२१ डिसेंबर २०१२

-

कागद होते, पेन होतं आणि शब्द होते. आणि एक झिरो होता. हिरो नव्हे. झिरो झिरो. झिरो हे त्याचं टोपणनाव. मूळ नाव शून्य. तर शून्याला लिहायचंय.
शून्य का लिहितो?
शून्याला त्याला हवे ते शब्द वापरता येत नाहीत, तरी?
शून्याला जे लिहायचंय ते कोणाला वाचायचं नाहीये, तरी?
शून्याला जी भाषा येते ती ढोंगी लोकांच्या ताब्यात आहे, तरी?
शून्याच्या भाषेला उडवणाऱ्या ढोग्यांना तो थांबवू शकत नाही, तरी?
तरी तरी तरी तरी शून्य का लिहितो.
शून्याला बहुतेक माहितेय की तो शून्य आहे. म्हणजे झिरो. हिरो नव्हे, झिरो झिरो.
म्हणून मग, तो पेनाने कागदावर लिहितो, त्याच्या डोक्यात येणारे शब्द.


फोटो : रेघ


***
काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावीं उत्तरें
टिनपट वा चोमडी
- बा. सी. मर्ढेकर
***

वाचेच्या चापल्ये     बहु जालो कुशळ।
नाही बीजमूळ     हाता आले।।

म्हणोनि पंढरिराया     दुःखी होते मन।
अंतरीचे कोण     जाणे माझे।।

पूज्य जालो अंगा     आला अभिमान।
पुढील कारण     खोळंबले।।

तुका म्हणे खूण     न कळे चि निरूती
सापडलो हाती     अहंकाराचे।।
- तुकाराम
***

१९ डिसेंबर २०१२

१२/१२/१२ : अबुझमाडच्या जंगलात

'तेहेलका'च्या वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या मजकुराचं मराठी भाषांतर. मूळ मजकूर- The Truth Behind the 12/12/12 Abujmarh Encounter
***


मुंगेली मडावी (फोटो : तेहेलका)
महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेवर, अबुझमाड जंगलातल्या वाला या गावात मुंगेली मडावी रडायचं थांबत नाहीत. त्यांचा १८ वर्षांचा मुलगा चैनू याचं नक्षलवाद्यांनी १२ डिसेंबरला अपहरण केलं. लगेच काही दिवसांनी पोलीस चकमकीत त्यांचा मुलगा मारला गेला. मुलाच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांना दोषी धरायचं की पोलिसांना हे अजूनही मडावींच्या ध्यानात येऊ शकलेलं नाही.

नक्षलवादी शस्त्रप्रशिक्षणासाठी मुलांना जबरदस्तीने उचलून नेऊ लागले, त्यानंतर बस्तरच्या उत्तर भागात परालकोट पंचक्रोशीत नक्षलवादी आणि पोलीस दोघांविरोधतही तीव्र रोष निर्माण झाल्याचं दिसतं. या संदर्भात पोलिसांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी कारवाई केली.

१२/१२/१२ असं गुप्त नाव देण्यात आलेल्या या कारवाईत १२ डिसेंबरला अबुझमाडच्या जंगलात अडीचशे पोलिसांनी प्रवेश केला आणि वाला नि सित्राम या दोन खेड्यांच्या दरम्यानच्या कुठल्यातरी ठिकाणी उभारलेला नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला. आपण आठ नक्षलवाद्यांना मारलं असून नऊ जणांना अटक केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. चैनू मडावीचं शव आणि 'आयईडी' (इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोजीव्ह डिव्हाईस) माध्यमांना पुरावा म्हणून दाखवण्यात आलं. ही कारवाई अत्यंत यशस्वी झाल्याचं पोलीस सांगत असले, तरी 'तेहेलका'च्या तपासणीत असं दिसून आलं की, नक्षलवादी नि पोलिसांच्या उंदरा-मांजराच्या खेळात गावकरी भक्ष्यस्थानी अडकले आहेत.

कांकेरचे पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणाले की, जंगलात शस्त्रांचं प्रशिक्षण शिबीर सुरू होतं असं ताब्यात घेण्यात आलेल्या सामग्रीवरून स्पष्ट होतं. पकडण्यात आलेल्यांच्या अंगावर नेहमीच्या कपड्यांवर नक्षलवादी गणवेष घातलेला होता. पण त्यापैकी बहुतेक जण १५ वर्षांखालचे असल्यामुळे त्यांना बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.

अटक झालेल्या नऊ जणांपैकी सहा जण सित्राम गावातील आहेत. त्यांपैकी चार जण - शांती नुरेटी, मुकेश्री यादव, राजी कवसी व सचिन मडावी - हे १३-१४ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नाहीत, असं गावकरी सांगतात. रामसू नायक नि अमन सिंग ठाकूर हे उर्वरित दोघे २० वर्षांचे आहेत.

बुधवारी (१२ डिसेंबरला) नक्षलवाद्यांनी प्रत्येक घरातून एक व्यक्ती - मुख्यत्त्वे मुलं- शस्त्रप्रशिक्षणासाठी पकडून नेली आणि शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू आला, असं गावकरी सांगतात. नक्षलवाद्यांनी जबरदस्तीने नेलेल्या सर्व मुलांना पोलिसांनी अटक केल्याचं नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं.

पोलीस आल्याआल्या नक्षलवादी पळून गेले, असं नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या एका १६ वर्षांच्या मुलाने सांगितलं. मागे राहिलेल्यांना पोलिसांनी घेराव घातला आणि चैनूला हातातली बंदूक खाली ठेवायला सांगितलं, चैनूने तसं करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. पोलिसांनी पहिल्यांदा गोळ्या झाडल्याचं या मुलाने सांगितलं.

मुलांना प्रशिक्षणाला पाठवण्यास जे लोक नकार देतील त्यांना नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या आणि दंडही ठोठावला, असं गावकरी सांगतात. प्रशिक्षण तळावरून अटक करण्यात आलेल्या सचिन मडावी या आठवीत शिकणाऱ्या मुलाची आई सुनिता मडावी सांगतात की, काही वर्षांपूर्वी सचिनच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर तोच कुटुंबातला एकमेव कमावता व्यक्ती होता. कथित चकमकीनंतर पोलिसांनी त्याला अटक करून जेव्हा ओळख पटवण्यासाठी गावात आणलं तेव्हा आपल्याला त्याच्या समोरही येऊ दिलं नाही, असा आरोप सुनिता करतात. पण, दोन दिवसांनी त्या पंखजूर पोलीस स्थानकात गेल्या तेव्हा त्यांना आपला मुलगा नक्षलवादी गणवेषात दिसला.

सचिनची आजी मौनीबाई सांगतात की, 'नक्षलवादी नेहमीच जबरदस्तीने मुलांना घेऊन जातात. सचिनचंही तसंच झालं. आम्ही शेतात झोपलेलो, तेव्हा अचानक नक्षलवादी आले नि जबरदस्तीने सचिनला घेऊन गेले'.

राजी कवासीचे वडील जुदूही या माहितीला दुजोरा देतात. ते सांगतात की, 'राजी तिच्या काकांबरोबर नारायणपूरमधे राहायची आणि मला भेटायला आठवड्याभरापूर्वीच गावी आली होती. ती पूर्वी कधीच नक्षलवाद्यांबरोबर नव्हती, पण ती पकडली गेली.'

शांती नुरेटीचे वडील संकू नुरेटी म्हणाले, 'सध्या कापणीचा मोसम असल्यामुळे आमचं सगळं कुटुंबच शेतात झोपलं होतं. तेव्हाच नक्षलवादी शांतीला घेऊन गेले.'

हीच कथा गावातल्या इतरांच्या तोडूनही ऐकायला मिळाली.

मसुराम उसेंडी (फोटो : तेहेलका)
सित्राम गावापासून नऊ किलोमीटरवर असलेले वाला गाव परालकोट पंचायतीमधे येतं. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी समको हिचे वडील मसुराम उसेंडी यांचा आपल्या मुलीची व्यथा कोणी कधी मांडेल यावर विश्वासच बसत नाही. समको गेली दोन वर्षं अंगणवाडीमधे आचारी म्हणून काम करत होती. बुधवारी दुपारी ती घरी जेवण तयार करत असताना नक्षलवादी जबरदस्तीने तिला जबरदस्तीने घेऊन गेले. वाला गावातून समकोबरोबर आणखी पाच जणांना नक्षलवाद्यांनी पळवून नेलं.

चैनूची आई मुंगेली सांगते, 'चैनू भीतीपोटी नक्षलवाद्यांसोबत जायचा आणि त्याला त्यांच्या बंदुका उचलायला सांगितलं जायचं.' वालापासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंखजूर पोलीस स्थानकात आपल्या मुलाचं शव ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या मुंगेली यांना अंत्यविधीसाठी पोलिसांकडून बाराशे रुपये देण्यात आले. पण परिसरातील दुर्गमतेमुळे त्या मुलाचं शव गावी परत आणू शकल्या नाहीत नि त्यांनी पंखजूरमधेच त्याला दफन केलं.

चैतुराम नुरेटी (फोटो : तेहेलका)
नक्षलवाद्यांकडून प्रशिक्षण मिळालेला पण पोलिसांच्या कारवाईपासून पळण्यात सफल झालेला सोळा वर्षांचा चैतुराम नुरेटी सांगतो, 'प्रशिक्षणासाठी आणखी तरुणांना आणायला मला जवळच्या कोंगे गावात पाठवलं होतं. पोलिसांची कारवाई झाली तेव्हा मी तळावर नव्हतो. कारवाई झाली त्या दिवशी सकाळी मुलांना शारीरिक कवायती शिकवल्या जात  होत्या.'

रुकानी आणि समारी मेतामी या अनुक्रमे आठ आणि दहा वर्षं वय असलेल्या मुलींशीही 'तेहेलका'ने संवाद साधला. त्या दोघीही प्रशिक्षण तळावर होत्या, पण प्रशिक्षण कशाचं होतं हे सांगणं त्यांना जमलं नाही. पण पोलीस आल्यावर नक्षलवादी पळून गेले आणि नंतर पोलिसांनी गोळीबार सुरू केला, असं मात्र त्यांनी सांगितलं.

पोलीस अधीक्षक राहुल भगत म्हणतात, 'नक्षलवादी लहान मुलांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देत होते. या कारवाईदरम्यान मानवाधिकारांचा भंग होणार नाही याची आम्ही अतिशय काळजी घेतली. (मृतांपैकी) दोन्ही मुली रमबती सोरी आणि मसलो परालकोट या स्थानिक दलमच्या सदस्य होत्या.' तळावरच्या कपाटातलं सामानही त्यांनी जाळल्याचा दावा पोलिसांनी केला, पण 'तेहेलका'ला घटनास्थळी कोणतंही कपाट सापडलं नाही.
रुकानी व समारी मेतामी (फोटो : तेहेलका)

या मोठ्या यशाबद्दल पोलीस स्वतःची पाठ थोपटत असताना, नक्षलवादी मात्र गप्प आहेत. गावकरी आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल संभ्रमित आहेत. आपण मुलांना भेटण्यासाठी तुरुंगात गेलो असताना पोलिसांनी आपल्याकडून कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

या भागातल्या गावांमधल्या मुलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला असून पुढच्या शुक्रवारी त्यासंबंधी बैठक बोलावण्यात आली आहे. जंगलातील आतल्या भागांमधील लोकांनाही बैठकीसाठी बोलावणं पाठवण्यात आलंय. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत गावकरी अडकले असून, एकीकडे त्यांना नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण शिबीरांना जबरदस्तीने स्वतःच्या मुलांना पाठवावं लागतंय तर दुसरीकडे त्यांनाच पोलिसांकडून अटक होतेय नि तेच जहाल नक्षलवादी असल्याचं चित्र उभं केलं जातंय.

१६ डिसेंबर २०१२

कुमार केतकरांना गहिवरून का आलं?

ही नोंद कुठल्याही वैयक्तिक आकसातून केलेली नाही. ज्यांना केतकरांची वैयक्तिक टिंगल इथे सापडेल असं वाटत असेल त्यांच्यासाठी ही नोंद नाही. मराठी पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही चर्चेत टाळता न येणारं एक नाव आणि ज्यांना त्यांच्या या क्षेत्रातील अनुभवामुळे प्रतिनिधी मानता येईल अशी व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याबद्दल ही नोंद करत आहोत.

यातला मुख्य संदर्भ आहे तो शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरच्या केतकरांच्या लेखांतून आणि टीव्हीवरच्या चर्चेतून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया. (यात बाळ ठाकऱ्यांबद्दलही आपण जे बोलू ते फक्त केतकरांच्या संदर्भातले विरोधाभास दाखवण्यापुरतंच असेल. अन्यथा टीका करायची तर बाळ ठाकरेच का, अमुक का नाहीत, तमुक का नाहीत, शरद पवार का नाहीत - असलं काहीतरी सुरू होतं.)

आणि अजून मुख्य संदर्भ म्हणजे कुमार केतकर ही व्यक्ती असं न पाहाता मराठी पत्रकारितेचं सध्याचं प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व म्हणून या नोंदीतल्या केतकरांच्या उल्लेखांकडे पाहावं.

केतकरांबद्दल (किंवा खरंतर कोणाहीबद्दल) वाट्टेल त्या खालच्या थराला येऊन बोलणारी व्यासपीठ इंटरनेटवर कमी नाहीत. तसं तर नकोच. पण काही गोष्टी नोंदवणं भाग आहे. यापूर्वीच्या 'रेघे'वरच्या नोंदीत जो तीन इंग्रजी छापील नियतकालिकांमधे आलेल्या माध्यमांसंबंधीच्या लेखांचा उल्लेख केला, तसं मराठीत कुठल्याही छापील व्यासपीठावर करणं अवघड असल्यामुळे आपण 'रेघे'वर ही नोंद करत आहोत.
***

एक

आता 'आयबीएन लोकमत' या वाहिनीवर निखील वागळे यांनी कुमार केतकरांशी मारलेल्या गप्पांकडे वळूया. बाळ ठाकरे यांच्या निधनानंतरची ही गोष्ट. १९ नोव्हेंबर २०१२ रोजी यू-ट्यूबवर हे व्हिडियो पोस्ट झाल्याची तारीख.

''कुमार केतकर इथे आल्याशिवाय आजचा कार्यक्रम संपणार नाही असा माझा आग्रह होता.'' असं म्हणून वागळे केतकरांना ठाकरे यांच्या निधनावरची प्रतिक्रिया विचारतात त्यावर केतकर म्हणतात, ''पहिली प्रतिक्रिया, म्हणजे मला आत्ता सांगतानासुद्धा गहिवरून आलंय, इतकी तीव्र होती.''

इथून सुरू झालेली ही दोन संपादकांमधली चर्चा 'यू ट्यूब'वर चार भागांमधे पाहाता येते.

 

 

 



पहिल्या भागात अनेक उल्लेख आलेत. केतकर 'मार्मिक'च्या सुरुवातीच्या काळात त्याचे वाचक कसे होते, तेव्हा 'मार्मिक'मधे कसं 'वाचा आणि थंड बसा' आणि नंतर 'वाचा आणि उठा' अशा घोषणा यायला लागल्या, त्यातून शिवसेनेचा जन्म, शिवसेनेच्या सहासष्ट सालच्या पहिल्या मेळाव्याला ते कसे उपस्थित होते - असं सगळं आलंय.

इथपर्यंत सगळं ठीक होतं.

यापुढे प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या प्रभावातून आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या डाव्या विचारांमधून शिवसेनेचा जन्म कसा झाला हेही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

दुसऱ्या भागात, मराठी समाजाला ठाकऱ्यांचं काय योगदान आहे, असा प्रश्न वागळे विचारतात त्यावर बोलताना केतकर म्हणतात की, '..ज्या मराठी माणसाच्या नावाने संयुक्त महाराष्ट्र होतोय, त्याच्या भवितव्याचा काय विचार आहे, काय योजना आहे, काय नियोजन आहे, अशा प्रकारची कोणतीही भूमिका संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतली नाही. की संयुक्त महाराष्ट्रात उद्योग मराठी माणसांकडे.. आम्ही मराठी माणसांना उद्योगाचं ट्रेनिंग देऊ. पण ते भांडवलशाहीच्या विरोधात असल्यामुळे उद्योगाचं ट्रेनिंग देऊ असं म्हणूच शकत नव्हते. त्यामुळे भांडवलशाही एका अर्थी नॉन-मराठी वर्गाकडे आणि कामगार वर्ग मराठी माणसाकडे होता पण त्याला मराठी म्हणून आयडेन्टिटी दिल्यामुळे त्याच्या वर्गजाणिवेला छेद गेला. आणि मराठी कामगार आणि नॉन-मराठी कामगार असं द्वंद्व सुरू झालं. नॉन-मराठी कामगार खूप कमी होता. त्या द्वंद्वातून मराठी अस्मिता अतिशय उग्रपणे, प्रखरपणे, कधीकधी अतिशय वाईटपणे पुढे आली त्याच्यामुळे मराठी अस्मितेचा चांगला परिणाम झाला. हा आत्मविश्वास द्यायला बाळासाहेबांनी मदत केली आणि दुसरीकडे राडा करणारा, भांडखोर, उग्रपणे दंगली करणारा, अशा मराठी माणसाच्या दोन विरोधी प्रतिमा तयार झाल्या.'

तिसऱ्या भागात, ठाकरे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि भारतीय जनता पक्षाची आणि हिंदुत्त्वाची कशी टिंगल करायचे आणि नंतर त्यांनी टॅक्टिकल भाग म्हणून भाजपशी युती कशी केली - हे सांगून केतकर म्हणतात की, 'पण यात त्यांच्या उत्स्फूर्ततेचा भाग होता, त्या अर्थी त्यांनी हिंदुत्त्ववाद स्वीकारला होता असं मला दिसलेलं नाही.. नायतर ते बाबरी मशिदीच्या जागी हॉस्पिटल बांधा म्हणाले नसते.'

'बाळासाहेबांच्या भाषणांमधे जात आणि धर्म सर्वसाधारणपणे यायचेच नाहीत. मतांपुरते बोलायचे ते सोड. त्यांच्या मनात तो मुद्दा नव्हताच. कोणत्याही भाषणांमधे बघ. ते हिंदुत्त्व वगैरे मधूनमधून बोलायचे ते सोड, असंही केतकर म्हणतात. आणि शेवटच्या भागात तर बाळासाहेब हळूहळू वैराग्याकडे झुकत होते, त्यांच्या कपड्यांमधे झालेला फरक बघ, आधी सफारी, नंतर कुडता आणि शेवटी तर भगवे कपडे', असंही केतकर बोलता बोलता बोलून गेलेत.

''निखील हे बघ, माझे त्यांच्याशी काय मतभेद होते तुला पूर्ण माहितेय. तुझेही मतभेद, तू तर मार खाल्लेला आहेस. तू पण समाजवादी परंपरेत वाढलेला आहेस, त्यामुळे तुझाही, म्हणजे त्या अर्थी वैश्विक डावा म्हणता येईल असा विचार आहे. म्हणजे कोणत्याही संकुचित विचारांमधे न बसणारा. पण मराठी म्हणून वाटत असतं ना आपली भाषा आपली संस्कृती आपला महाराष्ट्र या भावनेचा आधार बाळासाहेब ठाकरेच होते'', असं केतकर या भागात म्हणतात.

उत्स्फूर्ततेतून आलेली सामाजिक बांधिलकी हेच ठाकरे यांचं तत्त्वज्ञान असल्याचं केतकरांनी वारंवार या गप्पांमधे सांगितलंय. आणि या उत्स्फूर्ततेचे नकारात्मक परिणाम म्हणून कृष्णा देसाई खून, ९३च्या दंगली या गोष्टी झाल्या आणि तशा त्या जगभर झाल्यात, असंही सांगितलंय. पण नंतर ठाकऱ्यांनी उत्स्फूर्ततेतली नकारात्मकता कमी केली, असंही केतकरांच्या बोलण्यात आलंय.

हे सगळं आपण ऐकलं. त्यातलं थोडंच निवडून काढल्यासारखं नको, म्हणून मूळ व्हिडियो आणि शिवाय त्यातला आपल्याला बोलायचाय तो भाग तपशिलात वेगळा लिहून दिला.
***

दोन

केतकरांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'तेहेलका'त लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे - 'हाऊ टायगर गॉट हिज सॅफ्रॉन स्ट्रिप्स'. (वाघाला भगवे पट्टे कसे मिळाले)

यात केतकर म्हणतात-
''जर्मनीत नाझींचा उदय झाला तो आर्थिक अडचणीच्या काळातच. शिवसेनाही आर्थिक समस्या भडकली असतानाच स्थापन झाली. त्यावेळी काँग्रेसमधे मोरारजी देसाई, स. का. पाटील, अतुल्य घोष आणि अशी मंडळी (जी पुढे 'सिंडीकेट' म्हणून ओळखली गेली) उजव्या विचारांची उद्घोषणा करत होती. नेहरूंच्या मृत्यूनंतर स्वतंत्र पार्टी, जनसंघ आणि रामराज्य परिषद अशा उजव्या विचारांच्या पक्षांना राजकीय पाठिंबा मिळू लागला. काँग्रेसमधेही डावे आणि उजवे अशी सरळ विभागणी होत होती. यातूनच शीतयुद्धासारखं राजकारण सुरू झालं- काँग्रेसमधले डावे आणि कम्युनिस्ट पक्ष हे शक्यतो सोव्हिएत युनियनच्या बाजूने असत तर उजवे अमेरिकेकडे झुकलेले होते. याच वादातून १९६९मध्ये काँग्रेस फुटली. शिवसेनेने उजवी बाजू पकडली, पण क्वचित डाव्या घोषणा मात्र दिल्या!

हिटलरची स्तुती करण्याव्यतिरिक्त, बाळासाहेब महात्मा गांधी आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाविरोधातही बोलले होते. स्वातंत्र्यादरम्यान जन्माला आलेल्या पिढीला गांधी-नेहरूंच्या वारशाची खूपच अल्प जाणीव होती. श्रमिक वर्गाचे केंद्र असलेल्या मुंबईतून महाराष्ट्राच्या चळवळीचं नेतृत्त्व केलेली संयुक्त महाराष्ट्र समिती कोणतीही दीर्घकालीन योजना किंवा कामगारांसाठी एखादा डाव्या विचारांचा कार्यक्रम उभा करण्यात अपयशी ठरली होती, आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तिने स्वतःला बरखास्तच केले. स्वांतत्र्य चळवळीचा वारसा कमकुवत झाला असताना आणि काँग्रेस दुर्बलावस्थेत असूनही उजव्या शक्तींचं प्राबल्य दिसत असताना, तयार झालेल्या पोकळीत शिवसेना उदयाला आली; नव्याने तयार झालेल्या बेरोजगारांच्या आणि श्रमिक वर्गाच्या रस्त्यांवरील निदर्शनांतून. अस्थिर झालेल्या तरुणाईला हिंसेसाठी प्रोत्साहित करणं हा राजकाराणाचा भाग म्हणून स्वीकारला गेला होता. शिवसेनेचे अनेक नेते, आमदार, अगदी खासदारही त्या काळी रस्त्यावरच्या लढाईत होते.

या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांचा खून झाला. महाराष्ट्रातली ही पहिली राजकीय हत्या होती. देसाईंना मारणाऱ्या टोळीत तरुण शिवसैनिक होते आणि त्यांना खुद्द शिवसेनाप्रमुखांनी प्रोत्साहन दिलं होतं. त्यांनी आरोपींना पाठीशीही घातलं आणि त्यांचं संरक्षणही केलं. इतर डाव्या कामगार नेत्यांना ही एक सूचना होती.''
***

तीन

'फोर्ब्स'मधेही केतकरांनी ठाकऱ्यांवर लेख लिहिलेला. या लेखाचं शीर्षक आहे, 'बाळ ठाकरेज् फ्रॅक्चर्ड लीगसी'. (बाळ ठाकरे यांचा खंडित वारसा)

यात केतकर म्हणतात -
''हे खरंतर विचित्र आहे की जो माणूस स्वतःच्या मराठीपणाबद्दल अभिमान बाळगतो, मराठी अस्मितेसाठी लढतो, मराठी संस्कृतीचा पुरस्कार करतो आणि मराठी इतिहासाला जवळ करतो, त्याने शिवाजी महाराजांचे काही सोपे संदर्भ देण्यापलीकडे कधीच ऐतिहासिक संशोधनाला प्रोत्साहन देण्यात रस दाखवला नाही. त्यांच्यासाठी फक्त राजकारण महत्त्वाचं होतं, तेही विषयानुरूप नव्हे तर गर्दीला उसकवणारं तंत्र म्हणून. मुंबईतल्या परिघाबाहेर ढकलल्या गेलेल्या सामान्य लोकांना या मराठी अस्मितेच्या मुद्द्याने स्पर्श केला. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातही क्वचितच एखादी मोठी कंपनी मराठी माणसाच्या हातात होती, क्वचितच एखादा जागतिक आकांक्षा असणारा मोठा मराठी उद्योजक होता आणि शेअर बाजारातही आणखीच कमी संख्येने मराठी माणसं होती.

दुसऱ्या बाजूला, अमिताव घोष किंवा विक्रम सेठ यांच्या पातळीला पोहोचू शकतील असे कोणी मराठी लेखक नव्हते, अमर्त्य सेनांप्रमाणे नोबेल विजेते नव्हते, सत्यजीत राय यांच्या दर्जाचे मराठी चित्रपट दिग्दर्शक नव्हते. शिवसेना-भाजप युती सत्तेवर असताना बाळासाहेब सहजी काही चांगल्या संस्था उभारू शकले असते, ज्यातून या सगळ्याला प्रोत्साहन मिळू शकलं असतं. मराठीला वैश्विक भाषा बनवण्यासाठी ते प्रयत्न करू शकले असते. पण असला कसलाही प्रयत्न झाला नाही. कोणतीही दृष्टी नव्हती, कोणताही कार्यक्रम नव्हता, कोणतीही योजना नव्हती. त्यासाठी खरोखरच काही बौद्धिक काम करावं लागलं असतं. यातलं काही ना बाळासाहेबांना महत्त्वाचं वाटलं, ना त्यांच्या मुलाला, ना त्यांच्या पुतण्याला. त्यांच्या नावाने एखादी कला अकादमी सुरू करावी असंही त्यांच्यापैकी एकाला वाटलं नाही. (कदाचित त्यांना आता तसं वाटेल, बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करायचा असेल तर.)''

या लेखात शेवटच्या आधीचा परिच्छेद आहे-
''बाळासाहेबांनी मराठी लोकांमधे अभिमान जागृत केला हे आहेच, पण त्यांनी दुसऱ्यांबद्दल पूर्वग्रहही निर्माण केले. देदिप्यमान मराठी इतिहासाच्या बळावर त्यांनी लोकांमधे अभिमान जागा केला, पण इतिहास संकुचित पातळीवर आणून ठेवला. फक्त उच्चभ्रूंनाच स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालता यायचं. वर्गभेद तयार झाला.. मराठी माध्यमांच्या शाळांमधे सुविधा अपुऱ्या असतात, शिक्षण दुय्यम दर्जाचं असतं, शिक्षक फारसे उच्चशिक्षित नसतात. शिवसेनेच्या नेतृत्त्वाने त्यांच्या मुलांना उच्चभ्रू इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधे घातलं, आणि इंग्रजी नि हिंदीच्या प्रभावाबद्दल आक्रमकपणे बोलत राहिले''
***

चार

वरती जो मजकूर आणि केतकरांची जी विधानं दिल्येत ती मुद्दामहून जास्त तपशिलात दिल्येत, कारण सुटी वाक्यं उचलून टीका केलेय असं वाटू नये. शिवाय मूळ व्हिडियोंच्या, लेखांच्या लिंकही आहेत.

पहिला भाग आहे तो केतकरांच्या मराठी अभिव्यक्तीचा आहे आणि दुसरा नि तिसरा भाग हा केतकरांच्या इंग्रजी अभिव्यक्तीचा आहे. मराठी व इंग्रजी केतकरांमधला हा विरोधाभास यापूर्वीही 'रेघे'च्या एका खूप जुन्या नोंदीत नोंदवला होता. ही नोंद खाली प्रतिक्रियेच्या रूपात पूर्ण वाचायला मिळेल. यात वेगळं काही बोलायलाच नको एवढा विरोधाभास दिसतो.

वागळ्यांबरोरच्या गप्पांमधे ठाकऱ्यांच्या 'उत्स्फूर्त सामाजिक बांधिलकीवर' पूर्ण जोर आहे, आपल्या भावनिक आधाराचा उल्लेख आहे. 'तेहेलका' व 'फोर्ब्स'मधल्या लेखांमधे ठाकऱ्यांच्या हुकूमशाही वृत्तीचा आणि भावना उचकवणाऱ्या पण प्रत्यक्षात काहीच बदल न घडवणाऱ्या राजकारणाभोवती मांडणी केलेय.

ठाकऱ्यांनी जातीचं राजकारण केलं नाही, असे केतकर म्हणतात तेव्हा कोणाला मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळचं 'घरात नाही पीठ तर कशाला पाहिजे विद्यापीठ' हे विधान आठवू शकेल. किंवा रिडल्सच्या आंदोनावेळी दलित जनतेच्या मोर्चानंतर हुतात्मा चौकात शिवसेनेच्या नेत्यांनी गोमूत्र शिंपडून 'शुद्धीकरण' केलेलं आठवू शकेल.

केतकर उत्स्फूर्ततेच्या काहीशा नकारात्मक भागाचा उल्लेख करतात तेव्हा कोणाला, मेलेली माणसं आठवू शकतील. किंवा वरळीच्या दलित पँथरच्या मोर्चावेळी डोक्यात दगड पडून मेलेला माणूस. 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असल्या घोषणा आठवू शकतील. असं किती काय काय आठवू शकेल.

कामगार आणि मराठी यांच्या संदर्भात किंवा एकूण मराठी भाषा, मराठी संस्कृती यासंदर्भात केतकरांना बाळ ठाकरे जवळचे वाटतात. कामगार-मराठी संदर्भात नारायण सुर्वे नाहीत. किंवा जागतिक पातळीवर मराठीच्या संदर्भात अरुण कोलटकर नाहीत, किंवा असं हे कितीही सांगता येईल. मुळात असं जागतिक पातळीवर भाषा वगैरे बोलणं म्हणजेच उथळ आहे. पण साधा मुद्दा आहे, बंगाली भाषा म्हटली की, त्यातलं काहीही न वाचलेल्याच्याही समोर कोण येईल, तर रवींद्रनाथ टागोर. इंग्रजी म्हटलं की, साम्राज्यवाद पसरवणारी ईस्ट इंडिया कंपनी आठवेल की शेक्सपियर. दर्जा, मूळ आशय या बाजूने नाही म्हणत, पण भाषा-संस्कृती म्हटली की त्या भाषेचं काम केलेला माणूस कोणालाही पहिला आठवेल. पण यांना हे काय आठवतंय!
हे फार वाढवत नेणं महत्त्वाचं असलं तरी हा आपल्या नोंदीचा उद्देश नाही.

साडेचार
आपल्या नोंदींचा उद्देश आहे, तो केतकर मराठीत एवढं वेगळं आणि इंग्रजीत एवढं वेगळं का बोलतात?
आणि हा विरोधाभास तपासला का जात नाही? केतकर जे मराठी चॅनलवर बोलले ते सर्वसामान्य म्हणवल्या जाणाऱ्या मराठी माणसांनी ऐकलं. शिवाजी पार्कवर जमलेल्या लाखो लोकांपैकी बहुतेक लोकांना मराठी येतं, ते 'फोर्ब्स' किंवा 'तेहेलका' वाचत नाहीत. यावर आता कोणी असंही म्हणेल- केतकर तसलेच आहेत. पण मग आपण कसले आहोत?

'रेघे'वरची या पूर्वीची नोंद होती, त्यात इंग्रजी माध्यमांमधले बदल, त्यात नक्की काय चाललंय, सध्याची परिस्थिती काय आहे, माध्यमांची जी अवस्था आहे ती तशी का आहे, याबद्दल काहीतरी बोललं जातंय आणि तेही इंग्रजी भाषेतच, याबद्दल लिहिलं होतं. 'न्यूयॉर्कर' अमेरिकेतलं आहे, ते जरा बाजूला ठेवू. पण 'कॅरव्हॅन' किंवा 'तेहेलका'मधे किमान ह्या गोष्टींची दुसरी बाजू मांडली गेली. ढोंगीपणाबद्दल लिहिलं गेलं. शिवाय काही वेबसाईटींवरही अशी बाजू, तपासणी, चर्चा हे होतं. एक किमान पातळी सांभाळून हे होऊ शकतं. मराठीत असा विचार करणारे लोक आहेत, पण तरी मराठीत असं का होत नाही?

एकदम खालच्या थराला येऊन शिव्या घालणं किंवा मग गॉसिपच्या पातळीवर पेपरांच्या आतल्या बातम्या पत्रकारांच्या रोचक चर्चांपुरत्या देत राहाणं - या पलीकडे मराठीत थेट सवाल का विचारले जात नाहीत? सोशल नेटवर्किंगचा एवढा गवगवा होतोय, ब्लॉग आदी गोष्टी आहेत, पण एक चोख प्रश्न विचारायचं छापील किंवा ऑनलाईन व्यासपीठ मराठीत का नाही?

याची काय उत्तरं असतील. 
एक, आर्थिकदृष्ट्या मराठी ही वर्षानुवर्षं खंगलेली भाषा आहे.
दोन, आदरबिदर, मैत्रीबित्री, हितसंबंधबितसंबंध, असंच आहे ओ हे, सगळीकडे असंच असतं - अशी काही कारणं असतील.
उत्तरं माहीत नाहीत, पण ह्यामुळे किंमत कमी होते एकूणच सगळ्या बोलण्याची.
निखळ पातळीवर विरोध होईल इतपत माध्यमं सक्षम हवीत, ती नाहीत - असं आहे? की
निखळ पातळी म्हणजे काय, निखळ पातळीवर विरोध म्हणजे काय, हे आपल्याला माहीत नाही?
***

पाच

राडा - भाऊ पाध्ये
किंमत- १५० रुपये

क्लिक
ब्लर्बवरून-
१९७५ साली अलिबागमधून प्रकाशित झालेली ही कादंबरी वाचकांपुढे येण्यापूर्वीच शिवसेनेने तिची गळचेपी केली. हा सगळा प्रकार भाऊ पाध्यांनी एका लेखात नोंदवून ठेवला आहे - ''असं समजलं की प्रकाशकाला शिवसेनेच्या मंडळींकडून दम बसला होता आणि त्यामुळे त्याने 'राडा'च्या प्रती बाजारात विकायला काढल्या नाहीत. हीपण एक सेन्सॉरशिपच आहे. अर्थात माझ्यासाठी कोण आवाज उठवणार म्हणा.''

***



करविली तैसी केली कटकट।
वाकडे की नीट देव जाणे।।
- तुकाराम
***

१२ डिसेंबर २०१२

बाहेर आलेली पेस्ट आता परत ट्यूबमधे कशी घालणार?

'न्यूयॉर्कर'मधून
'न्यूयॉर्कर'ने ऑक्टोबर महिन्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या जैन बंधूंवर लेख प्रसिद्ध केला, त्यात 'आऊटलूक'चे आताचे संपादक कृष्ण प्रसाद यांचं एक विधान दिलंय- 'टूथपेस्ट आता बाहेर आलेली आहे, ती परत आत घालता येणार नाही.'

त्यांच्या या विधानाची पार्श्वभूमी समजण्यासाठी 'न्यूयॉर्कर'मधला पूर्ण लेख वाचावा लागेल.

समीर जैन फार बोलत नाही उघडपणे, पण विनीत जैनांनी त्यात एक विधान केलंय ते असं - 'आम्ही बातम्यांच्या व्यवसायात नाही, तर जाहिरातींच्या व्यवसायात आहोत.'

जैनांनी हे उघडपणे मान्य केलं.

याबद्दल आपण काही वेगळं बोलावं असं नाही. कृष्णप्रसाद यांनी त्यात असंही म्हटलंय की, 'प्रत्येक स्पर्धक सुरुवातीला त्रागा करतो, चिडतो आणि नंतर तेच स्वीकारतो. भाषा कुठलीही असो, भारतीय (माध्यमांच्या) बाजारातल्या प्रत्येकाकडे खूपच कमी पर्याय उरलेत.'

कॅरव्हॅन : कव्हर
'न्यूयॉर्कर'नंतर डिसेंबरमधे 'कॅरव्हॅन'नंही 'मिडिया इश्यू' काढला. त्यातही 'टाईम्स नाऊ'च्या अर्णव गोस्वामींवरच्या कव्हर-स्टोरीबरोबरच, समीर जैन यांच्याबद्दल लेख आहेच. यात गोस्वामींसोबत काम केलेल्या एका संपादकीय सहकाऱ्याने म्हटलंय, 'त्यांना बातम्यांपेक्षा टीव्हीची समज जास्त आहे. दूरचित्रवाणी माध्यमात काय चांगलं ठरेल याची ती समज आहे.' यात असंही एकाचं म्हणणं दिलंय की , 'आता इंग्रजी बातम्यांच्या वाहिन्या पाहा. हळूहळू सगळ्याच 'टाइम्स नाऊ'सारख्या दिसायला लागल्यात.'

जैनांना टाळून पुढे जाता येणार नाही, कारण त्यांच्यामागोमागच इतरांना जावं लागतंय अशी परिस्थिती आहे - हे बहुतेकांनी काढलेलं सार आहे.

'तेहेलका'मधून
झी-जिंदाल प्रकरणाच्या निमित्ताने 'तेहेलका'नेही माध्यमांच्या ह्या घडामोडींसंबंधी कव्हर-स्टोरी केली. जिंदाल यांच्या कोळशाच्या खाणींसंबंधीच्या कथित गैरव्यवहारावर बातम्या प्रसिद्ध न करण्यासाठी झी टीव्हीच्या संपादकांनी जिंदालबरोबर जाहिरातींच्या नावाखाली आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. जिंदालनी छुप्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून या व्यवहार उघडकीस आणला. या व्यवहाराच्या दोन्ही बाजू काळ्याच असल्यामुळे सगळंच अवघड.

यात 'तेहेलका'च्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी म्हणतात, 'या प्रकरणावरून बेडकाची एक जुनी रूपककथा आठवते. आपण ज्या पाण्यात पोहतोय, ते संथपणे गरम होतंय याचं भान ठेवलं नाही तर एक वेळ अशी येते जेव्हा आपण पूर्णच भाजून गेलेलो असतो.'

'तेहेलकात'ल्या लेखामधे 'एनडीटीव्ही इंडिया'चे व्यवस्थापकीय संपादक रवीश कुमार यांचं विधान दिलंय- 'या प्रकरणाकडे आपण कसं पाहातो तो मुद्दा नाहीये, तर या प्रकरणानंतर लोक आता आपल्याकडे कसं पाहातायंत हा खरा मुद्दा आहे. पत्रकारितेवर हा आणखी एक काळिमा फासला गेलाय. आधीपासूनच सुरू असलेल्या कुप्रसिद्धीमध्ये याने भरच पडणार आहे. आपण आपल्या 'कन्टेट'मुळे तशीही विश्वासार्हता गमावतो आहोतच. अशा प्रकरणांनी तर आपण पूर्णच उद्ध्वस्त होऊ.'

ही नोंद आपण करतोय ते रवीश कुमारांनी जे उद्ध्वस्तपणाचं म्हटलंय, त्याचा एक उल्लेख राहावा म्हणून. किमान त्याची नोंद करून ठेवावी म्हणून. काही तात्कालिक संदर्भ असतात, त्यापलीकडे जाऊन जी खोलातली म्हणता येतील अशी विधानं आहेत ती आपण इथे नोंदवली. नोंदीत उल्लेख केलेले लेख मुळातून ज्यांनी वाचले असतील त्यांना आणि जे आता वाचतील त्यांना एक प्रश्न : पेस्ट पुन्हा ट्यूबमधे कशी घालायची ते कोणाला माहितेय का?

१० डिसेंबर २०१२

दिलीप चित्रे : तीन वर्षं

दिलीप चित्रे
दिलीप पुरुषोत्तम चित्रे गेले त्याला आजच्या १० डिसेंबरला तीन वर्षं होतायंत. त्यांची आठवण ठेवायला हवी. काय करता येईल, तर सरळ त्यांच्याच तीन कविता देऊ -














एक माणूस
माणूस (फोटो : रेघ)

एक माणूस
रडण्याऐवजी चालत जातो पायाखाली येतील ते रस्ते
त्याच्या प्रत्येक पावलाएवढा अश्रू सांडतो एकेक रस्त्यावर.
एक माणूस...
दुःख झालं तर बडबडतो भलतंसलतंच
शब्दाने शब्द वाढवतो
एक माणूस
त्याच्या गळ्यातला विचार येत नाही कधीच जिभेवर..
एक माणूस
हसण्याऐवजी फक्त जोरात श्वास घेतो
भोवताली सर्वत्र हास्यध्वनी पसरतो
हादरतात इमारती, रस्ते गडाबडा लोळतात,
थरथरायला लागतं आकाश...
पण त्याच्या पोटातला धरणीकंप
तोंडावाटे पडत नाही कधीच बाहेर...
एक माणूस
वर्षानुवर्ष व्यवहार करतो झोपेतल्या झोपेत
क्वचित जागा होतो
आणि उन्हं घट्ट होतात त्याच्या चेहऱ्यावर.

पान २८६
***

विहीर

कोणी म्हणतात ही विहीर
आणि तसंही असेल.
मी आत डोकावलेलो नाही.
मी पाण्याचा आवाज
ऐकलेला नाही.
कसा असतो पाण्याचा आवाज?
पाण्यासारखाच का?
कदाचित् ही सुकलेली विहीर आहे.
आणि असेलही.
सुकलेल्या विहिरीतही आवाज घुमतो
आत वाकून हाक घालणाऱ्यांचा.
खडक (फोटो : रेघ)
पण मी आत वाकून
हाक घातलेलीच नाही.
कशी असते आत वाकून घातलेली हाक?
हाकेसारखीच का?
पाणी नाही. प्रतिध्वनी नाही.
रहाटाची कुरकुरसुद्धा नाही.
आणि तरीही मी कबूल करतो
की हीही विहीर असू शकेल
ही विहीर असेना का
मी हिच्याकडे पाठ करून बसलोय्.
खूप पूर्वीचं एक अंधुक आठवतं
की माझ्याच तहानेत खोलवर खणून
मी शोधून काढली होती
एक खरीखुरी विहीर.
हाकसुद्धा न घालता
मी स्वतःचा आवाज ऐकलाय् खडकांखाली.

पान ३२७
***

जन्मोजन्मी आम्ही

जन्मोजन्म आम्ही रचला अभंग
ओळी (फोटो : रेघ)
जगाचा वादंग सामावून

ना मोजल्या मात्रा चालताना यात्रा
असे आमरण व्याकरण

उठाठेव करा शब्दार्थाची तुम्ही
आम्ही ओळीतच पांगलेलो

मृदंगाशिवाय आम्ही दंगलेलो
विसरून सारी ताललय


पान ४१३
***

एकूण कविता-२ - मधून (पॉप्युलर प्रकाशन, आवृत्ती १९९५)
विजया चित्रे यांच्या परवानगीने या कविता इथे आहेत.
***

'रेडिफ'वर २००७मधे प्रसिध्द झालेली चित्र्यांची एक मुलाखत - पॉर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट.

***

०३ डिसेंबर २०१२

कुठली सीता, कुठला राघव?

- अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी

ही नोंद करण्यामागची निमित्तं तीन आहेत : १ डिसेंबरला (१९०९) कवी बा. सी. मर्ढेकर यांची जयंती होती. त्यानंतर २-३ डिसेंबर (१९८४) म्हणजे भोपाळमधे वायुगळतीनं जो भयानक प्रकार घडला त्या तारखा. आणि ५ डिसेंबर (२००७) ही म. वा. धोंड यांची पुण्यतिथी. अशी तीन निमित्तं साधून ही नोंद करतो आहे. मूळ नोंद अनिरुद्ध कुलकर्णींच्या 'लुकिंग अॅट कार्टून्स, गेटींग अलाँग' या ब्लॉगवर ६ डिसेंबर २००७ रोजी प्रसिद्ध झाली होती. मूळ पोस्ट इंग्रजीतली. कुलकर्णींच्या परवानगीने तिचं मराठी भाषांतर 'रेघे'वर प्रसिद्ध होतं आहे. बाकी संदर्भ नोंदीतून आपसूक स्पष्ट होतील बहुतेक. काही ठिकाणी सध्याच्या संदर्भांनुसार 'रेघे'तर्फे भर घातलेय आणि तसा उल्लेख केलाय. एकूण भरपूर निमित्तं एकाच नोंदीत घेतली गेल्येत. पण परस्पर संबंध स्पष्ट झाला तर झाला.



कुठली सीता, कुठला राघव?
-अनिरुद्ध गोपाळ कुलकर्णी (searchingforlaugh.blogspot.in)
६ डिसेंबर २००७

ही मूळ नोंद मी दोन दिवसांपूर्वी लिहिली. मला तिच्यात आता भर घालावी लागतेय त्याचं कारण दुःखद आहे. म. वा. धोंड यांचं वयाच्या ९३व्या वर्षी ५ डिसेंबर २००७ला निधन झालं. द. ग. गोडसे आणि दुर्गा भागवत यांच्याबरोबरीचे म. वा. धोंड हे जगातील काही महान कला समीक्षकांपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे ही नोंद आता त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरतेय.

धोंड यांच्याबरोबर मला खूपदा संवाद साधायला मिळाला. त्याबद्दल यापूर्वी मी ब्लॉगवर लिहिलं आहेच, अजूनही लिहीनच. त्यांचं मला आलेलं एक पत्र खाली देतो आहे.



त्यांच्या 'ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य' या 'क्लासिक' पुस्तकाची एक प्रत २००१ साली त्यांनी मला सही करून भेट दिली होती. ती प्रत घेताना मला जवळपास रडायला आलं होतं.

६ डिसेंबर २००७च्या 'पुढारी'मधल्या बातमीचा मथळा आहे : 'म. वा. धोंड अनंतात विलीन'.

नास्तिक असलेल्या धोंडांनी नक्कीच याबद्दल आक्षेप घेतला असता! पण ते नशिबवान ठरले, स्वर्ग आहे की नरक आहे की फक्त नथिंगनेस आहे याचा पत्ता आता त्यांना लागला असेल.

-- हा झाला धोंड गेल्यानंतर मूळ नोंदीला जोडलेला मजकूर

आता मूळ नोंद--

३ डिसेंबर २००७च्या 'एशियन एज'मधे एक हादरवून टाकणारा फोटो आहे-

'एशियन एज'मधला फोटो (३ डिसेंबर २००७)
 ''भोपाळ वायू दुर्घटनेची झळ पोचलेल्या मुलाला उचलून उभी असलेली आई... १९८४ साली भोपाळमधे झालेल्या जीवघेण्या वायू दुर्घटनेनंतर हजारो मुलं जन्माला आली, पण त्या रात्री ज्यांचे प्राण वाचले ते सांगतात की, त्या दुर्घटनेमुळे त्यांची मुलं कायमची पंगू झाली.''








फ्रंटलाईन : ७ डिसेंबर, २००७ रोजी आलेला मजकूर असा आहे-
''भोपाळमधे १९८४ला झालेल्या वायूगळतीच्या घटनेत वाचलेल्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जूनमधे माहिती अधिकाराच्या कायद्याखाली पंतप्रधान कार्यालयातून काही कागदपत्रं मिळवली आहेत. या दुर्घटनेच्या उत्तरादायित्त्वातून डाऊ केमिकल कंपनीला सूट देण्यास सरकार किती आतूर झालंय ते या कागदपत्रांधून स्पष्ट होतं.

...युनियन कार्बाईड कॉर्पोरेशनकडून भोपाळच्या दुर्घटनेसंबंधीची कोणतीही जबाबदारी घेण्यासंबंधी डाऊने सतत हात झटकले आहेत. पण अमेरिकेत मात्र कार्बाईडच्या अधिग्रहणामुळे निर्माण होणाऱ्या अॅस्बेस्टॉससंबंधीची जबाबदारी स्वीकारून त्यावर उपाय म्हणून या कंपनीने २.२ बिलियन डॉलरची तरतूद केलेली आहे. 'इंटरनॅशन कॅम्पेन फॉर जस्टीस इन भोपाल' या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत अॅस्बेस्टॉसने निर्माण होणाऱ्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांची जबाबदारी ही कंपनी घेत असेल, तर भोपाळच्या दुर्घटनाबाधितांची जबाबदारी ती का घेत नाही.''
***

आता जरा वेगळा विषय -
म. वा. धोंडांनी 'ललित'च्या दिवाळी अंकात (२००७) एक उत्तम लेख लिहिलाय. तुकाराम आणि बा. सी. मर्ढेकर यांच्या गरीबीसंबंधीच्या कविता वाचून त्याचा आस्वाद घेताना एकूण पददलितांबद्दल असलेल्या आपल्या समाजातील अनास्थेवर त्यांनी ताशेरे ओढलेत.

खाली मर्ढेकरांची एक मराठी कविता देतो आहे. यात शर्वरी ही एक कष्टकरी महिला शेणाचे गोळे करताना रामभक्त शबरीला सांगतेय की, तिची (शबरीची) भेट स्वीकारण्यासाठी राम आणि सीता आता काही अयोध्येतून दंडकारण्यात येणार नाहीत.

खप्पड बसली फिक्कट गाल
तळभिंतीवर घेउन जख्खड
मातीची ही जुनी झोपडी
आंबट मिनिटें चाखित रद्दड.

मधेंच दचकुनि बघते वरती,
अष्टदिशांचा सासुरवास;
चंद्रमौळि परि बेढब शबरी
क्षण-बोरांची रचिते रास.

मातीवरती करीत मात;
मिनिटांमधुनी काढित व्याधि;
तापकिरि-पिवळ्या मउ सालीचें
बोर गवसतां जरा सुगंधी,

कुरवाळित तें बोटांनी मउ
मिनिट सुवासिक हसते शबरी;
माणुसकीच्या दंडकांत अन्
गौर्या थापित वदे शर्वरी:

येइल का कधि सीतापति ग
चुकून तरि पण ह्या वाटेला?
घेइल का अन् रुजू करूनी
ह्या बोरांच्या नैवेद्याला?

कुठली सीता, कुठला राघव?
पुसे खडीचा रस्ता फक्कड़;
आंणि ठेविते गाल झोपडी
तळभिंतीवर फिरून खप्पड.


('आणखी काही कविता'मधून. मौज प्रकाशन)
***


'रेघे'ची भर : 'युनियन कार्बाईड' २००१मध्ये 'डाऊ केमिकल'ने विकत घेतली पण 'युनियन कार्बाईड'ने भोपाळमधे घातलेल्या धुमाकूळाची जबाबदारी स्वीकारताना मात्र हात झटकले. आता सरकारने आणि न्यायव्यवस्थेनेही या प्रकरणात कायमचे हात झटकले असून 'डाऊ' जबाबदारीमुक्त झाली आहे.
यासंबंधी 'इंडियन एक्सप्रेस'मधे आलेल्या विविध बातम्या इथे एकत्र सापडतील. 'हिंदुस्तान टाइम्स'मधे काल आलेली बातमी. 'विकिपीडिया'वरची नोंद.

भोपाळ दुर्घटनेचा उल्लेख निघालाच आहे तर रघू रायला बोलवायलाच पाहिजे. रघू राय यांनी भोपाळमधल्या त्या घटनेची भयानकता कॅमेऱ्यातून कायमची गोठवून ठेवलेय. पण आपण बहुधा एकूण व्यवस्था म्हणूनच गोठून गेलोय, त्यामुळे आपल्याकडे 'हृदयद्रावक'सारखे शब्द पुस्तकांमधून, लेखांमधून खूप वाचायला मिळतील, पण प्रत्यक्षात तसला भाबडेपणा कोण करेल!

भोपाळ : रघू राय यांनी काढलेला फोटो

३० नोव्हेंबर २०१२

बाळ ठाकरे, भांडवलदार आणि श्रमिक गरीब

- विद्याधर दाते

'टाइम्स ऑफ इंडिया' आतासारखा व्हायच्या आधी तिथे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केलेले विद्याधर दाते अजूनही विविध प्रकाशनांमधून लिहिते आहेत. त्यांचा हा लेख countercurrents.org या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या परवानगीने आणि त्यांच्या नजरेखालून हा लेख मराठीत अनुवादित करून 'रेघे'वर नोंदवून ठेवतो आहे. मुंबई आणि तिथल्या घडामोडी सुमारे अर्ध शतक दात्यांनी पत्रकाराच्या नजरेतून पाहिल्या, त्याचा दाखला देणारा हा लेख-
बाळ ठाकरे (फोटो - इथून)
बाळ ठाकरे हे मूलतः भांडवलदारांचं लाडकं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्यासोबत भांडवलदारांना सहज सोयरिक वाटायची. त्यामुळेच बहुतांश माध्यमांमधे त्यांचं व्यक्तिमत्त्व 'लार्जर दॅन लाईफ' रंगवलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल स्तुतिगान झालं.

शेक्सपियरच्या 'ज्युलियस सीझर' नाटकात मार्क अँटनीचा प्रसिद्ध संवाद आहे, 'माणसाची दुष्कृत्यं त्याच्यानंतरही जिवंत राहातात. चांगुलपणा मात्र हाडांसोबत गाडला जातो'. बाळ ठाकऱ्यांच्या बाबतीत असे काही प्रश्न उद्भवत नाहीत; त्यांनी दृष्कृत्यं केल्येत असं सुचवायचाही इथे हेतू नाही. त्यांच्या समर्थनार्थ लिहिणाऱ्यांची कमतरता नाही. ठाकऱ्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे शेक्सपियरचे निस्सीम चाहते होते. त्यांनी आपल्या तुटपुंज्या उत्पन्नातला इतका भाग पुस्तकांवर खर्च केला की त्यामुळे त्यांच्या आईला काळजी वाटू लागली आणि मग ते ग्रंथालयात बसून संशोधनात रमू लागले. बाळ ठाकरे आपल्या वडिलांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे होते. प्रबोधनकार हे विवेकनिष्ठ, कार्यकर्ता वृत्तीचे आणि महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांचे समर्थक होते, त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली. पण त्यांची आठवण सध्या कोणाला आहे? बाळ ठाकऱ्यांना गंभीर पुस्तकांचा फारसा उपयोग नव्हता.

ठाकऱ्यांना त्यांच्या सांप्रदायिकतेबद्दल, द्वेष पेरणाऱ्या वक्तव्यांबद्दल, अतिरेकी कट्टरतेबद्दल नेहमीच उदारमतवाद्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. पण भांडवलदारांशी असलेल्या त्यांच्या मैत्रीबद्दल मात्र त्यांच्या कार्यकाळात आणि नंतरही फारसं बोललं जाताना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेला इतरांचा, विशेषकरून विरोधी मत असलेल्यांचा सामना करू शकेल अशा लोकांची फौज लागतेच. डाव्या विचारांचा सामना करायला भांडवलदारांना शिवसेना हा चांगलाच साथी मिळाला.

ठाकऱ्यांच्या मृत्यूनंतर 'फेसबुक'वर केलेल्या पोस्टवरून दोन मुलींना अटक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केला गेला आणि तो योग्यच होता. पण आपल्याशी सहमत नसलेल्या व्यक्तीचा जीव घेणं हे तर त्यापेक्षाही घृणास्पद कृत्य आहे. शिवसेनेने तेच केलं आणि त्याच मार्गाने त्यांनी राजकारणात आपली वाट तयार केली. शिवसेनेचं दहशतीचं राजकारण १९७० साली कृष्णा देसाई या कम्युनिस्ट आमदाराच्या खुनापासून सुरू झालं. शिवसेनेचं अस्तित्त्व सिद्ध करणारी ही निर्णायक घटना होती. त्या काळी तुलनेनं सक्षम असलेल्या डाव्या चळवळीवर हा हेतूपूर्वक केलेला हल्ला होता. कम्युनिस्टांव्यतिरिक्त इतरही काहींनी या खुनाविरोधात आवाज उठवला. पण ही धोक्याची घंटा आहे याची जाणीव मात्र अजूनही अनेकांना नाही. शिवसेनेबद्दल लिहिणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांनी इतर अनेक वरवरच्या गोष्टींबद्दल लिहिलं, पण बाळ ठाकऱ्यांवर मात्र स्तुतीच उधळली. त्यांचा विनोद, मैत्रीपूर्ण स्वभाव याबद्दल त्यांनी लिहिलं, पण शिवसेनेच्या वर्गीय हितसंबंधांकडे मात्र बहुतेकांनी दुर्लक्ष केलं.

फॅसिस्ट आणि गुंड प्रवृत्तींना, किंवा श्रीमंत आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना विरोध करण्याबाबतीत बुद्धिजीवी मंडळी भ्यायलेली आणि निष्क्रिय असल्याचं बहुतेकदा दिसतं. जर्मनीवर नाझी सावट घोंघावत होतं तेव्हा या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करताना जर्मन कार्यकर्ता मार्टिन निएमोलर म्हणाला होता की, दुसऱ्यांवर हल्ला झाल्यानंतर तुम्ही काही करणार नसाल, तर तुमच्यावर हल्ला होईल तेव्हा तुम्हाला वाचवायलाही कोणी नसेल. बाळ ठाकऱ्यांना वाहण्यात आलेल्या भावनातिरेकी श्रद्धांजल्यांमधे एका गोष्टीला मात्र अगदी सार्वत्रिक बगल देण्यात आलेय, ती म्हणजे कष्टकरी लोकांच्या चळवळींवर शिवसेनेने केलेले आघात. त्या वेळी मी अगदी तरुण पत्रकार होतो. कृष्णा देसाईंच्या एका मारेकऱ्याचं वक्तव्य 'फ्री प्रेस जर्नल'मधील अनुभवी पत्रकार भालचंद्र मराठे सांगत असत, ते मला अजून आठवतंय. त्याने चाकू घुसवला आणि त्याची मूठ वळवली, कारण तसं केल्यावरच आतल्या भागाला पुरेशी इजा झाली असती. अत्यंत ओंगळवाणा खून. बाळ ठाकऱ्यांचं स्मारक होणं आवश्यक असेल, तर कृष्णा देसाईंचं स्मारक होणं त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे.

श्रीमंतांचे हितसंबंध जपून, गरीबांना हटवून जगभरातील शहरांची पुनर्रचना करण्यात येतेय, या संदर्भात बाळ ठाकऱ्यांच्या भूमिकेकडे पाहावं लागेल. शहरी जीवन, अर्थकारण आणि राजकारणाविषयीचे एक महत्त्वाचे विचारवंत डेव्हीड हार्वे हे या प्रश्नाबाबत मोलाचं बोलून गेलेत. शहरावर सामान्य माणसांचा अधिकार असायलाच हवा, शहरातील सेवांचा लाभ घेऊन विकासाला हातभार लावण्याचा अधिकार त्यांना आहे, असं ते म्हणतात. हा एक मूलभूत अधिकार मानला जायला हवा. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'रिबेल सिटीज्' या पुस्तकात ते दाखवून देतात की शहरही निदर्शनांची आणि बदलाची बलस्थानं ठरू शकतात, अमेरिकेत ऑक्युपाय चळवळीच्या बाबतीत असंच झालं.

गरीब मराठी माणूस हा ठाकऱ्यांचा मुख्य मतदार असला तरी त्यांनी गरीबांची बाजू फारशी कधीच लढवली नाही. कळीच्या मुद्द्यांवरील त्यांच्या उक्तीला कृतीची जोड फारशी मिळालीच नाही. पण मग त्यांच्या अंत्ययात्रेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचं विश्लेषण कसं करावं? हा प्रश्न फेसबुकवर जॉन गेम या ब्रिटिश व्यक्तीने अगदी योग्य पद्धतीनं विचारला. ते स्वतः मुंबईत सामाजिक काम केलेले गृहस्थ आहेत. पक्के डाव्या विचारसरणीचे गेम म्हणतात की, शिवसेनेने नागरिकांसाठी काही हितकारक कामंही केलं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

(अंत्ययात्रेला झालेल्या अफाट गर्दीचंच बोलायचं झालं तर, मार्क्सच्या अंत्यविधीवेळी जेमतेम अकराच लोक उपस्थित होते, याची आठवण आपण ठेवायला हरकत नाही).

होय, बाळ ठाकऱ्यांनी सामान्य लोकांच्या समस्या हातात घेतल्या, लोकांचं वैफल्य आणि आर्थिक निकड यांना दिशा दिली, पण हे सर्व त्यांनी नकारात्मक पद्धतीने केलं. त्यासाठी त्यांनी पूर्वग्रह पुन्हा पेरले, हिंसाचाराला खतपाणी घातलं. यात बहुतेकदा गरीब लोकच मार खाणाऱ्या बाजूला असत. परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही हेच झालं. श्रीमंतांनी घाबरावं असं ठाकऱ्यांकडे काही नव्हतं. पिळवणुकीवर भर देणारी आणि त्यातून लोकांचं लक्ष वास्तवातल्या समस्यांवरून उडवून लावणाऱ्या संघटना उभारणारी व्यवस्था आपण तपासली पाहिजे, त्याशिवाय एका संकुचित दृष्टिकोनातून ठाकऱ्यांवर टीका करणं फारसं बरोबर होणार नाही.

मुंबईतून गरीबांचं होणारं उच्चाटन थांबवण्याची अपेक्षा ठाकऱ्यांकडून ठेवली गेली होती. 'वाघ', 'सम्राट', 'मुंबईचा राजा' अशा अनेक उपाधी त्यांना दिल्या गेल्या. पण गरीबांना मदत करायची वेळ आली तेव्हा हा 'राजा' एवढा दुर्बल का झाला?

मुंबईचं निष्ठूर उच्चभ्रूकरण झालं आणि श्रमिक शहराची तिची प्रतिमा बदलून गेली, हे मुख्यतः ठाकऱ्यांच्या राजकीय कारकिर्दीतच घडलं. यातली शिवसेनेची भूमिका धडधडीतपणे दाखवणारं उदाहरण दादरमधल्या शिवसेना भवनासमोरच आहे. तुलनेने पर्यावरणपूरक असलेल्या या परिसरात उभी राहात असलेली काचेच्या तावदानांची पर्यावरणमारक इमारत कोणाच्या नजरेतून सुटू शकत नाही. याच इमारतीच्या अर्धवट बांधकामाच्या इथे उभं राहून शेकडो लोकांनी अंत्ययात्रेला प्रेक्षक म्हणून उपस्थिती लावल्याचं माध्यमांमधल्या फोटोंमधे दिसत होतं.

कोहिनूर गिरणी (फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / शशी अशिवाल)
नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनच्या कोहिनूर गिरणीची ही जमीन होती. सार्वजनिक जागांची कमतरता
असलेल्या या शहरात मराठी माणसाच्या बाजूने बोलणाऱ्या कोणीही ही जमीन सार्वजनिक वापरासाठी मिळावी अशीच मागणी केली असती. पण ही जमीन कोट्यवधी रुपयांना विकत घेण्यात आली. कोणी विकत घेतली तर राज ठाकरे आणि शिवसेना नेते मनोहर जोशींचा मुलगा उन्मेश जोशी यांनी. बांधकाम व्यवसायात दोघांचे घनिष्ठ संबंध आहेत. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १५ नोव्हेंबर २००९ रोजी आलेल्या बातमीनुसार या मालमत्तेमधला आपला वाटा विकून ठाकऱ्यांनी प्रचंड नफा कमवला.

माजी कसोटी क्रिकेटपटू माधव आपटे यांचे वडील लक्ष्मणराव आपटे यांच्या मालकीची ही गिरणी होती. आपटे हे मराठी माणूसच होते. आपट्यांची सांपत्तिक बाजू मजबूत होती. त्यांचा पेडर रोडला बंगलाही होता, तिथे आता वूडलँड्स अपार्टमेंटची गगनचुंबी इमारत उभी आहे.

कोहिनूर गिरणीची जागा रिकामी राहिली असती, तर आता शिवसेना ठाकऱ्यांच्या स्मारकासाठी जोरदार मागणी करत असताना सरकारला जागेची शोधाशोध करत राहावी लागली नसती. पण सार्वजनिक संसाधनं गिळंकृत करणं हे तर अगदीच सोपं आहे. त्यामुळे शहरातील तुरळक मोठ्या रिकाम्या ठिकाणांपैकी एक असलेल्या शिवाजी पार्कवर स्मारक व्हावं अशी मागणी होतेय. हे स्मारक म्हणून सिमेंट-काँक्रिटची कायतरी आक्राळविक्राळ वास्तू  उभारण्याऐवजी पर्यावरणपूरक असं काही बांधलं जावं, अशी आशाही ठेवता येणार नाही.

स्मारकं बांधण्याच्या बाबतीत आपल्याकडे प्रमाण आणि परिमाणांविषयीचं अज्ञान आहेच. काही दिवसांपूर्वीच मी नागपूरला गेलो होतो. ठाकरे यांच्या मृत्यूच्या आणि अंत्यविधीच्या दिवशीही तिथे दैनंदिन कामकाज सुरळीत होतं. कुठेही 'बंद' दिसत नव्हता. शहराच्या सीमेवर 'पसायदान' हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, तिथे संत ज्ञानेश्वरांचा अवाजवी मोठा पुतळा आहे.

महाराष्ट्राची व्यापक उदारमतवादी परंपरा ठाकऱ्यांनी मागे फिरवली. महात्मा गांधींचे गुरू होते गोपाळ कृष्ण गोखले आणि विशेष आवडते शिष्य होते विनोबा भावे. ठाकऱ्यांनी स्वतःला 'सेनापती' असा लष्करी नेतृत्त्वाचा किताब दिला आणि ते निर्दयपणे वागले. महाराष्ट्राचे दुसरे सेनापती राहिलेले सेनापती पांडुरंग महादेव बापट यांच्यापेक्षा ठाकऱ्यांची कामगिरी कितीतरी वेगळी होती! सेनापती बापटांनी इंग्लंडमधे महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान बॉम्ब बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि भारतात गांधीवादी मार्ग स्वीकारला. जगातील पहिल्या धरणविरोधी आंदोलनाचे नेतृत्त्व बापटांनी केलं. मावळ प्रांतातील मुळशी सत्याग्रहाचे ते प्रमुख आधार होते. मावळ प्रांतातील या लोकांचे पूर्वजच शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळे होते. नुकतंच पश्चिम बंगालमधल्या सिंगूरमधे घडलं, तसं मुळशीतली सुपीक जमीन सरकारने टाटांच्या ताब्यात दिली. ही घटना १९२१ची. गरीबांच्या जमिनीची ही लूटमार आता पुन्हा सुरू झालेय. मावळ्यांची ही जमीन हडपून तिथे नागरी वसाहती वसवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. नेहमी शिवाजीच्या नावाने घोषणा देणाऱ्या शिवसेनेने याविरोधात एक अक्षरही काढलेलं नाही, कारण राजकीयदृष्ट्या सोईची आणि पिळवणुकीला सोपी अशी ही जागा आहे. श्रमिक वर्गाचा पूर्ण इतिहास आणि वारसा उखडून टाकण्याच्या प्रयत्नांना थोपवण्यासाठीही शिवसेना काहीही करत नाही.

शिवसेना आणि भांडवलदारांमधील जवळकीचे संबंधी बहुतांशी राजकीय विश्लेषणात आणि विद्यापीठीय अभ्यासात दुर्लक्षिले जातात. पण इथेच मला आश्चर्याचा धक्का बसणारा एक लेख वाचनात आला. बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या या लेखातल्या शब्दांमागचा आशय आपण सहजी ओळखू शकतो. 'इकॉनॉमिक टाइम्स'मधे १९ नोव्हेंबरला पहिल्या पानावर छापून आलेल्या लेखात बजाज म्हणतात, 'माझे स्वर्गीय चुलते रामकृष्ण बजाज हे बाळासाहेबांचे खूप चांगले मित्र होते. संसदीय निवडणुका सुरू होत्या तेव्हा बाळासाहेब आणि माझे चुलते दोघेही कम्युनिस्टविरोधी होते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या तत्त्वांमधे काहीही साम्य नसतानाही त्यांचे संबंध चांगले होते.' निवडणुकांमधे काँग्रेसचा पाडाव झाल्यानंतर देशभर डाव्या चळवळींविरोधात संघटना फोफावत होत्या, तो हा काळ. काँग्रेसचं खालावणं आणि डाव्यांची आघाडी याने भांडवलदारांमधे चिंतेचं वातावरण होतं. यातील अमेरिकेच्या सहभागावर त्या काळचा कोणताही प्रामाणिक पोलीस अधिकारी किंवा राजकीय निरीक्षक प्रकाश टाकू शकेल.

ठाकऱ्यांकडे असलेल्या ताकदीबद्दल अनेक लोकांना अचंबा वाटायचा. 'टाइम्स ऑफ इंडिया'तले माझे वरीष्ठ सहकारी आणि आघाडीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यामध्येही ही भावना मी पाहिली. त्या दोघांनीही राजकीय व्यंगचित्रकार म्हणून १९४०च्या दशकात 'फ्री प्रेस जर्नल'मधून कारकिर्द सुरू केली. 'ठाकरे बघ किती पुढे गेले, नि मी इथे आहे', असं लक्ष्मण एकदा उदास स्वरात मला म्हणाले होते. लक्ष्मण यांच्याशी मी असहमत होण्याची ही अशी एकमेव वेळ होती!

सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तुलनेने बऱ्यापैकी जागरूकता आहे. पण पूर्वी असं फारसं नव्हतं. पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनाचं एक लक्ष्य ठरले होते ते इतिहासाचे मार्क्सवादी प्राध्यापक पंढरीनाथ विष्णू रानडे. ते कलासक्त होते, कवी होते आणि त्यांनी अजंठ्यातील कलेसंबंधी पुस्तकही लिहिलं होतं. हा १९७४ सालची गोष्ट. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं (१६७४) त्रिशताब्दी वर्ष. महाराष्ट्रात ते मोठ्या उत्साहात साजरं झालं. प्राध्यापक रानड्यांनी 'रणांगण' साप्ताहिकात याविरोधात सूर लावला. शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या मनात आदराचीच भावना होती पण शिवकालीन सामंतशाही पाहता सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे भक्ती करू नये असं त्यांचं मत होतं. यामुळे वादळ उठलं. रानड्यांची मराठवाडा विद्यापीठातील नोकरी गेली. भारतीय इतिहास परीषदेतील काही आघाडीच्या इतिहास अभ्यासकांनी या कारवाईचा निषेध केल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्यात आलं. एके दिवशी एका ठिकाणी व्याख्यान देऊन ते परतत असताना दादर पुलावर त्यांना शिवसैनिकांनी घेराव घातला आणि धमकी दिली. मी मधे पडायचा प्रयत्न केला तेव्हा मला मारहाण झाली, माझ्या चष्म्याचा चक्काचूर झाला. अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी 'महाराष्ट्र टाइम्स' या आघाडीच्या दैनिकाने संपादकीयातून रानड्यांवरच टीका केली. ही दुर्दशा आहे. बहुतेक लोकांचं सार्वजनिक आकलन पूर्णपणे वास्तवाच्या विपरित असतं. मी अनेक 'उच्चशिक्षित' लोकांना भेटलोय, ज्यांना असा पूर्ण विश्वास वाटतो की, १९९२-९३च्या दंगलींमधे मुस्लीम हिंसाचारापासून हिंदूंचं रक्षण ठाकरेंनीच केलं!

(फोटो सौजन्य : फ्रंटलाईन / विवेक बेंद्रे)
ठाकऱ्यांना ताकद पुरवलेल्या लोकांना दोषी ठरवणं सोपं आहे. पण आपली व्यवस्था मुळातूनच अनाय्य आणि पक्षपाती असल्यामुळे त्यांनी तसं केलं असं मला वाटतं. 'उच्चशिक्षित' लोक जर फॅसिस्ट वृत्तीकडे एवढे आकर्षित होत असतील तर सामान्य जनांनी त्या वृत्तीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना दोषी ठरवून काय उपयोग आहे!

उद्योगपती आणि कलासंग्राहक हर्ष गोएंका यांनी ठाकऱ्यांच्या निधनानंतर 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेली प्रतिक्रिया पाहा. त्यांनी ठाकऱ्यांना 'क्रांतिकारी' म्हटलं. या मूळ संकल्पनेच्याच विरोधात जाणारं हे विधान आहे. काही म्हणायचंच असेल तर ठाकरे प्रति-क्रांतिकारी होते, असं म्हणता येईल.

लता मंगेशकरांनी ठाकऱ्यांना दिलेल्या कट्टर समर्थनाची मुळं त्यांच्या वडिलांपर्यंत जातात. मास्टर दिनानाथ हे हिंदू राष्ट्रवादाचे जनक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे प्रशंसक होते. लताबाईंचे बंधू, संगीतकार हृदयनाथ यांनी विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमांमधे सावरकरांचा महिमा गायला आहे, अनेकदा ते चौकटीबाहेर जाऊन त्याबद्दल बोलत.

राजकीय पक्षांकडून आलेल्या प्रतिक्रियांपैकी, तात्त्विकदृष्ट्या सर्वांत स्पष्ट प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र विभागाचे सरचिटणीस डॉ. अशोक ढवळे यांच्याकडून आली. त्यांनी ठाकऱ्यांचं विश्लेषण वर्गीय दृष्टिकोनातून केलं.

'टाइम्स ऑफ इंडिया'त असताना मी ठाकऱ्यांच्या अनेक राजकीय मोर्चांचं वार्तांकन केलं. यातले अनेक मोर्चे वेधक होते आणि त्यांच्या कुशाग्र विनोदबुद्धीला दाद द्यावी अशी त्यांची भाषणं असत. काही वेळा माझ्या बातम्यांबद्दल ते खूष असत; त्यांच्या पत्नीचे बंधू आमच्या वृत्तपत्राच्या प्रशासकीय विभागात काम करत होते, त्यांच्याकडूनच हे मला कळे. पण शिवसेनेच्या विश्लेषणाचं बोलायचं तर दृष्टीकोन वस्तुनिष्ठच असायला हवा.

शिवसेनेमधल्या नकारात्मक गोष्टी खूपच आहेत. शिवसेना राज्यात सत्तेवर असताना मुंबईत खारमधल्या एका बैठकीत, ठाकऱ्यांनी एवढे खालच्या पातळीवरचे शब्द वापरले की मी खाजगी संभाषणातही ते वापरू शकलो नसतो. राजकीय वाद त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर आणून ठेवले. इतर राज्यांमधल्या कट्टर नेत्यांनीही अशी दहशतीची आणि द्वेषाची भाषा कधी वापरली नव्हती, शिवसेनेने ते करून दाखवलं!
***

विद्याधर दाते यांचा ई-मेल पत्ता - datebandra@yahoo.com

दात्यांचं 'ट्रॅफिक इन दी एरा ऑफ क्लायमेट चेंज' हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. 
या पुस्तकाबद्दल 'द हिंदू'मधे आलेला मजकूर.