकतील याचा शोध सुरू आहे. सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या बंगळूर शाखेतील विद्यार्थ्यांनी 'सीजी नेट स्वरा'वरती प्रकल्प बनविण्याचे काम सुरू केलंय यातून आर्थिक स्त्रोत सापडू शकतील. मुळात अधिकाधिक कमी पैशात स्थानिक पातळीवर माध्यम उभं करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमच्या डोक्यात जी कल्पना आहे त्यानुसार, एकूण तीस गावांचा समूह निश्चित केला जाईल (म्हणजे अंदाजे ३० हजार गावकरी), ही गावं स्वतःच स्वतःचा मीडिया सांभाळतील. हा मीडिया कम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल, रेडियो यांच्या एकत्रित यंत्रणेतून बनलेला असेल. हे मॉडेल शक्य तेवढं स्वस्त करण्यासाठी आणखी प्रयोग करावे लागतील. साधारण पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये आम्हाला 'सीजी नेट स्वरा'च्या पुढं जाण्याचा मार्ग सापडेल अशी आशा आहे. कोणालाही आपल्या परिसरात स्थानिक पातळीवर हे मॉडेल अंमलात आणता येईल अशी त्याची रचना असायला हवी. आम्ही आधी ज्या लॅपटॉपचा सर्व्हर म्हणून वापर करायचो, त्या जागी आता अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये मिळणारा लहान लॅपटॉप तिथं वापरायला लागलोय, 'सीजी नेट स्वरा'साठी आवश्यक असलेले चांगल्यातले मोबाइलही आता पाच हजार रुपयांपर्यंत मिळू शकतात. हा खर्च आणखी कमी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
एक उदाहरण द्यायचं तर गावातील देवळाचं देता येईल. असं देऊळ गावातील सर्वांच्या मदतीनं अस्तित्त्वात असतं. ते त्यांच्या कुठल्या गरजा कशा भागवतं हा वादाचा मुद्दा असू शकतो, त्यात आपण नको जाऊयात. पण हे देऊळ त्यांची भावनिक गरज असतं आणि ती भागवण्यासाठी ते स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात आणि सामोपचारानं त्या देवळाचा खर्च भागतो आणि ते टिकून राहातं. असंच मीडिया मॉडेल तयार करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न आहेत. यात कदाचित काही वर्तमानपत्रांना जोडून घेणं, स्थानिक दुकानदार, विक्रेत्यांच्या जाहिरातींचा वापर करणं असे आर्थिक स्त्रोत सापडू शकतील. पण हे सर्व स्पष्ट आराखड्याच्या रूपात सिद्ध करायला आणखी तीनेक वर्षांचा अवधी लागेल.


- सध्या आदिवासी भागात होत असलेला मोबाइलचा प्रसार पाहाता या माध्यमात इंटरनेट आणि नंतर सोशल मीडियाचीही भर पडण्याची शक्यता आहेच. आपला आवाज जगापर्यंत पोचविण्यासाठी आदिवासी मंडळी सोशल मीडिया वापरतील, असं काही भविष्यातलं चित्र असू शकतं का? आणि समजा असा वापर केला गेला तरी त्याचा प्रत्यक्षात काही बदल घडवण्यासाठी उपयोग होताना दिसेल का? सोशल मीडियाचं सध्या अस्तित्त्वात असलेलं स्वरूप प्रवाहाबाहेरच्या मंडळींच्या आवाज समजून घेईल की हा आवाज फेसबुक आदींच्या गोंधळात विरून जाईल?
यासंबंधी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, १९४७ सालचं. भारतानं आपण लोकशाही राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात येणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा जगभरात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. राष्ट्र म्हणून असलेलं अस्तित्त्वच एवढं विखंडीत असताना, लोकशाहीचा भारताचा प्रयत्न फसेल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल अशा शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण तरीही भारत टिकून आहे आणि कमी-जास्त प्रमाणात का होईना लोकशाही अस्तित्त्वात आहे. आणि सर्व दोषांचा विचार केला तरी लोकशाही हाच उपलब्ध पर्यायांमधला सर्वोत्तम पर्याय आहे हेही सिद्ध झालेलं आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना बोलण्याची सोय करून देणं हे आपलं काम आहे. मोजक्या लोकांच्या हातात (माध्यमांची) सत्ता केंद्रीत असणं ही सोपी गोष्ट आहे, त्या तुलनेत माध्यमांचं लोकशाहीकरण प्रथमदर्शनी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू शकतं. पण त्यातूनच काही सकारात्मक गोष्टी होतील...


- फेसबुकसारख्या मूलतः खाजगी कंपनी असलेल्या माध्यमाकडून या प्रक्रियेला कितपत हातभार लागेल? मुळात ज्या कंपनीचा हेतू नफा कमावणं हा आहे ती आदिवासींसारख्या आर्थिक नफ्याच्या दृष्टीने निरुपयोगी समुहाला सोईचं मॉडेल उपलब्ध करून देईल असं होऊ शकतं का?
आम्ही म्हणतोय तो 'सोशल मीडिया' म्हणजे कुठल्याही एका कंपनीवर, संस्थेच्या देणगीवर किंवा सरकारी मदतीवर अवलंबून असलेला नाही. हा खऱ्या अर्थानं सोशल मीडिया असायला हवा, म्हणजे लोकांनी त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून चालवलेला आणि त्यामुळेच त्यांना वापराचं स्वातंत्र्य असलेला.
माध्यमं सध्या श्रीमंतांच्या, मोजक्या उद्योगपतींच्या हातात आहेत त्याचं कारण माध्यम बनण्यासाठी जी यंत्रणा लागते ती महाग आहे; ती सुरू ठेवायला, तिचा सांभाळ करायला भरपूर पैसा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करणं आणि मोजक्या मंडळींकडून अधिकाधिक लोकांच्या हातात माध्यमं पोहोचवणं हा लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे.
आम्ही ज्या सोशल मीडियाची संकल्पना मांडतोय त्यात, समजा एका ठराविक दिवशी ७० टक्के मंडळी पाणीप्रश्नाबद्दल बोलत असतील तर ती त्या दिवशीची हेडलाईन असेल. सध्या जे मोजक्या मंडळींच्या निर्णयांवर हेडलाईनची निवड ठरते त्या ऐवजी ती लोकशाही पद्धतीनं ठरेल. यासाठी कम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल, रेडियो यांची स्वस्तात उपलब्ध होणारी एकत्रित यंत्रणा असणं हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे. 'सीजी नेट स्वरा'च्या माध्यमातून मोबाइल, इंटरनेट, कम्प्युटर यांचा वापर केला जातोय, यात रेडियोही समाविष्ट कसा करता येईल ते आम्ही पाहातो आहोत. मुळात बातमीचा प्रवास वरपासून खालपर्यंत होण्याऐवजी खालपासून वरपर्यंत होईल असा हा खराखुरा सोशल मीडिया असावा अशी आमची कल्पना आहे.
०००


०००
शुभ्रांशू चौधरी यांचं 'टेड'मधलं लहानसं व्याख्यान - माध्यमांचं लोकशाहीकरण ह्या विषयावर

०००

' सीजी नेट स्वरा'संबंधी 'रेघे'वर पूर्वी आलेली नोंद- तुमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं वय काय?

***

ही मुलाखत संपादित स्परूपात 'अनुभव' मासिकाच्या ऑक्टोबर २०१२च्या अंकात आली आहे.